अजूनकाही
आजकाल मी रोजच्या रोज 'वॉशिंग्टन पोस्ट', 'न्यूयॉर्क टाईम्स', 'डॉन' वाचतो. कदाचित भारतीय वर्तमानपत्रं वाचायची राहून जातील, पण सुरुवातीची दोन्ही अमेरिकन वर्तमानपत्रं आणि पाकिस्तानी ‘डॉन’ची वेबसाईट बघितल्याशिवाय दिवस पूर्ण करत नाही.
यामागे काही फक्त माझी आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयीची उत्सुकताच कारणीभूत नाहीये. अनेकदा त्यांच्या वेबसाईटवरच्या अनेक बातम्यांमध्ये मला काडीचाही रस नसतो. पण ज्या ताकदीनं त्यांनी त्यांच्या देशातल्या सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायचं धोरण सुरू ठेवलं आहे, ते मला अधिक महत्त्वाचं वाटतं. जे लिहून येऊ नये म्हणून सत्ताधारी धडपड करतात, तेच लिहिण्याची भूमिका घेणारी सगळी मंडळी आणि व्यासपीठं मला आवडतात. बाकी गावात कशी खुशाली आहे, हे सांगणाऱ्या चावड्या काही कमी नाहीत.
जे या परदेशी मीडिया हाऊसेसबद्दल आहे, तेच भारतात 'https://thewire.in', 'https://scroll.in' आणि ‘https://www.altnews.in'बद्दल आहे. राम जगतापनं जेव्हा मला 'thewire'बद्दल लिहायला सांगितलं, तेव्हा जय अमित शहाची स्टोरी प्रसिद्ध झाली नव्हती. पण तेव्हाही 'thewire'बद्दल लिहिण्यासारखं खूप काही होतं. आणि निव्वळ 'thewire'च नाही तर 'scroll', 'altnews' यांनी निर्भीड भारतीय पत्रकारितेचा जो ध्वज प्राणपणानं तोलून धरलाय, त्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे.
मुळात या एक प्रकारे समांतर माध्यमांची गरज का निर्माण झाली हे आपण समजून घ्यायला हवं. २०११ ते २०१४ च्या काळात 'नेशन्स वॉन्ट्स टू नो' म्हणून निर्भीड वगैरे भासवणारा माध्यमांचा एक मोठा प्रवाह २०१४ नंतर 'हाऊ डेअर यु आस्क क्वेश्चन्स टू प्राईम मिनिस्टर' विचारू लागला. आणि नेमकी हीच पलटी या देशातल्या खऱ्या माहितीच्या, प्रचार विरहित बातम्यांच्या आणि निःपक्ष विश्लेषणाच्या प्रवाहाला कुंठीत करणारी ठरू लागली.
सरकारचे क्लेम्स हे पत्रकारितेनं चॅलेंज करायचे असतात, तपासायचे असतात आणि खोटं आढळलं तर खोडून काढायचे असतात. सरकारच्या धोरणात सातत्य आहे की, नाही हे लोकांना उलगडून दाखवायचं असतं. पण जेव्हा ही प्रक्रिया थांबते, तेव्हा माहिती बाहेर येण्यासाठी आपला मार्ग शोधत जाते. या वेबसाईट्स माहितीच्या याच प्रवाहाला मोकळे करून देत आहेत.
'thewire'चे संपादक सिद्धार्थ वरदराजन अगोदर 'द हिंदू'चे संपादक होते. १४० वर्षांच्या या अत्यंत प्रतिष्ठित वर्तमानपत्राच्या इतिहासात कुटुंबाबाहेरची एकमेव संपादक झालेली व्यक्ती म्हणजे वरदराजन. जागतिक राजकारणाचा अत्यंत सखोल अभ्यास असणाऱ्या वरदराजन यांनी 'हिंदू'ला इन्व्हेस्टीगेटिव्ह रिपोर्टिंगचं अत्यंत उत्तम माध्यम बनवलं होतं. विचारानं सेक्युलर, लिबरल असणारे वरदराजन आज हिंदुत्ववादी संघटनांच्या आणि सरकारच्या टीकेच्या माऱ्याला तोंड देत आहेत. पण अनेकांना, ज्यामध्ये वरदराजन यांच्यावर टीका करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, त्यांना माहिती नाहीये की, त्यांनी भारत-अमेरिका अणू कराराच्या वेळी युपीए १ सरकारला प्रचंड हैराण केलं होतं. ‘हिंदू’च्या ‘नॅशनल अफेअर्स एडिटर’ या पदावरून त्यांनी या अणुकराराचे इतके विविध कंगोरे लोकांसमोर आणले होते की, संपूर्ण देशात तेव्हा ‘हिंदू’ या विषयावर काय म्हणतोय याची उत्सुकता असे. त्याच वर्षी त्यांना ‘जर्नालिस्ट ऑफ द इयर’ हा रामनाथ गोयंका पुरस्कारसुद्धा मिळाला होता.
.............................................................................................................................................
नवनवीन पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
सांगायचा मुद्दा असा की, असं सक्षम नेतृत्व असल्यानं ‘thewire' हे दर्जेदार माध्यम बनलेलं आहे. आज कुठल्या ट्रेंडिंग टॉपिकवर सखोल रिपोर्टिंग आणि विश्लेषण वाचायला मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे ‘thewire’ आहे.
‘scroll’ हे काहीसं वेगळं मॉडेल आहे. ‘thewire’ ठराविक विषय फोकस करतं आणि त्याचं विश्लेषण करतं. ‘scroll’ विविध नव्या विषयांपर्यंत पोहोचून नवी माहिती लोकांसमोर ठेवत असतं. त्यामुळे ‘scroll’ हा नव्या विषयांची, ट्रेंडिंग विषयातल्या वेगळ्या अँगलची माहिती लोकांसमोर आणणारं आजचं सर्वोत्तम व्यासपीठं आहे.
मला आजकाल ‘scroll’ आणि ‘thewire’ ही परस्परपूरक व्यासपीठं वाटतात. त्यामुळे मी काही त्यांची तुलना करणार नाही. इंटेलक्च्युअल अॅनलिसिस हे ‘thewire’चं वैशिष्ट्य आहे, तर इंटेलक्च्युअल रिपोर्टिंग ही ‘scroll’ची ताकद आहे.
एक आनंदाची गोष्ट ही आहे की, आपापले हे डोमेन्स सांभाळताना दोन्ही माध्यमांनी शोध पत्रकारितेला तिची हक्काची स्पेस दिलेली आहे. जय शहाची स्टोरी ही या स्पेसचाच भाग आहे, असं मी मानतो. त्यामुळेच, सत्तेला आरसा दाखवणाऱ्या या स्पेसनं भारतीय पत्रकारिता आणि राजकारणाच्या या अंधाऱ्या काळावर आपली प्रज्वलित छाप सोडली आहे!
.............................................................................................................................................
लेखक अमेय तिरोडकर 'द एशियन एज' या इंग्रजी वृत्तपत्राचे स्पेशल करस्पॉन्डट आहेत. लेखातील लेखकाची मतं वैयक्तिक आहेत.
ameytirodkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gautami K
Thu , 19 October 2017
वायर आणि स्क्रोल हे निष्पक्ष पत्रकारिता करतात असे म्हणता येणार नाही. ज़र तुम्ही या वेबसाईटवर त्यांच्या लेखात मांडलेल्या विचारांचा विरोध करणारे कमेंटस् पोस्ट केले तर हे कमेंटस् ५-७ दिवसांपर्यंत पेंडींग ठेवलेले असतात (पोस्ट होत नाहीत) व आर्टिकल जुने झाले की हे कमेंट पोस्ट केले जातात तर कधीकधी कारण न देता डिलिट केले जातात. लेखाची स्तुती करणारे कमेंटस् मात्र १ तासाच्या आतच पोस्ट होतात. ह्याला निप्षक्ष पत्रकारिता म्हणायची का ? तसेच बहुसंख्य लेख हे हिंदूंवर व उच्चवर्णियांवर टिका करणारे असतात. मुस्लिमांवर टिका करणारे लेख हे विरळच असतात. तसेच बिजेपीला टार्गेट करणारे लेख जास्तीकरून प्रसिद्ध केले जातात. काॅंग्रेस, TMC, LEFT parties वर टिका क्वचितच केली जाते. त्यामुळे या वेबसाईट politically motivated वाटतात. बिजेपी विरोध हाच त्यांचा अजेंडा आहे असे वाटते. सरकारने ३ वर्षांत काहीच चांगले केले नाही का ? कारण सरकारची स्तुती करणारे एकपण लेख तेथे सापडत नाहीत. म्हणूनच या वेबसाईट निप्षक्ष नसून संशयास्पद वाटतात. रशियाने जसे अमेरिकेत फेक न्यूज पसरवून निवडणूक प्रभावित केल्या, तसा प्रकार रशिया , वायर आणि स्क्रोल च्या माध्यमातून भारतात तर करणार नाही ना हि भिती कधीकधी मनास वाटते.
Bhagyashree Bhagwat
Thu , 19 October 2017
aatopshir aani nemka