अजूनकाही
१. अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रम्प
रिपब्लिकन बुशने केलेल्या युद्धखोरीमुळे झालेल्या कर्जाचा डोंगर उपसायला ओबामांना करआकारणी करायला लागली. त्याला वैतागून धाकले बुश परवडले, असं म्हणायला लावणारा आढ्यताखोर, बाईलवेडा, वर्णद्वेष्टा, तोंडाळ आणि शुद्ध आचरट ट्रम्प अमेरिकन जनतेने निवडून दिला आहे… श्रीमंतांचे चोचले थांबवा म्हणून त्यांनी एका अब्जाधीशाला निवडून दिलं आहे… एकंदर काय, तर तिकडेही बागों में बहार है!!!
......
२. भोपाळमधल्या सिमी अतिरेक्यांच्या बराकीत काजू, बदाम, किसमिस, पेंडखजूर आणि अन्न शिजवण्यासाठी भांडी व शेगडीही सापडली…
भिजत घातलेले बासमती तांदूळ, नुकत्याच कापलेल्या बकऱ्याचं मटण आणि दुधात भिजवलेलं केशर सापडलं नाही का? अरेरे, मग बिर्याणी कसे करून खात होते ते? की पार्सल मागवत होते?
......
३. पाचशे, हजारच्या नोटा रद्द केल्यावर आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आपट्याची पानं वाटणार आहे का? : मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचा खोचक सवाल
बरोबरच आहे ही काळजी? दोन्ही चुलत पक्षांना ती अडचण नाही… तिथं कोणी कोणाला काही देत नाहीत… फक्त घेण्याचीच सवय… देऊन देऊन देतात काय, तर निवडणुकीच्याआधी टार्गेट ठरवून जाहीरपणे खोपच्यात घेऊन देतात, तेवढंच… तेही कार्यकर्तेच देतात!
......
४. उत्तर प्रदेशातल्या कैरानामधून हिंदूंचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असताना त्यांची बाजू घेतल्याबद्दल सेक्युलरांनी मला जातीयवादी ठरवलं तरी बेहत्तर : भाजप नेते हुकूमसिंग
अहो, पण म्हणजे तुम्ही कपाळावर पट्टीच चिकटवून घेतलेली असताना कोणी तुम्हाला वेगळं काही कसं म्हणेल? तुम्हाला जातीयवादी म्हणण्यासाठी कारण कशाला हवं कसलं?
......
५. पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून स्वागत
काल रात्रीपासून त्यांच्यावर आणि बारामतीवर जे विनोद होतायत, त्यांनी ते खळखळून हसल्याचं बातमीत का लिहिलेलं नाही? काळा पैसा कमावणारे तो नोटांच्या स्वरूपात साठवून ठेवतात, अशी बाळबोध आर्थिक समज असलेल्या देशात आपण राहतो आहोत, याचं त्यांना किती बरं वाटलं असेल.
६. एसटीच्या निवडक मार्गांवर एसटीने करार केलेल्या हॉटेलांत प्रवाशांना शिरा, पोहे, उपमा, इडली, वडापाव, मेदूवडा यातला एक नाश्ता आणि एक चहा फक्त तीस रुपयांत मिळणार
बातमी चांगलीच आहे. फक्त ही हॉटेलं टाळून चालक-वाहकांची सगळीच 'सोय' फुकटात करणाऱ्या हॉटेलांपुढे एसटी नेण्याच्या प्रकारांना आळा कसा घालणार? शिवाय तीस रुपयांत द्यायचंय म्हणून नैवेद्याच्या वाटीत शिरा, पोहे आणि मरतुकडे वडे खपवले जाणार नाहीत, हे कोण पाहणार?
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment