अजूनकाही
आज (१६ ऑक्टोबर) जागतिक भूलशास्त्र दिवस आहे. या निमित्तानं एका भूलतज्ज्ञाच्या नजरेतून या शास्त्राविषयी, प्रत्यक्षातल्या त्यांच्या कामाविषयी आणि त्यातील अडीअडचणींविषयी…
.............................................................................................................................................
आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विमानाचा वापर करतो. उड्डाणापूर्वी वैमानिक त्याचं सर्व कौशल्य, ज्ञान, अनुभव यांचा उपयोग करून, आपला प्रवास सुरक्षित कसा होईल, यासाठी प्रयत्न करतो. विमानाचं उड्डाण, हवेतील प्रवास व परत ते जमिनीवर उतरवणं, ही अतिशय गुंतागुंतीची, क्लिष्ट व अत्यंत जबाबदारीची प्रक्रिया असते.
आम्हा भूलतज्ज्ञांचंही काहीसं तसंच.
कोणत्याही गंभीर/ तातडीच्या शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची अत्यंत बारकाईनं व सूक्ष्म स्वरूपात तपासणी करणं, काही दोष असतील, कमतरता असेल तर ती दुरुस्त करणं, शस्त्रक्रियेसाठी रुग्णाची तयारी करून घेणं, हे अत्यंत महत्त्वाचं असतं. खूप गंभीर परिस्थिती असेल तर कधी कधी यासाठी वेळ मिळतं नाही. अशा वेळी आपल्या अनुभवानं, कौशल्यानं रुग्णास भूल देणं महत्त्वाचं असतं. शस्त्रक्रिया कितीही मोठी, गुंतागुंतीची असेल आणि कोणत्याही प्रकारची भूल त्यासाठी लागणार असेल, त्याही वेळी रुग्णाचा श्वास, रक्तदाब, लघवीचं प्रमाण, प्राणवायूचं प्रमाण योग्य त्या प्रमाणात ठेवणं अत्यंत क्लिष्ट असू शकतं. याचबरोबर ती शस्त्रक्रियेच्या दरम्यानच्या घडामोडी रुग्णाला किंचितही आठवल्या नाही पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि कोणत्याही प्रकारची व कसलीही वेदना रुग्णाला जाणवू न देता शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्जनला मदत करणं, ही आमची त्यावेळची प्रमुख भूमिका असते.
म्हणजे, सर्व दुःख, प्रचंड वेदना, गंभीर परिस्थिती या सर्वांच्या पलिकडे रुग्णांना घेऊन जाणं आणि परत सर्जरीनंतर या भौतिक जगातील सर्व संवेदना परत मिळवून देणं, हे आमचं काम असतं.
भूलशास्त्र हे एक परिपूर्ण शास्त्र आहे. यात शरीराच्या सर्व प्रकारचा व सर्व आजारांचा, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांचा, सर्व वयोगटांच्या पद्धतीनुसार अभ्यास केला जातो. हे एक चतुरस्त्र शास्त्र आहे. एमबीबीएस ही पदवी प्राप्त केल्यानंतर MD/FCPS/DA असे अनेक प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रम असतात. त्यासाठी साधारणपणे तीन ते चार वर्षे शिक्षण व प्रात्यक्षिक कालावधी असतो.
सध्या या नंतरच्या काही सुपर स्पेशालिटींसाठी पुढचेही शिक्षण असते. उदा. मेंदूच्या शस्त्रकियेसाठी /हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी/नवजात बाळांच्या शस्त्रक्रियेसाठी/अवयव रोपण शस्त्रक्रियेसाठी इ.साठचे भूलतज्ज्ञ. पण एवढंच भूलतज्ज्ञांच काम नसतं. पुढील जबाबदाऱ्याही खूप महत्त्वाच्या असतात -
१. व्हेंटिलेटर्स मॅनेजमेंट - सर्व प्रकारचा कृत्रिम श्वास देणाऱ्या मशीनचा योग्य वापर करणे.
२. आयसीयू - अतिदक्षता विभागात देखरेख.
३. सी- आयसीयू - हृदय विकारसंबधित अतिदक्षता विभागाची जबाबदारी.
४. कॅथलॅब – ज्या ठिकाणी हृदयविकाराचा गंभीर झटका आलेला असताना अँजिओप्लाटी करून प्राण वाचवले जातात तो विभाग. हा भूलतज्ज्ञांच्याच देखरेखीखाली चालू असतो.
५. पेनलेस डिलिव्हरी - बाळंतपणाच्या कळा न सोसता बाळच्या जन्मासाठी त्या गर्भवती मातेस, ती पुर्णपणे शुद्धीवर असताना, कुठलीही वेदना न जाणवू देता, प्रसुतीसाठी भूलतज्ज्ञ मदत करतात. त्यामुळे त्या कुटुंबीयांना ही एक आयुष्यभरासाठी अलौकिक अनुभव असतो.
६. पेन मॅजनेजमेंट - गुंतागुंतीची वेदना, कन्सरसारख्या आजारातील वेदना, मणक्याचे आजार, अपघातानंतरची वेदना घालवण्यासाठीही भूलतज्ज्ञ मदत करतात.
७. डिझास्टर मॅनेजमेंट - कोणत्याही आप्तकालीन परिस्थितीमध्ये उदा. भूकंप, चेंगराचेंगरी, महापूर, साथीचे रोग, युद्ध इ. मध्ये भूलतज्ज्ञांची समाजासाठी मोठी मदत होते.
पण सध्या काहीसा ताण आमच्यावरही येतोय. एक लाख लोकसंख्येमागे एक भूलतज्ज्ञ असावा असं मानलं जातं. प्रत्यक्षात हे प्रमाण अत्यंत विसंगत व कमी आहे. त्यामुळे कामाचा प्रचंड ताण आमच्यावर असतो. सतत, नेहमी व कधीही (२४×७×३६५) आम्हाला तितक्याच ऊर्जेनं व तत्परतेनं कुठल्याही प्रसंगाचा सामना करावा लागतो… रुग्णास भूल देण्यासाठी जावं लागतं. कार्यालयीन कामकाजाचं वेळापत्रक आम्हाला लागू होत नाही. त्यामुळे ठराविक व साचेबद्ध असं कामाच्या तासांचं वेळापत्रक आमच्यासाठी नसतं.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असल्यानं आमच्याही शरीरावर त्याचा परिणाम होतो. तब्येतीच्या कुरबुरी लवकरच सुरू होतात. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने निर्णय घेण्यासाठी मानसिक स्थिरता लागते. त्यासाठी आम्हाला स्वतःसाठी कमी वेळ उपलब्ध असतो. शरीरशास्त्रातील प्रत्येक सुधारणांबाबत स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी आमचा अभ्यासही सतत वाढतच असतो.
भूलशास्त्र हे मानवजातीला एक वरदान आहे. मानवाच्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचं काम आम्ही भूलतज्ञ रात्रंदिवस करत असतो. खुद्द परमेश्वरानंतर हे काम करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, हा आमचा बहुमान आहे.
लेखक डॉ. सुजीत अडसूळ बारामतीमध्ये भूलतज्ज्ञ म्हणून काम करतात.
adsuldrsujit@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment