४.
तळवलकर सकाळी दहा वाजताच ‘मटा’च्या कार्यालयात येत व बऱ्याच वेळा लगेच अग्रलेख लिहून टाकत. त्यांची पहिली मीटिंग सकाळी अकरा वाजता होई- ती सहसंपादक मा.पं. शिखरे, रा.के. लेले, मी व कधी कधी भालचंद्र वैद्य अशी. त्या वेळी गप्पा सर्वसाधारण असत. त्यांना एका बाजूला महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाबद्दल तुच्छता वाटे आणि दुसऱ्या बाजूला, ते त्याच जीवनाचा भाग असल्यामुळे त्यासंबंधी औत्सुक्य असे व सतत नवनवीन माहिती हवी असे. ते त्या सकाळच्या सत्रानंतर दुपारी एकच्या बेताला पुन्हा केबिनबाहेर येऊन माझ्या टेबलासमोर बसत. तेव्हाही त्यांच्या मराठी साहित्य-संस्कृती जगातील अनेक गोष्टींबद्दल विचारणा असत. तशा ‘गॉसिप’ गोळा करणे हा मोठाच उद्योग माझ्यासाठी असे. तळवलकरांची पु.ल., ना.गो. कालेलकर, व्यंकटेश माडगूळकर, मं.वि. राजाध्यक्ष यांच्यामधील उठबस बरीच वाढली होती. ते जवळ जवळ प्रत्येक वीकेंडला पुण्याला जात. त्यांची ठरलेली शनिवार दुपारची सिकंदराबाद एक्स्प्रेस ही गाडी असे. रविवारची पुरवणी त्या आधी सकाळी अकरा वाजता छापून आलेली असे. बदलत्या काळानुसार पुरवणीचा ढाचा निव्वळ वाङ्मयीन अभिरूचीकडून समाज-संस्कृतीच्या अनेकांगांकडे वळला होता. वाचकांचा वाढता सहभाग ही नवी क्लृप्ती रूढ झाली होती. समाज जसा प्रस्फुटित होत होता, तसे मराठी नाटक-चित्रपट यांमध्ये नवनवे प्रयोग होत होते. तेंडुलकरांची ‘घाशीराम’ -‘सखाराम’ ही नाटके, श्रीराम लागू यांचा ‘गार्बो’ अमोल पालेकरचे ‘गोची’- ‘वासनाकांड’ यांचे प्रयोग, सत्यदेव दुबेची कळकळ, छबिलदासची चळवळ; तसेच, फिल्म फेस्टिव्हल्स व स्थानिक फिल्म सोसायट्यांकडून होणारे पूर्व युरोपीय देशांतील चित्रपट प्रदर्शन यांनी चोखंदळांसाठी नवे जग उघडून दाखवणे सुरू केले होते.
मराठी साहित्यात भाऊ पाध्ये, ह.मो. मराठे यांचे बंडखोर नवलेखन स्थिरावले होते. दलितांचा नवा प्रवाह उमटला होता. त्या सगळ्यांचे दर्शन ‘मटा’च्या पुरवण्यांत होई. दैनिकात वार्ताहरांचा चमू चतुरस्त्र होता. रणदिवे यांची शोधकता, वि.ना. देवधरांची संस्कारशीलता, अशोक जैनची विदग्ध रसिकता, गो.आ. भट यांची तपशिलातील अचूकता व नीला उपाध्ये यांची तडफ असे विविध पैलू तेथे प्रकट होत. गावोगावी वार्ताहरांचा संचही सक्षम होता. तळवलकर त्यामध्ये दोन प्रकारची भर घालत. पाश्चात्य नियतकालिके व पुस्तके यांमधील विचारप्रवाह आणि मुंबईच्या कॉस्मोपॉलिटन जगातील घडामोडी - त्यामध्ये नानी पालखीवाला यांच्या भाषणांपासून ‘जीना हाऊस’पर्यंतच्या विविध हकिगतींचा समावेश असे. कधी इस्त्रायलच्या राजदूताचा इंटरव्ह्यू घ्यावा लागे. असे साहित्य असले, की तळवलकर समाधान पावत. पण त्यांचा स्वभाव समाधान-खुशी व्यक्त करण्याचा नव्हता. उलट, ते उणिवा, त्रुटी यांवर नेमके व जखम होईल अशा तीक्ष्णतेने बोट ठेवत. त्यांच्या लेखनात ते तसेच व्यक्त होई. त्यामुळे संबंधित लोक जखमीदेखील होत.
जे लोक त्या फटकाऱ्यांनी जखमी होत त्यांतील काहींचा संताप सात्त्विक असे, पण त्यांना मराठी सांस्कृतिक जगात कोणी त्राता नसे. साहित्यसमीक्षक चंद्रकांत बांदिवडेकर हे एकदा असे चिडून ‘मटा’त आले, कारण तळवलकरांनी अग्रलेखात हिंदी साहित्यजगतावर काही निमित्ताने कडाडून हल्ला चढवला होता. तळवलकरांनी हिंदी साहित्य वाचलेही नव्हते, परत त्यांना त्याबद्दल पूर्वग्रह होते. (‘काहे दिया परदेस?’ या मालिकेतील मोहन जोशी!) बांदिवडेकर तळवलकरांच्या आक्षेपांचे निराकरण करू शकले नाहीत, कारण त्यांचे आक्षेप निराधार होते. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक ग.ना. जोशी यांचा ग्रंथ न वाचता त्यावर तळवलकरांनी अग्रलेखातून टीका केली व त्यांना पुढे खुलासे छापत बसावे लागले. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे अध्यक्ष वसंतराव पटवर्धन यांच्यावरील हल्ला कुप्रसिद्ध आहे. तळवलकरांची ताकद त्यांच्या पूर्वग्रहांत होती. ते पूर्वग्रह अत्याग्रह वाटावे इतके तीव्र होते. त्यामुळे त्यांच्याकडून माणसे दुखावली जात. कोणीतरी कोणाला तरी झोडपून काढत आहे याचा आनंद वाचकांना वाटे. अशी कितीतरी उदाहरणे! ‘सचिवालयात मेहुण’, ‘समाजवादी लक्षभोजन’, ‘सूक्ष्मातील विनोबा स्थूलातील आपण’, ‘नाथांचे भारूड’, ‘देवरस यांचे सीमोल्लंघन’, ‘भालबांचे नीतिपुराण’, ‘यशवंतराव वीसकलमे’ अशांसारखे त्यांचे अग्रलेख गाजले. त्यांतील प्रासंगिकता व भेदकता विलक्षणच आहे. परंतु मागे वळून बघता ती देखील व्यक्तिगत टीकेचीच उदाहरणे वाटतात. तळवलकर त्यामधून बदलत्या काळाचे नवे आकलन सुचवत नाहीत. ते लेखन वर्तमानपत्रीय ‘एक्स्पोजर’ या पातळीवर राहते.
५.
‘मटा’ आणि ‘लोकसत्ता’ यांच्यामध्ये वेगळीच चुरस असे. ‘लोकसत्ता’ मुंबईत ‘मटा’च्या पुढे जवळ-जवळ लाख प्रतींनी होता, पण ‘मटा’ सुसंस्कृत शहर, पुण्यामध्ये अकरा हजार प्रती विकला जाई तर ‘लोकसत्ते’च्या तेथे जेमतेम एक हजार प्रती प्रसारित होत. ‘मटा’च्या वितरण विभागाला त्याचा खप मुंबईतही ‘लोकसत्ते’एवढा असायला हवा असे वाटे आणि ‘लोकसत्ता’ मात्र ‘मटा’ची प्रतिष्ठा मिळावी म्हणून तडफडत असे. माधव गडकरी यांनी त्यांच्या ‘लोकसत्ते’च्या संपादकपदाच्या उत्तरकाळात ती प्रतिष्ठा काही प्रमाणात मिळवली. गडकरी यांच्या पाठोपाठ अरुण टिकेकर, कुमार केतकर व आता गिरीश कुबेर यांनी लोकसत्ते’ची प्रतिष्ठा वाढवत नेली आहे. पुल हे महाराष्ट्राचे नंबर एकचे लाडके व्यक्तिमत्त्व असेल तर गडकरी त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर १९८० च्या दशकात होते. तथापि, गडकरी यांची ती लोकप्रियता ‘मटा’च्या प्रतिष्ठेच्या स्थानाला धक्का लावू शकली नाही. ते पुढे, भारतकुमार राऊत यांच्या संपादकीय कारकिर्दीत घडून आले.
गडकरी ‘लोकसत्ते’तून निवृत्त झाल्यानंतर कोठे कोठे कॉलम लिहीत. त्यांची त्यावेळी मॅजेस्टिक गप्पांत मुलाखत झाली. त्यांना विचारले गेले, की संपादकपदाची कवचकुंडले गेल्यावर आता कसे वाटते? ते उद्गारले होते, की मजकडे अजून तेवढेच लोक येतात वगैरे. वास्तवात त्यांनी ताकद गमावली होती. त्यांच्या लेखनातील तळमळ, त्यांचा स्वत:चा कार्यकर्त्यांसारखा उत्साह वाचकांना भावून जात असे. त्यामुळे अनेक व्यक्तींना न्याय मिळालाही. सामाजिक परिषदेसारखे काही उपक्रम उभे राहिले. तळवलकर यांना तशा प्रकारच्या चळवळ्या पत्रकारितेचा राग असे. त्यामुळे तळवलकर यांनी त्यांच्या स्वभावप्रकृतीला साजेसा, अर्थपूर्ण जगण्यासाठी संशोधनपर लेखनाचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रगल्भ दर्शनाचा बाज निवृत्तीनंतर स्वीकारला. त्यांचे पूर्वग्रहही वयाबरोबर वितळत गेले असावे.
‘मटा’ला प्रतिष्ठेचे जे स्थान होते, त्याचे श्रेय तळवलकरांइतके त्यांच्या टीमकडेही जाते. ती टीम जुळून आलेली होती. ‘मटा’ ज्या परिस्थितीत निर्माण झाला त्या परिस्थितीत त्याची कारणे आहेत. शिवार, ती कामगिरी कर्णिकांची व गोखले यांची. ‘मटा’तील तळवलकरांचे मा.पं. शिखरे, दि.वि. गोखले, दिनू रणदिवे, अशोक जैन, कमलाकर नाडकर्णी, वि.ना. देवधर, नरेंद्र बल्लाळ, जोसेफ नरोन्हा, काही काळ जगन फडणीस, वि.वि. करमरकर असे सहकारी तोडीस तोड होते. त्या प्रत्येकाची ‘मटा’मधील कामगिरी ही स्पृहणीय होती. मी, भालचंद्र वैद्य व श्रीराम शिधये, आम्ही ‘पुरवणी विभाग’ स्वतंत्रपणे सांभाळत होतो. त्यात ‘रविवार पुरवणी’ला नवे रूप लाभलेच, पण ‘मनोरंजन पुरवणी’, ‘विज्ञान पुरवणी’ अशा नव्या कल्पनाही राबवल्या गेल्या. दूरदर्शनने मराठी सांस्कृतिक जगात जे नवे ‘आक्रमण’ केले होते आणि मनोरंजनाचा जो नवाच फंडा रूजू पाहत होता, त्याला ‘मनोरंजन पुरवणी’ने तोंड फोडले तर बुधवारच्या ‘विज्ञान पुरवणी’ने ‘मटा’ची ‘बौद्धिक खाद्य पुरवणारे दैनिक’ अशी प्रतिमा राखली गेली; त्याचबरोबर बदलत्या नव्या युगाची चाहूलही घेतली गेली. त्या काळात ‘मटा’च्या जाहिरातीचे ‘स्लोगन’ बसस्टॉपवर लागले ते असे होते -‘बातम्या तर सगळेच देतात. विचार फक्त ‘मटा’ देतो.’ हे विचार फक्त अग्रलेखांत नव्हते, तर बातम्या-लेखांच्या पाठीमागे भूमिका स्वरूपात दडलेले होते व त्यांचाही वाचकमानसावर परिणाम होत होता. तो काळ वैचारिक आंदोलनांनी भारलेला होता. ‘मटा’ने तो विविधांगांनी त्याच्या प्रतिमेत उतरवला होता. तळवलकरांचे सपासप फटकारे मारणारे अग्रलेख हा त्याचा घटक होता. अन्य बातम्या-लेखांचे काहीच नमुने उद्धृत करतो. कै. एकनाथ ठाकूर यांनी स्टेट बँक अधिकाऱ्यांच्या असोसिएशनमध्ये संजय गांधी यांच्याविरुद्ध ऐन आणीबाणीच्या काळात ठाम भूमिका घेतली. दिनू रणदिवे त्यावेळी ‘मटा’त त्यांच्या बाजूने उभे राहिले. गोखले यांनी तर आणीबाणीविरुद्ध सत्याग्रह केला. आणीबाणीपूर्व काळात दुर्गा भागवत यांनी आकाशवाणी/दूरदर्शनवर बहिष्कार घातला होता. तर मी लेख लिहिला होता - ‘आकाशवाणी, नव्हे प्रचारवाणी’. अशोक जैनचे दिल्लीचे वार्तापत्र म्हणजे मेजवानी असे. लेखकवर्गाची तर किती नावे नोंदवावी? वि.म. दांडेकर (अर्थ), सिंधु डोक्रस (सौंदर्र), लीना मोहाडीकर (सेक्स) असे नियमित लिहिणारे लेखक होते. त्यांच्या विषयांवरील त्यांचे लेखन मराठी वर्तमानपत्रांत प्रथमच येत होते. स.गं. मालशे, सरोजिनी वैद्य यांच्यासारख्या नामवंतांपासून बाळ फोंडके, सुबोध जावडेकर या त्यावेळच्या नव्या लेखकांपर्यंतची मंडळी विविध प्रकारे व विविध क्षेत्रांतून लेखन करत.
तळवलकरांचे संपादकीय लेखनाबाबतीत साधर्म्य लोकमान्य टिळक यांच्याशी सांगितले जाते, पण टिळकांनी नेतृत्व केले, त्यासाठी ‘केसरी’ हे साधन म्हणून वापरले. तळवलकरांकडे नेतृत्वगुण होते असे त्यांचे मित्रदेखील म्हणणार नाहीत; किंबहुना त्यांच्या मनात नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, लोकसंपर्क यांबद्दल नफरत होती. तळवलकरांचा तो गुणविशेष मराठी मध्यमवर्गीयांना प्रिय वाटला असावा. कारण मध्यमवर्ग १९५० नंतरच्या काळात अधिकाधिक संकुचित व स्वान्त होत गेला. त्याने सभोवतालातील सहभाग जवळ जवळ बंद केला. त्याने स्वत:चा उत्कर्ष साधला, दूर बसून टिकाटिप्पणी करण्याची सर्वसाधारण प्रवृत्ती अंगीकारली. पुढे, ‘मटा’ची ‘पत्र नव्हे मित्र’ ही तळवलकरांपुरती तरी फसवी घोषणा आली आणि एक मोठा पत्रकार-लेखक त्याचे ‘पत्र नव्हे मित्र नव्हे, कुत्रं’ असे विडंबन करू धजला. कारण तोपर्यंत ‘मटा’ हे प्रॉडक्ट आहे आणि त्याची विक्री जाहिराती करून साबणासारखी वाढवता येईल ही, नवे मालक समीर जैन यांची विचारसरणी टाइम्स’च्या बिल्डिंगमध्ये व एकूण वर्तमानपत्रसृष्टीत पसरली होती. गिरीलाल जैन या ‘टाइम्स’च्या संपादकांचा बौद्धिक रूबाब घसरला होता. तळवलकरांना त्याचे धक्के, त्यांचा ‘पेपर’ मराठी असल्याने दुरून बसू लागले होते, परंतु मराठी समाजमनातील त्यांची प्रतिमा मात्र अभंग राहिली होती.
तळवलकरांना त्यांच्या लेखनापलीकडे ‘मटा’ची मोठी ताकद जी होती, ती कळली होती की नाही याबद्दल माझ्या मनात बऱ्याच वेळा शंका असते. ‘मी शंका असते’ असे म्हणण्याचे कारण म्हणजे मी ‘मटा’तून मुक्त झाल्यानंतर जवळ-जवळ आठ वर्षें तळवलकर ‘मटा’चे संपादक होते. ते त्यानंतरची वीस वर्षें अमेरिकेत राहून वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी व त्यांच्या स्वत:च्या पुस्तकांचे लेखन करत होते. काही पत्रकार सहकाऱ्यांनी त्यांच्या त्या काळातील लेखनाबद्दल व सहवासाबद्दल लिहिले आहे. त्यावरून ते खूप सहृदय, सहकाऱ्यांबद्दल आत्मीयता बाळगणारे, पत्रकारितेबद्दल काही धारणा असलेले असे संपादक वाटतात. विनोद शिरसाठ यांनी त्यांच्या ‘साधने’तील लेखनाच्या निमित्ताने त्यांच्या सामाजिक जाणिवेची जी उदाहरणे सांगितली ती थक्क करणारी आहेत! तो त्यांच्या जीवनकारकिर्दीचा दुसरा व तिसरा टप्पा आहे. आता विचार करताना त्यांच्या त्या नव्या जाणिवेचा आरंभबिंदू य.दि. फडके यांच्या लेखानिमित्ताने प्रकट झालेला दिसला. तो ‘मटा’त प्रसिद्ध झाला. १९८५-८६ चा सुमार. फडके यांच्या लेखातील टिळकांच्या क्रांतिकारकत्वासंबंधीच्या उल्लेखाबाबत वेगळी व जादा माहिती कुमार केतकरने एका पत्राने दिली. तळवलकर त्याकाळी माझ्या टेबलासमोर नियमित येणारे, केतकर-अरुण साधू यांच्याकडे थोड्या अधिक्षेपानेच पाहत असत. परंतु केतकरच्या त्या पत्रातील संदर्भांमुळे तळवलकरांना नवेच घबाड मिळाले. फडके यांच्या लेखास उत्तर म्हणून ते सारे संदर्भ उद्धृत केले गेले. तो मोठाच वाद घडून आला, पण त्यामुळे तळवलकरांची तरुण पिढीकडे पाहण्याची दृष्टी बदलली. कुमार तर त्यांचा लाडका बनून गेला. इतका, की त्यांनी त्यांचा वारस म्हणून त्याला पुढे ‘मटा’चा संपादक ठरवले! तोपर्यंत खरोखरीच वेगवेगळ्या क्षेत्रांतील नव्या विचारी कार्यकर्त्यांची व लेखकांची एक परिपक्व फळी समाजात तयार होऊन पुढे आली होती. मध्यमवर्गाचे जुने सांस्कृतिक जग बदलले होते. पत्रकारांची तरुण, जिज्ञासू पिढी तयार होत होती. तळवलकरांचा त्यांच्याबरोबर सुखसंवाद होऊ लागला होता. तळवलकरही पोक्त, साधनसंपत्तीने युक्त झाले होते. एक व्यक्ती केवळ पत्रकारितेचा व्यवसाय करून सुखसमृद्ध होते असे मराठीतील ते पहिलेच उदाहरण. त्यामुळे तरुण पत्रकार प्रभावित झाले. तळवलकरांचे बदललेले रूप विलोभनीय आहे. तळवलकरांच्या नजरेने विचारजगतातील ‘शिफ्ट’ अचूक हेरला याबद्दल त्यांचे कौतुकच वाटते.
६.
माझा स्वत:चा त्यांच्यासोबतचा वीस वर्षांच्या नोकरीतील सहवास आत्मीय भावाचाच होता, परंतु त्यावेळी स्टाफपैकी जवळ जवळ सर्वांचे मत तळवलकर तुसडे, स्वत:पलीकडे न पाहणारे, पत्रकारितेची बूज फारशी न ठेवणारे, हस्तिदंती मनोऱ्यात राहणारे व वावरणारे आहेत असे होते. तळवलकर १९९६ साली निवृत्त झाले तेव्हा मंगला आठलेकर आणि निखिल वागळे यांनी तळवलकरांबद्दल अत्यंत टीकास्पद लेखन केले आहे किंवा त्याही आधी श्रीपाद हळबे यांनी ‘दिनांक’ या साप्ताहिकात तळवलकर-गडकरी या संपादकद्वयाची तुलना करताना तळवलकरांच्या, समाजापासून फटकून राहण्याच्या वृत्तीचा ‘आरव्हरी टॉवर’मधील संपादक म्हणून खरपूस समाचार घेतला आहे.
तळवलकरांना त्यांच्या टीमचे श्रेय कधी जाणवले होते किंवा नाही याचा अंदाज कोणी कधी घेतलेला नाही. त्यांच्या ज्या पाच-सात मुलाखती प्रसिद्ध आहेत, त्यांमध्ये देखील त्यांना हा प्रश्न विचारला गेल्याचे दिसत नाही; ना कधी त्यांनी स्वत:हून त्याचा उल्लेख केल्याचे आढळते. अपवाद म्हणजे त्यांनी ‘मटा’तून निवृत्त होताना जो निरोपलेख लिहिला. त्यात ‘मटा’च्या प्रतिष्ठेला त्यांचा संपादकीय वर्ग व लेखकवर्गही कारणीभूत होता अशी औपचारिक नोंद केलेली आहे. गिरीश कुबेर, नीतिन वैद्य, प्रकाश अकोलकर, प्रताप आसबे, अंबरीश मिश्र यांसारख्या नंतरच्या पिढीतील बुद्धिकुशल पत्रकारांनी त्यांच्याबद्दल फार सहृदयतेने लिहिले आहे. त्यांच्या पिढीचे ते ‘आयडॉल’ होते, असाच त्यामुळे समज होतो. तेही तळवलकरांचे दर्शन अगदी वेगळे आहे.
७.
तळवलकर ज्या काळात महत्त्वाचे पत्रकार व संपादक बनले, तो मुद्रण माध्यमाच्या परमोत्कर्षाचा काळ होता. मराठीत छपाई दोनशे वर्षांपूर्वी सुरू झाली. दैनिके व नियतकालिके एकोणिसाव्या शतकामध्ये प्रबोधनपर व राष्ट्रीय स्वातंत्र्य या हेतूंसाठी प्रसिद्ध होत गेली. त्यांपैकी ‘केसरी’ व ‘ज्ञानोदय’ ही अजूनही अस्तित्वात आहेत. मराठी पुस्तकेदेखील एकोणिसाव्या शतकात प्रकाशित झाली. पहिल्या मराठी कादंबरीचे आयुष्य दीडशे वर्षांहून थोडे अधिक आहे. मराठी कथेने तीस वर्षांपूर्वी शताब्दी साजरी केली. जांभेकरांपासून आंबेडकरांपर्यंतची वैचारिक प्रबोधन परंपरा धगधगती आहे. त्यांचे माध्यम मुद्रित शब्द मराठी निरतकालिकांना व छापील साहित्याला उत्कर्षाचा काळ लाभला १९१५-२० पासून. तो टिपेला पोचला १९४५-५० च्या आसपास. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापासून ते राज्य स्थिरावेपर्यंतचा काळ - म्हणजे १९५१ ते १९८०- मराठी प्रकाशनांचा सर्वोत्कट काळ मानता येईल. त्या काळात अनेकविध रुचींची साप्ताहिके-मासिके मराठीत प्रसिद्ध होत गेली - स्तन-नितंबांच्या गोष्टी छापणाऱ्या ‘रंभा’, ‘दी बेळगावी’ मासिकांपासून ‘समाज प्रबोधन पत्रिके’सारख्या तत्त्वविचारी मासिकापर्यंत. प्रसिद्ध पुस्तकांची संख्या वाढली, त्यांचा विषयविस्तार घडून आला, पण मराठी अभिरुचीचे जाणीवपूर्वक संगोपन व संवर्धन झाले ते तीन पीठांकडून - ‘मौज-सत्यकथा’, ‘माणूस’ व ‘मटा’. त्या तीन प्रमुख नियतकालिकांमध्ये त्या काळातील मराठी समाजाचे वेगवेगळ्या थरांतील प्रतिबिंब उमटलेले दिसते. तिघांचा वाचकसंघ मध्यमवर्ग हाच होता आणि त्यांची धारणा वैचारिक बैठक व सुसंस्कृतता ही होती.
‘सत्यकथे’ची विक्री महिन्याला दोन-तीन हजार प्रतीच होती. ‘मौजे’च्या पुस्तकाच्या पहिल्या हजार प्रतींची आवृत्ती संपण्यास दहा-दहा वर्षें लागत, परंतु महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्या-तालुक्यात गेले तरी ‘मौजे’चा एखादा वाचक भेटे. असे ते अभिरूचीचे जबरदस्त ‘नेटवर्क’ होते. वाचकांना कमल देसाई यांच्या कथेपासून आरती प्रभू यांची पहिली कविता स्त्रीनावामुळे ‘सत्यकथे’त कशी छापली गेली या कुजबुजीपर्यंत सर्व गोष्टी माहीत असत. त्यांना त्यांच्या परिसरात नाव असे. अशा तऱ्हेने ‘मौज-सत्यकथे’चा सांस्कृतिक प्रभाव साऱ्या महाराष्ट्रावर होता. (‘ग्रंथाली’ची वाचक चळवळ येऊन वातावरण मोकळे झाल्यावर पुढे, रा.रं. बोराडे यांनी त्या प्रभावाचे वर्णन ‘दहशत’ असे केले आहे. त्यांनी असे म्हटले, की आपल्याला जे वाटते ते लिहावे, की ‘खटाववाडी’ला प्रिय ते लिहावे अशी भीती मनात असे.) ‘मौज-सत्यकथे’च्या साहित्यातून जी अभिरुची व्यक्त होई ती मूल्यव्यवस्था होती. मौजे’चे संपादक व लेखक उदार होतेच; त्यांना सर्व तऱ्हेच्या विचारांना, चळवळींना समजावून घेणे आवडे, पण ते त्यांच्या शर्तींवर. त्या शर्तींचे मूळ रूढ हिंदू संस्कृतिव्यवस्थेत होते. ती व्यवस्था विषमतेवर आधारित होती. त्यांना दूर इंग्लंडमध्ये असलेले फॅबियन वगैरे उदार समाजवादी प्रवाह वाचण्यास आवडत, मात्र त्यांना ते प्रवाह येथील समाजजीवनाशी कसे जुळले जातील याची कळकळ जाणवत नसे. त्यामुळे त्यास अभ्यासाचे, व्यासंगाचे मूल्य राही. पूर्वास्पृश्यांना दुरून पाणी वाढत तसा तो प्रकार - तहान तर भागवली आणि सोवळेपणही राखले. ‘एनबीटी’च्या पुणे येथील एका सेमिनारमध्ये श्रीपुना गं.बा. सरदार यांनी या मुद्यावर छेडलेदेखील, परंतु दोघांनी त्यांचे मूल्याधार वेगवेगळे आहेत हे जाणून व ‘सेमिनारचे औचित्य’ राखून त्यांच्या त्यांच्या तलवारी म्यान केल्या. ती बातमी ‘मटा’च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली! ‘मौज-सत्यकथे’ने व तळवलकरांनी पुढे तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले.
‘मौज-सत्यकथा’ पंथास जनांचे साहित्य प्रचारी वाटे. भारतीय संस्कृतीची विशालता आणि समावेशकता व्यक्त करील असे अभिजात साहित्यही मराठीत संतपरंपरेनंतर निर्माण झालेले नाही. अशा अवस्थेत ती मंडळी ‘फॉर्म’ची उजळणी करत राहिली. कवी शंकर वैद्य ‘सत्यकथे’च्या कथा-कवितेला टोक आणण्याच्या प्रयत्नांचे वर्णन गांधी टोपचा दाखला देऊन करत. काँग्रेस पुढारी स्वातंत्र्योत्तर काळात गांधी टोपीला नीळ व खळ देऊन टोक आणत असत, पण त्या क्रियेत त्या टोपीचा आशय हरवून जात असे. तसे ‘सत्यकथे’च्या कथा-कवितेला टोक आणण्याच्या संपादकीय संस्काराचे होते का, असा त्यांचा सवाल होता. अभिजनांच्या ललित साहित्याची ही तऱ्हा तर केतकर-राजवाडे-डांगे काळातील अभ्यास परंपराही लोपली होती. विद्यापीठीय पारिभाषिक अभ्यासाचा बडिवार माजवला जात होता. फुले-आंबेडकरांचे, एवढेच काय कर्व्यांचे विचार स्वीकारण्यासदेखील गेल्या शतकाच्या ऐंशीनंतर मोकळा होत गेलेला काळ उजाडावा लागला! त्यामुळे सर्व साहित्यासाठी पश्चिमेकडे पाहावे लागे. निरोगी, निकोप भारतीय परंपरासूत्रे व आधुनिक विचार यांमधून एकात्म नवपरंपरा निर्माण होण्याची शक्यता राहिली नव्हती. तो पेच अजून तसाच आहे.
‘मौजे’च्या या ‘त्यांच्या शर्ती’वरील प्रभावास तडा गेला तो ‘माणूस’मुळे. ‘माणूस’ कधी पाक्षिक, कधी साप्ताहिक तर कधी द्विसाप्ताहिक असे प्रसिद्ध होत असे. ‘माणूस’ची सुरुवात १९६१ सालीच झाली. ते व्यापक, विविध विचारांना खुली जागा देणारे नव्या चळवळींचे-प्रयोगांचे उदार व्यासपीठ होते. त्यामुळे ‘मौज’कडे अचंबा व आदरयुक्त भीतीने पाहणारा मराठी वाचक थोडा मोकळा झाला आणि तो किलकिल्या झालेल्या डोळ्यांनी ‘माणूस’च्या माध्यमातून समाजवास्तवाकडे पाहू लागला. ‘माणूस’ची विक्री पंधरा ते पंचवीस हजारांच्या दरम्यानच होती. तथापि, त्याला बघता बघता, त्या वेळच्या महाराष्ट्राच्या पाच-सात कोटी लोकसंख्येच्या संवेदनाशील व वैचारिक प्रतिनिधीत्वाचे महात्म्य लाभले. पददलित, गरीब, स्त्रिया यांच्यासाठी काम करणाऱ्यांना त्यांची ती हक्काची जागा वाटे. तेथे उच्च प्रस्थापितांची मानभावी करुणा नव्हती तर समाजाच्या प्रश्नांना क्षेत्री भिडणे होते. त्यामुळे तरुणांचा राबता तिकडे होता. ‘माणूस’चे संपादक श्री.ग. माजगावकर हे हिंदुत्वाच्या परंपरेत वाढलेले, परंतु त्यांनी समतादी आधुनिक मूल्ये मन:पूर्वक स्वीकारार्ह मानली; क्युबापासून चीनपर्यंतच्या परदेशांतील क्रांतिप्रयत्नांचा आस्थेने मागोवा ठेवला. येथील अन्यायाविरुद्धच्या तळच्या वर्गातील लढायांचे चित्रण केले आणि ‘माणूस’ हे सुशिक्षित, संवेदनाशील विचारी मराठी मनाचे प्रतिबिंब बनले.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
‘मटा’ हे वर्तमानपत्र ‘माणूस’ व ‘मौज’ या दोन टोकांना हिंदोळत असे. फक्त अग्रलेखांचा आणि तळवलकरांच्या लेखनाचा विचार केला तर तो झोका ‘मौजे’कडे जाई. ‘मटा’चा संपादकीय वर्ग त्याच्या विविधरंगी भूमिकांतून झोका - ‘माणूस’प्रमाणे वास्तव भूमिकेकडे खेचून आणे. हे मोठ्या जाणीवपूर्वक घडत होते असे नव्हे, परंतु वैचारिक ‘कॅलिडोस्कोप’चा ‘मटा’त खेळ चाले असा तो मामला होता. ‘मटा’मध्ये लेखारंभी निर्देश केला त्याप्रमाणे दोनच गट राहिले नव्हते. समाजच विविध मतप्रवाहांत विखुरला गेला होता आणि त्या सर्व छटा ‘मटा’च्या संपादकीय वर्गात व्यक्त होत होत्या. त्या वेळची टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘नुक्कड’ हिच्या धर्तीवर आम्ही ‘मटा’ला ‘नुक्कड’ म्हणत असू. तळवलकर साडेपाचला घरी जात. तळवलकरांची केबिन वगळली तर बाहेर गोखले यांचे दिलखुलास राज्य असे. ते बोलण्या-लिहिण्याचे खूप स्वातंत्र्य देत. सर्वांना सामावून घेत. आम्ही म्हणत असू, की त्यांनी ख्रिश्चन पाद्रयाचा ढिगळ झगा घातला आहे. मात्र सर्वांनी त्या झग्याच्या आत असायला हवे! गोखले यांच्यासमोर विविध मतप्रवाहांच्या घणाघाती चर्चा होत. एकच दाखला. गोखले सहसंपादक झाल्यावर त्यांनी पुण्यातील एका ‘कोर्ट केस’वर ‘धावते जग’मध्ये स्फुट लिहिले होते. खटला खुनाचा होता. गुन्हेगार फक्त चोवीस वर्षांचा होता. न्यायाधीशांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली होती. तो तरुण धीरोदात्तपणे म्हणाला होता, की मला फाशी द्यावे- मला जगण्याची इच्छा नाही! गोखले यांनी स्फुटात सूचित केले होते, की न्यायाधीशांनी त्या तरुणाला त्याच्या मागणीप्रमाणे फाशी द्यायला हवे होते, कारण त्याचा गुन्हा गंभीर होता. त्या स्फुटावर दुसऱ्या दिवशी संपादकीय विभागात चर्चा झडली. गोखले त्यांच्या मतावर ठाम होते. त्यातून मंडळी पुरोगामी-प्रतिगामी या त्या काळातील प्रचलित संज्ञांवर घसरली आणि मग गोखले यांना निर्वाणीचा टोला लगावला गेला, की न्यायाधीशांचा निर्णय योग्य आहे. त्या एवढ्या कोवळ्या गुन्हेगार मुलाला फाशी देणे हे रानटीपणाचे होईल. पुरोगामी-प्रतिगामी या संज्ञा जंगलराज संपले आणि मानवी संस्कृती निर्माण झाली, तेव्हा आल्या! तुमची फाशीची शिफारस ही रानटीपणात मोडते!
त्या काळी जगभर फाशीविरोधी वातावरण होते. श्रीराम लागू यांनीही तत्संबंधी ‘मटा’त लिहिले होते व त्यावर पत्रव्यवहार प्रसिद्ध झाला होता. मध्यमवर्गीय समाजातील संवेदनाशील, विचारी माणसांचे प्रतिबिंब ‘मटा’च्या स्टाफमध्ये होते आणि सर्व खेळीमेळीने, एकत्र नांदत होते. चीन-पाकिस्तान बरोबरची युद्धे, कऱ्हाड-लातूर रेथील भूकंप, पुरासारख्या आपत्ती, बहात्तरचा व त्यानंतर आलेले दुष्काळ, पुणे जिल्ह्यात झालेला विमान अपघात अशा प्रत्येक वेळी सारे एकदिलाने, जिव्हाळ्याने कामास लागत. एरवी, राजकीय-सामाजिक विषयांवरील धुसफुस, वाद-प्रतिवाद जोरदारपणे चाले. समाजातील कोणीही माणूस खुलेआम ‘मटा’च्या कचेरीत येऊन प्रेमाने बसत होता. खरोखरीच, त्यांच्यापैकी काही हक्काने लेखनासाठी म्हणून न्यूजप्रिंटच्या कागदांचे पॅडदेखील घेऊन जात!
तळवलकर त्या भानगडींमध्ये नसत. ते आणि त्यांचे लेखन एवढाच त्यांचा बाणा होता. आणीबाणीनंतर जनता राज आले आणि मग मीडियाला मोकळे रान झाले. तळवलकरांना त्यांच्या ‘अधिकारपदा’ची जाणीव त्या काळात केव्हातरी झाली. ते हुकमतीने लिहू लागले. तळवलकरांचे त्यांच्या मृत्यूनंतर दैवतीकरण होताना पाहिले, की त्यांची एक वेगळीच इमेज माझ्या मनात तयार होते. त्यांच्या एका हातात तलवार आहे व दुसऱ्या हातात ज्ञानदीप. पण मग त्यांच्या बाकी दोन भुजा ‘मटा’च्या स्टाफमध्ये दिसू लागतात.
८.
मराठीत संपादक दोन प्रकारचे राहत आले आहेत. एक लिहिणारे संपादक, दुसरे संयोजक संपादक. वाचकांना लिहिणारे संपादक जास्त आवडतात. तळवलकर फक्त लिहीत राहिले. त्यांनी वर्तमानपत्र घडवण्याचा विचार कधी केला नाही. श्री.पु. भागवतांनी लिहिले जवळ जवळ नाही - मोजकी भाषणे दिली, पण मराठीत साहित्यसंस्कृतीची भूमिका दृढमूल केली. श्री.पु. भागवत यांनी त्यांचा प्रस्थापितांचा भोज्जा सांभाळला. तळवलकर त्या भोज्ज्याच्या जवळ असत. त्याला त्यांनी पाश्चिमात्य उदाहरणे घेऊन आधुनिक व्यासंगी जोड दिली, परंतु ते त्या व्यासंगाचे नाते येथील समाजाशी जोडू शकले नाहीत. तळवलकरांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या नादाने कधी वेडीवाकडी वळणे घेतली, काही वैचारिक साहसे केली. ते रमले मात्र १९५० पूर्वीच्या गोठलेल्या विचारविश्वात! मराठी मध्यमवर्गीय दुर्दैव असे, की तोही त्यांच्याबरोबर त्याच भोवऱ्यात गरगरत राहिला. माजगावकर प्रमुखत: संयोजक होते, त्यामुळे मराठी समाजात जी वैचारिक वादळे येत होती, ती माजगावकरांनी अचूक टिपली; ते त्यांच्या परीने त्यांना वळणे देत राहिले. ते कधी चळवळीतही उतरले. त्या ओघात त्यांनी टिपणे स्वरूपात लेखन केले आहे, त्यात त्यांची स्वत:ची दिशा आहे. त्यांच्याकडे समाजपरिवर्तनाचा कार्यक्रम होता. ‘माणूस’ श्रीगमा यांच्या मृत्यूआधीच १९८० च्या दशकात बंद पडले. त्यांची आठवण काढणारे पत्रकार अजून आहेत. ‘माणूस’चा वसा चालू राहावा असे मानणारा वर्ग आहे. ‘मौज’ आणि ‘मटा’ यांनी मात्र केव्हाच कात टाकली आहे!
तळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. काय योगायोग पाहा -त्यांचा शेवटचा जो लेख ‘साधने’त प्रसिद्ध झाला तो गडकऱ्यांच्या ‘राजसंन्यास’वर आहे. ते पुण्यातील पुतळ्याच्या वादंगाबद्दल काही बोलत नाहीत. ‘राजसंन्यास’चे लेखन आणि अत्रे-पुल यांचे संदर्भ यासंबंधीच रसिकतेने लिहितात. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना!
(लेखातील उल्लेख माझ्या आठवणीतून केले आहेत. त्यांची सत्यासत्यता तपासून पाहता आलेली नाही. अर्थात असे उल्लेख अन्यायकारक असणार नाहीत असे सहसा पाहिले आहे.)
(‘रूची’ या ग्रंथालीच्या मासिकाच्या मे २०१७च्या अंकातून लेखकाच्या पूर्वपरवानगीने साभार.)
.............................................................................................................................................
लेखक दिनकर गांगल ‘ग्रंथाली’ या प्रकाशन संस्थेचे एक संस्थापक आहेत.
dinkargangal39@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Bhagyashree Bhagwat
Mon , 23 October 2017
purvardha chokh uttarardha sail.