Altnews : फेक न्यूज विरोधातील पत्रकारिता
दिवाळी २०१७ - ऑनलाईन\सोशल मीडिया
अभिषेक भोसले
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 19 October 2017
  • दिवाळी २०१७ भारतीय प्रसारमाध्यमं अल्ट न्यूज Alt News प्रतिक सिन्हा Pratik Sinha

‘Altnews’ अर्थात ‘अल्टरनेटिव्ह न्यूज’, ही माध्यम संस्था सध्या चर्चेत आहे. आठ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या www.altnews.in या संकेतस्थळानं भारतीय माध्यमांमध्ये स्वत:चं एक अस्तित्व निर्माण केलंय. सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रतीक सिन्हा आणि त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांनी मिळून या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. सोशल मीडिया, वेगवेगळी संकेतस्थळं आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांतून प्रसारित प्रकाशित होणाऱ्या फेक न्यूज, फेक छायाचित्रं आणि फेक व्हिडिओंमधील सत्य समोर आणण्यात या संकेतस्थळाचं मोठं योगदान आहे.    

प्रतिक सिन्हा हे ‘ट्रूथ ऑफ गुजरात’ (Truth of Gujrat) हे फेसबुक पेज चालवत असत. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यातून  सरकारच्या खोट्या प्रचारतंत्राचा भांडाफोड करण्यात येत होता. प्रतिक सिन्हांच्या इतर दोन सहकाऱ्यांच्या ओळखी मात्र गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील एक जण अनऑफिशअल ‘सुस्वामी’ (Unofficial Sususwamy) नावाचं फेसबुक चालवतो. तर दुसरा, सॅम जावेद या टोपण नावानं लिखाण करतो. प्रचारतंत्र आणि माध्यमं यावर त्याचं लिखाण आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेलच. या सर्वांची ओळख ट्विटरच्या माध्यमातून झाली होती.

एकीकडं बहुतांश मुख्य प्रवाहातील माध्यमव्यवस्था फेक छायाचित्रं आणि व्हिडिओच्या माध्यमातून होणाऱ्या अप्रत्यक्ष राजकीय प्रचारतंत्राला, त्यातून येणाऱ्या तथ्थांना बळी पडत असताना ‘Altnews’ त्यांच्या कुवतीप्रमाणं हे प्रचारतंत्र मोडीत काढण्याचं काम करत आहे. पत्रकारितेचा मूळ गाभा हा सत्य आहे. ते समोर आणण्याचं काम ‘Altnews’कडून गांभीर्यानं करण्यात येतं.

फेक न्यूज पूर्वी नव्हत्या का ? तर होत्या. पण आत्ता त्या घातक यासाठी आहेत, कारण त्या मुख्य प्रवाहातील माध्यमांतून बातम्या आणि विश्लेषणाच्या स्वरूपात तुमच्यासमोर मांडल्या जात आहेत. 

सोशल मीडियातून व्हायरल होत असलेले फेक व्हिडिओ, फेक छायाचित्रं हे अशा बातम्यांचे स्रोत... मुळात तात्त्विक विचार करताना कोणत्याही नागरिकाला माध्यमांमधून सत्य माहिती मिळावी, हा त्याचा मानवी अधिकार तर आहेच, सोबतच तो संविधानिक अधिकारही आहे. पण जर माध्यमातून मिळणारी माहिती सत्य नसेल तर मग?

बातमी, आम्ही तिला इतिहासाचा कच्चा ड्राफ्टही म्हणतो. कोणत्याही काळातील घटनांचा इतिहास लिहायला सुरुवात होते ती बातमीच्या रूपानं. हा बातमीरूपी इतिहास लिहिताना आम्ही पत्रकारांनी काही गोष्टी ध्यानात ठेवाव्यात असं आमच्या पत्रकारितेच्या प्राध्यापकांनी आम्हांला शिकवलेलं असतं. त्यात बातमी सत्य असावी, आपण वाचकांचं मत परिवर्तन करत असतो, बदलवत असतो, निर्माण करत असतो. त्यामुळे तुम्ही देत असलेल्या आशयाची सत्यता महत्त्वाची असते. पण ते अभ्यासक्रमात मार्कांपुरतं मर्यादित असल्यानं त्याचा फिल्डवर गेल्यानंतर उपयोग करण्याची गरज अनेकांना वाटत नाही. त्यातून मुक्त तंत्रज्ञानाची भर आशयनिर्मितीच्या प्रक्रियेत पडते. आणि या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात निर्माण होत चाललेलं प्रॉडक्ट म्हणजे फेक न्यूज...

आपली बातम्यांची स्मरणशक्ती फारशी नाहीये. त्यामुळे मागच्या दोन वर्षांतील दोन बातम्या इथं पाहूयात, ज्यामुळं हे फेक न्यूज प्रकरण लक्षात येईल.

परेश रावल या अभिनेत्यानं अरुधंती रॉय यांच्याबद्दल ट्विट केलं होतं. भारतीय सैन्यानं काश्मिरी युवकाला जीपला बांधून मानवी ढाल म्हणून वापर केला होता, तेव्हा रावल यांनी त्या तरुणांऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवं होतं, असं ट्विट करून म्हटलं होतं. हे ट्विट ज्या मुलाखतींच्या आधारे होतं ती मुलाखतच फेक असल्याचं नंतर सिद्ध झालं.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक माध्यमांनी नव्या नोटांमध्ये जीपीएस चीप असल्याच्या बातम्या प्रकाशित केल्या होत्या. काही वृत्तवाहिन्यांनी तर एक्सक्युझिव्ह पॅकेज आणि प्रोग्राम चालवले होते. नंतर असं काही नसल्याचं सिद्ध झालं आणि नरेंद्र मोदी आता काळ्या पैशाविरुद्धची लढाई जिंकणार, हा प्रचार करण्यासाठी अशा बातम्या पेरण्यात आल्याचं सिद्ध झालं होतं.

अशा प्रकारे जाणीवपूर्वक सरकार किंवा विशिष्ट विचारधारेच्या समर्थनात जनाधार निर्माण करण्यासाठी या चुकीच्या माहितीचा वापर करण्यात येतो. अनेक वेळा हे मुद्दे तुमच्या धार्मिक, जातीय आणि राष्ट्रवादाच्या अस्मितेशी जोडलेले असतात. या न्यूज, व्हिडिओ, छायाचित्रं एवढ्या ताकदीनं तुमच्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर येतात आणि त्याची सत्यता पडताळण्याचा विचारही त्यावेळी आपल्या मनात येत नाही. सत्यता पडताळण्याचा विचार मनात न येणं हेच या प्रचारतंत्राचं यश असतं. कमी-अधिक प्रमाणात आपण सर्व या प्रचारतंत्राला बळी पडत असतो. अनेक वेळेला अशा प्रचारतंत्रामुळे सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण होते. किंबहुना ती निर्माण व्हावी, याच उद्देशानं असे व्हिडिओ तयार केले जातात. ज्या वेळी खोट्या माहितीवर आधारित प्रचारतंत्र वापरण्यात येतं, त्या वेळी त्याला खोडून काढण्याची जबाबदारी माध्यमांची असते. भारतीय माध्यमं आणि राजकीय व्यवस्था यात पूर्णपणे अपयशी ठरली असताना ३५ वर्षीय प्रतिक सिन्हानं या प्रचार तंत्राविरुद्ध तंत्रज्ञानाचा आधार घेत लढा उभारला आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या कितीतरी छायाचित्रांची, व्हिडिओंमधील खोटेपणा ‘Altnews’नं समोर आणला आहे.

‘Altnews’नं सत्यता उघड केलेली काही प्रकरणं...

१. ‘न्यूज लाँड्री’ या संकेतस्थळाच्या मधू त्रिहान यांचं एक ट्विट उजव्या विचाधारांच्या संकेतस्थळ आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवरून व्हायरल करण्यात आलं होतं. ‘बाहुबली’ सिनेमात एकही मुस्लिम कलाकार नसल्यामुळे त्रिहान नाराज आहेत, असा या ट्विटचा आशय होता. त्यानंतर त्रिहान यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. त्रास देण्यात आला. या प्रकरणाचा भांडाफोड करत ‘Altnews’नं त्रिहान यांनी असं कोणतंच ट्विट केलं नसल्याचं सिद्ध केलं होतं.

२. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या प्रतिष्ठित दैनिकात ‘फ्रांकोईस ग्वाटिअर’ यांचा एक ब्लॉग प्रकाशित करण्यात आला होता. त्यानुसार नॉस्ट्रॉडॉमच्या भविष्यवाणींचं एक नवं हस्तलिखित सापडल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यात नरेंद्र मोदी यांचा उदय होणार याचं भाकित १६ व्या शतकात केल्याचं सांगणारा हा ब्लॉग होता. ‘Altnews’नं ज्या हस्तलिखिताच्या आधारे हा ब्लॉग लिहिला गेला आणि छापला गेल्याचं सांगितलं होतं, ते हस्तलिखित फेक असल्याचं सिद्ध केलं होतं. 

३. बिहारमध्ये मुस्लिमांनी एका हिंदूची हत्या केल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर ‘Altnews’नं त्या व्हिडिओची सत्यता समोर आणली. मुळात हा व्हिडिओ बांगलादेशमधल्या मोनीर होसन सरकार यांच्या हत्येचा होता. तो भारतात काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्यासाठी व्हायरला केला होता.

४. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या २०१६-१७ च्या वार्षिक अहवालात एक छायाचित्र छापण्यात आलं होतं आणि ते भारत–पाकिस्तान सीमेचं असल्याचं सांगण्यात आलं होतं. ‘Altnews’नं त्याची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केल्यानंतर लक्षात आलं की, ते तर मोराक्को आणि स्पेन या दोन देशांमधील सीमेचं छायाचित्र आहे.

या सर्वांवरून आपल्या लक्षात येईल की, ‘Altnews’ सत्य समोर मांडण्याचं जे काम करतंय, ते किती महत्त्वाचं आहे. मुळात या प्रचारतंत्राचा वापर करून इथल्या नागरिकांच्या चुकीच्या अस्मिता, राष्ट्रवाद जागवण्याचं काम ठराविक विचारधारेचे गट करत आहेत. ‘Altnews’नं असा प्रचार करणारी ४० संकेतस्थळं, फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट्सची यादी जाहीर केली आहे. त्यात Hindutva.info हे संकेतस्थळ सर्वाधिक जास्त खोट्या बातम्या पसरवण्यात आघाडीवर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

‘Altnews’ व्हायरल झालेल्या व्हिडिओची तुकड्यांमध्ये विभागणी करून त्याची छायाचित्रं तयार करतं. ती इंटरनेटच्या माध्यमातून इतरत्र शोधली जातात. त्यातून त्याची सत्यता तपासण्यात मदत होते. त्याचप्रमाणं व्हिडिओतील कृती इंटरनेटवर शोधल्या जातात. त्या कृतीशी संबंधित इतर व्हिडिओंचा अभ्यास करून सत्यता तपासण्यात येते.   

यातून ‘Altnews’नं शोध पत्रकारितेचा नवीन अवकाशही निर्माण केला आहे. नुकताच त्यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे पत्रकार रविश कुमार यांना त्रास देण्यासाठी चालवण्यात येणाऱ्या अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपचा भांडाफोड केला आहे. हे ग्रुप कोणाशी संबंधित आहे, त्यांचे राजकीय हितसंबंधही उघड केले होते. यातील अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनना देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षातील अनेक नेते फॉलो करत असल्याचं सिद्ध झालं.  

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

‘Altnews’ हे पोस्ट ट्रुथ काळाचं माध्यम असल्याचं प्रतिक सिन्हा सांगतात. त्यांच्या मते, फेक न्यूज या भारतातील अप्रत्यक्ष राजकीय प्रचारतंत्राच्या भाग आहेत. आज उजव्या विचारसरणीतील लोकांकडून करण्यात येणाऱ्या या प्रचारतंत्राला मुख्य प्रवाहातील माध्यमंही बळी पडत आहेत, ही गांभीर्याची बाब आहे. आणि त्यातच कोणताही राजकीय पक्ष याविरोधात आवाज उठवत नाही, हे लोकशाहीप्रधान देशात धक्कादायक आहे. 

संकेतस्थळ, ट्विटर या माध्यमातून ‘Altnews’ प्रचारतंत्रविरोधी माध्यम म्हणून काम करत आहेच. नव्यानंच त्यांनी व्हॉट्सअॅप सेवादेखील सुरू केली आहे. ‘Altnews’सारख्या प्रचार तंत्रविरोधी माध्यम संस्थांची भारतालाच नाही, तर सध्या जागतिक पातळीवरही नितांत निकड, आवश्यकता आणि गरज आहे.

नुकतीच फेसबुकनंही फेक न्यूजबद्दल ठोस भूमिका घेत सहकार्य करण्याची हमी दिली आहे. युरोपीय देशांमधील मुख्य प्रवाहातील माध्यमांनी फेक न्यूज विरोधात काम सुरू केलंय. ‘फर्स्ट ड्राफ्ट न्यूज’च्या नेतृत्वाखाली युरोपातील ४० माध्यम समूहांचा फेक न्यूजविरोधी काम करणारा गट कार्यान्वित झाला आहे. त्यात बीबीसी, चॅनेल४ न्यूज, इंटरनॅशनल बिझनेस टाईम्स, ब्लूमबर्ग, बझफिड इत्यादी प्रतिष्ठित माध्यमंस्थांमधील पत्रकारांचा सहभाग आहे. हा गट आलेल्या बातम्यांची सत्यता तपासण्यासाठी कंटेट मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर करत आहे. भारतात आणखीन मुख्य प्रवाहातील माध्यमांना त्यांच्या अर्थिक आणि राजकीय हितसंबंधांमुळे फेक न्यूज विरोधात काम करण्याची गरज भासत नसावी. पण ही कमतरता ‘Altnews’नं पूर्ण केली आहे.

.............................................................................................................................................

लेखक अभिषेक भोसले औरंगाबादमधील एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय पत्रकारिता’ या विषयाचे प्राध्यापक आहेत.

bhosaleabhi90@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

Post Comment

Pravin Shinde

Thu , 19 October 2017

खुपच चांगल्या पद्धतीने भारतीय माध्यमांचे विश्लेषण केले आहे. Post Truth च्या काळात माध्यमांच्या भूमिकाही संधीक्त होत चालल्या आहेत. यासाठी माध्यमांची अर्थकेंद्री भूमिका आणि राजकीय अजेंडे देखील कारणीभूत आहेत. हळूहळू एकूणच माध्यमांच्या विश्वासहार्यतेला तढा जात असताना, सजगपणे काम करणाऱ्या माध्यमांना वाचकांपर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे काम या लेखाने केले आहे. मनःपूर्वक धन्यवाद.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा