१.
संपादक गोविंद तळवलकर यांच्या निधनाने एक काळ संपल्याची भावना झाली. तो काळ गेल्या शतकाचा. तळवलकर यांचा मृत्यू झाला तेव्हा ते ब्याण्णव वर्षांचे होते. म्हणजे त्यांनी जवळ जवळ सारे गेले शतक जाणतेपणाने पाहिले. शिवाय, त्यांची जिज्ञासा ते पत्रकार/संपादक असल्याने सतत जागी होती. त्यांनी त्यांचे वाचन, त्यांचा अभ्यास सतत वाढवत नेला. त्यांची दृष्टी सूक्ष्म होती.
मी तळवलकर यांचा सहाय्यक म्हणून ‘मटा’च्या पुरवणी विभागात वीस वर्षे काम केले. तो त्यांच्या संपादक म्हणून घडण्याचा काळ होता. त्यांचा माझ्यावर खूपच विश्वास होता. ते संपादक झाल्यानंतर तीन वर्षांतच पहिला युरोप दौरा करून आले, तेव्हा त्यांनी जर्मनीतून एक अॅश ट्रे आणला होता. मला त्यांनी तो केबिनमध्ये देत असताना बजावले की, बाहेर कोणास दाखवू-सांगू नका, कारण मी फक्त तुमच्यासाठी काही वस्तू आणली आहे. बाहेर, वृत्तसंपादक गोखले यांचे व त्यांचे नाते फार, म्हणजे फारच जिव्हाळ्याचे होते. मी १९८९ साली ‘मटा’तून मोकळा झालो, तेव्हा मात्र तळवलकरांचे व माझे संबंध बरेच औपचारिक झाले होते, कारण ते संपादक म्हणून खूपच मोठे झाले होते व माझी बैठकदेखील मला ‘मटा’ने देऊ केलेल्या खुर्चीपेक्षा विस्तारली होती.
माझी आणि तळवलकरांची त्यानंतर एकदाच भेट झाली. मीच त्यांना भेटण्यास गेलो होतो. त्यांनी नाशिकला बांधलेला बंगला विकला होता व त्यांचा पुण्यात जागा घेण्याचा बेत चालला होता. माझ्या एका स्नेह्यांना त्याचा सुगावा लागला. त्यांचा सिंहगड रोडवर बंगला होता. तो त्यांना विकायचा होता. ते म्हणाले, “विचारा तळवलकरांना.” माझ्या व तळवलकरांच्या त्या बोलण्यात त्यांची व्यवहारी वृत्ती व त्यांचा खवचटपणा, दोन्हींचा प्रत्यय आला. मी त्यांना म्हटले, “तुमच्याजवळ खूप पैसे आहेत, तर छान मोठा बंगला घ्या.” ते म्हणाले, “म्हातारपणात फक्त पैशांचा आधार असतो. जयवंत दळवी बघा. धनवान होते, गुणवान होते! मात्र डायलिसिसने बेजार झाल्यावर दादरची जागा विकून त्यांना बोरिवलीला राहण्यास जावे लागले. पुलंचा लोकसंपर्क केवढा मोठा! पण त्यांना त्यांचा एकही चाहता सकाळचा चहा रोज आणून देत नसे. ती व्यवस्था त्यांना समोरच्या हॉस्पिटलमधून करावी लागली.”
मला त्यानंतर, गेल्या वीस-पंचवीस वर्षांत, त्यांचे लेखन नजरेस पडे व कोणा स्नेह्याकडून हकिगत समजे, तेवढाच माझा त्यांच्याशी माझ्या बाजूने एकतर्फी संपर्क.
तळवलकर यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्यासंबंधी सहकाऱ्यांनी, लोकांनी वेगवेगळ्या माध्यमांतून छान छान लिहिले आहे. तीन मोठ्या शोकसभा झाल्या. तेथे वक्ते उत्कटपणे बोलले. त्यामधून त्यांच्याबद्दल वाचकांत आदराची, प्रेमाची किती भावना होती ते दिसून आले, त्याबरोबर त्यांचे प्रगल्भ, विचारी, व्यासंगी व शैलीदार संपादक म्हणून आणि तितकेच रसिक, संवेदनशील व्यक्ती म्हणून दर्शन झाले. जवळ-जवळ साठ वर्षांची कारकीर्द होती त्यांची. त्यापैकी निम्मी वर्षे त्यांनी संपादक म्हणून महाराष्ट्राच्या सुशिक्षित, सुसंस्कृत जनतेला संमोहित केले. त्यांच्या कारकिर्दीचे साधारण तीन भाग दिसतात. त्यांनी पहिल्या वीस वर्षांत लेखनावरील व संपादक म्हणून हुकूमत प्राप्त केली. ते दुसऱ्या सोळा-अठरा वर्षांच्या टप्प्यात ‘मेंटॉर संपादक’ म्हणून हसतखेळत, आनंदात, रसिकतेने मौजमजा करत जगले व त्यांनी उभरत्या पिढीला ज्येष्ठत्वाचा हात दिला. ज्यांना त्यांच्या सहवासाचा त्या काळात लाभ झाला, त्यामध्ये कुमार केतकर-गिरीश कुबेर यांच्यापासून नीतिन वैद्य-प्रवीण बर्दापूरकरपर्यंतचे अनेक सध्याचे अग्रणी व प्रौढ पत्रकार येतात.
त्यानंतर तिसरा टप्पा येतो तो त्यांनी अमेरिकेत राहून केलेल्या व्यासंगी लेखनाचा. त्यामधून त्यांनी मराठी साहित्यात अनमोल अशा वैचारिक साहित्याची भर घातली. ही तिन्ही रूपे वेगवेगळी आहेत, पण त्यात एक समान धागा आहे तो त्यांच्या वाचनध्यासाचा. ते डोंबिवलीला बालपणीदेखील एका ग्रंथालयाचे चिटणीस होते व तेच वाचक म्हणून त्या लायब्ररीचा लाभ उठवत, अशा आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत.
२.
तळवलकर व ‘मटा’चे वृत्तसंपादक दि.वि. गोखले एकत्र मला प्रथम भेटले ते मुंबईत सीएसटी समोरच्या ‘एंपायर’ (आता मॅक्डोनाल्ड) या रेस्टॉरंटमध्ये. मी त्यावेळी ‘ब्रिटिश डेप्युटी हायकमिशन’च्या इन्फर्मेशन विभागात काम करत होतो. ती नोकरी कायम नव्हती, पण पगार बरा होता. त्याच सुमारास ‘मटा’मध्ये नोकरीच्या जागा तयार होत होत्या. गोखले वृत्तसंपादक असल्याने नोकरभरतीची जबाबदारी त्यांची होती, परंतु ‘टाइम्स’मध्ये भरती केलेल्या उमेदवारास वर्ष-सहा महिन्यांचे ट्रेनिंग घ्यावेच लागे. मी ‘सकाळ’-‘केसरी’तील सहा वर्षांचा अनुभवी पत्रकार होतो. शिवाय, ‘ब्रिटिश डेप्युटी हायकमिशन’च्या इन्फर्मेशन सर्व्हिसमधील दीड वर्षांची नोकरी चालू होती, ती सहसंपादक या पदावर! गोखले यांनी त्यांच्या दुपारच्या चहाच्या वेळी ‘एंपायर’मध्ये मला, मी ‘मटा’त नोकरीसाठी अर्ज करावा हे पटवून देण्यासाठी बोलावले होते. तळवलकर त्यावेळी सहसंपादक होते आणि द्वा.भ. कर्णिक हे मुख्य संपादक.
मी ‘मटा’च्या ट्रेनिंग डिपार्टमेंटला एक-दोन महिन्यांतच जॉईन झालो. माझे नंतरचे सहा-आठ महिने तेथे विविधभाषी प्रशिक्षणार्थी पत्रकारांबरोबर हुंदडण्यातच गेले आणि एके दिवशी, मला “तुम्ही ‘मटा’च्या संपादकीय विभागात हजर व्हा” अशी सूचना ट्रेनिंग डिपार्टमेंटमधून देण्यात आली. मी द्वा.भ. कर्णिक यांच्या केबिनमध्ये जाऊन उभा राहिलो. मी माझे नाव सांगितले. कर्णिक माझ्याशी पहिले वाक्य बोलले ते, “तुम्ही त्या अर्धी चड्डीवाल्यांपैकी नाही ना?” असे होते.
‘मटा’ सुरू होऊन सहा वर्षे झाली होती. ‘मटा’मध्ये त्यावेळी दोन गट होते. कर्णिकांचा रॉयवाद्यांचा/उदारमतवाद्यांचा आणि दुसरा, गोखले यांचा संघवाद्यांचा. मी गोखल्यांमार्फत आल्यामुळे कर्णिकांच्या मनात ती शंका उद्भवली असावी. तळवलकर हे आरंभी रॉयवादी वर्तुळात असत आणि कर्णिक जरी कट्टर रॉयवादी असले तरी तळवलकरांचे आणि कर्णिकांचे जमत अजिबात नसे. त्यामुळे बहुधा तळवलकर हे गोखले यांना घट्ट धरून असत. कर्णिक यांनी मला माझा उत्साह पाहून ‘नवाकाळ’ या दैनिकावर वृत्तलेख लिहिण्यास सुचवले. त्याला निमित्त होते, ‘नवाकाळ’च्या खाडिलकरांनी रोटरी छपाई मशीन घेतल्याचे! रोटरी छपाई मशीन ही तंत्रक्रांती होती आणि कर्णिकांना, एका मराठी मध्यमवर्गीय मालक-संपादकाने ते विकत घेतले, ती भांडवली गुंतवणूक केली याचे अप्रूप वाटले होते! कर्णिक यांची पत्रकार म्हणून दृष्टी अशी व्यापक आणि शोधक होती. ते सर्व सहकाऱ्यांना विविध तऱ्हांनी प्रोत्साहन द्यायचे, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाला पाठवायचे, त्यांना लिहिते ठेवायचे. ‘मटा’चे त्या काळातील अंक काढले तर विविध सदरांनी, ललित लेखनांनी भरलेले असे ते अंक दिसतील. त्यांनीच माधव गडकरी, शंकर सारडा यांना प्रोत्साहन देऊन, त्यांच्याकडून मोठमोठी संपादकीय कामे करवून घेतली.
‘मटा’चे मूळ रूप म्हणजे सुशिक्षित मध्यमवर्गीय वाचकांसाठी वर्तमानपत्र अशी प्रतिमा. ती कर्णिक, गडकरी आणि सारडा यांच्या प्रयत्नांतून साकार झाली होती. तेव्हा पत्रकारितेत एक फंडा होता, तो स्वातंत्र्य चळवळीतून आलेल्या वर्तमानपत्रांचा. म्हणजे संपादकाने वाचकाला शिकवून तयार करायचे असा. दुसरा यशस्वी फंडा नानासाहेब परुळेकरांनी ‘सकाळ’मधून आणला होता. त्यात वर्तमानपत्राचे जनसामान्यांसाठी रूप अभिप्रेत होते. त्यांच्या व्यथावेदना व भावजगत यांना तेथे तोंड फोडले जाई. ‘सकाळ’मध्ये व्यावसायिक पत्रकारितेची आधुनिक जाणीवही होती. ‘छोट्या जाहिराती लोक बातम्यांप्रमाणे वाचतात’ ही क्रांतिकारी घोषणा ‘सकाळ’ची! कर्णिकांच्या ‘मटा’ने वर्तमानपत्रांत सुसंस्कृततेचा, उच्च अभिरूचीचा बाज आणला. गोखले यांनी गटबाजीचा भेदभाव न ठेवता कर्णिकांना उमदेपणाने सहकार्य केले. त्यांनी स्वत:देखील क्रीडा व युद्ध यांबद्दलच्या बातम्यांना व लेखांना मराठी वर्तमानपत्रांमध्ये प्रथमच प्रमुख स्थान दिले. ती त्यांची कामगिरी ऐतिहासिक महत्त्वाची आहे. तळवलकर हे कर्णिकांच्या त्या पाच-सहा वर्षांच्या काळात दुर्लक्षित होते. ते एका कोपऱ्यात बसत. ते स्वभावानेही घुमे होते. पुढे, ते परदेशी वकिलातींमध्ये जाऊ लागले, मुंबईच्या ‘कॉस्मॉपॉलिटन वर्ल्ड’मध्ये मिसळू लागले, तेव्हा आम्हाला अचंबा वाटे, की तळवलकर तेथे बोलतात कसे? त्यांना ‘मटा’त येणाऱ्या अपरिचित माणसांशीही बोलता येत नसे. त्यांचे काम रोज ‘धावते जग’मध्ये एक स्फुट लिहिणे एवढेच होते. दुसरे सहसंपादक मा.पं. शिखरे हेही अबोल होते, पण ते कर्णिकांच्या गटाचे. ते लिहायचे मोजके, पण त्यांची सुडौल भाषा म्हणजे मजा होती! ते व उपसंपादक रा.य. ओलतीकर यांची नावे त्यांच्या, वर्तमानपत्राच्या धबडग्यातील ललित भाषाशैलीसाठी घेतली जात.
कर्णिक मी ‘मटा’त आल्यानंतर, सहा महिन्यांतच निवृत्त झाले आणि तळवलकर संपादक बनले. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांचे नाव ‘टाइम्स’ कंपनीचे मालक जैन यांना सुचवले असे त्यावेळी सर्रास बोलले जाई. मी पहिली एक-दोन वर्षे ‘मटा’च्या स्पोर्ट्ससहित सर्व विभागांत काम केले आणि अंतिमत: पुरवणी विभागात स्थिरावलो. मी पुरवणी विभागाचा प्रमुख असल्याप्रमाणे त्यानंतर जवळ जवळ एकोणीस वर्षे कार्यरत होतो. तळवलकरांनीच मला ते स्थान अनभिषिक्तपणे दिले होते. तळवलकरांची यशवंतराव चव्हाणनिष्ठा किती प्रसृत होती त्याचे एक गंमतीदार उदाहरण सांगून पुढे जातो. आम्हाला पुरवणीच्या लेखांसाठी फोटो आणण्याकरता ‘टाइम्स’च्या संदर्भ विभागात वरच्या मजल्यावर जावे लागे. तेथे जुलेखा नावाची सहकारी कामाला होती. मी एकदा एका लेखासाठी ‘प्राणी संग्रहालयां’चे फोटो पाहत होतो. मला वाघाचा फोटो हवा तसा मिळत नव्हता. जुलेखा दुरून उद्गारली, “तुम्हाला वाघाचा फोटो चव्हाणांबरोबर हवा असेल ना!” संदर्भ विभागातील सर्वच मंडळी हसू लागली. ‘टाइम्स’मधील स्टाफ वगळाच, पण इतर भाषांमधील सहकारीदेखील तळवलकरांच्या यशवंतरावांबद्दल ‘सॉफ्ट’ असण्यासंबंधी चेष्टेखोर उल्लेख करत.
त्या काळात वर्तमानपत्रांच्या संपादकीय विभागात नोकरश्रेणी फारशा कठोर नव्हत्या. उपसंपादक-प्रमुख उपसंपादक, वार्ताहर-प्रमुख वार्ताहर, वृत्तसंपादक, सहसंपादक, संपादक एवढाच स्टाफचा पसारा असे. गोखले यांनी स्पोर्ट्सचा विभाग स्वतंत्र करून, त्यासाठी दैनिकाचे शेवटचे पान राखीव ठेवून, तेथे प्रमुख म्हणून वि.वि. करमरकर यांची नेमणूक केली. करमरकर हे पुढे, क्रीडासमीक्षक म्हणून मोठे नाव झाले. गोखले यांनी भारतावर चिनी आक्रमण १९६२ साली झाले, तेव्हा ‘मटा’च्या पहिल्या पानावर युद्धविषयक स्तंभलेखन सुरू केले. त्यात विलक्षण स्फुरण असे. तो मराठी दैनिकांतील युद्धविषयक नियमित लेखनाचा आरंभ ठरला. गोखले यांनी युद्धविषयक पुस्तके लिहिली. त्यांना त्यामधून मोठी लोकप्रियता लाभली. रिपोर्टिंग डेस्कवर चंद्रकांत ताम्हणे व विशेषत: दिनू रणदिवे हे दोन खंदे प्रमुख वार्ताहर होते.
‘मटा’ १९६० साली जूनमध्ये सुरू झाला. त्याच्या पहिल्या काही अंकांतच ना.सी. फडके, पु.भा. भावे यांच्यासारख्या त्या काळच्या श्रेष्ठ व लोकप्रिय लेखकांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले व त्यामुळे वाचकांना ‘पेपर’ची जातकुळी कळून आली. ‘रविवारच्या पुरवणी’चा जम काही आठवड्यांतच बसला, तो मुख्यत: शंकर सारडा यांच्या कल्पक संयोजनामुळे. पण त्याचा भर साहित्यावर असे. त्यामुळे मराठी साहित्य व जगभरचे, मुख्यत: इंग्रजी वाङ्मय लोकांसमोर योग्य परिप्रेक्ष्यात येऊ लागले. त्याने एका लेखात खानोलकरांच्या लेखनास शेक्सपीअरच्या शोकात्मिकांच्या तोडीस नेऊन बसवले. त्यावर वाद-प्रतिवाद झडले, परंतु त्यामुळे मराठी साहित्यातील खानोलकरी लेखनाची सखोलता वादातीत ठरून गेली. सारडाने गंगाधर पाटील यांची गहन असणारी, पण प्रतिष्ठेची समीक्षा मराठी वर्तमानपत्रांत छापण्याचे धाडस केले! सुशिक्षितांना त्यामधून नवी दृष्टी लाभू लागली. त्याबरोबर सारडाच्या संयोजनातून मराठी भावविश्वही अचूक पकडले गेले. नरेंद्र बल्लाळची साथ सारडाला असे. ‘लग्नानंतरचे पहिले वर्ष’ ही वाचकांसाठी स्पर्धात्मक मालिका आठवते. तिला प्रचंड प्रतिसाद लाभला. सर्वसाधारण मराठी मध्यमवर्गीय स्त्री ‘मटा’मधून बोलू लागली! तिला तो तिचा पेपर वाटू लागला. मटा’च्या रोजच्या अंकांतही सत्याधारित ललित लेखनाला बराच वाव दिला जाई. कर्णिक-शिखरे-गडकरी स्टाफवरील इच्छुक सहकाऱ्यांना त्यासाठी प्रवृत्त करत. त्याखेरीज बाहेरच्या लेखकांचेही स्तंभ नियमित असत. विजय तेंडुलकर यांची ‘कोवळी उन्हे’ हे त्यांपैकीच गाजत गेलेले सदर. चिं.त्र्यं.खानोलकर, शं.ना.नवरे यांनीही तसे स्तंभ लिहिले. ‘मटा’ मराठीत अवतरल्यानंतर मराठीतील साप्ताहिकांचे, त्या आधीच्या दोन दशकांतील गाजलेले दिवस संपले असे बोलले जाई. मग साप्ताहिकांत वाण राहिला तो ‘श्री’सारख्या सनसनाटी साप्ताहिकाचा.
आम्ही पुण्याचे पत्रकार ‘मटा’चे नवनवे प्रयोग औत्सुक्याने पाहत होतो. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण पत्रकाराची मनीषा ‘मटा’त नोकरी मिळावी अशी असे! मी ‘मटा’त आलो तेव्हा सारडा ‘निमन फाउंडेशन’ची पाठ्यवृत्ती घेऊन वर्षभरासाठी अमेरिकेत गेला होता. त्याने परतल्यावर नोकरी सोडली. गडकरी न्यूज डेस्कवर काही दिवस होते. परंतु तेही कर्णिकांपाठोपाठ चालले गेले. ते गोव्यात ‘गोमंतक’चे संपादक झाले. त्यांचे तळवलकर-गोखले यांच्या राज्यात काही चालणे अवघड होते, परंतु सारडाने ‘मटा’ला वाङ्मयीन अभिरुचीचे वळण जसे लावले, तसे गडकरी यांनी महाराष्ट्राच्या जिल्हा राजकारणाचा वेध घेऊन, विकेंद्रित लोकशाहीच्या नव्या प्रयोगाचे यशापयश वाचकांसमोर मांडले. त्यामधून जिल्हा पुढारी व त्यांचे राजकारणातील डावपेच/चमचेगिरी हे शहरी वाचकाला कळू लागले. अरुण साधूच्या ‘सिंहासन’ कादंबरीचा ‘बॅकड्रॉप’ गडकरी यांच्या त्या लेखनाने तयार झाला असे म्हणता येईल. गडकरी यांचा झपाटा व उत्साह तळवलकरांच्या नेमस्त प्रकृतीला मानवणारा नव्हता. सुधाकर अनवलीकर याचे पुण्याहून लेखन रसिले असे. तो त्याच्या बातम्या-लेखांतून महाराष्ट्राच्या विचारी जगातील सामर्थ्य व त्यामधील दंभ अचूक पकडत होता. पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी होती. कर्णिकांनी त्या शहराचे महत्त्व रेखून तेथे अनवलीकर या धडाडीच्या रसिक वार्ताहराची नेमणूक केली होती. अनवलीकरचे तीन महिन्यांपूर्वीच निधन झाले.
३.
तळवलकर ‘मटा’चे संपादक या पार्श्वभूमीवर झाले होते. तळवलकरांची संपादक म्हणून सुरुवात चाचपडतच झाली. ते पहिली काही वर्षे डोंबिवलीहून कामावर येत. स्वाभाविकच, त्यांचे डोंबिवली प्रेम त्यांच्या लेखनातून व्यक्त होई. त्यांचे पु.भा. भावे, ग.दि. माडगुळकर यांच्याबद्दल आस्थेवाईक लेखन आरंभी प्रसिद्ध झाल्याचे आठवते, परंतु त्यांनी त्यांचे व्यक्तिगत स्नेहबंध काही काळातच जेवढ्यास तेवढे केले. ते संपादकीय कामामध्ये व्यक्त होऊ देत नसत. थोडी पुढची गोष्ट. पुण्याच्या मधुकाका कुळकर्णी यांचे श्रीविद्या प्रकाशन ऐन बहरात होते. लक्ष्मणशास्त्री जोशी हे जणू त्यांच्या घरचेच असत. मधुकाकांचा एकदा ‘मटा’त डायरेक्ट लाइनवर फोन आला की, लक्ष्मणशास्त्रींनी लिहिलेला ‘श्रीविद्या’च्या अमुक पुस्तकाचा अभिप्राय छापायचा आहे. मी म्हटले, तळवलकरांना विचारतो. तर तळवलकर स्वत: फोन घेण्यास केबिनबाहेर आले. रागीट आवाजात मधुकाकांना म्हणाले, ‘संपादक मी आहे की तर्कतीर्थ की तुम्ही? पुस्तक पाठवा. आम्ही ठरवू ‘रिव्ह्यू’ कोणाचा छापायचा ते.’ त्यांच्या वागण्याबोलण्यात तर्कतीर्थांपर्यंतच्या स्नेहीवर्तुळाबद्दल असा तडकफडकपणा येत गेला. एकदा पु.भा.भावे डोंबिवलीहून दुपारी १२ च्या सुमारास ऑफिसात येऊन थडकले. तळवलकर केबिनमध्ये काही लिहीत होते. मी त्यांना भावे आल्याचे सांगताच त्यांच्या कपाळावर आठी उमटली. म्हणाले, “बसायला सांगा.” भावे तासभर केबिनबाहेर बसून होते! इतकी त्यांची त्यांच्या लेखनावरील भक्ती वाढू लागली होती.
तळवलकरांचा नूर ते चर्चगेटला कंपनीच्या जागेत राहायला आल्यावर बदलला होता. तो त्यांच्या अग्रलेखांतूनही (विषयांची निवड व लेखनशैली या दोन्ही अंगांनी) व्यक्त होतो असे आम्ही म्हणायचो. त्यांचे ‘एशियाटिक’मध्ये, ‘एनसीपीए’मध्ये जाणे-येणे वाढले. त्यांच्या भेटी परदेशी, विशेषत: ब्रिटिश व अमेरिकन वकिलातींना वारंवार होत. काळ जागतिक शीतयुद्धाचा होता. त्यामुळे अमेरिका व इंग्लंड हे देश (आणि रशियाही) त्यांच्या वकिलातींमार्फत स्थानिक दैनिके, त्यांच्या साप्ताहिक आवृत्ती यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी वाटा वाकड्या करत- वृत्तपत्रांच्या संपादकांना इंग्लंड-अमेरिकेतील प्रकाशने वाचण्यास नियमित सप्रेम पाठवत. तो त्यांच्या प्रचाराचा भाग असे. (मी ‘ब्रिटिश इन्फर्मेशन सर्व्हिस’मध्ये तशीच कामे तर करत होतो!) तळवलकरांना विदेशी वृत्तपत्रे वाचण्याची चटक लागली ती अशी. ते संपादक झाल्यानंतरच्या पहिल्या तीन-चार वर्षांत जर्मनी व इंग्लंड यांचा दौरा तशाच सौजन्याने करून आले. ‘एनसीपीए’मध्ये कुमुद मेहता असत. नंतर पुल तेथे अध्यक्ष झाले. ते पुण्याहून येत, दिवस-दोन दिवस गेस्ट हाऊसमध्ये राहत. कुमुद मेहता तळवलकरांना सिनेमांना बोलावून घेत. त्यामधून शीतयुद्धातील दक्षिण अमेरिका, आफ्रिका या खंडांतील राजकारणाचे पदर उलगडले जात. ‘एशियाटिक’मध्ये विद्वत्जनांचा अड्डा असे - नाना जोशी, विश्वास पाटील, दुर्गा भागवत वगैरे. त्यातच ज.द. जोगळेकर हे कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे गृहस्थ होते. तळवलकरांची त्यांच्याबरोबरही सलगी गोखल्यांच्या स्नेहामुळे झाली. तळवलकरांचा तो बदललेला पवित्रा ‘मटा’मधील लिखाणातून व्यक्त होऊ लागला. त्यांची अशोक शहाणे यांच्याशी मैत्री एशियाटिक’मध्येच जुळली आणि त्यामधून शहाणे यांचा पहिला लेख ‘मटा’च्या पुरवणीत अवतरला. तो शहाणे यांच्या त्या आधीच्या गाजलेल्या ‘क्ष किरण’च्या तीक्ष्णतेचा नसला तरी जुन्या रूढ मराठी साहित्याचे तितकेच वाभाडे काढणारा होता. तळवलकरांच्या चेहऱ्यावर कोणाची तरी खुमखुमी जिरली की हास्याची, त्यांच्या सर्व फोटोंत दिसणारी एकाच प्रकारची लकेर झळके. पत्रकाराला असे खमंग लेखन प्रिय असतेच. शिवाय, तळवलकर व्यक्ती म्हणून वस्तुनिष्ठ वा अलिप्त जरा अधिकच होते. अशोक शहाणे यांनी त्यांच्या फटकाऱ्यांमधून भावे-माडगुळकरांनाही वगळले नव्हते असे आठवते. तळवलकर त्यांच्या घट्ट मित्रांना दुखावण्याइतके धाडसी व अलिप्त झाले होते! त्यानंतर अशोक शहाणे यांनी ‘मटा’साठी खूप सारे लेखन केले. शहाणेदेखील ‘सुधारले’ होते. तेही प्रस्थापितांना मानू लागले आणि त्यांनी त्यांच्या ‘प्रास प्रकाशना’च्या ‘प्रिय बाई’ या पुस्तकासाठी चक्क पुलंची शिफारस घेतली! तळवलकर अशा विविध प्रभावांनी घडत गेले.
तळवलकर यांच्या संपादक म्हणून कारकिर्दीत दोन महत्त्वाचे समाजबदल घडून आले. पहिल्या बदलात देशाने राजकारणाची धुरा बदलली. दुसऱ्या, १९८५-८६ नंतर घडून आलेल्या बदलात तंत्रवैज्ञानिक क्रांतीने मनुष्यजीवनाचाच कब्जा घेतला.
स्वातंत्र्य मिळून वीस वर्षे होऊन गेली होती, महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन दहा वर्षे लोटली होती. साक्षरतेचा प्रसार झाला होता. लोकांना समृद्धीची चाहूल लागली होती असे म्हणता येणार नाही, तथापि त्यांच्याकडे पैसा खुळखुळू लागला होता. काळच पालटत होता. पंडित नेहरूंचे राजकारण मागे पडले होते. इंदिरा गांधी पुढे आल्या होत्या. त्यांच्या धाडसी राजकीय निर्णयांमुळे (बँकांचे राष्ट्रीयीकरण, तनखेबंदी, ‘गरिबी हटाव’च्या घोषणा) तळच्या समाजाला नवे बळ प्राप्त होत होते. सामाजिक उलथापालथ वाढली होती. मध्यमवर्गीयांना सुरक्षित जीवनाचे वेध लागले होते, सुस्थितीची स्वप्ने दिसू लागली होती. त्यामुळे इच्छा, अपेक्षा, आकांक्षा सर्व स्तरांवर वाढल्या होत्या. त्याचबरोबर मागण्याही. स्वातंत्र्य चळवळीचे ‘स्पिरिट’ मागे पडून लोकशाही राजकारणाचे प्राबल्य पसरले होते. तो कोलाहल मोठा होता. सामाजिक-सांस्कृतिक विसंगती भडकपणे जाणवू लागल्या होत्या. त्या वाङ्मयकोशासारखे प्रकल्प, ग्रंथसंग्रहालय-साहित्य संघ यांसारख्या संस्था - तेथील पदाधिकारी यांच्या वर्तनव्यवहारात दिसू लागल्या होत्या. त्या निमित्ताने वा.ल. कुलकर्णी, म.वा. धोंड अशा थोरांची नावेही प्रकट होऊन गेली. एकूणच, प्रस्थापित व्यवस्थांच्या बाबतीतील असंतोष सर्व स्तरांवरील बंडखोरीतून आणि चळवळींतून तीव्रपणे व्यक्त होत होता. राजकारणात विकेंद्रीकरण होत होते. जिल्हा परिषदा व जिल्हा बँका सामर्थ्यवान जाणवू लागल्या होत्या. तरी सांस्कृतिक-सामाजिक क्षेत्रे मुंबई-पुणेकेंद्री होती. वर्तमानपत्रांच्या मुंबई आवृत्तींचा प्रसार महाराष्ट्रभर होता. त्यामुळे ‘मटा’ व तळवलकर यांचे लेखन साऱ्या महाराष्ट्रभर पोचे. त्यांचा दबदबा सर्वत्र होई.
तळवलकर स्वत: तशा घडामोडींपासून दूर राहत, पण सारे सूक्ष्मतेने ताडून पाहत. त्यांचे वाचन अफाट वाढले होते. त्यांचे ते व्यसनच जणू झाले होते. त्यामुळे ते रोजचा अग्रलेख लिहीत तो विलक्षण जोरकस असे. तळवलकरांच्या लेखनशैलीला ती धार होती. ते इंग्रजी पुस्तके-वर्तमानपत्रे यांतील लेखन वेगवेगळ्या स्तंभांमधून उद्धृत करत. ते इंग्रजी साहित्यातील, विचारपरंपरेतील नवनवे प्रवाह नोंदवत. तळवलकर वाचकांना एका बाजूला विश्वदर्शन घडवत असताना दुसऱ्या बाजूस मराठी समाजातील विसंगतीपूर्ण हीन, कद्रू वृत्ती-प्रवृत्तींवर हल्ले करत होते. त्यांचे त्यासाठी संदर्भ पाश्चात्य वर्तमानपत्रांतील व साहित्यातील असत. त्या परिस्थितीत मध्यमवर्गीय वाचकाला तळवलकरांचे अलिप्त राहून तडकफडक, रोखठोक लिहिणे आवडू लागले होते. स्वाभाविकच, अत्रे यांच्या मराठ्याचा जसा आमजनांत धाक वाटे, तसाच तळवलकरांच्या ‘मटा’चा दरारा सुसंस्कृत जगात निर्माण झाला होता. वाचक तशा लेखनाने खूष होत. त्यांना वाटे, की तळवलकर जणू मूल्यांची जपणूक करत आहेत!
तळवलकर सार्वजनिक ठिकाणी दिसत नसत; एवढेच काय, त्यांचे स्वत:चे फोटोदेखील ‘मटा’त प्रसिद्ध होत नसत. त्यामुळे त्यांचे लेखनातून होणारे दर्शन, त्यांनी ‘वाचस्पती’ या स्वीकारलेल्या टोपणनावाला शोभेसे ‘अपौरुषेय’ वाटे. प्रत्यक्षात त्यांचे व्यक्तिमत्त्वही लालसर गोरेगोमटे, सुदृढ, नीटनेटके व तेजस्वी वाटावे असे होते. त्यांच्या चेहऱ्यावर व आविर्भावात बुद्धीचे तेज दिसे. त्यामधून त्यांच्याबद्दलचा आदर/दरारा वाढत गेला. त्यांच्या लेखनाचा झपाटा इतका होता, की काही जाणते लोक त्यावेळी म्हणत असत, ‘तळवलकर वाचतात आणि ओकून टाकतात. त्यांनी थोडे रिचवावेसुद्धा!’
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
तळवलकर जे लिहीत होते ते मराठी संकुचित जगाला अपूर्वाईचे होते. तोपर्यंत मराठी मनाला बाहेरच्या जगाचा परिचय, इंग्रजी अभिजात पुस्तकांचे वाचन, हॉलिवूडचे सिनेमा आणि ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्यासारखे कोणी पत्रकार-लेखक इंग्लंड युरोपला जाऊन आल्यानंतर त्यांचे प्रत्यक्षदर्शी लेखन यांतून जेवढा होईल तेवढाच. बेडेकरांची ‘रणांगण’ आणि मर्ढेकरांची कविता हे साहित्य त्याच ‘जॉनर’मधले व म्हणून मराठी समाजाच्या खूप पुढचे, आगळेवेगळे वाटणारे. प्रत्यक्ष त्यापलीकडचा वैश्विक दृष्टिकोन मराठी समाजासमोर त्याआधीच्या पंचवीस-तीस वर्षांत प्रकटला नव्हता. (साधारण १९२५-३० ते १९६०-७०. दुसऱ्या महायुद्धाच्या हकिगतीदेखील नेमक्या पोचत). ते सारे तळवलकरांच्या लेखनातून कळून येई. युरोपातील माणसे जीवन किती विविधांगांनी पाहतात व कशा रसवत्तेने जोखतात हे जाणवून जाई. त्यामुळे श्री.पु. भागवत, य.दि. फडके यांच्यासारखे मातब्बर संपादक-साहित्य संशोधकदेखील तळवलकरांकडे अचंब्याने पाहू लागले. त्यांचे अग्रलेख काही आम वाचकांना तर तोंडपाठ असत!
मी पुण्यात प्राध्यापकांच्या तोंडून तळवलकरांच्या अग्रलेखांचे तसे पठन ऐकलेले आहे. प्रकाशक केशवराव कोठावळे यांच्या पत्नीने त्यांच्या मृत्यूनंतर जो लेख लिहिला, त्यामध्ये ‘मटा’चा हृद्य संदर्भ आहे. श्रीमती कोठावळे यांनी म्हटले होते, की केशवरावांना निद्रानाशाचा विकार होता. त्यामुळे ते सकाळी नऊ-साडेनऊ वाजता उठत. त्यांना जाग येताच बाजूच्या टेबलवर चहाचा कप आणि ‘मटा’ हवा असे. तो तेथे नसेल तर ते संतापत. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे सुशिक्षित नव्हते. त्यामुळे त्यांना वाचनाबद्दल औत्सुक्य नसे. तथापि, ते त्यांना तळवलकरांच्या अग्रलेखांनी वाचते केले असे सांगत.
दुसरा समाजबदल १९८६ च्या सुमारास टीव्ही कलर्ड झाला व त्यामुळे घडून आला. त्याची बीजे टीव्ही १९७२ साली आला तेव्हाच पेरली गेली होती. पण कलर्ड टीव्हीपाठोपाठ फोटो टाइप सेटिंग आले, पीसी आला, नंतरच्या दशकात इंटरनेट आले. मोबाईलने तर धुमाकूळच घातला आहे. तळवलकर या बदलालाही तरुण मनाने सामोरे गेले, त्यांनी स्टाफमधील आम्हा कोणाच्याही आधी हातातील बॉलपेन टाकून पीसीवरील मराठी लेखन सुरू केले. पुढे, विद्यमान संपादक अशोक पानवलकरने तत्संबंधी वाचकांचे अवधान वाढवण्याकरता लेखनयज्ञच आरंभला. तळवलकर यांना त्या क्रांतीतील तांत्रिकतेत वा तिच्या सामाजिक परिणामांत मात्र फार औत्सुक्य नव्हते. त्यांना त्यांचे लेखन नवीन पद्धतीने व जलद गतीने वाचकांकडे पोचत आहे याबद्दलच फार ओढ वाटत होती. त्यामुळे त्यांच्या लेखनाचे विषय फार बदलले नाहीत. फक्त त्यांचा विश्वसंचार सायबर वेगाने सुरू राहिला.
(‘रूची’ या ग्रंथालीच्या मासिकाच्या मे २०१७च्या अंकातून साभार.)
.............................................................................................................................................
लेखक दिनकर गांगल ‘ग्रंथाली’ या प्रकाशन संस्थेचे एक संस्थापक आहेत.
dinkargangal39@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment