अजूनकाही
कर्र...कर्र...कर्र...दरवाजा हळूहळू हळूहळू उघडतो...एक लांबच लांब हात बाहेर येतो... फक्त हाडं... बोटांची हाडं.... सांगाड्याचा हात… अंधारातून कर्कश्श किंकाळी ऐकू येते...
वाऱ्याचा आवाज, सळसळत्या पानांचा आवाज... पावलांचा आवाज... काळं मांजर खिडकीतून उडी मारून आत येतं. त्याचे फक्त डोळे चमकतात... सांगाड्यांचं नृत्य सुरू होतं... हाडं कडकडा वाजतात...
भुतांच्या गोष्टींचं अतोनात आकर्षण होतं. खूप मागे लागल्यावर दादा कोकणातल्या हडळींची गोष्ट सांगायचे. गोष्ट ऐकता ऐकता डोळे मोठे व्हायचे. आता त्यातल्या एका गोष्टीचा शेवट फक्त आठवतोय- ‘गावलास तावडीत’.
दुसऱ्या एका गोष्टीतली हडळ झालेली आर्इ मुलीच्या घरी जाते. मुलीला कुठे माहिती असतं आर्इ हडळ झालीय? ती आर्इला गळामिठी मारते. तिच्या आंघोळीसाठी पाणी गरम करायला ठेवते. खीर करण्यासाठी रवा भाजायला लागते. आर्इची आंघोळ होते. दोघी पोटभर जेवतात, पोटभर गप्पा मारतात. रात्र होते. मुलगी म्हणते, ‘आर्इ, तू खूप दमली असशील, चालत आलीस. मी पाय चेपते’. आर्इ अंगभर पांघरूण घेऊन अंथरुणात पडलेली. ती म्हणते, ‘अगं, तूच दमली असशील, खूप काम पडलं तुला. काही नको पाय चेपायला’. पण मुलगी कुठली ऐकायला! पाय चेपण्यासाठी पांघरूण दूर करते आणि पाहते तर काय? आर्इची पावलं उलटी!
भुतांच्या गोष्टी पिढ्यान पिढया चालू राहतात. तसंच आकर्षण गुन्हेगारीच्या गोष्टींबद्दलही असतं. कथा-कादंबऱ्यांच्या एकूण विक्रीमधील गुन्हेगारी साहित्याचा वाटा २५ ते ४० टक्के इतका घसघशीत असतो. समाजाला भीषण, भेसूर आणि हिंसक गोष्टींमध्ये अतोनात रस असतो. आत्यंतिक हिंसा हिंसेला जन्म देते इ. समाजशास्त्रीय सिद्धान्त आहेतच. पण गुन्हेगारी साहित्य आणि भुतांच्या गोष्टी नसत्या, तर समाजाचं काय झालं असतं?
भुतांच्या गोष्टी, दंतकथा, झपाटलेली झाडं आणि झपाटलेल्या घरांच्या गोष्टी आपल्या सांस्कृतिक गरजा पुऱ्या करतात. त्या व्यतिरक्त नैतिक मूल्यांबाबतच्या आपल्या चिंता आणि भीतींचं विरेचन या साहित्यामुळे होतं. विश्वात अनेक अगम्य गोष्टी घडत असतात. त्यापैकी अनेक गोष्टींची कारणपरंपरा समजून येत नाही. तसंच प्रत्येक घटनेच्या कारणांची आणि परिणामांची उकल शक्य नसते. मग ती शोधण्याचा मानसिक प्रवास सुरू होतो. जी.ए.कुलकर्णींच्या कथांमधला हा शोध एकाच वेळी विलक्षण आणि धारदार सुरीसारखा तीक्ष्ण असतो.
मृत्यूची आशंका मनात घर करून बसलेली असते. सूप्त मनात या आशंकेशी झगडा सुरू असतो. ‘आपुलाची वाद आपणाशी’.
‘चांदोबा’तल्या विक्रम वेताळाच्या गोष्टी निरंतर सुरू राहतात. प्रेत खांद्यावर टाकून विक्रमादित्य चालू लागतो. प्रेतातील वेताळ बोलू लागतो... तरीही विक्रमादित्य आपला हट्ट सोडत नाही...
निरंतर सुरू राहणाऱ्या अगम्य गोष्टींची परंपरा अस्सल भारतीय. ‘अरेबियन नार्इट्स’मुळे ती अरबस्थानातही होती हे समजलं. या दोन्ही परंपरा अखंड शोध घेण्याच्या.
अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या मृत्युचं दु:ख आभाळाएवढं मोठं असतं. मृत व्यक्तीची उणीव काळीज कापत राहते. भुतांच्या कहाण्यांमुळे आपल्या दु:खाशी आपला संवाद सुरू होतो. शिवाय भुतांमुळे मृत्युचा डंख सौम्य झाल्यासाखा वाटतो. मृत आणि जिवंत व्यक्तींमधली काल्पनिक सीमारेषा पुसट होण्यासाठी भुतांची ‘मदत’ होते.
भुतांच्या गोष्टी, गुन्हेगारी साहित्य आणि अभिजात साहित्य एकमेकांना जोडणारा बिंदू म्हणजे शोधासाठी केलेला मानसिक प्रवास. ही वाट अत्यंत तापदायक आणि क्लेशकारक असते. गुन्हेगारी कथांमधून कारणांची आणि परिणामांची फोड करून सांगितली जाते. म्हणून हे साहित्य लोकांना भावतं. जीवनातील जटिलता त्रास देणारी असते. म्हणूनच ‘इट्स एलिमेंटरी, माय डियर वॉटसन’ हे शरलॉक होम्सचं वचन आपल्याला आश्वासक वाटतं.
‘तू आज खूप पेशंटना तपासलयंस’, डॉ. वॉटसनना पाहताच शरलॉक होम्स म्हणतात. 221\B, Baker Street, London येथील आपल्या घरात होम्स वॉटसनची वाट पाहतायत. ‘अॅडव्हेन्चर ऑफ द क्रूकेड मॅन’ या कथेतील हा प्रसंग. डॉ वॉटसनच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटतं. आपणही आश्चर्यचकीत होतो. होम्स मात्र सहजपणे म्हणतो, ‘इट्स एलिमेंटरी वॉटसन’.
होम्सच्या कहाण्यांमधून असंख्य वस्तू आणि गोष्टींचे उल्लेख येतात. लेखक आर्थर कॉनन डॉयल यांनी प्रतीक म्हणून या गोष्टींची योजना केली असावी असं वाटू लागतं. ‘ठिपके असलेली पट्टी होती ती... ठिपक्या ठिपक्यांची पट्टी...’, ‘स्पेकल्ड बॅन्ड’ या कथेत ज्युलिया स्टोनर चित्कारते आणि ती मरून पडते. ठिपक्यांची पट्टी हे कशाचं सूचन असावं असा विचार आपण करू लागतो, तितक्यात होम्स आपल्याला समजावतो. ठिपक्यांच्या पट्टीचा अर्थ शब्दश: तोच- ‘ती साप चावून मेली’.
कथासूत्र आणि पात्र आकार घेत असताना रूपकं आणि प्रतीकंही आकार घेऊ लागतात. होम्सचं बेकर स्ट्रीटवरील घर अगदी बारीक तपशीलांसह आपल्यासमोर उभं राहतं. सोन्याची तपकिरीची डबी, पेपरच्या कात्रणांची वही, एनसायक्लोपीडिया, होम्सची हत्यारं- भिंग, दुर्बीण, छोटा हातोडा, सोफा, हॅट, छत्र्या आणि रेनकोट टांगण्याचा स्टँन्ड. या खऱ्याखुऱ्या बारकाव्यांमुळे या कथा चित्ताकर्षक वाटतात.
अपार्टमेंटचं तपशीलवार वर्णन करून लेखक थांबत नाही. होम्सच्या कथांमधून सतत धडधडणारं, आर्थिक समृद्धी आणि वसाहतीच्या साम्राज्याचं केंद्र म्हणून लंडन पुढे येतं. भारतात प्रशासक म्हणून काम करायला आलेल्या काही व्यक्तींच्या गोष्टी यात येतात. साम्राज्य काही देतं आणि काही हिसकावूनही घेतं. ‘फार्इव्ह ऑरेंज पिप्स’ या कथेत जॉन टर्नरकडे भरपूर पैसा येतो, पण तो राजकारणाकडे ओढला जातो आणि सर्वस्व गमावून बसतो. भारतात ज्युनियर ऑफिसर वा सैनिक म्हणून निम्नवर्गीय समाजातील लोक आले होते. ब्रिटिश समाजाच्या उतरंडीत श्रीमंत होऊन परत आलेल्या या अधिकाऱ्यांना सन्मान मिळाला नाही. होम्स आणि त्याचा लेखक कॉनन डॉयल अभिजन वर्गातील. जगाच्या एक तृतीयांश भागावर राज्य करतो, याचा छुपा अभिमान होम्स आणि लेखक/लेखनामधूनही डोकावतो. त्यामुळेच या बहुपेडी कथा निव्वळ गुन्हेगारी कथा राहत नाहीत. त्याला नवे आयाम मिळतात.
उत्तर आधुनिक काळातील गुन्हेगारी व भयकथा/कादंबऱ्यांकडे लोक गांभीर्यानं पाहू लागले आहेत. हॅन कँग या लेखिकेच्या ‘द व्हेजिटेरियन’ या कादंबरीतील इयाँग या नायिकेला भयस्वप्न पडतात. त्यात तिला आतडी आणि रक्त दिसतं. ती शाकाहारी होण्याचा निर्णय घेते. या निर्णयावरील तिच्या नवऱ्याच्या आणि आर्इ-वडिलांच्या प्रतिक्रिया हिंसक म्हणाव्या अशा असतात. ‘कोणालाही न सांगता ती हा निर्णय घेतेच कसा? ही इतकी व्यक्तीवादी कशी होऊ शकते?’ - इयाँगच्या नवऱ्याला प्रश्न पडतात आणि त्याला शाकाहार ही विकृती वाटू लागते. भयस्वप्नांनंतर आणि शाकाहार स्वीकारल्यानंतर इयाँग शरीरसंबंधालाही नकार देते.
आर्इ-वडील घरी जेवायला आले असता त्यांना आपल्या मुलीच्या शाकाहारी ‘वेडा’चा सुगावा लागतो. वडील संतप्त होतात. ‘कशी खात नाही, मांस तेच पाहतो’, जेवणाच्या टेबलवर वडील तिला मांसाचा घास भरवू लागतात. इयाँगला उलटीची भावना होते. वडील तिच्या कानफटात मारतात.
दुसऱ्या भागात इयाँग आपल्याला मनोरुग्णालयात सापडते. शाकाहारामुळे तिच्यावर सर्वस्व गमावण्याची वेळ आलेली असते. बहिणीचा नवरा, इयाँगचा मेहुणा मात्र तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये येतो. तो कलाकार असतो. बॉडी आर्ट या कलेच्या नव्या प्रांतात त्याची मुशाफिरी सुरू असते. त्याला इयाँगची मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक उलघाल समजते. दोघांचा दोस्ताना जमतो.
तिसऱ्या भागात इयाँगला आपल्या शरीरातून वनस्पती बाहेर येतेय असं वाटू लागतं. त्यामुळे ती शाकाहाराचाही त्याग करते.
‘द व्हेजिटेरयन’ ही कादंबरी स्त्रियांच्या अधिकारासंबंधी आणि जीवनातील आनंदांसंबंधी आहे. एकुणात स्त्रियांमध्ये या भावना दडपल्या जातात. स्त्रियांनी व्यक्तीवादी होऊ नये म्हणून कुटुंब आणि समाज नीतीनियम लादतात. हाही एकप्रकारचा दहशतवाद. स्त्रियांसाठी ते ‘हॉरर’च असतं. ही कादंबरी स्त्रियांच्या निवडीच्या स्वातंत्र्यापेक्षा ती कोणती निवड करते यासंबंधी आहे. इयाँग आपला रस्ता निवडते. त्यामुळे तिच्या आयुष्यातील पुरुषांना ती गोष्ट ‘हॉरर’सारखी वाटू लागते.
टॉम रॉब स्मिथ या तरुण ब्रिटिश लेखकाची ‘चार्इल्ड 44’ ही कादंबरी गेली काही वर्षं अमाप गाजते आहे. स्टालिनच्या रशियामध्ये तिची गोष्ट घडते. चाळीसच्या दशकाच्या अखेरीस म्हणजे १९४८ ते १९५१ या वर्षांत अनेक बालकांचे खून होतात. कोणीतरी सीरिअल किलर मोकाट सुटलेला असतो. पण त्याच्या तपासामध्ये अडथळे येतात, कारण सोविएत सिस्टिममध्ये गुन्हे घडूच शकत नाहीत, असं गृहीत धरलेलं असतं. स्टालिन प्रशासन हे गुन्हे घडलेच नाहीत, अशी विकृती साम्यवादी राजवटीत असूच शकत नाहीत, असं म्हणत राहतं. पण अखेरीस कोणा परदेशी विकृत व्यक्तीनं हे खून केले असावेत, असं स्वत:चं समाधान करून घेत साविएत पोलिसांनी तपास सुरू करतात.
स्टालिननं आपल्या काळात युक्रेनची नाकाबंदी केली होती. सरकारी मदत पूर्णपणे थांबवण्यात आली होती. यूक्रेनच्या कडाक्याच्या थंडीमध्ये हजारो लोक काकडून मरण पावले. ‘चार्इल्ड 44’ या कादंबरीची सुरुवात युक्रेनमध्ये होते.
गुन्हेगारी साहित्यात गुन्हे करणाऱ्या व्यक्तीच्या नैतिकतेसोबत समाजाच्या नैतिकतेवरही प्रकाशझोत टाकला जातो. ‘चार्इल्ड 44’मध्ये स्टालिनच्या आत्यंतिक दहशतीची नीती समोर येते. खून झालेले आहेत याचा नकार, तसेच गुन्ह्यांच्या तपासाला नकार देत राहिल्यामुळे गुन्ह्यांचं सत्र वाढत जातं. साम्यवादी समाजामध्ये गुन्हे होऊ शकत नाहीत. त्यामुळे पोलिसांचं कामच नाही अशी नीती पाळण्यात आलेली असे. गुन्हे नोंदणी थांबवलेली असते. नंतर भांडवलवादी अमेरिकेचे छुपे एजंट गुन्हे घडवून आणतात, म्हणून या खुनाच्या मालिकेच्या तपासाला मान्यता मिळते. पण गुन्हा सोविएत नागरिकडूनच झालेला असतो, हे समोर येईपर्यंत स्टालिनचा मृत्यू झालेला असतो.
लेखनपूर्व संशोधनासाठी स्मिथ यांना चार वर्षं लागली. रशियातील चाळीस आणि पन्नासच्या दशकांतील पोलीस फार्इल मिळवणं आव्हानात्मक ठरलं होतं. हे सारे जटील धागे एकत्र करून त्याची कादंबरीच्या रूपातील अत्यंत तलम गुंफण स्मिथ यांनी केली. या कादंबरीत खून मालिकेच्या भयकथेसोबत स्टालिनच्या काळातील ‘हॉरर’ही समोर आलं आहे.
अनेकांना भयकथा आणि गुन्हेगारी साहित्य वाचणं कमीपणाचं वाटतं, कारण या साहित्याचा बराचसा रोख वरवरच्या पृष्ठभागावरील रचनेकडे असतो. पण आता या साहित्य प्रकारात अमूलाग्र बदल झाला असून भूपृष्ठाखालील घुसळणही त्यात प्रतीत होऊ लागली आहे. स्मिथ यांची ही कादंबरी बुकर पारितोषिकाच्या शॉर्टलिस्टमध्ये होती, तर हॅन कँग यांच्या ‘द व्हेजिटेरियन’ ला २०१६चं मॅन बुकर पारितोषिक मिळालं.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
केवळ कथा, कादंबऱ्या, कविता, महाकाव्य आणि नाटकं हे साहित्यप्रकार (जॉनर) मानल्यामुळे इतर ‘जॉनर’चं लेखन पुरस्कारांच्या यादीतून वगळलं जायचं. नोबेल पुरस्कारानं साहित्यातील हा जातीयवाद दूर करण्याचं ठरवलं आहे.
२०१५ सालचं साहित्याचा नोबेल पुरस्कार स्वेतलाना अलेक्सीविच या पत्रकर्तीला मिळाला. चेर्नोबिल अणू उत्सर्जनामुळे लोकांवर झालेल्या मानसिक आणि शारीरिक परिणामांचा शोध त्यांनी घेतला आणि या मौखिक इतिहासाचा दस्तावेज स्वेतलाना यांनी तयार केला. हा इतिहास घटनांचा नव्हता. तो होता भावनांचा इतिहास. स्वेतलाना अलेक्सिीविच यांची पुस्तकं रिपोर्ताज स्वरूपाची आहेत.
‘असंख्य आवाजांतील तिच्या लेखनाला... आजच्या काळातील दु:ख, व्यथा आणि धैर्याचं स्मारक आहे तिचं लेखन’, असं आपल्या गौरव संदेशात नोबेल कमिटीनं म्हटलं आहे.
२०१६ सालचा साहित्य पुरस्कार बॉब डिलन या गीतकार-गायकाला मिळाला. बॉब डिलन हे गीतकार, कवी नव्हेत. त्यामुळे काही शिष्टजनांनी नाराजी व्यक्त केली. पण नोबेलनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे- ‘अमेरिकेच्या गीतांच्या थोर परंपरेत नवी काव्यात्मक अभिव्यक्ती निर्माण करण्याबद्दल’.
डिलन यांची ‘ब्लोविंग इन द विंड’ आणि ‘द टाइम्स आर...’ ही गीतं युद्धविरोधी आणि नागरी स्वांतत्र्यासाठी लढणाऱ्या तरुणांची अॅन्थेम बनली होती.
गीतांची परंपरा प्राचीन आहे आणि सर्व संस्कृतीमध्ये तिचा आविष्कार आढळतो. तसंच अदभुत कथांची परंपरासुद्धा फार जुनी. उच्च आणि कमी दर्जाचे साहित्य असू शकतं, साहित्य प्रकारांत अशी उच्चनीचता असू शकत नाही, ही आपल्यासाठी पर्वणीच आहे.
.............................................................................................................................................
लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.
alkagadgil@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment