सोशल मीडियावर असणं आत्ताच्या काळाची अनिवार्य गरज झाली आहे. तिथं नसणं काळाबरोबर नसल्याचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे काळानं निर्माण केलेलं हे माध्यम समाजानं आपलंसं करणं स्वाभाविक आहे. हे माध्यम आत्ताच्या समाजमनाचा आरसा आहे. बदलत्या राजकारणाला समजून घेताना सोशल मीडियाला वगळून पुढे जाता येत नाही. सध्याच्या काळात एकूणच राजकारण अन समाजकारण अधिक समकालीन होत चाललं आहे, असं एका बाजूला वातावरण आहे; तर दुसर्या बाजूला माध्यमांचं लोकशाहीतील स्थान व महत्त्व, राजकारणाशी आपले संबंध घट्ट करून ठेवण्यात हे माध्यम यशस्वी झालं आहे. लोकशाही ज्या देशात आहे, तिथं ही बाब सयुक्तिक मानायला हवी. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांचा गुंता समजून घेण्यात बदलत्या राजकारणाचा वेध दडलेला आहे.
राजकारण परिवर्तनशील असतं, तसंच माध्यमंदेखील सतत बदलत असतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राजकारणातील परिवर्तनात कळीची भूमिका माध्यमं बजावतात असतात. सोशल मीडिया हे अंतिमतः माध्यम आहे. मात्र, मुद्दा एवढाच आहे की, राजकारण बदलतं तशी माध्यमं बदलतात का? माध्यमं राजकारणाला बदलवतात का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकाच वेळी होकारार्थी अन नकारार्थी येतील.
आत्ताच्या राजकारणाचा एकूणच, केंद्रबिंदू जुन्या मूल्यांपासून, प्रतीकांपासून व निष्ठांपासून दुसरीकडे सरकलेला आहे. त्या सरकण्याच्या मुळाशी सकारात्मक व नकारात्मक कंगोरे आहेत. त्या दोन्ही संदर्भातून सोशल मीडियाचा प्रभाव आणि परिणामकारकता आजच्या राजकारणात कशी दिसते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सोशल मीडिया जसं काळाचं देणं आहे, तसंच ते समाजाच्या समकालीन आकलनाचं प्रतिबिंबही आहे. यामध्ये काळ ही गोष्ट प्रतीकात्मक अर्थानं आहे. कारण काळ ही अशी अगंतुकपणे जन्माला येणारी बाब नाही. काळ हे त्या त्या परिस्थितीतील सामाजिक आकलनातून आणि आकर्षणातून आकाराला येणारी अभासी संकल्पना आहे. सामूहिक कृतीची भावना प्रवाहपतित होते. त्यातून ज्या कशाचा जन्म होतो, त्याला व्यापक अर्थानं काळ मानलं जातं. सोशल मीडिया हे प्रकरण अशाच पद्धतीनं जन्माला आलेलं आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पना सामाजिक मूल्यांपेक्षा सध्या वरचढ झाल्या आहेत, अशा काळात हे माध्यम जन्माला आलेलं आहे. त्यामुळे राजकारण–समाजकारण यातून मूल्यांची फारकत आणि सोशल मीडिया मान्यता पावणं हे एकाच काळात घडलेलं आहे. सध्याच्या काळात बदलांचा वेग वाढला, परिणामी आपसूकच बदलांची गुंतागुंतदेखील वाढली. ते समजून घ्यायला अधिक समकालीन व्हावं लागेल. त्याचा एक प्रमुख भाग सोशल मीडिया आहे. तो सामूहिक आकर्षण अन कृतीचा दस्ताऎवज आहे.
हे माध्यम जन्मानं परदेशी आहे. मात्र ते आजमितीला इतकं देशी झालेलं आहे की, जणू काही ते आपणच जन्माला घातलं आहे! या माध्यमानं आपल्या देशात जे काही चांगल्या अन वाईट अर्थानं थैमान घातलेलं आहे, ते पाहता, त्यातून राजकारण, उद्योग, करमणूक, आरोग्य अशी जवळपास सगळीच क्षेत्रं पादाक्रांत केलेली आहेत. या सगळ्यांना सोशल मीडियाची गरज भासत आहे. किंबहुना माध्यम म्हणून त्याचा दबाव वाढत असल्यानं ते अपरिहार्य आहे. या माध्यमानं एकाच वेळी समाजाचं जेवढं प्रबोधन चालवलं आहे, तेवढीच काही घटकांची बदनामीही या माध्यमाच्या अनियंत्रित व्यवस्थेमुळे होत आहे.
जगाच्या वेगाबरोबर अन बदलाबरोबर चालायचं असेल तर तुम्ही सोशल मीडियावर असलंच पाहिजे. भारत नावाचा देश बदलतोय. तो सतत बदलत आलेला आहे. पण सोशल मीडियाच्या रेट्यानं तो अधिकच बदलतोय असं भासवलेलं आहे. कारण हे माध्यम जे घडतं, ते सांगण्यात प्रंचड यशस्वी झालेलं आहे. त्याचबरोबर जे घडत नाही तेदेखील तितक्याच, किंबहुना अधिक गतीनं सांगण्यात या माध्यमानं ‘यश’ संपादन केलेलं आहे.
घडणार्या गोष्टी अन न घडणार्या गोष्टी यांना राजकारणात अतोनात महत्त्व असतं. त्यातच राजकारणात वेळ ही बाबही खूप महत्त्वाची असते. सोशल मीडिया या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टींना ‘न्याय’ देण्यात तत्पर आहे. जे घडत नाही ते सोशल मीडिया मोठ्या शिताफीनं पार पाडत असल्यानं हे आजच्या धोरणात्मक उपद्रवी राजकारणातील महत्त्वाचं माध्यम झालं आहे. संकुचित राजकारणाला जे हवं आहे, ते सोशल मीडिया देत असल्यानं या माध्यमाला अधिक महत्त्व आलेलं आहे.
सोशल मीडिया हे सर्वार्थानं प्रभावी माध्यम आहे. यामध्ये फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअॅप ही सोशल मीडियातील लोकप्रिय उपमाध्यमं आहेत. याशिवायदेखील अनेक नवनवीन प्रकार जन्माला आले आहेत, येत आहेत. या माध्यमांना एकाच वेळी अनेक कंगोरे आहेत. यातल्या प्रत्येक माध्यमाची क्षमता अन उपयोगिता वेगवेगळी आहे. या माध्यमात मजकूर, व्हिडिओ, चित्र अन कार्टुन सारखे विविध प्रकार वेगवेगळ्या पद्धतीनं हाताळता येतात.
फारसं विशेष नियंत्रण नसलेलं हे माध्यम आहे. एका बाजूनं हे माध्यम व्यक्तीगत आहे आणि समूहाचंही आहे. दुसऱ्या बाजूनं नियंत्रणअभावी हे माध्यम कुणाचंच नाही. त्यामुळेच या माध्यमाची विश्वासार्हता अडगळीत सापडलेली आहे. राजकारणाची विश्वासार्हताही अशीच असते, आहे.
या माध्यमातून फार पटकन आपलेपण साधता येतं; तितकीच पटकन कटुतादेखील हे माध्यम निर्माण करू शकतं. समज अन गैरसमज अधिक गतीनं वाढवण्यात या माध्यमाचा मोठा वाटा आहे. समकालीन भारतीय राजकारण विकासाविषयी समज आणि इतिहासातील योगदानाविषयी गैरसमज निर्माण करण्याभोवती आकार घेत आहे. त्यामुळे या माध्यमाचं ‘योगदान’ हे आत्ताच्या राजकारणाचं कॅरेक्टर आहे.
अमेरिकेच्या काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत फेसबुकचा एकाच वेळी एकाच यंत्रणाकडून दुहेरी वापर झाला. ज्यांनी दुसर्याच्या बदनामीच्या जाहिराती दिल्या, त्यांनीच स्वतःच्या कौतुकाच्या जाहिराती दिल्या. त्यामुळे नियंत्रण नसणं अन ते ठेवणं अतिशय कठीण असणं ही या माध्यमाची उणीव आहे.
या माध्यमाच्या मुख्य बलस्थानाचा राजकारणाला जेवढा उपयोग आहे, त्याहीपेक्षा या माध्यमाच्या उपद्रव क्षमतेचा ‘उपयोग’ अधिक आहे, असं म्हणायला आपल्या देशात वाव आहे. कारण हे माध्यम जेवढं ज्ञान देतं, तेवढंच अज्ञान पेरतं. जेव्हा आपण राजकारणाचा या माध्यमाशी सबंध जोडतो, तेव्हा अर्थातच त्याच्या सर्व बाजू समजून घ्याव्या लागतात. मुळात समाजातील जवळपास सर्वच घटक या माध्यमानं आपलेसे केले आहेत. या माध्यमानं माणसांचं अस्तित्व अन चारित्र्य तपासण्याची पद्धतदेखील जन्माला घातलेली आहे. पूर्वी गाव, तालुका, जिल्हा किंवा जातीच्या लिंकवरून नातं लावण्याचा प्रयत्न केला जात होता. आता फेसबुकच्या म्युच्युअल फ्रेंडलिस्टवरून नातं ठरतं. आणि पोस्टवरून त्याचं आकलन, आवाका अन आकर्षण याचा अंदाज बांधला जातो. म्हणून हे माध्यम राजकारण या मानवी व्यवहाराला आपल्या कवेत घेण्यात यशस्वी झालेलं आहे. समाजात ज्या ज्या गोष्टीचा प्रभाव असतो, त्या गोष्टी राजकारणाला अन राजकारण्यांना वर्ज्य करता येत नाहीत. त्यामुळे सोशल मीडिया उपयोगी असो वा उपद्रवी, त्याचा प्रभाव असल्यानं समकालीन राजकारण त्या भोवती कटिबद्ध आहे.
राजकीय नेत्यांना आपले समर्थक वेगवेगळ्या पद्धतीनं संपर्कात ठेवावे लागतात किंवा त्यांच्या संपर्कात राहावं लागतं. हे माध्यम संपर्कात राहण्यासाठी फारच सोपं आहे. कुठेही बसून या माध्यमामुळे नेता अन कार्यकर्ता यात संवाद घडू शकतो. सोशल मीडियावर असलेले मित्र अन फॉलोअर्स ही आजच्या नेत्याची उंची मोजण्याचं साधन झालं आहे. मात्र त्याला तसा फारसा अर्थ नाही. जसं राज ठाकरेंच्या सभेत गर्दी करणारे सगळेच मनसेला मतदान करत नाहीत, तसंच सोशल मीडियावरचे फॉलोअर्सदेखील गांभीर्यानं घ्यायची गरज नसते. कारण त्यात आभासीपणा जास्त आहे. अर्थात त्यातले सगळेच तसे असतात किंवा सगळेच खोटे आहेत असं नाही. या माध्यमावर काही लोक एकमेकांशी एकमेकांवर लक्ष ठेवण्यासाठी जोडलेले असतात. त्यामुळे हे माध्यम माणसांना संख्यात्मक बाजूनं एकत्र करत असलं तरी त्यात गुणात्मकता मात्र फारशी नाही. अर्थात माणसांमध्ये काहीशी आपुलकी हे माध्यम वाढवत आहे. पण त्यात आभासीपणा जास्त आहे. जातीपातीच्या भिंती ओलांडण्याचं काम हे माध्यम करत नाही. असं असलं तरी हे माध्यम संकुचित आहे असंही नाही. या माध्यमाला कुठल्याही चौकटीत गुंफणं अवघड आहे. मात्र असं असलं तरी आजच्या राजकारणाचा गाभा अन आवाका घडवण्यात या माध्यमाचा मोठा वाटा आहे. आजचं राजकारण बेभरवशाचं होण्यातही याच माध्यमाचा मोठा हातभार आहे. अर्थात ते सामाजिक प्रतिबिंब आहे. माध्यम तिथं निमित्तमात्र आहे.
मोदी सत्तेवर येण्यापूर्वीच आपल्या देशात सोशल मीडिया लोकप्रिय झालेला आहे. सुरुवातीच्या काळात हे माध्यम उच्चशिक्षित मध्यमवर्गाकडे होतं. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सर्वप्रथम हे माध्यम दखलपात्र झालं. कारण अण्णांच्या आंदोलनात ज्या समूहानं झटकन क्रांतीची स्वप्नं पाहिली, त्याच वर्गानं हे माध्यम स्वयम घोषित क्रांतीच्या नादात कवेत घेतलेलं होतं. तत्कालीन काँग्रेस सरकार अन त्या सरकारमधील महत्त्वाच्या नेत्यांना यथेच्छ बदनाम करण्यात या माध्यमाचा महत्त्वाचा रोल राहिला. त्यामुळे भारतीय राजकारणात भ्रष्टाचार मुक्तीसाठी या माध्यमातून जेवढं प्रबोधन झालं, त्यापेक्षा अधिक उपयोग सत्ताधारी पक्षाच्या बदनामीसाठी झालेला आहे. अगदी आत्ताही हे माध्यम तेच काम नेटानं पार पाडत आहे.
या माध्यमानं अण्णांचं आंदोलन राजकीय अर्थानं यशस्वी केलं. कारण त्यातून आपलं राजकीय भवितव्य घडवू इच्छिणार्या केजरीवालांचा पक्ष जन्माला आला. त्याच आंदोलनात काँग्रेस पुरेशी बदनाम झाल्यानं मोदींच्या स्वप्नाला पंख फुटले अन ते पंतप्रधान झाले. मोदीप्रणीत भाजप यशस्वी होण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे.
हे माध्यम ट्रेंड निर्माण करण्यात कमालीचं यशस्वी झालेलं आहे. पण या माध्यमावर एकाच वेळी परस्परविरोधी ट्रेंड निर्माण होत असतात. त्यामुळे या माध्यमानं जन्माला घातलेले अन वाढवलेले पक्ष असोत वा नेते, त्यांची विश्वासार्हता ट्रेंड सारखीच आहे. मोदी सत्तेवर आल्यानंतरचा काळ सगळ्याच बाजूंनी सोशल मीडियाच्या जंजाळात अडकलेला आहे. अन तो ट्रेंडभोवती आहे. देशात कोणत्या विषयावर काय भूमिका घ्यायची इथपासून कोणतं धोरण कसं असावं इथपर्यंत सगळं काही सोशल मीडियावर घडवलं गेलं आहे.
ज्यांना या माध्यमानं बळ दिलं, मोठं केलं, आधार दिला; त्यांनाच आता हे माध्यम कायद्याच्या कचाट्यात आणून संवादी रूप थांबवावंसं वाटतं, हेच या माध्यमाचं बलस्थान आहे आणि हीच त्याची मर्यादाही आहे. राजकारण अनिश्चित असत असं म्हटलं जातं, ते अधिक खरं करून दाखवण्याची जबाबदारी सोशल मीडिया पार पाडत आहे. म्हणून त्याला समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.
त्यातच, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियाचं प्रचंड आकर्षण आहे (काही दिवसांनी होतं म्हणावं लागेल की, काय, असं वाटावं इतक्या झपाट्यानं या माध्यमानं मोदींना चिंताग्रस्त केलेलं दिसतं.). पंतप्रधानांच्या आवडीच्या विषयाला राजकीय महत्त्व असणं स्वाभाविक आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना लहान मुलं खूप आवडायची असं म्हणतात! खरं तर लहान मुलं आवडणं अतिशय स्वाभाविक गोष्ट, पण तीच गोष्ट राष्ट्रप्रमुखांना आवडते, तेव्हा त्याचं महत्त्व निराळं असतं. अशा मोठ्या नेत्यांच्या आवडीनिवडीचंदेखील एक राजकारण असतं. सोशल मीडियाचं अगदी तसंच आहे. आत्ताच्या आपल्या पंतप्रधानांना सोशल मीडिया आवडत असल्यानं त्याचं राजकीय महत्त्व अन त्याचे राजकीय परिणाम असणं स्वाभाविकच म्हणावं लागेल.
हे प्रस्थापित व्यावसायिक माध्यम मालकीला अप्रत्यक्षपणे आव्हान देण्याचा भाग म्हणूनही जन्माला आलेलं आहे. तसंच माध्यमांच्या प्रस्थापित मालकीला आव्हान देण्याबरोबर या माध्यमानं अनेक प्रस्थापित मूल्यांनादेखील आव्हान दिलं आहे. एकूण प्रस्थापित मानसिकतेला या माध्यमानं आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे प्रस्थापित मानसिकतेच्या राजकारणाला कलाटणी देण्यात या माध्यमाचा मोठा वाटा आहे. गावच्या राजकारणापासून देशाच्या राजकारणापर्यंत या माध्यमाचा प्रभाव आहे. कारण सारं गाव या माध्यमावर येऊन बसलं आहे. म्हणून आत्ताच्या राजकारणाचा एक कंगोरा सोशल मीडिया भोवती गुरफटलेला आहे.
आत्ताची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात वर्तमानात रमते. तिला इतिहास महत्त्वाचा वाटत नाही. कारण वर्तमान आपल्या हातात असतो. तो हवा तसा घडवतो येतो. आपल्याला हव्या त्या दिशेनं वळवता येतो. त्यात इतिहासचं दडपण नसतं. हा बदल आहे. इथं बदलाची बाजू कितीही आकर्षक असली तरी ती धोकादायक आहे. राजकारणासाठी तर हा धोका अधिक गंभीर आहे. इतिहास नाकारणार्या काळाचं आव्हान आपल्या समोर आहे. ते आव्हान वाढवण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. त्यातच जेव्हा आपण राजकारणाच्या अनुषंगानं बघतो, तेव्हा इतिहास महत्त्वाचा असतो. पण मुळात इतिहासाचं देणं-घेणं नसेल अतर बाकी मुद्द्यांना कुठे महत्त्व? आपण समाज म्हणून मूल्यात्मक बाजूनं जेव्हा इतिहासाशी फारकत घेतो, तेव्हा मात्र आपलं वर्तमान चिंतनीय असतं. आत्ताचा काळ तसाच आहे. इतिहासाची मोडतोड हा आपल्यापुढचा धोका आहे. तो आपल्या देशात आता निर्माण केला जातोय. त्यात भाजपचा मोठा वाटा आहे! हा धोका पसरवण्यात सोशल मीडियाचा मोठा आधार घेतला जातो.
आपलं समकालीन राजकारण (भाजपच्या पुढाकारानं) इतिहास, मूल्य संस्कृती याची नव्या राजकारणासाठी फेरमांडणी करण्यात गर्क आहे. त्यात सत्य अन वास्तव हे गौण मुद्दे आहेत. सोशल मीडियाचा अशा फेरमांडणीला अवास्तव महत्त्व देण्यात हातभार आहे.
हे माध्यम व्यक्तीचं आहे. या माध्यमाला प्रसाराच्या मर्यादा आहेतही आणि नाहीतही. कारण सर्वसामान्यपणे हे माध्यम आपापल्या मित्र परिवारापुरतं बंधिस्त ठेवता येतं. आवश्यकता असल्यास जाहिरात देऊन हव्या त्या लोकांपर्यंत पोहचताही येतं. त्यामुळे राजकीय नेत्यांना आपल्या भूमिका अन भावना लोकांपर्यंत पोहचवता येतात. त्यामुळे हे माध्यम जिथं जिथं निवडणुकांचं राजकारण व्यक्तीस्वातंत्र्याला महत्त्व देतं, तिथं तिथं महत्त्वाचं आहे.
हे माध्यम गतिशील असल्यानं त्याची परिणामकारकता तितकीच गतिशील आहे. ज्या गतीनं ते एखाद्याला उंचीवर घेऊन जातं, त्याच गतीनं खाली खेचतं. हे माध्यम एकेकाळी ज्यांना खुलं पाहिजे, त्यांना आता त्याच्यावर बंधन घालावीशी वाटतात. कारण एकच- नियंत्रणाचा अभाव. तसंच हे माध्यम कुणा एकाच्या मालकीचं नसल्यानं कुणा एकाबरोबर राहायला तयार नसतं. त्यामुळे ते आज ज्याच्या फायद्याचं असतं, उद्या त्याच्या तोट्याचंही ठरू शकतं.
या माध्यमानं राजकारण कसं बदलवलं आहे, हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे.
आपल्या देशात मोदी सत्तेत आल्यानंतर या माध्यमाचा प्रभाव अधिक वाढला. मोदीप्रणीत भाजपनं आपली बहुतांश शस्त्रं याच माध्यमाद्वारे वापरली. विशेषतः विरोधकांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. मात्र जेव्हा प्रमुख प्रचलित माध्यमं सरकारच्या दडपणाखाली आली, तेव्हा मात्र या माध्यमाची उपयोगिता वाढलेली आहे. विशेषतः या माध्यमानं आता व्यक्तिगत रूप काहीसं सोडलं आहे. त्यात व्यापक प्रगतीचा मुद्दा अस्तित्वाच्या प्रश्नामुळे शिरकाव करत आहे. कारण हे माध्यम एका बाजूला ट्रोल करून बदनामीसाठी जसं वापरलं गेलं, तसंच आत्ता सरकारी धोरणाची चिकित्सा करण्यासाठी त्याचा उपयोग केला जात आहे. अर्थात त्यात अजून दोष आहेत. पण तरीही मर्यादित अर्थानं विश्वासार्हता निर्माण करून काही व्यावसायिक संस्था हे माध्यम नीटपणे वापरत आहेत. सर्वच पक्षातील दीर्घकालीन भवितव्य असलेले नेतेही या माध्यमाचा प्रबोधनात्मक भूमिकांसाठी उपयोग करत आहेत.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
सोशल मीडियामुळे महत्त्वाच्या मुद्यांचं महत्त्व कमी होणं अन नको त्या मुद्यांचं महत्त्व वाढण्याचं काम चोखपणे पार पाडलं जातं. राजकीय पक्षांना किंवा नेत्यांना काही महत्त्वाच्या गोष्टींवरचं लक्ष विचलित करण्यात जे राजकारण घडवायचं असतं, ते काम सोशल मीडियाच्या मदतीनं नेमकेपणानं पार पाडता येतं. त्यातच नको त्या मुद्यांचं अवास्तव महत्त्व वाढवणं राजकारणासाठी आवश्यक असतं, तेही काम हे माध्यम चोखपणे पार पाडतं. समकालीन राजकारणाच्या बाजूनं पाहिलं तर गाईचे प्रेम हे राष्ट्रीय कार्य झालं अन गाय वाढवणारा शेतकरी मात्र दुय्यम झाला. मात्र हे माध्यम कसं वापरायचं हे जसं सामान्य माणसाच्या, विशेषतः शेतकर्यांच्या हाती आलं, तेव्हा मात्र हे माध्यम सार्वजनिक चर्चाविश्वाची दिशा निर्धारित करू शकलं. जिथं मूल्यात्मक सिद्धान्त आहे, त्यासाठी आग्रह धरणारं कुणीतरी आहे. त्यात सातत्य आहे, हे जेव्हा अधोरेखित झालं तेव्हा मात्र या माध्यमाची भूमिका अधिक परिणामकारक दिसायला लागली.
सोशल मीडिया हे जागतिकीकरणानंतरच्या गतिमान युगाचं प्रतिबिंब आहे. माणसं व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रेमात गुरफटत असताना सामाजिकतेचा सामूहिक आधुनिक अर्थ लावायला भाग पाडणं, हे या माध्यमाचं फलित आहे. समाजाच्या रोज बदलणार्या अपेक्षांचा दबाव निर्माण करणार्या भूमिकांचं त्यात प्रतिबिंब आहे. आमच्या अपेक्षांची आभासी का होईना, पण दखल घ्या असं ज्या आजच्या काळात म्हटलं जात आहे, अशा काळात हे माध्यम चौथ्या स्तभांची आधुनिक पद्धतीची बुज सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे.
त्यातच माणसं आत्मकेंद्री झाली आहेत. त्यांच्यात चांगल्या गोष्टी घडवण्याचं समूहभान पूर्वीसारखं राहिलेलं नाही, असं म्हणत असताना हे माध्यम प्रस्थापित होऊ पाहणार्या प्रत्येकासाठी सुट्या माणसांच्या अभासी समूहभानातून का होईना आव्हान देत आहे. बदलांना गती असायलाच हवी, हे भान अन अपेक्षा याकडे लक्ष देणारे राजकारणात-समाजकारणात टिकतील, अन्यथा तुमचा बेदखल इतिहास व्हायला वेळ लागणार नाही असं समाज म्हणत आहे. त्यामागे सोशल मीडियाचं बळ आहे. आत्ताचं राजकारण वेगळं नाही. ते आत्ताच्या समाजाचं प्रतिबिंब आहे. आत्ताच्या राजकारणावर इतिहासाचं ओझं नाही, पण वर्तमानाचं मात्र मोठं दडपण आहे. आत्ताचं वर्तमान गुंतागुंतीचं आहे. ते उलगडण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर सतत असलं पाहिजे. ती आजच्या काळाची आयडेंटीटी आहे. तोच आपल्या समकालीन राजकारणाचा गाभा आहे.
.............................................................................................................................................
लेखक किशोर रक्ताटे ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.
kdraktate@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Bhagyashree Bhagwat
Thu , 19 October 2017
sanyat aani muddesud. mast. aavdla.