ज्वालामुखींच्या सहवासात अर्थात हवाई बेटांची सफर
दिवाळी २०१७ - संकीर्ण
लोपा राजदेरकर 
  • लेखातील सर्व छायाचित्रं - कौस्तुभ कालकुंद्री, लोपा राजदेरकर 
  • Mon , 23 October 2017
  • दिवाळी २०१७ संकीर्ण हवाई बेट Hawaii island कीलाउएया Kīlauea मौना लोआ Mauna Loa मौना किया MaunaKea हालेमा'उमा'ऊ Halemaʻumaʻu

आमच्या दोन आठवड्यांच्या हवाईच्या वास्तव्याचे सगळे बारकावे आणि प्रत्येक अनुभव या लेखात उलगडून सांगणं शक्य नाही. तेव्हा मनाचा ठाव घेणाऱ्या विशेष अनुभवांपैकी हवाई डायरीतल्या दोन दिवसांच्या या निवडक नोंदी. 

ता.  १३ मे २०१७

पाण्याच्या ओढीनं हवाईला आलो, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं इथले जिवंत ज्वालामुखी बघण्याची उत्सुकता होती. शक्य असेल तिथं आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं परवानगी असेल तिथं हाईक करत volcanoes बघायचे हे ठरलंच होतं. पण volcanoes चे caldera सारखे भाग जवळून बघता येणं धोकादायक असल्यानं जवळून नजरेत भरणं अवघड. तेव्हा बिग आयलंड - म्हणजेच हवाई समूहातील मुख्य हवाई बेट - (यालाच हवाई असंही म्हणतात), इथं पोचल्याच्या पहिल्याच सकाळी हेलिकॉप्टर राईडचं बुकिंग केलं. आधी हेलिकॉप्टरनं जाऊन टेहाळणी करायची, मग नेमके कुठे कुठे पायी जायचं याचा अंदाज घेता येईल, हा त्यामागचा हेतू. तसंच हिलो-हवाईसारख्या ठिकाणी हेलिकॉप्टर टूर ठरवताना दिवसाची पहिली टूर घेणं जास्त चांगलं, हे हवाईला जाण्यापूर्वी केलेल्या वाचनात आलं होतं. कारण हवाईचा उत्तर-पूर्व हिलो परिसर म्हणजे अमेरिकेतलं एकमेव रेनफॉरेस्ट. इथं नेहमीच आभाळ दाटून आलेलं असतं, दुपारनंतर हमखास रोज पाऊस पडतो. 

gorgeous day म्हणतात, तशी ती सकाळ सुंदर निळं आकाश घेऊन अवतरली. वातावरणात कसलीच घाई नव्हती. मे महिन्याचे दिवस म्हणजे हवाईतला उर्वरित वसंत ऋतू, सगळीकडे वेडी रानफुलं हसत होती. अशा shire (संदर्भ : हॉबिट सिनेमा) मधून कोरलेल्या वाटेनं आम्ही विमानतळावर येऊन पोचलो. हेलिकॉप्टर राईडची रीतसर माहिती, सुरक्षिततेबद्दलच्या सूचना असे आवश्यक सोपस्कार आटोपले गेले. मग टारमॅकपर्यंत चालत गेलो. बाजूची दारं/खिडक्या नसलेल्या हेलिकॉप्टरमधून जाण्याची ही पहिलीच वेळ आणि त्यात हवाईचा वारा. एक चालक आणि आम्ही दोघे पॅसेंजर. टूर कंपनीच्या तांत्रिक सहाय्यकानं हार्नेस आणि सेफ्टी बेल्ट लावल्याची खात्री करून घेतली आणि उडायची परवानगी दिली. टेक ऑफ झालं आणि पायलट पॉलनं आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. तो स्वतः नौदलातून मरीन म्हणून नुकताच निवृत्त झाला होता. ते ऐकताच आम्ही एकदमच बिनधास्त झालो आणि त्या टूरची खरी मजा घ्यायला लागलो. बऱ्याचदा टूर कंपनीचे पायलट किंवा तांत्रिक कर्मचारी म्हणावे तितके अनुभवी नसतात. आपण नीट तपासून, भरपूर पैसे देऊन तिकिटं काढली असली तरी अपघाताचं प्रमाण दुर्लक्षित करता येत नाही. पण पॉलनं कुठेही बडेजाव न करता, त्याच्या लष्करी कारकिर्दीला शोभेल अशा उमदेपणानं आमचा विश्वास लगेच मिळवला. मग volcanoes च्या भागात पोचेपर्यंत हवाई बेटाची माहिती, तिथले त्याचे आवडते पॉइंट्स, अमेरिकन मिलिटरीचे गमतीदार किस्से, असं करत आमची शब्दश: हवाई मैफल जमली. हवाई बेटांत एकूण पाच volcanoes आहेत, त्यापैकी तीन- कीलाउएया (Kīlauea), मौना लोआ (Mauna Loa) आणि मौना किया (MaunaKea) (हवाई भाषेत मौना म्हणजे पर्वत) हे सक्रिय अवस्थेत असल्याचे मानले जातात. म्हणजे नजीकच्या शतकात आलटून-पालटून तिन्हींचा लावा उद्रेक झाला आहे. त्यापैकी कीलाउएया हा ज्वालामुखी १९८३ पासून सतत लावा ओततोय. आम्ही याच कीलाउएयाचा नजारा बघायला निघालो होतो. 

एका बाजूनं समुद्र सतत सोबतीला होता. दुसरीकडे गावाचा राहता भाग, वर्दळीचा परिसर सपासप मागे पडू लागला. आणि काही हजार फूट उंचीवरून कीलाउएया volcano चं हालेमा'उमा'ऊ (Halemaʻumaʻu) क्रेटर अर्थात ज्वालामुखीचं जिवंत मूख लांबून दृष्टीक्षेपात येऊ लागलं. तिथून निघणारा धूर ढगांना विळखे घालत जणू काही आकाशाला साद घालत होता. ढगात मिसळून आकाशात पसरणाऱ्या volcanoच्या धुराला vog असा पारिभाषिक शब्द आहे. त्या vog शी इथं चांगलीच ओळख झाली. आणि खाली बघतो तर काय, नजर जाईल तिथपर्यंत, क्षितिजापर्यंत लावा पसरलेला. इथं अख्खी गावं या लावानं गिळंकृत केली आहेत. पण त्या गावांचे कुठेही अवशेष म्हणायला दिसत नाहीत. कारण सगळे अनेक फूट लावा खाली दडलेले. जिवंत प्राण्यांची खूण नाही. मैलोनमैल पसरलेल्या त्या रखरखीत प्रदेशात दुरून एकच काय ते टीचभर हिरवं ठिगळ दिसलं. इथं झाडं तसंच हसरं गवत वाऱ्याशी खेळत होतं. हा एवढाच भाग वाहत्या लावाच्या कचाट्यातून सुटला होता! तसंच किनाऱ्यालगत अकस्मात तुटक रास्ता दिसतो - तोसुद्धा एखादी सुबक रेष मध्येच कोणीतरी खोडून काढावी तसा. मी त्याचे Road to the Past, ‘गतकाळाकडे नेणारा रस्ता’ असं नाव ठेवलं.

पॉलनं तितक्यात खुणावलं, ‘खाली कुठे काही लालसर दिसतंय का? लक्ष ठेवा’ म्हणाला. लावा दोन प्रकारे वाहतो, एक क्रेटरच्या तोंडातून आणि दुसरा लहान मोठ्या चीर गेलेल्या भेगांमधून. सध्या कीलाउएयाच्या लावा फील्ड्समध्ये अनेक भेगांमधून रोज नवीन ठिकाणी धुसफूस दिसते. त्या जागा मोठ्या लाल ठिपक्यांसारख्या दिसतात. त्याभोवती मग कमी लाल, केशरी, पिवळसर आणि शेवटी काहीसे पांढरट असे रंग बदलत जातात. लावाच्या अति उष्ण ते गार होण्याच्या प्रक्रियेबरोबर तसा रंगबद्दल होणं साहजिकच. ताजा व नुकताच वाहून पोचलेला लावा बराचसा चांदीचा वर्ख पांघरल्यासारखा, चकचकीत दिसतो. त्या उलट वाहणं थांबलेला, शिळा लावा द्रवपदार्थ आटून सूर्यप्रकाश परावर्तित न झाल्यामुळे जास्त काळसर आणि कोरडा दिसतो. कुठे आकृतिबंध रेषा, कुठे वाहता वाहील तसा वेडावाकडा, कुठे पीळदार, कुठे सांडलेल्या केकच्या बॅटरसारखा. फक्त काळा.

अशा भन्नाट कल्पना-स्वाऱ्या करत होते, तोच कौस्तुभच्या हाकेनं सतर्क झाले. सल्फरचा वास आणि क्रेटरच्या भोवती वाहत्या लावाचा उष्णपणा एकदमच जाणवू लागला. आता क्रेटरच्या अगदी जवळ पोचलो होतो. आणि काही कळायच्या आत, wow केवढी ही प्रचंड पोकळी? सकाळच्या कोवळ्या प्रकाशात आमच्या पुढ्यात त्या राक्षसी मापाच्या वाडग्यात नॉन स्टॉप अग्निद्रव ओतल्या जात होता. कीलाउएयाचा शब्दशः अर्थ ओकणं, spewing. ११०० डिग्री सेल्सियस (-२००० फॅरेनहाईट) च्या वर तापमान असलेला उकळता, सळसळतालावा त्या क्रेटरच्या कडेतून, आत तयार झालेल्या लावा ट्यूबमधून लाटा उसळाव्यात तसा फेकल्या जात होता. त्याचबरोबर तिथून उठणारा vog तिथलं वातावरण आणखीन गंभीर करत होता. आत्तापर्यंत इतक्या ठिकाणी फिरून आलो, कितीतरी नैसर्गिक चमत्कार बघितले, तरी या volcanoनं बाजी मारली! इथल्या देखाव्याबद्दल पूर्वानुमानित अपेक्षा ठेवून आलो नव्हतो, पण कोणतीही कल्पना केली असती किंवाकरता आली असतीतरी अपुरीच पडली असती, इतकं समोरचं दृश्य अचंबित करणारं होतं. 

आम्हाला क्रेटर सगळ्या बाजूंनी नीट दिसावं म्हणून पॉलनंहेलिकॉप्टर क्रेटरच्या भोवती सावकाशपणे तीन-चारदा फिरवलं. समोरचं दृश्य बघून मनात उमटणारे विचार आणि हेलिकॉप्टरचा जाणवणारा नियंत्रित वेग यांनी एव्हाना माझ्यावर पूर्ण कबजा केला होता. आपण आत्ता या क्षणी अपघातानं पडलो तर काय असं मनात येऊन गेलं. तसं झालं तर काही नाही, पडता क्षणी खलास. का आहुती म्हणायचं? पूर्वी असं काही घडलं असेल का? आपल्याकडे अग्नीला पवित्र मानतात, तसं हवाई बेटांतही. पेले (Pele) ही इथली अग्नी देवता, ज्वालामुखीची देवतासुद्धा. कीलाउएया volcanoचं हालेमा'उमा'ऊ क्रेटर हे पेलेचं निवासस्थान, अशी इथल्या जुन्या लोकांची धारणा आहे. पेलेच्या अनेक गोष्टी व मिथकं इथं ऐकायला मिळतात. volcanoचा उद्रेक, लावापासून रक्षण व्हावं या विश्वासानं पेलेची उपासना पूर्वीचे लोक करत. आपण ज्याला नैवेद्य म्हणू असं काहीबाही तिला अर्पण केलं जाई. पेलेव्यतिरिक्त इथं इतर अनेक देवता आहेत, बहुतेक निसर्गाच्या निरनिराळ्या रूपांना मूर्त, मानवी आवाक्यातले स्वरूप देणाऱ्या. काही देवता पूर्वजांचं रूप म्हणून पुजल्या जातात. या सगळ्या देवतांची व्रत-वैकल्यं आहेत, अगदी आपल्याकडच्या श्लोकांची, मंत्रांची आठवण व्हावी अशा निबद्ध चालींवर म्हटले जाणारे chants सुद्धा. हवाई भाषेत त्यांना ओली (Oli) किंवा मेले (Mele) म्हणजे विशेष गाणी, असे प्रतिशब्द आहेत. इथला प्रसिद्ध हूला (Hula) नृत्यप्रकार हा त्या ओली वा मेलेंचा मोहक दृश्याविष्कार. इथल्या देवतांची हेईआउ (Heiau) अर्थात देवळं आहेत, ती पूर्वी स्थानिक अधिकारी व्यक्तींच्या अख्यतारीत असत.

हवाई बेटांत अनेक ठिकाणी विखुरलेल्या हेईआउंत नेमकी कसली व्रतवैकल्यं चालत? त्याचे संदर्भ सहज लागत नाहीत. अजूनही अनेक ठिकाणी जतन केलेल्या या देवळांमध्ये पर्यटकांना प्रवेश करण्यास बंदी आहे, हवाई लोकांचं हे पवित्र श्रद्धास्थान म्हणून सांगतात. एकूण संबंधित रूढींचा भाग, गूढता हे आपल्याकडच्या प्राचीन शाक्त किंवा तंत्र पंथांची आठवण करून देणारं आहे. इथं आल्यापासून बघितलेले, ऐकलेले आणि आधी वाचलेले माहितीचे अंश मी पझल जुळवावे तसे जोडत होते. तेवढ्यात पॉलच्या जोक्समुळे ताळ्यावर आले. 

१९३५ साली बिग आयलंडला मोठा भूकंप झाला. त्याच सुमारास मौना लोआचा स्फोट झाला आणि दिवसा एक मैल वेगानं वाहणारा लावा आता अख्खं हिलो गाव खाऊन टाकेल की काय अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा हवाईच्या ज्वालामुखी वेधशाळेच्या संचालकाला लावा ओकणाऱ्या लावा ट्यूब्सवर बॉम्बचा हल्ला करावा अशी दिव्य कल्पना सुचली. कल्पना विवादास्पद होती. खूप विनिमयाअंती खरोखरच मौना लोआला लावाच्या उगमस्थानाभोवती, अमेरिकन मिलिटरीमार्फत १० फायटर विमानांच्या मदतीनं २० शक्तिशाली बॉम्ब टाकले गेले. आठवड्याभरानं लावा वाहायचा थांबला. अर्थातच वेधशाळेच्या संचालकानं सगळी श्रुतिसुमनं आवर्जून स्वतःच्या खात्यात जमा केली. Sci-fi सिनेमात शोभेल असा हा किस्सा.

अनेक वर्षांनंतर आधुनिक शास्त्राचा निष्कर्ष मात्र वेगळा आहे, बॉम्ब टाकणं आणि लावा शांत होणं हा केवळ योगायोग होता, यावर शास्त्रज्ञांचं एकमत आहे. एक मात्र आहे, त्या बॉम्बच्या विस्फोटानं आणि अतिउष्ण लावाच्या कर्षणानं डोळ्यांचं पारणं फिटेल अशी आतषबाजी नक्कीच झाली असणार. त्या दृश्य सोहळ्याचे फोटो किंवा १९३५ साली कोणी हुशारीनं व्हिडिओ काढला असल्यास तो बघायला मिळावा हे पॉलचं दिवास्वप्न होतं! हा किस्सा ऐकवत, पॉलनं शिताफीनं हेलिकॉप्टर परतीच्या मार्गावर वळवलं. एरपोर्टला परतण्यापूर्वी हिलोचे धबधबे, विद्यापीठ, मुख्य इमारती असं सगळं फिरवून आणलं. हेलिकॉप्टर लॅण्ड झालं, पायलटबरोबर फोटो इत्यादी रिवाज झाले आणि पॉलला बाय म्हणून आम्ही लहान मुलांच्या उत्साहानं टारमॅकवर बागडत आमच्या गाडीच्या दिशेनं चालू लागलो.

एअरपोर्टहून हिलो गावाकडे निघालो, तेव्हा भूकेची वेळ झाली होती. इथलं स्थानिक फेवरीट हिलो शार्क्स कॅफे आम्हाला आवडलं, तिथं मस्तपैकी सँडविच आणि कॉफीचे ब्रँच आटपून हिलोच्या फार्मर्स मार्केटकडे मोर्चा वळवला. तिथं प्रामुख्यानं टारो (Taro, म्हणजे आपले अळू व अळकुडे), फळं, भाज्या, चीझचे प्रकार, कपडे, फूड स्टॉल्स, हस्तकलेच्या वस्तू असे काय म्हणाल ते होतं. बरीचशी फळं व भाज्या भारताची आठवण करून देणाऱ्या होत्या. ते साहजिकच कारण हवाईच्या उष्णकटिबंधीय (tropical) हवामानाचं भारताच्या पश्चिम किनाऱ्याच्या हवामानाशी खूप साम्य आहे. अनेक अनाकलनीय पदार्थही होते. तिथल्या बोलक्या लोकांकडून माहिती घेत, काही सॉलीसिटिंग हुकवत आम्ही त्या फार्मर्स मार्केटची मजा घेत होतो. जगातल्या सगळ्या रंग-रूपांचे, आकाराचे लोक इथं आहेत. अतिशय साधे आणि प्रेमळ. पण मूळ पॉलीनेशिअन लोक सध्याच्या लोकसंख्येच्या एक दशमांशसुद्धा नाहीत. अमेरिकेत संमिश्र वंशाची सर्वाधिक लोकसंख्या हवाई बेटांवर वसली आहे. परिणामी इथली स्थानिक संस्कृतीसुद्धा संमिश्र आणि खऱ्या अर्थानं विविध आहे. 

बाकीचं मार्केट फिरून, तिथल्या प्रसिद्ध पपया सॅलडचा आस्वाद घेऊन आम्ही उर्वरित दिवस हिलो गावात घालवला. 

ता. १४ मे २०१७

आज सकाळपासून पाऊस थांबायचं नाव घेतच नव्हता. Volcano हाईकचा प्लॅन बहुतेक नाही जमणार असं वाटत होतं. जवळपासचे बरेच पॉइंट्स भर पावसातच बघावे लागले, पण इतक्या लांब आलो आहोत तर बघूच जाऊन म्हणून Volcanoes National Park ला हजेरी लावली. कीलाउएयाच्या लावाचं समुद्रात जिथं प्रसरण होतं ते ठिकाण पूर्वेकडून कालापनाच्या (Kalapana) बाजूनं चालत वा सायकल भाड्यानं घेऊन किंवा पश्चिमेकडून चेन ऑफ क्रेटर्स रस्ता (नाउलु ट्रेल, Naulu Trail) जिथं संपतो, तिथून पुढे पायी जाऊन बघता येतं. कालापनाच्या बाजूनं अंतर खूपच कमी आहे, जेमतेम एक मैल. पण तिथून गेल्यास पर्यटकांची गर्दी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐन लावा फील्ड्स पार करण्यातला विस्मयकारक आनंद नाही. आम्ही आडवळणाचा पर्याय निवडला. 

एव्हाना मुसळधार पाऊस थांबून ऊन-पाऊस असं सत्र चाललं होतं. त्यातल्या त्यात अनुकूल म्हणायचं. दुपारी चार वाजता चालायला सुरुवात केली तर सूर्यास्तापर्यंत लावा व्ह्यू गाठू शकू, असा आमचा सरासरी हिशोब होता. येऊन-जाऊन ११ मैल होणार होते. National Park Service (NPS) च्या सूचनेनुसार हाईक करता योग्य कपडे चढवून व भरपूर पाणी, माफक खाऊ आणि मुख्य म्हणजे तिथल्या नियमाप्रमाणे फ्लॅश लाईट असं सगळं पाठीवर घेऊन चालायला सुरुवात केली. या रस्त्याला आमच्या व्यतिरिक्त इतर तीन-चार लोक होते. एक तर्फी पाच-साडेपाच मैल, त्यातले पहिले तीन मैल NPS नं लावा बेड्सच्या मधून कच्चा रस्ता काढला आहे. त्यावरून जायचं आणि उर्वरित अंतर प्रत्यक्ष लावा फील्ड पायी तुडवत. कच्च्या रस्त्याच्या कडेला गोठलेला लावा मुक्तहस्ते पसरला होता. हाईकच्या सुरुवातीला किरकोळ हिरवळ दिसली. मनुष्य वर्दळीनं इथपर्यंत येऊन विखुरलेलं बी-बियाणे, पक्षांनी दुरून आणलेले परागकण रुजू लागले आहेत. पुढे मात्र फक्त काळा ठिक्कर लावा. कच्चा रस्ता संपून लावा फील्ड्समध्ये शिरकाव करताना NPS चा फलक ‘Strenuous and hazardous hike’. याच्या पुढे सराईत वाट नव्हती. NPS नं एक दोर काय तो बांधला होता. त्याच्या उजवीकडे अजिबात जायचं नाही, पण त्या साधारण दिशेनं आगेकूच करायची. काही कारणानी दोर जर का तुटला तर मग सगळं स्वतःच्या भरवशावर. गोठलेल्या लावावर चालणं वरवर जरी सोपं वाटलं तरी चुकून पडायला झालं तर चांगलंच त्रासाचं होऊ शकतं. लावाचा पृष्ठभाग रखरखीत, चिरडून जर का लागला तर मोडलेल्या काचेमुळे व्हाव्या तशा जखमा होऊ शकतात. त्यात चालताना अरुंद भेगांतून नुकताच लावा वाहून गेल्याची चिन्हं दिसत. मधेच एखाद्या भेगेतून धूर निसटताना बघितला की शहारून येई. हा आमच्याकरता एक नवीन अनुभव नक्कीच होता. आत आत चालल्यावर परग्रहावर आलो की काय असंही वाटून गेलं. आम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे चालत होतो. लावा-प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे. म्हणजे आम्ही चालत होतो त्या थराखालून लावा आडवा वाहत होता. तिकडं पार उजवीकडे उंच कडेवरून समुद्रात सांडत होता. एकदाचे त्या व्ह्यू पॉइंटशी जाऊन पोचलो. तर समोर लावाचे प्रचंड धबधबे, पाच-सहा अग्निधारा होत्या. ११०० डिग्री सेल्सियसचा उकळता लावा ६० एक डिग्री तापमानाच्या पाण्यात येऊन आदळतो, तेव्हा प्रचंड वाफ आणि लावाचे लहान मोठे तुकडे हवेत फेकले जातात. ते दृश्य विशेषच होतं. सूर्य मावळून अंधार पडू लागला तसं आणखीनच सुंदर दिसू लागलं. बायनॉक्युलरचा इथं खास उपयोग झाला. समोर साक्षात आद्यनिर्मिती चालली होती! "वह था हिरण्यगर्भ सृष्टी से पहले विद्यमान" – इथे कीलाउएयानं १९८३ पासून प्रतिवर्षी ४२ एकर दरानं समुद्राला सरकवत नवीन भूभाग तयार केला आहे. पर्यायानं बिग आयलंड रोज आणखीन बिग, आणखीन मोठं होत आहे. 

केवढे तरी फोटो घेतले, संधिप्रकाश संपून अंधार झाला तेव्हा ट्रायपॉड आणायचे विसरलो हे लक्षात आलं. कारण आता ट्रायपॉड शिवाय long exposure शॉट्स घेणं अशक्य होतं. शेवटी कॅमेरा बॅगेत कोंबला आणि फक्त दृष्टिसुख लुटलं. तिथून हलावंसं वाटत नव्हतं. किती तरी वेळ निघून गेला, उशीरच झाला होता खरा. गर्दीही निवळली, तेव्हा कौस्तुभला मी जबरदस्तीनं तिथून हलवलं. बाहेर काढलेल्या पाण्याच्या बाटल्या, फोन वगैरे सगळं पुन्हा नीट पॅक केले आणि आता पुन्हा पाच-सहा मैल चालायला सज्ज झालो. एक तर परतीच्या वाटेत शॉर्टकट मारणं हा पर्याय नव्हता. गाडी पार्क केली तिथं जाणं अपरिहार्य होतं. इथं येताना उजेड होता, तरीसुद्धा लावा बेड्स पार करताना खूप काळजीपूर्वक यावं लागलं होतं. आता अंधारात तिथून परत जायचं, तेही NPS च्या एका तकलादू दोराच्या आधारे दिशेचा अंदाज घेत! आपल्यालाच लै हौस, आणखीन काय...   

चालायला सुरुवात करायची म्हणताच दोघांनी आपापले फ्लॅश लाईट्स काढले, तर काय व्हावं? माझा फ्लॅश लाईट चालू होईना. सकाळी निघताना सगळं नीट बघून आणलं होतं. नवीन बॅटरीज होत्या, असं कसं झालं? आपण नेहमी इतके काटेकोर असतो, नीट तयारीनं जातो सगळीकडे आणि आजच असं व्हावं! तसे दोघांच्या सेलफोनचा लाईट वापरता आला असता, कमीत कमी वापर करून फोनची बॅटरी मुद्दामच टिकवून ठेवली होती. इथं फोन वापरण्याचा तसा प्रश्नही नव्हता. कारण मुळात रेंज नव्हती हा वेगळा भाग. पण फोन लावा बेड्समध्ये कुठे निसटून जर का पडला, एखाद्या भेगेत जाऊन अडकला तर तो शोधत बसणं धोक्याचं आणि नसते उपद्वाप झाले असते. वर निसटू नये म्हणून फ्लॅश लाईटला मनगटाभोवती गुंडाळता येणारी दोरी होती, फोनचं तसं नव्हतं. पण आता काही त्याचे चविचचर्वण करण्यात अर्थ नव्हता. मग असं ठरलं की, एकानं फ्लॅश लाईट धरायचा, एकेक पाऊल टाकण्यापूर्वी ३६० डिग्री नजर टाकून मग दोघांनी हात धरून सावकाश पुढे जायचं. तसं करणं गरजेचं होतं. एवढा मिट्ट काळोख होता, त्यात चंद्र प्रकाशही नाही. धूसर का होईना एरव्ही दगडांवरून चांदणं परावर्तित होतं, तेसुद्धा अशा वेळी खूप हायसं वाटतं. पण चंद्राचा उजेड असता तरी त्या काळ्या ठिक्कर लावानं तो शोषून घेतला असता. त्यात पावसाची रीपरीप. मध्येच सल्फरचा वास, कुठे धुस्स्स आवाज, कुठे धूर. चढ-उतार करत, उड्या मारत चालताना ठिसूळ लावाच्या फुटण्याचा आवाज आणि गाडीजवळ पोचेपर्यंतची नाही म्हटलं तरी थोडी रुखरुख (अर्थात ती फक्त मला). तो दोरसुद्धा चाचपडत शोधावा लागत होता अंधारात. त्यात आम्ही दोघेच, पुढे-मागे एकही माणूस नाही. वाटेत ठेच लागून माझं एका खड्ड्यात पडूनही झालं. सावरून तसंच पुढे जात राहिलो. 

आता समुद्र डाव्या हाताला होता. कडेवरून पाण्यात वाहणारा लावा दिसत नव्हता, फक्त त्याची लालसर आभा तेवढी कळत होती. पण आपण त्या जिवंत लावाच्या स्त्रोतावरून, मार्गावरून चालतोय याची जाणीव चित्तथरारक होती. २०१७ च्या फेब्रुवारीत याच लावा बेडची एक मोठीच्या मोठी शिळा अचानकपणे समुद्रात कोसळली, पापुद्राच तो! तेव्हा काही महिने कीलाउएयाचा हा भाग, पर्यटन सगळं बंद होतं. इथं निसर्ग कधी कोणतं रौद्र रूप दाखवेल त्याचं भाकीत करता येत नाही. Volcanoes व्यतिरिक्त हवाई बेटं भूकंप प्रवण सुद्धा आहेत, तेव्हा निकडीचे प्रसंग कोणत्याही क्षणी उदभवू शकतात.  

.............................................................................................................................................

नवनवीन पुस्तकांसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

बाकी समुद्राच्या लाटा उसळण्याचा आवाज काय तो आम्हाला चालण्याची लय पुरवत होता. तेवढ्यात उजवीकडे हालेमा'उमा'ऊ क्रेटर दिसू लागलं. काल सकाळी डोकावून बघितलेलं. डोंगरमाथ्यावर प्रचंड व्यासाचा तेज:पुंज गोलाकार, त्या गडद अंधारात तळपत्या सोन्यापेक्षाही विलक्षण सुंदर दुसरं काही असू शकेल? तिथून समुद्राकडे उतरणाऱ्या तांबट पिवळ्या सोन्याच्या धारा, अलगद लावा बेड्सखाली गायब होणाऱ्या. इतका अशक्य देखावा प्रत्यक्षात आपल्या डोळ्यांनी बघतो आहोत, विश्वासच बसत नव्हता. पीटर पॅनच्या गोष्टीत पीटर वेन्डीला सांगतो- "And that's my home, where dreams are born". हेच ते Never-Never Land असेल का? तिथंच बघत बसावं असं खूप वाटत होतं, पण पुढे जाणं भाग होतं. क्रेटरकडे सारखं वळून बघत होतो. पाच-दहा मिनिटांत पाऊस थांबला आणि वर बघतो तर काय, चांदण्यांनी आकाश ओसंडलं होतं. एकीकडे ते क्रेटर, दुसरीकडे न संपणारी भरजरी आकाशगंगा. "जो है अस्तित्वमान धरती आसमान धारण कर, जिसके बल पर तेजोमय हैं अंबर..." आणि त्यांच्या ऊर्जेच्या, गूढतेच्या भोवऱ्यात आता पूर्णपणे अडकलेले आम्ही. क्रेटर आणि आकाशातल्या लाखो चांदण्यांनी मंत्रमुग्ध करणारं एक आकर्षण क्षेत्र रचले होतं. "सृष्टी निर्माता, स्वर्ग रचयिता" त्या छंदाचं आवर्तन आता थांबत नव्हतं. सगळं काही स्तब्ध असूनसुद्धा त्या क्षणात केवढं चैतन्य, केवढी उत्कट गती होती. आपण एका अक्षाभोवती फिरतो आहोत आणि त्याला समांतर आपल्याला वेढणारं अवकाशसुद्धा फिरते आहे, time travel सारखं. क्रेटरभोवती चांदण्या का चांदण्यांभोवती क्रेटर? सीमारेषा विरघळून पृथ्वी आणि आकाश मिसळल्यासारखं झालं. "फ़ैली हैं दिशाये बाहू जैसी उसकी सब मे सब पर" अशा भारावलेल्या मन:स्थितीत न बोलता चालत राहिलो. लावा बेड्सवरून कच्च्या रस्त्याला कधी लागलो कळलं नाही. दोन-अडीच मैल आलो होतो, आणखीन तीन मैल जायचं होतं. 

पुन्हा एकदा मागे वळून बघितलं. क्रेटर दिसेनासे झाले होते. वर चांदण्याही अचानक दिसेनाशा झाल्या, त्यांची जागा अक्राळ विक्राळ वीजांनी घेतली होती. अरेच्या म्हणेपर्यंत आभाळ कोसळू लागलं. तेव्हा कुठे चढलेली तंद्री उतरली, वास्तवात आलो. पावसाचं जॅकेट वगैरे असून काही उपयोग नव्हता, अगदी चिंब भिजलो. तापमान घसरून चांगलंच गार झालं होतं. कुडकुडत कसेबसे गाडीपर्यंत पोचलो, तेव्हा मध्यरात्र झाली होती. एरव्ही चिडचिड झाली असती, पण आज तक्रार नाही, आम्ही एक phenomenon अनुभवलं होतं! 

.............................................................................................................................................

लेखिका लोपा राजदेरकर या बर्कली, कॅलिफोर्निया इथं राहतात.

lopa.rajderkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Sudha Rajderkar

Mon , 18 December 2017

Dhanyavaad!


Sanjeevanee Shintre

Sat , 18 November 2017

एक आगळा वेगळा अनुभव


Sanjeevanee Shintre

Sat , 18 November 2017

एक आगळा वेगळा अनुभव


Bhagyashree Bhagwat

Tue , 24 October 2017

Bhari!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा