अजूनकाही
आम्ही २००७मध्ये अमेरिकेत आलो. २००८मध्ये बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. तेव्हा आणि आताही आम्ही अमेरिकेतल्या राजकारणाविषयी सतत जाणून घेत होतो. डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय एका अर्थानं काहीसा अनपेक्षित आहे. हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्ष व्हायला हव्यात असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटत होतं. त्या फार हुशार वगैरे आहेत, असं नाही, पण त्या ट्रम्पपेक्षा नक्कीच चांगल्या आहेत. ट्रम्प स्वत:च्या भूमिका सतत बदलत आले आहेत. त्यामुळे कुठल्या गोष्टींवर त्यांचा खरोखर विश्वास आहे आणि कुठल्या गोष्टी ते केवळ मतं मिळवण्यासाठी बोलले आहेत, हे नक्की कधी कळलं नाही. आम्ही अशी आशा करू की, त्यांनी केलेली बरीचशी वादग्रस्त विधानं ते केवळ मतं मिळवण्यासाठी केलेली असावीत. त्यामुळे आता राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ते त्यांची काही अमलबजावणी करणार नाहीत. ट्रम्प यांची महिलांबाबतची भूमिका फार चुकीची होती. त्यामुळे महिला मतदारांची त्यांना फारशी पसंतीही नव्हती. त्यामुळे अशी आशा करायला हरकत नाही की, त्यांची विचारपद्धती तशी नसावी. आणि जरी असली तरी राष्ट्राध्यक्ष म्हणून ती देशावर लादली जाणार नाही.
ट्रम्पना जास्तकरून मध्यमवयीन आणि वयस्कर अमेरिकनांनी मतं दिली असणार. कारण त्यांना वाटतं आहे की, ते त्यांच्या समस्या सोडवतील. ट्रम्पनी त्यांचा व्यवसाय उत्तम प्रकारे चालवला आहे. ते एक यशस्वी उद्योजक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अल्पशिक्षित, अर्धशिक्षित अमेरिकनांची परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे त्यांना काहीतरी बदल पाहिजे होता. त्यांना त्यांचा आवाज ऐकणारं कुणीतरी वॉशिंग्टन डी.सी.मध्ये हवं होतं. त्यांची अशी भावना आहे की, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोन्ही पक्षांचे लोक काही काम करत नाहीत. ते फक्त सतत एकमेकांशी संघर्ष करत राहतात. त्यामुळे त्यांना कुणीतरी बाहेरची व्यक्ती हवी होती, जी राजकारणी नसेल, पण विकासावर लक्ष केंद्रित करेल. ट्रम्प नेमके तसे आहेत. त्यामुळे अमेरिकतील ब्ल्यू कॉलर वर्कर्सना ट्रम्प यांची स्थलांतरित, मुस्लीम, मेक्सिकन या विषयांवरील आक्रमक मतं आवडतात. थोडक्यात ज्यांचे विचार पुरोगामी आणि उदारमतवादी नाहीत आणि ते उजव्या विचारसरणीचे आहेत, त्यांना ट्रम्प यांच्या रूपाने आधार मिळाला.
काल झालेल्या निवडणुकीत शेवटी ट्रम्प जिंकले, पण सर्व एक्झिट पोल हिलरी क्लिंटन यांच्या बाजूने होते. अनेकांना असं वाटत होतं की, हिलरी सहज जिंकतील. पण फ्लोरिडा, नॉर्थ कॅरेलिना आणि पेनसिल्व्हेनिया या तीन राज्यांमध्ये एक-दोन टक्क्यांनी हिलरी हरल्या.
आता हे पाहावं लागेल की, ट्रम्प यांनी जी वेगवेगळी आश्वासनं दिली आहेत, ती केवळ निवडणूक जिंकण्यासाठी केली आहेत की, खरोखरच त्यांना तसं वाटतं. त्यांची काही वक्तव्यं फक्त अमेरिकेसाठीच नाहीतर संपूर्ण जगासाठी धोकादायक आहेत.
त्यांची ध्येयधोरणं अर्धकच्ची आहेत. त्यांचा सहकार्यावर फारसा विश्वास नाही. कारण त्यांनी रशिया वगळता जगातल्या सगळ्या महत्त्वाच्या देशांवर टीका केली आहे. त्यांनी यापुढच्या काळात इतर देशांशी सहकार्य करण्यास नकार दिला तर त्याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. अशी आशा आहे की, याबाबतीत त्यांचे सल्लागार त्यांना चांगल्या प्रकारे समजावू शकतील.
अमेरिकेतल्या कायदेशीर निर्वासितांना ट्रम्पच्या धोरणांमुळे काही फरक पडेल असं वाटत नाही, पण बेकायदेशीर निर्वासितांना नक्कीच फरक पडू शकतो. अर्थात निवडणूक प्रचारादरम्यान ते जे बोलले आहेत, ते त्यांनी अमलात आणायचं ठरवलं तर. सामाजिक धोरणं कशा प्रकारे बदलतील यावर त्याचा परिणाम सबंध अमेरिकेवर कसा होईल हे ठरेल. वंशवाद वाढला तर त्यातून काही आव्हानं निर्माण होऊ शकतात.
पण हे सगळं होईल की नाही याबाबत नक्की सांगता येणार नाही. कारण ट्रम्पनी प्रत्येक वेळी आपली भूमिका बदलली आहे. त्यामुळे त्यांचा कशावर विश्वास आहे आणि कशावर नाही हे आत्ताच सांगणं अवघड आहे.
त्यांना त्यांच्या पक्षाचाही अजून पूर्ण पाठिंबा नाही. तो ते कसं मिळवतील हेही पाहावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत ते कुठल्याच प्रकारे राजकारणात नव्हते. असा माणूस एका पॉवरफुल देशाचा राष्ट्राध्यक्ष होतो, तेव्हा ते जरा आव्हानात्मक ठरू शकतं. आता ही जबाबदारी ट्रम्प कशी पेलतात हे बघणं गरजेचं आहे. ट्रम्प यांचा स्वभावही बऱ्यापैकी चिडका वाटतो. कारण निवडणूक पूर्व चर्चांमध्ये आणि भाषणांमध्ये ते जरा अहंकारी वाटले होते. ते थोडं काळजीत टाकणारं आहे.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment