तळवलकरांची मनमानी
दिवाळी २०१७ - तळवलकर : एक मूल्यमापन
मंगला आठलेकर
  • पत्रपंडित गोविंदराव तळवलकर
  • Sat , 21 October 2017
  • दिवाळी २०१७ गोविंद तळवलकर Govind Talwalkar महाराष्ट्र टाइम्स Maharashtra Times

१९९६ साली तळवलकर ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून निवृत्त झाले. त्यानंतर हा लेख दै. ‘महानगर’मध्ये प्रकाशित झाला होता. हा लेख ‘ग्रंथाली’तर्फे झालेल्या तळवलकरांच्या मुलाखतीवर आधारित आहे. त्यामुळे या लेखातील काही संदर्भ त्यावेळचे आहेत, याची वाचकांनी नोंद घ्यावी ही विनंती.

.............................................................................................................................................

आजच्या चर्चेचा विषय आहे, ‘पत्रकारितेत संपादकांची मनमानी नसते का?’. मुळात पत्रकारिता हा माझा प्रांत नाही. त्यामुळे रोजचं वृत्तपत्र आकार घेत असताना, त्यात संपादक कोणकोणत्या प्रकारची मनमानी करू शकतात, करतात किंवा करीत नाहीत, याविषयी मला काही कल्पना नाही आणि संपादकांच्या मनमानीचा मला अनुभवही नाही. तेव्हा ज्या विषयाचा आपल्याला अनुभव नाही, ज्याविषयी आपल्याकडे पुरेशी खात्रीलायक माहिती नाही, त्या विषयावर बोलू नये, असं मी मानते.

पण कित्येकदा असं घडतं की, संपादक आपल्या अग्रलेखातून, भाषणातून, अन्य स्वरूपाच्या लेखनातून मनमानी विधानं करतात. अशा वेळी त्यांच्या अग्रलेखांचा वाचक म्हणून, त्यांच्या व्याख्यानांचा श्रोता म्हणून त्यांच्या वैचारिक मनमानीशी आपला परिचय होत असतो.

अलीकडेच ज्येष्ठ पत्रकार व निवृत्त संपादक गोविंद तळवलकर यांची एक प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीत मराठी साहित्य, महाराष्ट्रातील विचारवंत या संदर्भात त्यांनी काही शेरेवजा विधानं केली; ती तिथं जमलेल्या अनेकांना मनमानी करणारी वाटली. त्या मुलाखतीवरील प्रतिक्रिया मी व्यक्त करावी, म्हणजेच संपादकांच्या वैचारिक मनमानीवर मी बोलावं असा विषय मला संपादकांनी दिला आहे.

तळवलकरांचं बोलणं ऐकत असताना किंवा त्यांचे लेख वाचत असताना एक गोष्ट लक्षात येते व ती म्हणजे तळवलकरांची काही प्रिय मतं आहेत, प्रिय व्यक्ती आहेत, प्रिय साहित्यिक आहेत- अर्थात पाश्चात्त्य! आणि आपल्या या प्रिय मतांच्या निकषावरच ते इतरांचं मूल्यमापन करीत असतात.

अशा काही मतांपैकी त्यांचं एक प्रिय मत म्हणजे, ‘मराठी साहित्य हा एक यःकश्चित पदार्थ’ आहे. म्हणजे हे शब्द त्यांचे नाहीत, पण असे स्पष्ट शब्द न वापरताही आपल्या आविर्भावातून हाच अभिप्राय ते फार परिणामकारकरीत्या स्पष्ट करतात. अगदी एखाद्या नावडत्या वस्तूकडे टाकावा तसा दृष्टिक्षेप ते मराठी साहित्याकडे टाकतात. ‘अमूक एक वस्तू तुमची नावडती का?’ असं आपल्याला कोणी विचारलं, तर आपण त्याची कारणं देऊ शकतो. तसं आजचं मराठी साहित्य आपल्याला का आवडत नाही, याविषयीचं काही स्पष्टीकरण तळवलकर देत नाहीत. कारण त्यांनी ते वाचलेलंच नसतं!

उलट, काहीशा अभिमानानं ‘गेल्या अमुक अमुक वर्षांत आपण एकही मराठी कादंबरी किंवा मराठी कथा वाचली नाही’ असं ते सांगतात आणि न वाचताही मराठी साहित्याविषयी असा तुच्छताभाव व्यक्त करतात. दिवाळी अंकांविषयीही ते अशीच तुच्छता दर्शवितात. अर्थात, आजचं सगळं मराठी साहित्य किंवा सगळे दिवाळी अंक काही फार मोठा दर्जा राखून आहेत असं आपणही म्हणणार नाही. पण तळवलकर जेव्हा या सार्‍याची एक मोट बांधतात, तेव्हा गंभीरपणे लेखन करणार्‍या चार चांगल्या लेखकांवर किंवा वैविध्यपूर्ण कल्पनेतून आपला दिवाळी अंक साकारण्याची धडपड करणार्‍या एक-दोन दिवाळी अंकांच्या संपादकांवर ते निश्चितच अन्याय करतात.

बरं, तळवलकरांची ही अनास्था केवळ आजच्या मराठी साहित्याविषयी आहे असं नाही. संतसाहित्यात आपल्याला रस नाही असं ते जाहीरपणे सांगतात. त्यांना कोस्लर आवडतो- आपला आक्षेप असू शकत नाही. त्यांना ज्ञानेश्वर-तुकारामात रस नाही यालाही आपला आक्षेप असू शकत नाही; पण मनात असा प्रश्न येतो की, जो सामाजिक-सांस्कृतिक इतिहास आपल्या जगण्याचा भाग आहे, त्या इतिहासाबद्दल तळवलकरांकडे इतकी अलिप्तता कशी? आपल्या धर्मातील पाप-पुण्याच्या चुकीच्या कल्पनांमुळे ‘संन्याशाची मुले’ म्हणून ज्यांचा अनन्वित छळ झाला आणि तरीही ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ अशी विश्वाच्या सुखाची, कल्याणाची तळमळ ज्यांना आयुष्यात लागली ते ज्ञानेश्वर, किंवा सामाजिक दंभावर, दुटप्पी वृत्तीवर तुटून पडणारे आणि आप-पर भेदापलीकडे जाऊन विलक्षण करुणामयी बनलेले तुकाराम- यांच्या कार्यात तळवलकरांना रस कसा नाही? ज्याची भूमिकाच पत्रकाराची त्याला असा सामाजिक इतिहास नाकारता येतो?- हा मनमानीचाच एक प्रकार नव्हे?

तळवलकरांचं असंच दुसरं एक प्रिय मत म्हणजे, महाराष्ट्रात गेल्या चाळीस-पन्नास वर्षांत एकही विचारवंत निर्माण झाला नाही. पण असा फक्त शेरा मारण्याऐवजी आज विचारवंत का नाहीत आणि त्यात आपलाही काही वाटा आहे का? याविषयी तळवलकरांनी बोलायला हवं होतं. कारण आज चांगला विचार करणारी माणसं आहेत, पण समाजाला त्यांची ‘विचारवंत’ म्हणून ओळख होत नाही. असं का घडतं? याचं विश्लेषण तळवलकर करतात का? तळवलकरांना जे विचारवंत म्हणून मान्य होते, त्या न्या. रानडे, आगरकर, लोकहितवादी यांच्या काळात सामाजिक परिस्थिती, धर्माधर्माच्या कल्पना, कर्मकांडाचा बडिवार, विधवांचे प्रश्न, ब्रिटिश राजवट अशा अनेक प्रश्नांचे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्या वेळी त्यांनी नुसतं प्रश्नांचं चित्रण केलं नाही, त्या प्रश्नांना उत्तरांचे अनेक पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या ‘दर्पण’ या पत्रातून विधवांच्या दुर्दशेची जाहीर चर्चा सुरू केली आणि लोकहितवादी व इतर सुधारक मंडळींनी विधवांना दुःखमुक्त करण्यासाठी पुनर्विवाहाचा पर्याय मांडला. त्या काळी समाजाला तो अर्थातच रुचला नाही; पण आपल्या पर्यायातील अपरिहार्यता समाजाच्या पचनी पडेपर्यंत ही मंडळी सतत त्यावर लिहीत राहिली आणि जेव्हा समाजाला ही अपरिहार्यता पटली, तेव्हा समाज त्यांच्या सुधारणेला अनुकूल झाला. समाजाला ही जाग आणण्यासाठी त्यांनी वापरलेलं हत्यार म्हणजे वृत्तपत्र!

आज परिस्थिती वेगळी आहे, प्रश्न वेगळे आहेत. आज भ्रष्टाचाराची परिसीमा झालेली आहे. सत्ताधार्‍यांपासून ते रस्त्यावरच्या माणसापर्यंत प्रत्येक जण स्वतःच्या सुखाचा, सुरक्षिततेचा विचार करताना हवं तसं अनिर्बंध स्वातंत्र्य घेतो आहे, आणि त्यात चोरी, दरोडे, बलात्कार, खून, जाळपोळ, दंगली सार्‍यांचा समावेश आहे. ‘आज विचारवंत नाहीत’ म्हणणार्‍या तळवलकरांनी या प्रश्नांचा पाठपुरावा का केला नाही? या सामाजिक परिस्थितीवर सातत्यानं अग्रलेखांचा भडिमार का केला नाही? याचं एक कारण तळवलकरांच्या त्या दिवशीच्या मुलाखतीत सापडतं. ते म्हणाले होते की, वृत्तपत्रव्यवसायात येताना ‘समाजप्रबोधन’ ही माझी भूमिकाच नव्हती. पत्रकारानं समाजप्रबोधनाची भूमिका नाकारणं हीच मुळात केवढी तरी मनमानी आहे. आणि दुसरं कारण म्हणजे तळवलकर काय, अन्य संपादक काय, किंवा तुम्ही-आम्ही काय, जोपर्यंत आपण पगारी नोकर असतो तोपर्यंत मालकाला रुचेल तेच करावं लागतं. त्यामुळे अशा पगारी संपादकांना शंभर टक्के वैचारिक स्वातंत्र्य घेता येत नाही. मात्र, जे संपादक-मालक असतात ते हे स्वातंत्र्य घेऊ शकतात. जांभेकर, आगरकर, लोकहितवादी हे पगारी नोकर नव्हते आणि समाजप्रबोधन हीच त्यांची महत्त्वाची भूमिका होती. म्हणून त्यांना त्यांच्या तात्त्विक भूमिकांशी तडजोड करावी लागली नाही.

तळवलकरांनी सांगितलेल्या गोष्टीचाच दाखला घेऊ. आणीबाणीच्या काळात मनात असेल तसा अग्रलेख लिहिण्याचं स्वातंत्र्य मिळालं नाही, तेव्हा आपण ती जागा बातम्या छापून भरून काढली असं ते म्हणतात. हे ऐकताना पत्रकारितेतल्या मंडळींना काय वाटलं, मला माहीत नाही. पण मला हे फार धक्कादायक वाटलं. ‘अग्रलेखाऐवजी बातमी’ हा पलायनवाद नव्हे? तळवलकरांनी ही एवढी मोठी तडजोड केली आहे की, अशी तडजोड करणार्‍याला ‘आज विचारवंत नाहीत’ असं म्हणण्याचा अधिकार तरी राहतो का? ही तडजोड त्यांनी केली नसती तर त्यांना सरकारी रोषाला सामोरं जावं लागलं असतं. पण तसं न करता ते अनंत भालेरावांच्या पत्राचा दाखला देत राहिले, तेव्हा ते समर्थन लटकं तर वाटलंच, पण ते स्वतःचीच समजूत घालतायेत असंही वाटलं.

लोकहितवादी, म.फुले, र.धों.कर्वे यांनाही आपले विचार मांडताना आणि तशी कृती करताना केवढ्यातरी सामाजिक रोषाला सामोरं जावं लागलं होतं. म.फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी रोज लोक अंगावर घाण, चिखल टाकतात म्हणून काही स्त्रीशिक्षणाचं कार्य थांबवलं नाही. प्रत्येक नोकरीतून काढून टाकलं जाई तरीही रघुनाथ कर्वे यांनी संततीनियमनाच्या प्रचाराचं कार्य थांबवलं नाही. नोकर्‍या वाचविण्यासाठी तडजोड करण्याऐवजी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. पण आपल्या कामावरच्या निष्ठेशी तडजोड केली नाही आणि म्हणूनच समाजाला त्यांची ‘विचारवंत’ म्हणून ओळख पटली.

पूर्वीच्या या विचारवंतांनी पारतंत्र्यात असूनही कसल्याही दडपणांना जुमानलं नाही. आणि आज आपण स्वतंत्र आहोत, लोकशाहीत आहोत, तरीही कसल्या ना कसल्या दडपणाखाली आहोत. आपल्याला समाजाचं दडपण, संस्थांचं दडपण, मान्यवर व्यक्तींचं दडपण!

अगदी तळवलकरांच्या या मुलाखतीतदेखील हे जाणवत होतं. शंकर वैद्य त्यांना मराठी साहित्य आणि मराठी भाषेचा विकास, वृद्धी याबद्दल प्रश्न विचारीत होते आणि आजचं मराठी साहित्य न वाचताच तळवलकर ‘हे साहित्य मराठी भाषेचा कसलाही विकास करू शकत नाही’ असं तुच्छतापूर्ण उत्तर देत होते. माझ्या मनात येत होतं की, शंकर वैद्य स्वतः कवी आहेत, साहित्यिक आहेत, मग का नाही ते तळवलकरांना विचारीत की, ‘तुम्ही न वाचताच असं कसं बोलता?’ पण शंकर वैद्यांनी असं काही विचारलं नाही याचं कारण एकच आणि ते म्हणजे ‘गोविंद तळवलकर’ या नावाचं दडपण! (आणि कदाचित समारंभातील औचित्य).

आजच्या वृत्तपत्रांतून तरी किती वैचारिक, मूलभूत तात्त्विक चर्चांना महत्त्व असतं? अलीकडेच विश्वास पाटील यांनी हिंदू धर्मातील मूलतत्त्ववादासंबंधी एक लेख ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये लिहिला होता. अतिशय मानहानी करणार्‍या शब्दांत हा लेख कुणीसा खोडून काढला. नंतर विश्वास पाटील यांनी हे खोडून काढणं कसं अज्ञानमूलक आहे हे सप्रमाण सिद्ध करणारा अकराशे शब्दांतला एक लेख ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे पाठवून दिला. तो ‘महाराष्ट्र टाइम्स’ने प्रसिद्ध केला नाही; म्हणजे ज्या प्रश्नावर जास्तीत जास्त वादळं उठायला हवीत, चर्चा व्हायला हव्यात, समाजात विचारांचं आदानप्रदान व्हायला हवं, त्यानिमित्तानं ‘धर्म’ संकल्पनेचा पुनःपुन्हा नव्यानं विचार व्हायला हवा, तो विषय वृत्तपत्रं बंद करून टाकतात आणि मंगेश पाडगावकरांची कविता ही मंचीय कविता की वाचनीय कविता यावर महिनोन्महिने निरर्थक पत्रव्यवहार प्रसिद्ध होत राहतो. मग समाजात विचारवंत निर्माण होणार कुठून?

अर्थात, आपल्याकडे वैचारिक अड्डे काही कमी नाहीत; पण या अड्ड्यांतून स्वहिताचा विचार अधिक चालतो आणि विचारवंतानं तर समाजहिताचा विचार करायचा असतो. साहजिकच, मुंबई-पुण्यात जागोजाग वैचारिक अड्डे असूनही नाव घेण्यासारखा एकही विचारवंत नाही.

तेव्हा एक मोठ्या वृत्तपत्राचा संपादक या नात्यानं या सगळ्या परिस्थितीवर तळवलकरांनी काय लिहिलं? ही अनेक दडपणं, या तडजोडी, नको ते विषय बंद करणं, हवे तेवढेच प्रसिद्ध करणं, ही मनमानी. यातूनच विचारवंतांचं खच्चीकरण होत नाही? शिवाय, खुद्द तळवलकरांनी इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत अमुक एक नवा विचार दिला असं कुणाला सांगता येईल?

अगदी अलीकडे, ‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकावर ते लेख लिहितात, तेव्हासुद्धा हेच लक्षात येतं. या नाटकावर त्यांचे दोन मोठे आक्षेप आहेत. पैकी पहिला आक्षेप असा की, हे नाटक हरिलालच्या चष्म्यातून लिहिलं आहे, हरिलालची व्यथा ते व्यक्त करतं; पण महात्मा गांधींच्या मनातील वादळाबद्दल मात्र काही बोलत नाही. तळवलकर असं विधान करतात, याचा अर्थ म.गांधींच्या मनातील वादळं तळवलकरांना ठाऊक होती. मग प्रश्न असा निर्माण होतो की, एवढा प्रदीर्घ लेख लिहूनसुद्धा त्या वादळाबद्दल तळवलकर काहीच का लिहीत नाहीत? म्हणजे जी चूक नाटककारानं अज्ञानानं केली, तीच चूक तळवलकरांनी, त्या गोष्टीचं ज्ञान असूनही केली. पुढं ते गौतम बुद्धाची व महात्मा गांधींची तुलना करतात. त्यांचा प्रश्न असा की, ‘देखण्या पत्नीला आणि तान्ह्या राहुलला सोडून जाताना बुद्धाच्या मनात करुणा दाटली नसेल का?’ आणि पुढं ते म्हणतात की, ‘अफाट जनसमुदायाबद्दलची करुणा त्याहीपेक्षा मोठी होती, म्हणून बुद्ध घराबाहेर पडला आणि म्हणूनच तो ‘बुद्ध’ झाला.’

मुळात बुद्ध आणि गांधी यांच्या सांसारिक जीवनाची तुलना होऊ शकत नाही. बुद्धानं घर सोडताना महालाचं वैभव आणि त्याहून मोठं वैभव म्हणजे ‘जगण्याचं स्वातंत्र्य’ आपल्या बायको-मुलांसाठी मागे ठेवलं होतं. याउलट, गांधीजी घर तर सोडून गेले नाहीतच, पण मुलांच्या जीवनात सतत हस्तक्षेप मात्र करीत राहिले. आपले आदर्श, आपल्या उच्च शिक्षणाच्या कल्पना, आपले ध्येय मुलांवर लादत राहिले. साहजिकच, उच्च शिक्षण नाही म्हणून चांगली नोकरी नाही आणि गांधीजींचा मुलगा म्हणून हलकी नोकरी नाही, अशी आयुष्याची कोंडी झालेला हरिलाल आपली व्यथा मांडतो, तेव्हा गांधीजींवर अन्याय कसा होतो?

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

तळवलकरांचा या नाटकावरचा दुसरा आक्षेप म्हणजे, हे नाटक म. गांधींविषयी गैरसमज पसरवितं, गांधीविरोधी वातावरण निर्माण करतं. थोडक्यात, म.गांधींची बदनामी करतं. पण आज गांधींच्या तत्त्वांचं खरंच समाजाला काही सोयरसुतक आहे का? मंत्रालय, राजभवन, संसदभवन, सरकारी कार्यालयं, शाळा-कॉलेज, खासगी कंपन्या सगळीकडे आज गांधींच्या फोटोखाली बसून, गांधींच्या ‘अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रहा’ची जास्तीतजास्त पायमल्ली होत असते. तेव्हा गांधी टोपी घालणार्‍यांनी आणि गांधींचा फोटो मिरविणार्‍यांनी गांधींची जेवढी बदनामी केलेली आहे, त्यानंतर अजून काही बदनामी करण्यासारखं शिल्लक राहतं का? पण तळवलकर मात्र या नाटकावर गांधींच्या बदनामीची सगळी जबाबदारी टाकून मोकळे होतात!

हे असं का घडतं? तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून! असा विशिष्ट मतांचा आग्रह जेव्हा असतो, तेव्हा नकळत माणूस न्यायाधीशाची भूमिका घेऊ लागतो. ‘हे चूक, ते बरोबर’ असे निर्णय द्यायला लागतो. संपादकानं ही न्यायाधीशाची भूमिका घेता कामा नये, त्याची भूमिका समाज ‘साक्षर’ करण्याची हवी. ‘साक्षर समाज’ याचा अर्थ या ठिकाणी मला सरकारला अभिप्रेत असलेली साक्षरता नाही. ग,म,भ,न लिहिता-वाचता येणं म्हणजे ‘साक्षर’ होणं नव्हे. ‘साक्षर’ याचा अर्थ खर्‍या-खोट्याची पारख असणं, न्याय-अन्याय, नीती-अनीती यांविषयी चाड असणं आणि या अर्थानं ‘साक्षर’ समाज निर्माण करण्यात वृत्तपत्रांचा वाटा फार मोठा असतो. वृत्तपत्रं ही माणसांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेली असतात; म्हणून समाजप्रबोधनाचं मोठं काम ती करू शकतात. पण पत्रकार-संपादक म्हणून तीस-पस्तीस वर्षं पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरूनही ‘आपली भूमिका समाजप्रबोधनाची नाही’ असं जेव्हा तळवलकर म्हणतात, तेव्हा ते फार मोठी मनमानी करतात, असं मला वाटतं.

आणि शेवटी, खरी गोष्ट ही की, बौद्धिक अहंकार, त्यातून निर्माण होणारा विशिष्ट मतांचा आग्रह आणि अधिकाराची जागा, या तीन गोष्टी ज्याच्याकडे असतात, तो मनमानी करतो. त्यासाठी ‘संपादक’ असण्याची गरज नाही. पण आजची चर्चा पत्रकारितेवरची म्हणून संपादकांच्या मनमानीविषयी बोलायचं. प्रश्न वृत्तीचा आहे. काही क्षेत्रांमध्ये ही मनमानी समाजाला अधिक जाचते. वृत्तपत्र हे असंच क्षेत्र आहे.

.............................................................................................................................................

लेखिका मंगला आठलेकर यांची ‘महर्षि ते गौरी’, ‘धर्म आणि हिंसा’ अशी पुस्तके प्रकाशित आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Arvind Gokhale

Wed , 25 October 2017

तळवलकर यांच्याविषयी ते गेल्यावर अनेकांना उबळ का यावी हे कळत नाही. मी हा अधिकार कोणालाही नाही असे म्हटलेले नाही. माझे फक्त म्हणणे एवढेच होते की कोणतीही व्यक्ती गेल्यावर तिच्याविषयी मागे केव्हातरी छापलेला लेख परत छापण्यामागे जी वृत्ती दिसली ती सभ्य नाही एवढेच माझे म्हणणे आहे. त्यांच्याकडून सुसंस्कृतपणा अपेक्षित कसा धरावा? इथे दिसते ते वैर नाही तर दुसरे काय आहे? यालाच सूडबुद्धी असे मराठीत म्हटले जाते आणि या वृत्तीचे समर्थन करणारेही त्याच सुडाच्या भावनेने पेटलेले असतात. संपादकांच्या कारकिर्दीत त्यांना अनेकांना कळत न कळत दुखवावे लागते त्यातून तर हा लेखनप्रकार झालेला नाही ना याचे आत्मपरीक्षण संपादकांनी करून पाहावे हे उत्तम. मला वाटते ज्यांना हा लेख उदबोधक वाटला त्यांनीही हे असे स्वत:च्या मनाला विचारून पाहायला हरकत नाही.


ADITYA KORDE

Mon , 23 October 2017

श्री अरविंद गोखले ह्याना ... रामायणात रावणाला मारल्यावर बिभीषणाला राम म्हणतो मरणान्तानि वैराणि निवॄत्तं न: प्रयोजनम् क्रीयतामस्य संस्कारो ममापेष्य यथा तव अर्थ - मृत्यू बरोबर(च) वैर संपते, (म्हणून) माझे इथले काम(प्रयोजन) आता संपले आहे. मी माझे कर्तव्य पुढे चालू ठेवतो, तु तुझे कर्तव्य करत राहा... ह्या श्लोकातील “मरणांती वैरांनी” ही आपल्याकडे संस्कृत म्हण बनून गेली आहे. पण हल्ली राष्ट्रवाद, देशभक्ती, असहिष्णुता, सद्गुणविकृती(ही बहुधा फक्त हिंदूंमध्ये असते असा हिंदुत्वावाद्यांचाच दावा असतो) असल्या शब्दाच्या आणि भावनांच्या गदारोळात ही म्हण उगाचच स्वत:चा अर्थ हरवून बसली आहे. माणूस मेला कि त्याबरोबरच त्याच्याशी असलेले (एखाद्याचे) वैर हि संपते( किंवा संपले पाहिजे ) असा इतका साधा सरळ ह्या म्हणीचा अर्थ आहे. वैर/ शत्रुत्व संपले पाहिजे म्हणजे त्याला माफ करून टाकावे असा अर्थ होत नाही पण तो मेलाच असल्याने माफ करणे-नकरणे, त्याचा प्रतिशोध घेणे, पराभव करणे किंवा त्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करणे ह्या गोष्टी अर्थ हीन होतात. पंण त्या माणसाच्या विचारांची, कृतीची परखड आणि तटस्थ चिकित्सा चालूच राहिली पाहिजे. त्यातून भाविष्यकालासाठी काही महत्वाचे धडे आपल्याला मिळू शकतात. आपापले मत सभ्य भाषेत मांडायचा अधिकार सर्वांनाच आहे त्यामुळे जसा तो अधिकार तळवळकराना होता तसाच तो अक्षरनामाच्या संपादकानाही आहे. आणि मंगला आठलेकारानाही आहे. आता त्यानी ह्यात कोणते अश्लाघ्य,असभ्य वर्तन केलेले असल्याचे मलातरी दिसत नाही... असो लेख अत्यंत उद्बोधक आणि संयत आहे मला व्यक्तिश: फार आवडला . आदित्य


Arvind Gokhale

Sat , 21 October 2017

खरे म्हणजे या विषयावर मी लिहिलेही नसते आणि मी व्यक्त व्हायचे टाळले असते. पण ज्या व्यक्ती एरवी माध्यमांच्या स्वातंत्र्याविषयी लिहित असतात त्या अन्य कोणाला तेवढे स्वातंत्र्य आहे असे मनात नाहीत असे दिसते. गोविंद तळवलकर या व्यक्तीला त्यांचे मत व्यक्त करण्याची संधी नाही असे ते मानतात. त्यामुळेच हा लेख आधीच्या काळात लिहिला गेला आणि आपण तो आता प्रसिध्द केलात. मरणान्तानि वैराणी हा एक साधा नियमही आपल्याला मान्य नसावा असे दिसते. असो मला हा प्रकार अजिबात आवडलेला नाही हे केवळ आपल्या माहितीसाठी.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख