गोविंद तळवलकर हे विद्वान संपादक होते. पण, त्याचबरोबर ते भाग्यवान संपादक होते. कारण, त्यांना विद्वान संपादक असण्याची मुभा होती. तशी, बऱ्यापैकी निरंकुश आणि निष्कंटक, सोय लाभलेले ते शेवटचे संपादक असावेत.
तळवलकरांच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या संपादकपदाच्या प्रदीर्घ कारकीर्दीच्या अगदी अखेरच्या टप्प्यात त्यांच्यासोबत आणि ‘तळवलकरांच्या मटा’त काम करण्याची संधी मला मिळाली... त्यानंतर तो ‘केतकरांचा मटा’ (केतकर‘प्रेमीं’च्या मते ‘सोटा’ म्हणजे ‘सोनिया टाइम्स’) आणि नंतर ‘भारतकुमार राऊतांचा मटा’ (राऊत‘प्रेमीं’च्या मते ‘सेटा’ म्हणजे ‘(शिव)सेना टाइम्स’) कसा बनला, हे या दोन्ही संपादकांबरोबर काम करताना प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव मिळाला... अर्थात ‘मटा’मधले खरे बदल त्याच्या राजकीय विचारधारेतले बदल नव्हते; ते बदल फारच वेगळ्या प्रतलांवरचे होते, त्यांनी ‘मटा’चंच नव्हे, तर पुढे मराठी पत्रकारितेचं रूप पालटलं आणि प्राधान्यक्रमही बदलून टाकले. या ‘नव्या मटा’च्या उभारणीत इच्छेअनिच्छेनं एखादी वीट लावण्याचंही भाग्य आमच्या या, तीन संपादक पाहिलेल्या, पिढीला लाभलं... नव्वदच्या दशकात मराठी पत्रकारितेनं कूस बदलून वेगळंच स्वच्छ व्यापारी रूप धारण केलं आणि नंतर ते अस्वच्छही करून घेतलं. ही एक ऐतिहासिक प्रक्रिया होती. ‘मटा’ हा निर्विवादपणे त्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणि अग्रभागी होता.
तळवलकर ते राऊत या संपादकांच्या बदलत्या काळात ‘मटा’नं वाचकांना अनेक बरे-वाईट धक्के दिले, वृत्तपत्र व्यवसायातल्या अनेकांनी ‘मटा’मधल्या बदलांना तेव्हा नाकं मुरडली आणि नंतर तेच त्यांना आत्मसात करावे लागले. अर्थात, ते करूनही काहींचं नाकं मुरडणं अजूनही थांबलेलं नाहीच. पण, ते एक असो.
तळवलकर या सगळ्या बदलांच्या आधी निवृत्त झाले, हे त्यांचं भाग्य. वर्तमानपत्राच्या ऑफिसात संपादकाचा शब्द अंतिम असण्याची मौज त्यांनी मन:पूत अनुभवली. ती संपुष्टात येण्याच्या आधीच्या टप्प्यावरच ते अचूकपणे सन्मानानं बाहेर पडले, म्हणून ते ‘भाग्यवान’.
तळवलकर काही कारणाने आणखी दोनेक वर्षं संपादकपदावर राहिले असते तर?
तर ते एवढे भाग्यवान ठरू शकले नसते. ‘मटा’मध्ये आणि पाठोपाठ मराठी पत्रकारितेमध्ये जे बदल झाले, ते तळवलकर असते तरी, थोडे पुढेमागे का होईना, झालेच असते; ते तळवलकर थांबवू शकले नसते. तळवलकरांना हयातभर जे देदीप्यमान वलय लाभलं, ते मात्र नक्कीच काहीसं काळवंडलं असतं. थोडी जास्त वर्षं थांबले असते, तर ते वलय लुप्तही झालं असतं. नव्वदच्या दशकात ‘मटा’चा आणि मराठी पत्रकारितेचा चेहरा खऱ्या अर्थानं बदलणारे संपादक होते कुमार केतकर आणि भारतकुमार राऊत. या दोघांनाही तळवलकरांचं ते वलय लाभलं नाही. राऊतांचा पिंड बराच वेगळा होता, पण, केतकर हे खरं तर वाचन-व्यासंगाच्या बाबतीत तळवलकरांच्या परंपरेचे पुढचे पाईक ठरायला हवे होते. ‘मटा’मधल्या त्यांच्या अल्पजीवी कारकीर्दीच्या पहिल्या टप्प्यात तळवलकरांचाच ‘मटा’ आधुनिक, स्मार्ट आणि कालसुसंगत बनून पुढे जाईल, असं वाटत होतं. तसं घडलं नाही. व्यवस्थापनानं संपादकपदाचं वलय जाणीवपूर्वक काढून घेण्याची जी प्रक्रिया सुरू केली होती, तिच्या सावटात त्यांना ती कारकीर्द घडवावी लागली. राऊतांच्या टप्प्यापर्यंत ती प्रक्रिया पूर्ण झाली होती. राऊतांनी व्यावसायिक यशाच्या माध्यमातून त्याच व्यवस्थापनाकडून वेगळ्या प्रकारे ते वलय मिळवलं. पण, त्यांना किंवा केतकरांना तळवलकरांचं वलय काही लाभू शकलं नाही.
त्या वलयांकित ‘तळवलकरांचा मटा’ नेमका काय होता?
खरं तर एखादं दुर्लक्षित सरकारी कार्यालय बरं असं वाटायला लावणाऱ्या, टेलिफोन वायरींच्या भेंडोळ्या लोंबणाऱ्या, लाकडी बाकं जोडून बैठका बनवलेल्या, लाकडी खुर्च्यांच्या, घरघरणाऱ्या पंख्यांच्या एका ऑफिसातून निघणारा हा पेपर मराठीतला सगळ्यात प्रभावशाली पेपर होता, हे एक आश्चर्यच होतं. पण, तेव्हाची बहुतेक सर्व मराठी वर्तमानपत्रांची कार्यालयं ही ‘कार्यालयं’च होती, त्यांची चकचकीत ‘ऑफिसेस’ झाली नव्हती. ‘मटा’चा दबदबा असा होता की, मराठी पेपर वाचणाऱ्यांमध्ये ‘मटा’ वाचणारे आणि अन्य पेपर वाचणारे अशा दोन जाती होत्या. एकतर गावोगावच्या आवृत्त्या नसल्यानं मुंबईतच प्रकाशित होणारा, महाराष्ट्राच्या राजधानीचा तो पेपर होता. सगळ्या राज्यभर त्याचं ते स्थान होतं. मुंबईपासून गल्लीबोळापर्यंत सामाजिक, राजकीय, प्रशासनिक, सांस्कृतिक, वैचारिक विश्वात जे कोणी ओपिनियन मेकर्स होते, त्या सगळ्यांना ‘मटा’ वाचणं जणू कम्पल्सरी होतं. बातम्यांसाठी अनेक पेपर होते. पण, सगळीकडच्या खास बातम्या, जगभरातली खास माहिती, तिचं अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्रांमधल्या थोरामोठ्यांचं विविध विषयांवरचं चिंतन समजून घ्यायचा एकच मार्ग होता, ‘मटा’ वाचणं. त्याला पर्याय नव्हता. मटाचा खप किती होता, हे तिथं काम करणाऱ्या अनेकांना माहितीही नव्हतं. ती त्या काळात अनावश्यक आणि बिनमहत्त्वाची बाब होती. वर्तमानपत्राचा प्रभाव सांगण्यासाठी तेव्हा खपाचे आकडे फिरवून सांगण्याचा केविलवाणेपणा करावा लागत नसे. ‘मटा’चा राज्यभरात प्रभाव किती मोठा होता, हे सगळ्यांनाच माहिती होतं. ‘दाद-फिर्याद’सारख्या निव्वळ तक्रारी सांगण्याच्या सदरात एखादा फुटकळ विषय छापून आला, तर सगळ्या संबंधित यंत्रणा कामाला लागून आठवड्याभराच्या आत तो तडीला लागलेला असायचा. या सदरासाठी पुढची तीन-चार वर्षं पुरतील, इतकी पत्रं कायम शिल्लक असायची. ‘अनुभव’ या नावानं सर्वसामान्य वाचकांना पुरवणीत लेखनाची पहिली संधी उपलब्ध करून दिली गेली, तेव्हा जो मजकुराचा एकगठ्ठा पाऊस पडला, त्यातून दहाएक वर्षं ते सदर सहज चाललं असतं. तरीही दर आठवड्याला अनुभवचं जाडजूड टपाल येतच राहिलं. वार्ताहर बैठका, वार्तांकन दौरे, मुलाखती अशा ठिकाणी ‘मटा’च्या वार्ताहराला ‘मटा’ची पुण्याई आणि थोरवी समजायची. इतरत्र कितीही मोठी बातमी छापून आली, तरी ‘मटा’मध्ये दोन ओळी का होईना छापून याव्यात, यासाठी पीआरओंपासून सर्व प्रकारचे हितसंबंधी जंग जंग पछाडायचे. ‘मटा’च्या गावोगावच्या वार्ताहरांच्या मोजक्याच बातम्या छापून यायच्या. पण, त्यांना स्थानिक पत्रकारितेत मोठा मान असायचा. ती बडी प्रस्थं बनून बसली होती. त्यांच्यातल्या अनेकांना नंतर विविध वर्तमानपत्रांचे आवृत्ती संपादक बनण्याची संधी मिळाली. कोल्हापुरात मटा संध्याकाळी चार-पाचनंतर मिळायचा आणि गोव्यात दुसऱ्या दिवशी सकाळी मिळायचा. तरी तो संध्याकाळी स्टँडवर जाऊन घेणारे लोक होते, पेपरची एक लाइन संध्याकाळीही टाकली जायची.
तळवलकरांनी प्रारंभापासूनच ‘मटा’मध्ये इतर वर्तमानपत्रांमधले मोजकेच पण दणकट शिलेदार आणले होते. दि. वि. गोखल्यांसारख्या, तळवलकरांचा वैचारिक सहप्रवासी नसलेला खंदा सहकारी तळवलकरांच्या कल्पनेतला उच्च अभिरूचीचा ‘मटा’ साकारत होते. शंकर सारडा, दिनकर गांगल, अशोक जैन यांच्यासारख्या पुरवणी संपादकांनी ‘मैफल’ला अव्वल दर्जावर नेऊन ठेवलं होतं. ‘मटा’ हा नि:संशय अभिजनांचा पेपर होता. पण, अशा प्रकारे चांगलंचुंगलं वाचणारा, आस्वादणारा, जगाची माहिती असणारा नेमस्त अभिजन बनावं, अशी चेतना (जिला नंतर अॅस्पिरेशन या नावानं वेगळ्या बाजारात बसवलं गेलं) त्यानं ‘सामान्य वाचक’ म्हणून ओळखले जाणाऱ्यांतही निर्माण केली होती. ती ‘मटा’ची सर्वांत मोठी पुण्याई असावी.
‘मटा’ किंवा एकंदरच तेव्हाच्या वर्तमानपत्रांचं कामकाज समजून घेण्यासाठी तेव्हाच्या एकंदर प्रसारमाध्यमांचीही स्थिती समजून घेणं आवश्यक ठरतं. या काळात टीव्हीचा प्रसार मोजक्या शहरी भागांमध्येच झाला होता. झी टीव्हीच्या नावानं खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांचं पहिलं पाऊल रोवलं जात असलं तरी प्रामुख्यानं दूरदर्शन या सरकारी वाहिनीचाच जबरदस्त दबदबा होता. तीच सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचत होती आणि तिचं प्रसारणही मर्यादित वेळेतच होत असे. अहोरात्र प्रसारण ही संकल्पनाही कोणाच्या डोक्यात आली नसेल. सातच्या प्रादेशिक मराठी बातम्या आणि रात्री नऊच्या हिंदी बातम्या यांच्यापलीकडे दिवसभरातल्या ताज्या-मोजक्या घडामोडी वर्तमानपत्रांच्या आधी समजण्याची कोणतीही दुसरी व्यवस्था नव्हती. या बातम्याही ‘सरकारी’ असत. खासगी संस्थेनं बातम्यांवर आधारित कार्यक्रम सादर करण्याची कल्पना साप्ताहिक पातळीवर मूळ धरत होती. निव्वळ बातम्यांनाच वाहिलेल्या अखंड प्रसारणाच्या वाहिन्यांचं युग अजून दूर होतं. वर्तमानपत्रांना दुहेरी महत्त्व होतं. अनेक ‘खऱ्या, ताज्या आणि विशेष’ बातम्या वर्तमानपत्रांतूनच मिळत असत. छापील शोधपत्रकारितेतून आलेली एखादी बातमी वर्तमानपत्रातून हंगामा उडवून देत असे आणि मग इतर वर्तमानपत्रांना तिच्या ‘फॉलोअप’च्या बातम्या द्याव्या लागत. वर्तमानपत्रांच्या बातम्यांनी सरकारचा पाया हादरवल्याची उदाहरणं होती. त्याचप्रमाणे वर्तमानपत्रं ओपिनियन लीडर्स होती. संपादकाला काहीएक चेहरामोहरा होता, त्याची काही विचारसरणी होती, भाषाशैली होती आणि अमुक एका विषयावर तळवलकर काय म्हणतात, गडकरी काय म्हणतात, केसरीकार काय म्हणतात, खाडिलकर काय म्हणतात, अशा प्रकारची उत्सुकता होती. ‘सकाळ’चा घवघवीत अपवाद वगळता लिहित्या संपादकाविना यशस्वी झालेल्या मुख्य प्रवाहातल्या वर्तमानपत्राचा दाखला देता येणं अवघड होतं.
मुळात माहितीचे स्रोत कमी होते. माहितीचा धंदाच प्रामुख्यानं वर्तमानपत्रांच्या हातात एकवटलेला होता. माहिती मिळवण्याचं आणि तिचं तात्कालिक संदर्भात ताबडतोबीनं विश्लेषण करण्याचं प्रशिक्षण घेतलेले पत्रकार आणि ज्येष्ठ स्तंभलेखक जगाचं आकलन त्यांच्या चष्म्यातून करवून देत होते. त्याचबरोबर पुरवण्यांच्या आणि रोजच्या संपादकीय पानांवरच्या लेखांमधून वेगवेगळ्या विषयांमधले तज्ज्ञ त्यांच्या त्यांच्या विषयांतली माहिती आणून देत होते. खुद्द तळवलकरांसारखे ‘वाचस्पती’ संपादक इंग्रजी भाषेतल्या विविध विषयांवरच्या पुस्तकांच्या परिशीलनातून वाचकाला समृद्ध करत होते. निदान तसा ‘फील’ तरी देत होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिघातल्या कुसुमाग्रजांपासून पु. ल. देशपांड्यांपर्यंतच्या सगळ्या मानबिंदूंसाठी सार्वजनिक स्वरूपात व्यक्त होण्याचा प्राधान्याचा मंच होता, ‘मटा.’ हेच जगण्याच्या जवळपास प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीत खरं होतं.
साहजिकच ‘मटा’ हा एक सांस्कृतिक मठ होता आणि तळवलकर होते ‘मटाधीश.’ ते, मी पाहिलेल्या काळात सकाळी लवकरच ऑफिसला यायचे. आपल्या केबिनमध्ये जाऊन काही ना काही वाचत बसायचे. दुपारच्या सुमारास सहायक संपादक, वृत्तसंपादक, मुख्य वार्ताहर, राजकीय वार्ताहर ही मंडळी गोळा झाली की, दिवसभरात काय घडतं आहे, आजच्या अंकात काय गडबडी झाल्या, का झाल्या, आजचे अग्रलेखाचे आणि स्फुटांचे विषय काय आहेत, याची चर्चा व्हायची. मुंबईत, प्रमुख शहरांत, राज्यात, देशात आणि जगात काय घडतंय, याचा एक वर्तमानपत्रयोग्य अंदाज यायचा आणि अंकाचं धूसर प्रारूप उभं राहायचं. पुढे अंकाच्या वेगवेगळ्या विभागांशी संबंधित मंडळी त्या त्या भागांना आकार द्यायची. वर्तमानपत्र असल्यामुळे ऐन वेळच्या बदलांसाठी तयार असावंच लागायचं. पण, फार मोठं काही नसेल, तर ते सगळं दुसऱ्या फळीतले वरिष्ठ करून घ्यायचे. तळवलकरांनी बहुतेक वेळा अग्रलेखाचा विषय ठरवलेला असायचा. तो शीर्षकासह त्यांच्या डोक्यात तयार असायचा. आधीच्या काळात ते तो लिहीत असणार. मी होतो त्या काळात ते दोन हातांची दोन बोटं वापरून एकाग्रतेनं तो अग्रलेख टाइप करत. पुढची उस्तवार सहायक संपादक मंडळी करत. तळवलकर पुन्हा वाचनात मग्न होत असत. संध्याकाळी आजच्या अंकात काय जातंय, याचा आढावा घेणारी आणि ताज्या बातम्या समजून घेऊन त्या दिवशी तयार होणाऱ्या अंकाची साठएक टक्के रचना तेव्हा निश्चित होत असे. संध्याकाळी पाचच्या सुमारास तळवलकर हात मागे बांधून संपादकीय विभागातून चालत जाऊन कंपोझिटर आणि पानं लावणाऱ्यांच्या विभागात एक चक्कर मारत असत. क्वचित डेस्कवर थांबून चीफ सब एडिटरशी एखाददुसऱ्या विषयावर बोलत असत. त्यानंतर ते घरी निघून जायचे. मग थेट रात्री नऊच्या सुमारास त्यांचा मेन डेस्कवर एक फोन यायचा, रात्रपाळीचा चीफ सब त्यांना पहिल्या पानावर काय कुठे घेतलंय, काय हेडिंगं दिलीयेत वगैरे सांगायचा. दोन मिनिटांचा हा कॉल संपला की, पुन्हा आपली भेट दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता.
तळवलकरांच्या काळातली पत्रकारिताही तशी सुटसुटीत होती. आवृत्त्या कमी होत्या. पानं कमी होती. बातम्यांची घडी बसली होती. कामाची घडी बसली होती. वर्षानुवर्षं त्यात बदल नव्हता. ‘मटा’मध्ये तर कमी पण दर्जेदार काम हाच मंत्र होता. इतर ठिकाणी ढोरमेहनतीची आठवण करून देणारं काम करून आलेल्यांना इथं धक्काच बसायचा. मात्र, बातमी पीटीआयची भाषांतरित करून घेण्याची असो की, वार्ताहराकडून आलेली संपादित करण्याची असो- तिच्या आगेमागे काय संदर्भ आहेत, याचा नीट विचार करूनच ती भाषांतरित किंवा संपादित केली जावी, यावर त्या त्या शिफ्टप्रमुखाचा कटाक्ष असे. चांगल्या बातम्यांना बक्षीसं देण्याचीही पद्धत काही काळ होती. प्रत्येकाचं काम मर्यादित असल्यामुळे भरपूर चर्चा, वादविवाद होत असत आणि एखाद्या ‘थंड’ दिवशी चीफ सब एडिटर एखादं पुस्तक वाचतोय, सब एडिटर पेपरची फाइल चाळतायत, रिपोर्टर मंडळी दिवाळी अंकांवर चर्चा करतायत, नाट्य समीक्षक एखाद्या ताज्या नाटकातल्या नटाची गंमत रंगवून सांगतायत, पुरवणी विभागात एखाद्या लोकप्रिय लेखकाशी गप्पा मारायला मंडळी जमली आहेत, अशा प्रकारचं काव्यशास्त्रविनोदाचं, नवोदितांना भारून टाकणारं आणि समृद्ध करणारं वातावरण आसपास असे. साहजिकच अशा या सुशोभित कोंदणाच्या मधोमध, संपादकांच्या केबिनमध्ये लेखन, मीटिंगा आणि क्वचित कुणाच्या भेटींचा काळ वगळता, सर्व वेळ समाधी लावल्यासारखे वाचत बसलेले तळवलकर शोभून दिसत. हेच त्यांचं भाग्य होतं.
१९९०च्या दशकात हे सगळं बदलू लागलं होतं. तोवर मटाच्या ऑफिसच्या दाराशीच असलेल्या केबिनीतले ब्रँड मॅनेजर सुधाकर श्रोत्री हे अतिशय मैत्रीपूर्ण पद्धतीनं संपादकीय विभागाकडून ब्रँडची तुरळक कामं करून घेत. तळवलकरांशी ते अतीव आदरानं बोलत आणि काम नसताना त्यांच्या केबिनमध्ये फिरकत नसत. वितरण विभागाची मंडळीही फारच क्वचित संपादकीय विभागात येत आणि संपादकांच्या केबिनमध्ये नम्रपणे उभी असत. रोजचा पेपर कसा काढावा, हे संपादकानं ठरवायचं असतं, हे अन्य विभागांना आणि व्यवस्थापनाला बहुश: मान्य असण्याचा तो काळ होता.
तो बदलायला सुरुवात झाली १९९०च्या दशकात. बाबरी मशिदीचं पतन आणि त्यापाठोपाठच्या दंगली, बाँबस्फोट हा घटनाक्रम देशाच्या सर्वसमावेशकतेवर कायमचे चरे उमटवून गेला आणि तोवरची मुंबई पूर्णपणे बदलून गेली. तिची मानसिकताच बदलली. अस्मितावादी राजकारणानं देशभरातल्या बहुसंख्यांच्या भावनांचा आणि नंतर बुद्धीचा कब्जा घेतला. तळवलकरांच्या ‘मटा’नं नेहरूवादी ब्रीदाला साजेशी भूमिका घेतली होती. याआधीच्या कसोटीच्या प्रसंगांमध्ये तिच्यावर टीका झाली असेलच; पण, बाबरी पतनोत्तर काळात या टीकेचं रूपांतर हिंस्त्र हल्ल्यांमध्ये झालं. विजय तेंडुलकरांचा ‘रामप्रहर’ हा स्तंभ मुस्लिमांची भलामण करतो, म्हणून त्याला ‘बेहरामप्रहर’ ठरवण्यात आलं. ‘मटा’मधल्या काही वृत्तलेखांनी हिंदू एकजूटवाद्यांना लक्ष्य मिळवून दिलं. परिणामी स्थापनेपासून स्थिर राहिलेला ‘मटा’चा खप अचानक कोसळू लागला. लोक पत्रं लिहून पेपर बंद करत असल्याचं कळवू लागले. मटासाठी हा मोठा धक्का होता.
याच काळात इतरही काही गोष्टी घडत होत्या. टीव्हीच्या रूपानं हळूहळू एक प्रतिस्पर्धी माध्यम तयार होत होतं. उदारीकरणानं खुल्या झालेल्या दारांतून जगभरातल्या माहितीचा स्फोट इंटरनेटच्या, कम्प्युटरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचायला लागला होता. ती स्पर्धा जाणवू लागली होती. शिवाय वर्तमानपत्रांचं अर्थकारण बदलायला लागलं होतं. वर्तमानपत्राच्या प्रत्यक्ष खपाशी आणि त्याच्या किमतीतून मिळणाऱ्या पैशांशी आता अर्थकारण बांधलेलं नव्हतं. वर्तमानपत्राचा निर्मिती खर्च खूप मोठा होत चालला होता. किंमत मात्र कमी होती. मधला खर्च आणि नफा जाहिरातदारांकडून मिळत होता. तोवर, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून व्यवस्थापनाला राजसत्तेवर अंकुश ठेवणं, अन्य व्यवसायांसाठी त्या संबंधांचा फायदा मिळवणं, हे सगळे लाभ मिळत होते. अनेक संस्थांना मोक्याच्या जागी भूखंड मिळाले, ते सत्कारणी लावून पिढ्या न पिढ्यांची सोय लावता आली. या लाभांपुढे वर्तमानपत्रांच्या कामकाजात संपादकीय विभागाचा वरचष्मा होता. पण, या दशकात चित्र पालटायला लागलं. वर्तमानपत्रांमधला संपादकीय दबदबा कायम ठेवण्याचा एकच मार्ग होता. वर्तमानपत्रांच्या किमती वाढवणं. त्या कालसुसंगत ठेवणं. मात्र, वर्तमानपत्रांवर लोकशिक्षण, लोकजागृती, प्रबोधन वगैरे भाकड गोष्टी लादून ते स्वस्तातच लोकांच्या हातात पोहोचायला हवं, अशी दळभद्री भूमिका घेतली गेली. त्यात मालकांची चलाखी होती. किंमत वाढवून खप पडला, तर नुकसान होण्याची शक्यता होती. किमती तशाच ठेवून जाहिराती वाढवणं हे दुहेरी फायद्याचं होतं. नफा अधिक होता, तात्काळ होता, धोका फारच कमी होता आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जाहिरातींनी सबसिडाइझ केलेल्या पेपरमध्ये संपादकीय हस्तक्षेप करणं सगळ्यात सोपं होतं... संपादकीय विभाग हा वर्तमानपत्रावरचा अनुत्पादक बोजाच आहे, अशा रीतीनं अन्य विभागांनी वागण्याची सुरुवात होण्याचा हा काळ होता. दुर्दैवानं हे सगळं नव्या पिढीच्या मनावर ठसवण्याच्या कामात पॅकेजबद्ध कॉर्पोरेट संपादकही हिरीरीनं उतरले. सल्लागार संपादक, व्यवस्थापकीय संपादक, प्रबंध संपादक अशा नानाविध अभिधानांनी मालकांची नावं ‘संपादका’च्या डोक्यावर झळकू लागण्याचा हाच काळ होता. या काळाची पावलं वाजू लागलेली असताना तळवलकर निवृत्त झाले. त्यांना तेव्हा ते कितपत आवडलं होतं, कोण जाणे. त्यांना आणखी काही काळ ‘मटा’च्या संपादकपदी राहायला आवडलं असतं कदाचित. पण, जे झालं ते योग्यच झालं, हे त्यांच्या नंतर लक्षात आलं असेल.
तळवलकरांच्या कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात कार्यकारी संपादक म्हणून आलेल्या कुमार केतकरांनी ‘मटा’चा आधुनिकतेकडचा खरा प्रवास सुरू केला... त्यांनी उपसंपादकांच्या एका तरुण पिढीच्या हातात मटाचं मागचं पान सोपवलं. संपादकीय पानाचाही चेहरामोहरा बदलून तो स्मार्ट केला. तळवलकरांच्या काळात त्यांच्या केबिनमध्ये जाण्याचं धारिष्ट्य फक्त काही मोजक्या वरिष्ठांनाच करता येत होतं. ज्युनियर लेव्हलवरच्या अनेकांशी मिळून तळवलकर एक फुलस्केपभरही बोलले नसतील त्यांच्या सहवासात. त्यांच्या केबिनीत प्रवेश तर दूरच होता. केतकरांनी या सगळ्या भिंती मोडून काढल्या. अनेकदा एखाद्या मजकुराबद्दल चर्चा करायला तेच केबिनमधून उठून उपसंपादकांच्या डेस्कवर जात. अग्रलेख लिहून झाल्यानंतर कोणाही बरं शुद्धलेखन असलेल्या सबड्याच्या (म्हणजे सब एडिटरच्या) हातात तो सोपवून मोकळे होत. तो मान सहायक संपादकांचाच असावा, असा त्यांचा आग्रह नव्हता. त्यांनी ‘मटा’च्या मनोवृत्तीत मोठा बदल घडवून आणला. त्याला एकविसाव्या शतकाशी सन्मुख केलं. मात्र, केतकरांच्याच काळात व्यवस्थापन ‘मटा’च्या कामकाजात आणि परिसरात ‘दिसू’ लागलं... अनेक वर्षांपासूनचं ‘मटा’चं मास्ट हेड बदललं. त्यासाठी कंपनीनं कोणा डिझायनर महिलेला कोटभर रुपये मोजले होते म्हणे! त्यावर आम्ही म्हणायचो की, यापेक्षा आमच्यावर किंगफिशरच्या दोनचार क्रेट्सचा खर्च केला असता, तर आम्ही हेच डिझाइन दिलं असतं की! प्रचंड विचार करून आणि प्रचंड विश्लेषण करून त्या डिझायनरनं किंगफिशरच्या लोगोप्रमाणे ‘मटा’च्या मास्टहेडमधल्या ‘म’चा पाय इकडून ओढला होता आणि ‘स’चा पाय तिकडून ओढला होता.
केतकरांनंतर आलेल्या भारतकुमार राऊतांच्या काळात त्या मास्टहेडच्या मधोमध गणपती येऊन विराजमान झाला. बुद्धिमत्ता ते बुद्धिदेवता हा प्रवास सुफळ संपूर्ण झाला.
आपण योग्य वेळी बाहेर पडलो आणि आपण भाग्यवान होतो, हे तळवलकरांना कळलं असेल का, हे कळण्याचा आता काही मार्ग नाही.
.............................................................................................................................................
लेखक मुकेश माचकर ‘बिगुल’ या न्यूज पोर्टलचे संपादक आहेत.
mamanji@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sanjeevanee Shintre
Sat , 18 November 2017
पत्रकारितेतल्या बदलांची मुद्देसूद नोंद करणारा उत्तम लेख...
Bhagyashree Bhagwat
Mon , 23 October 2017
Utkrushta!