जागतिक नजरेत लार्जर दॅन लाइफ ठरलेल्या बहुतेक सर्व चित्रकारांची पेंटिंग्ज आपल्यात सामावून घेत उभी असलेली नॅशनल गॅलरी ओलांडून पाच-सात मिनिटं पायी पुढे जात राहिलं की, तुम्ही थेट चेरिंग क्रॉस रोडवर येऊन पोचता.
देशोदेशीच्या साहित्यशौकिनांना, कलासक्त पावलांना ओढ लावणारी लंडनमधली ही अत्यंत नावाजलेली पुस्तकपेठ. जागतिक मान्यता लाभलेले लेखक, आजघडीचे नवखे-उगवते लेखक इथपासून ते नुसतीच लेखक व्हायची ऊर्मी मनात बाळगून असलेली वा पुस्तकवेडानं झपाटलेली अफाट लिहिती-वाचती माणसं या सगळ्यांच्याच आस्थेचं हे ठिकाण - Charing cross road, London.
या रस्त्याच्या आरंभालाच वर कोपऱ्यात सहजी लक्ष न जाणारी ‘Charing Cross Road’ अशा अक्षरांची छोटीशी पाटी तुमचं शांतपणे स्वागत करते आणि तुम्ही तुमच्या इच्छित जागी पोचल्याची खात्री देते. पुढे रस्ताभर वळणा-वळणावर आकडे बदलत तुम्हाला या पाट्या दिसत राहतात. त्याखाली हारीनं उभी जुन्या-नव्या पुस्तकांनी ओसंडून वाहणारी कितीतरी दुकानं. मुळात जुन्या पुस्तकांची दुकानं हेच चेरिंग क्रॉस रोडचं मुख्य आकर्षण. जगभरातल्या साहित्यरसिकांना कायम भुलवणारी, second hand वा used books असं लेबल मिरवणारी, अत्यंत दुर्मिळ, out of print यादीतली, अनेक नजरांनी वाचून झालेली अन साहित्यविश्वातला अत्यंत मोलाचा ठेवा असलेली जुनीपुराणी पुस्तकं मिळण्याची खात्रीशीर जागा, अशी या रस्त्याची नेमकी ओळख. लेखक-वाचक-संशोधकांची वर्दळ इथं कधीच ओसरताना दिसत नाही ती यामुळेच. त्यातच लंडनमधली प्रसिद्ध अशी प्रमुख सिनेमागृहं आणि नाट्यगृहं या चेरिंग क्रॉस रोडला लागूनच असल्यानं हा रस्ता नितांत वाहता आणि जिवंत भासतो! अगणित कलांचा आत्मा असलेलं लंडन इथं आणखी आससून अनुभवता येतं.
आणखी म्हणजे इथलं प्रत्येक पुस्तकाचं दुकान स्वतःची अशी अंगभूत सजावट, पुस्तकांनी गजबजलेल्या दालनाची अत्यंत देखणी मांडणी घेऊनच तुमच्या पुढ्यात येतं. आधी तुम्ही त्या सगळ्या मांडणीच्याच प्रेमात पडता आणि नंतर मग शेल्फमधल्या पुस्तकांकडे वळता.
मुख्य चेरिंग क्रॉस रोडवर महत्त्वाची आणि विशेष नावाजलेली काही मोजकी दुकानं ओळीनं एकाआड एक अशी आपापली खासीयत घेऊन उभी आहेत. पण मुख्य रस्ता ओलांडून जरासं कडेच्या गल्लीबोळात डोकावलं तर तिकडेही विषयांचं वैविध्य लेवून कितीतरी पुस्तकदालनं गल्लीच्या दुतर्फा उभी असलेली दिसतात. दुकानाच्या पाट्या किंवा काचांआड सुबकरीत्या मांडून ठेवलेली पुस्तकं, मोठाली पोस्टर्स आतल्या पुस्तकांचे विषय चटकन लक्षात आणून देतात. Music, sport, science, art, fashion, photography, छोट्यांकरता कॉमिक्स, travel, spiritual ते अगदी erotica अशा विषयांवरील नि केवळ त्याच विषयाची पुस्तकं मिळणारी स्वतंत्र दुकानं. यामुळे एखाद्या विषयाची इतकी पुस्तकं जगभरात उपलब्ध आहेत याचं सुखद आश्चर्य मनात मावेनासं होतं. अख्ख्या इंग्लंडभरच अशा जुन्यापुराण्या दुर्मिळ पुस्तकांची दुकानं इथंतिथं विखुरलेली आहेत. कला-साहित्यावर नुसतं भाबडं प्रेम न करता तो ठेवा जतन करण्याची अतिशय प्रखर जाणीव इथली माणसं बाळगून आहेत. साहित्य आणि एकूणच जगण्याशी भिडत राहणाऱ्या विविधांगी कलांचं एक आगळं मोल या पश्चिमवासियांच्या जगण्यात मिसळून गेलेलं आहे आणि त्याची प्रचिती आसपास सतत आपल्याला येत राहते.
Bank holiday हा इथला सार्वत्रिक सुटीचा दिवस. चेरिंग क्रॉसवरची ग्रंथदालनंही त्या निमित्तानं ‘closed’ अशी पाटी मिरवत अखंड विश्रांतीमय झालेली दिसतात. ही बंद दुकानं बाहेरून सावकाश न्याहाळणं किंवा काचांच्या आड गारठलेल्या मलूल उजेडात बाहेरची वर्दळ निरखत निवांत पडून राहिलेली पुस्तकं, नुसतीच बघत राहणं हा तर आणखी वेगळा अनुभव. ती जिथं विसावलीत ती ब्रिटिश धाटणीची कोरीव कपाटं, भिंतीवर कुठे कुठे टांगलेली पुस्तकांबद्दलच्या स्लोगन्स, शतकं पार केलेली पोस्टर्स, रीतसर मांडून ठेवलेली दुर्मिळ नियतकालिकं, एखादं antique penstand, नक्षीदार मेणबत्ती किंवा कोपऱ्यातली अगदी जुनीपुराणी काहीशी धुळकट वाटणारी फुलदाणी… काळ खोळंबून राहिल्याचा आभास देणाऱ्या या सगळ्या वस्तू. तिथल्या पुस्तकाइतक्याच जुन्या. या दालनान केवढातरी मोठा काळ ओलांडलाय याची साक्ष देणाऱ्याही. एरवी आत जाऊन आधाशीपणानं केवळ पुस्तकं हाताळत राहताना ही निरीक्षणं निसटत राहतात.
साधारण चाळीसेक तरी बुकशॉप्स या चेरिंग क्रॉस रोड परिसरात आहेत. मुख्य रस्त्यावरची सहज नजरेला पडणारी सोडून इतर आसपासची बुकशॉप्स मात्र बारकाईनं आणि सावकाशीनं शोधावी लागतात.
जागतिक पातळीवर सर्वाधिक मोठं म्हणून गणलं जाणारं बहुमजली ‘Foyles’ तसं चटकन लक्ष वेधून घेतं, ते त्याच्या खास रॉयल धाटणीच्या चकचकीत, आकर्षक वास्तुरचनेमुळे. अर्थात हे दुकान नव्या-ताज्या पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहे. काचांनी वेढलेले अन पुस्तकांनी ओथंबून गेलेले एकेक मजले. ही पुस्तकांची अद्भुत दुनिया इथं पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकाला भान हरपायला लावते. पुस्तकांच्या सान्निध्यात कॉफीचा मंद सुवास पेरत उभ असलेलं इथलं कॅफे तर केवळ अफलातून आहेत. वेळेचं भान विसरून खा, प्या, वाचा… कोणी चुकूनही हटकणार नाही.
‘Foyles’च्याच आगेमागे उभी असलेली, तुलनेनं अगदीच छोटेखानी भासणारी जुन्या पुस्तकांची दुकानं मात्र कुठल्याही चकचकीतपणाखेरीज आपल्या खास royal antique look मुळे आपसूक नजरेत भरतात. या रस्त्याचा इतिहास घडवण्यात त्यांचा मौलिक वाटा आहे.
‘Any Amount of Books’ हे यातलं एक लाजवाब दुकान. एक पौंड ते काही हजार पौंड किमतीची पुस्तक इथं उपलब्ध आहेत. म्हणून दुकानाचं हे नाव. पुस्तकांची ख्याती अन दुर्मिळपण जितका अधिक, तितकं ते जास्त किमतीचं, असं समीकरण या सगळ्याच दुकानात अगदी पक्कं. आपल्या भारतीय मानसिकतेला किंवा पुस्तकांशी सख्य नसलेल्या कोणालाही ती 'महाग' वाटतातही. पण ‘महाग’ हा शब्द मुळात तसा सापेक्ष. त्यामुळे हा शब्द इथं जुळणारा नाही वाटत. इंचभरही जागा वाया न घालवता वर छतापर्यंत टेकलेली कपाटं. अमाप प्रसिद्धी मिळालेली ते कुणाच्या खिजगणतीतही नसलेली अशी हरतऱ्हेची असंख्य पुस्तकं दाटीवाटीनं तिथं जागा करून बसलेली. जगातल्या कित्येक देश-प्रांताच्या उभारणीचा, लढ्याचा, क्रांतीचा, मानवी उलथापालथीचा इतिहास समोर ठेवणारी पुस्तकं ते तत्त्वज्ञान, कविता, कादंबरी, classics, critics, religion, travel, संदर्भग्रंथ असं अमाप वैविध्य.
इंग्लिश वगळता जगभरातल्या इतर भाषांतील साहित्याचीही उपलब्धता लक्षणीय म्हणावी अशी. हे इथल्या बहुतांशी दुकानाचं वैशिष्ट्यच. नुसत्या स्पाईनवरून नजर फिरवली तरी टायटल्स वाचून दमायला होतं.
बाहेर दुकानाला लागुनच ‘second hand paperbacks’चा भलामोठा स्टाॅल आहे. दारातच ती आपल्याला थबकून ठेवतात. अगदी उत्तम असं पुस्तक यात हाताला लागण्याची शक्यता फारशी नाही. पण अनेक क्लासिक्स एक पौंडला मिळून जातात. थ्रिलर, रहस्यकथा, शौर्यकथा व इतर जनरल विषयांवरील पुस्तकांचा भरणा अधिक असतो. मात्र विशिष्ट विषय मनात धरून आणि दुर्मिळ पुस्तकं शोधायची तर आतली शेल्फंच गाठावी लागतात. जेमतेम उभा राहायला जागा असलेलं हे दुकान म्हणजे पुस्तकाची एक प्रचंड गुहा आहे. विषयानुरूप पुस्तकांचे वेगवेगळे विभाग पद्धतशीर केलेले आहेत. त्यामुळे आपल्या पुस्तकाचा विभाग रीतसर धुंडाळता येतो. पण एखाद विशिष्ट पुस्तक या खचाखच भरलेल्या जंत्रीतून शोधणं तसं जिकिरीचंच. पुस्तकांची यादी दुकान मालकाला दाखवली किंवा पुस्तकाची विचारणा केली तर उत्साहानं ते विभाग सांगतातही. पुस्तक available आहे नाही हेही सांगतात. पण त्या विभागामध्ये ती नेमकी कुठं असतील हे त्यांनाही सांगता येत नाही. आणि हवं ते पुस्तक दुकान मालकानं चटकन स्वतः शोधून तुमच्या हातात ठेवण्याची परंपरा या बहुतेक दुकानांमध्ये नाही. तो शोध आणि बोध तुमचा तुम्ही स्वतःच घ्यायचा. पण यातच खरी मजा आहे. तुम्हाला हवं ते पुस्तक जर नाही मिळालं - बहुतेकदा ते मिळत नाही, हाच अनुभव खूपदा मिळाला - तरी दुसरंच एखादं अप्रतिम अज्ञात बाड तुमच्या हाताला लागतं. म्हणूनच ही दुकानं वाचकाला, ग्रंथशोधकाला रिकाम्या हाती परत पाठवत नाहीत हे नक्की. इथला करकरणारा अरुंद लाकडी जिना उतरून खाली गेलात तर तळघर अगणित दुर्मिळ पुस्तकं आपल्या पोटात घेऊन बसलेलं दिसतं. मग शेजारचा जाडजुड बसका स्टूल ओढून त्यावर बैठक मांडायची अन खालच्या खणातली पुस्तकं बघून घ्यायची. वरच्या खणासाठी भलीमोठी शिडी आसपास उभी असतेच. जीर्णशीर्ण पानांचा किंचित धुळकट कागदी वास त्या जागेत भरून राहिलेला जाणवतो. खरं तर त्या पुस्तकमय माहोलची खुमारी तो वाढवत असतो.
पाशात्य देशांमध्ये घरातल्या, तसंच कॅफेज, हॉटेल्स, ऑफिस, क्लब अन पबमधल्या अंतर्गत सजावटीत बुकशेल्फला एक आगळं महत्त्व आहे. त्याकरताच लेदर वा क्लोद बाईंडिंगमधलं classical collection पुरवण्याचं काम या दुकानाच्या माध्यमातून करण्यात येतं. ग्रंथांची नेमकी निवड अन त्यांची देखणी मांडणी याबाबतच्या सल्लामसलतीचं कामही इथले कर्मचारी त्या त्या ठिकाणी जाऊन करतात.
‘quinto and Francis Edwards booksellers’ हे याच रांगेतलं दुसर अनोखं दुकान. Antiquarian पुस्तकांसाठी विशेष प्रसिद्ध. काचांच्या आत शिस्तीनं अन नजाकतीनं उघडून ठेवलेली पुस्तकं, त्यातून डोकावणारी विशिष्ट मजकुराची, चित्रांची जुनाट पिवळट पानं उत्सुकता चाळवतात. जगद्विख्यात लेखकांच्या अत्यंत गाजलेल्या साहित्यकृतीच्या पहिल्या प्रती, तसेच दस्तुरखुद लेखकाची सही असलेल्या प्रती - first copy, signed copy अशा लेबल्ससहित - लक्ष वेधून घेतात. आणि आपले पाय आपसूकच दुकानाचं दार किलकिल करून आत स्थिरावतात.
भागीदारीत चालणाऱ्या या दुकानाचे दोन रीतसर विभाग आहेत. देखण्या लेदर bound, हार्ड bound, क्लोद bound मधील antique ग्रंथांनी खचाखच भरलेला दर्शनी भाग हा फ्रान्सिस एडवर्डसचा. कोपऱ्यातल्या जिन्यानं खाली उतरलं की, तळघरातला क्लासिक, दुर्मिळ, पुरातन पुस्तकांचा विभाग हा quintoचा. इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, सामाजिकशास्त्र, साहित्य, समीक्षा, कविता, कादंबरी अशा एकूणएक विषयातलं ग्रंथभांडार या तळघरात विसावलेलं. क्लासिक अन जनरल असा दोन्हींचा अमाप संग्रह. तोही दर महिन्याला नेमानं अद्ययावत होणारा.
त्या त्या शेल्फवर पुस्तकांचे विषय लिहिलेले असले तरी कादंबरीच्या विभागामध्ये कवितांचं एखादं क्लासिक तुमच्या हाताला लागून जातं किंवा अगदी दुर्मिळ असं निबंधाचं पुस्तकही. १७-१८ व्या शतकातली एखादी प्रत हाताला लागते नि ती नुसती पाहत रहावंसं वाटतं. लेखक, प्रकाशक, पुस्तकाचं नावगाव काही काही ठाऊक नसतानाही ते पुस्तक उगाचच ओढ लावत राहतं. तुम्हाला त्यातली अक्षरं, त्यांचा फॉण्ट, कधीकाळची बांधणी, ले आउट सगळं काही त्या गतकाळासकट निरखता येतं. भान हरपून खिळवून ठेवणारी जी ठिकाणं असतात त्यातलं हे एक.
Quinto ला लागूनच असलेलं ‘Henry pordes books’ हेदेखील असंच अप्रतिम दुकान. Antiquarian पुस्तकं ही या दुकानाचीही खासीयत. त्या जोडीनं कला, साहित्य, इतिहास, सायन्स, मेडिसिन, परफॉर्मिंग आर्ट्स, फोटोग्राफी, आर्किटेक्चर ते पाककला असं विषयांचं वैविध्यदेखील चकित करणारं. त्यातही jewish साहित्य हे अजून एक विशेष. लेदर- हार्ड- क्लोद बाउंड तसेच गोल्डन- सिल्व्हर इम्बोस्सिंगमधील हे दुर्मिळ, पुरातन ग्रंथ-संकलन ब्रिटिशपण जपणाऱ्या कोरीव शेल्फमध्ये अजूनच मोहक वाटत राहतं.
लेखकाच्या सहीसकट किंवा पहिली दुर्मिळ प्रत इथंही मिळून जाते. घर वा सार्वजनिक जागांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या क्लासिक, antique पुस्तकांसाठीही हे दालन प्रसिद्ध आहे. या दुकानांमधून नुसती भटकंती करत राहील तरी पुस्तकांचा एक कैफ चढत जातो नकळत.
तुम्ही '84 चेरिंग क्रॉस रोड' हे हेलेन होन्फ या अवलिया लेखिकेच तितकंच अवलिया धाटणीचं पुस्तक वाचलं असेल, तर या रस्त्यावरून फिरताना ते सतत तुमची सोबत करत राहतं. त्यातल्या खाणाखुणा तुमचं मन नकळत या रस्त्यावर शोधूही बघतं.
अमेरिकेतल्या कुठल्याशा गावात लिहिण्या-वाचण्यात गढलेली, त्यातूनच चिमूटभर कमाईचे मार्ग शोधणारी आणि कोऱ्या करकरीत पुस्तकांऐवजी जुनाट, रंग उडालेल्या पुस्तकांवर जीव टाकणारी हेलेन ही एक होतकरू लेखिका. चेरिंग क्रॉसवरील ‘Marks and Co’ या दुकानाच्या मालकाशी, तिथल्या कर्मचाऱ्यांशी निव्वळ पुस्तकप्रेमातून अन पुस्तकशोधापायी तिनं केलेल्या पत्रापत्रीतून विणल्या गेलेल्या अनवट भावबंधाची ही कहाणी. कित्येक वर्षांचा हा अत्यंत रोचक, स्नेहाळ पत्रसंवाद पुस्तकरूपानं दुनियेसमोर आला आणि हेलेन एका रात्रीतून जगप्रसिद्ध लेखिका होऊन गेली. नाटक, सिनेमा यांचा विषय बनलेलं हे पुस्तक एक अद्भुत घटित बनून राहिलं आहे. लंडनविषयी, चेरिंग क्रॉसवरच्या जुन्या पुस्तक दुकानांविषयी अपार कुतूहल, ती ग्रंथदालनं प्रत्यक्ष पाहण्याची अतोनात ओढ असूनही आर्थिक चणचणीमुळे लंडनला न पोचू शकलेली, पण तिथं जाण्याचा ध्यास बाळगतच जगणारी हेलेन निव्वळ या पुस्तकामुळेच अखेर तिथं पोहोचली. ‘Marks and Co’ कधीच बंद झालंय, पण तुम्हाला ते त्याच्या मागे उरलेल्या खुणा शोधायला भाग पाडतं. हेलेनसारख्या कितीतरी पुस्तकवेड्यांसाठी हा चेरिंग क्रॉस असा आजवर ‘मक्का-मदिना’ बनून राहिला आहे.
इथल्या रस्तोरस्ती पसरलेले निरनिराळे चॅरिटी शॉप्स आणि तिथं मिळणाऱ्या second hand वस्तू हा इंग्लंडमधील सामान्य माणसाच्या जगण्याचा एक मूलभूत भाग आहे. महायुद्धाच्या वेदनेची गडद किनार त्याला आहे. त्यातही आपल्याकडील जास्तीच्या चीजवस्तू दान करून टाकण्याची अन कुणीतरी वापरलेल्या जुन्यापुराण्या वस्तू सहज घरी घेऊन येण्याची ब्रिटिश मानसिकता याच्या मुळाशी आहे. Oxfam हे यातलं महत्त्वाचं चरॅरिटी शॉप. त्याच्या माध्यमातून उभा राहणारा पैसा देश-विदेशात मदतगार ठरतो.
जुन्या, second hand पुस्तकांसाठीही Oxfam bookshops बरीच प्रसिद्ध आहेत. इंग्लंडभर त्यांच जाळं पसरलेलं आहे. यापैकी एक दुकान चेरिंग क्रॉस रोड परिसरातही आहेच. फिक्शन, नॉन फिक्शन, शैक्षणिक, तसंच छोट्यांसाठीच्या पुस्तकांचं भरपूर वैविध्य इथं पाहायला मिळतं. हार्ड बाउंड, लेदर बाउंडमधील उत्तम संग्राह्य ग्रंथही बहुसंख्येनं असतात. त्यासोबतच चित्रकला, पाककला ते विणकामापर्यंतच्या जनरल पुस्तकांचा भरणाही पुष्कळ असतो. बहुतांशी पुस्तक एक पौंडात मिळून जातात. पण दुर्मिळ, नावाजलेलं साहित्य असेल तर अर्थातच त्या पटीत त्याचं मूल्यही वाढतं. ही सगळी पुस्तकं लोकांनी दान म्हणून दिलेली असतात.
चेरिंग क्रॉसच्या गल्ल्यांमध्ये उभी असलेली ‘Watkins Books’ आणि ‘Treadwell’s’ ही दोन पुस्तकांची अद्भुत दुकानं आहेत. भविष्य, भाकीत, आधिभौतिक, आध्यात्मिक, धार्मिक, गूढवादी तथा मंत्रतंत्र, जादूविद्या अशा विषयांत, त्यासंबंधीच्या साहित्यात रस असणाऱ्यांसाठी ही दुकानं म्हणजे एक अचाट खजिना आहे. त्यातही ‘Watkins Books’चं दालन हे गूढगम्य (esoterica) विषयांसहित जगभरातल्या धर्मांचा, अध्यात्माचा सखोल अभ्यास मांडणारी असंख्य नवी-जुनी, दुर्मिळ, पुरातन पुस्तकं उपलब्ध करून देणारं विशेष नावाजलं गेलेलं आहे. शतकं पार केलेलं हे दुकान काळाबरोबर कमालीचं अद्ययावतही होत राहिलं आहे. पुस्तकदालनाची अफलातून मांडणी आणि पुस्तकांचं विलक्षण वैविध्य, याकरता ज्यांना या विषयात विशेष रस नाही त्यांनीही ही दुकानं आवर्जून पाहावीत.
‘Treadwell’s’ हे मुख्यत्व पाश्चात्य गूढवाद, गुढवादि साहित्य तसंच युरोपियन व ब्रिटिश paganism (प्रतिमापूजन मानणारी व देवाचं अस्तित्व नाकारणारी संस्कृती) या विषयातील नव्या-जुन्या, दुर्मिळ, पुरातन ग्रंथांच्या संग्रहासाठी ओळख कमावलेलं दुकान. संबंधित विषयात विशेष अभ्यास-संशोधन करणाऱ्यांना आत्मीयतेनं मार्गदर्शन कारणारा स्टाफ हे इथलं आणखी एक वेगळेपण. ‘tarrot reading’चा स्वतंत्र विभागही इथं पाहता येतो. त्यावर विश्वास असणारे तिथं बसून आपलं भविष्यही अजमावू शकतात.
खास विषयाला वाहिलेली ही स्वतंत्र ग्रंथदालनं संबंधित विषयाची विचारधारा ठामपणे मानणारी अन त्या विचाराच्या प्रचार-प्रसाराकरता अविरत झटणारीही आहेत. म्हणूनच या दालनांमधून विविधांगी व्याख्यानं, चर्चासत्रं, शिबिरं नियमित भरवली जातात. या सर्वच दुकानांमधला स्टाफदेखील विलक्षण जाणकार अन आपापल्या विषयातला तज्ज्ञ असा असतो. आर्थिक नफ्यापेक्षाही साहित्याविषयी प्रचंड आस्था, हीच या बहुतेकांची ही ग्रंथदालनं सुरू ठेवण्यामागील मुख्य प्रेरणा असते.
विशिष्ट विचारसरणी जोपासणारं पुस्तकदालन पाहणं हा तर आवर्जुन अनुभवावा असा अनुभव. Bookmarks हे यातलं विशेष प्रख्यात असं दुकान. Socialist bookshop म्हणून ओळख असलेलं हे दुकान दारासमोर उभारलेल्या छोट्याशा पाटीवरच्या स्लोगनमधूनच आपली अर्धीअधिक ओळख उजागरं करतं. आतल्या साहित्याची नेमकी कल्पना तुमच्यापर्यंत पोहोचवतं. ‘Books are weapons’ ही ती खडूनं लिहिलेली अक्षरं. ती मनात घोळवत तुम्ही दुकानात पाऊल ठेवता. समाजवाद, मार्क्सवाद आणि तमाम डाव्या, पुरोगामी विचारधारेचं नेतृत्व करणारं हे दुकान पुस्तकांनी पुरतं ओसंडून वाहतंय असं वाटतं. बहुसंख्य विकसित-अर्धविकसित देशातील समाजकारण, राजकारण, इतिहास, लढा, क्रांत्या यांचं तीक्ष्ण विवेचन मांडणारं केवढंतरी साहित्य. जगभरातील डावी-पुरोगामी चळवळ, स्त्रीवादी चळवळ इथपासून ते कामगार-मजूरवर्ग, कृष्णवर्णीय, समलिंगी अशा परिघावरील जगण्याचा संघर्ष मांडणारी कित्येक पुस्तकं... नवी-जुनी, दुर्मिळ अन पुरातन.
विषयानुरूप तसंच एकेका राष्ट्रानुसारही इथं पुस्तकांचे विभाग केलेले दिसतात. त्या त्या राष्ट्राच्या विभागामध्ये तिथला राजकीय, सांस्कृतिक अन व्यवस्थात्मक लढा चितारणारी कितीतरी पुस्तकं गवसत जातात. दुकानातला प्रत्येक कोपरा न कोपरा पुस्तकांनी व्यापलेला. लहानांच्या साहित्याचा विशेष विभाग आहे. जगभरातल्या विविध प्रमुख भाषांतील साहित्याचाही खास विभाग आहे. तुलनेनं नॉन पिक्शनचं संकलन मोठं असलं तरी मोजकं classic fictionही आहे. latest arrivals ही मोठ्या संख्येनं उपलब्ध असलेली दिसतात. bookmarks च्या स्वतःच्या प्रकाशनाद्वारेही सातत्यानं नवनवीन वैचारिक, अभ्यासात्मक साहित्य प्रकाशित होत असतं. rebel's guide हे बुकमार्क्सचं एक खास प्रकाशन. ही छोट्या पुस्तिकांची एक सिरीज आहे. ज्याला pocket guide ही म्हणता येईल. मार्क्स, लेनिन, ट्रॉटस्की अशा अनेक विचारवंतांच्या व्यक्तित्वाची, विचारांची, त्यांच्या महत्त्वपूर्ण मांडणीची अन अर्थातच त्यांच्या राजकीय, सामाजिक संघर्षाची, तसंच वेगवेगळ्या पुरोगामी विचारप्रवाहांची अगदी थोडक्यात माहिती या पुस्तिकांमधून शब्दांकित केलेली आहे. या पेपरबॅक ब्लॅक अँड व्हाइट पुस्तिका वाटतातही खूप आकर्षक.
याखेरीज radical विचारधारेच्या प्रचार-प्रसाराचं व्रत जपणारं हे दालन यासंबधीच्या नाना तऱ्हेच्या वस्तू-साहित्याच्या माध्यमातून तिथं येणाऱ्या प्रत्येकाच्या विचारजाणीवांना जाग आणण्याचंही काम अथकपणे करत आहे. radical विचारधारेला अर्ध्वयू मानणाऱ्या अनेक विचारवंतांची भाषणं, मुलाखती, लघुपटांचं संकलनदेखील इथं सीडी, डीव्हीडीच्या स्वरूपात उपलब्ध आहे.
Marxist, Socialist, Feminist तथा Anti-fasist विचार शब्दबद्ध केलेले अत्यंत सुबक कॉफी मग, टी-टॉवेल्स, बुकमार्क्स, कापडी पिशव्या, स्त्रियांचे दागिने, पोस्टकार्ड्स, पोस्टर्स, टी-शर्टस, कि-चेन्स यांचं वैविध्यही पुष्कळ आहे.
मार्क्स, लेनिन, बुद्ध, ट्रॉटस्की यांचे छोटेखानी शुभ्र स्कल्पचर्स पुस्तकांच्या राशींमधून मांडून ठेवलेले आहेत. पुस्तकांच्या लक्षवेधी सजावटीत ते भर टाकतातच, पण जणू तिथल्या साहित्याविषयाचा आशय अजूनच उजळ करत राहतात. हे स्कल्पचर्स इथं विक्रीलाही आहेत.
.............................................................................................................................................
नवनवीन पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
ही काही मोजकी ग्रंथदालनं वगळता आणखीही बरीच खासमखास दुकानं या परिसरात फिरता फिरता आपलं लक्ष वेधून घेतात. आणि आपलं पाउल नि मन तिथं हमखास रेंगाळतंच. अवघ्या साहित्याच्या इतिहासात अन लंडनच्या कला-संस्कृती विश्वात कदाचित म्हणूनच हा चेरिंग क्रॉस रोड असा लखलखीत वैभव बनून राहिलेला आहे.
.............................................................................................................................................
लेखिका शुभांगी गबाले स्त्रीप्रश्नाच्या अभ्यासक आहेत.
shubhangigabale@rediffmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment