आखिर बाप बाप होता हैं!
सदर - न-क्लासिक
चिंतामणी भिडे
  • ‘द स्टिंग’चं एक पोस्टर
  • Mon , 16 October 2017
  • इंग्रजी सिनेमा English Movie न-क्लासिक द स्टिंग The Sting जॉर्ज रॉय हिल George Roy Hill रॉबर्ट रेडफोर्ड Robert Redford पॉल न्यूमन Paul Newman

एखाद्याकडून फसवली गेलेली व्यक्ती त्याचा बदला घेण्यासाठी एक मोठी बोगस यंत्रणा उभी करते, मग त्याच्यावर जाळं फेकून त्या यंत्रणेत त्याला खेचते आणि त्याला फसवते... आपला बदला पूर्ण करते (किंवा झालेलं नुकसान भरून काढते)...

ओळखीची वाटते ना ही कल्पना?

हिंदी चित्रपटसृष्टीत या मध्यवर्ती कल्पनेवर दोन महत्त्वाचे सिनेमे आले. पहिला ‘ब्लफमास्टर’. ‘शोले’वाल्या रमेश सिप्पीचा गुणवान दिग्दर्शक पुत्र रोहन सिप्पीचा सिनेमा. दुसरा दिबाकर बॅनर्जी नावाच्या जीनियस दिग्दर्शकाचा ‘खोसला का घोसला’.

हे दोन्ही सिनेमे गेल्या एका तपातले. २००६चा ‘खोसला का घोसला’ वास्तव आयुष्यातील काही घटनांचा वापर करून रचला होता. ‘ब्लफमास्टर’ २००५चा. त्याच्या आधी दोन वर्षं आलेल्या ‘मॅचस्टिक मॅन’वरून तो बेतला होता. कथानकाच्या पातळीवर ‘ब्लफमास्टर’चं ‘मॅचस्टिक मॅन’शी थोडंफार साधर्म्य आहे.

पण या तिन्ही चित्रपटांचा जो मूळ प्रेरणास्त्रोत असावा तो चित्रपट म्हणजे १९७३ साली प्रदर्शित होऊन धो धो चाललेला ‘द स्टिंग’.

‘द स्टिंग’नं दिलेल्या प्लॉट डिव्हाइसचा हुबेहूब वापर ‘खोसला...’, ‘ब्लफमास्टर’ आणि ‘मॅचस्टिक मॅन’ या तिन्ही चित्रपटांमध्ये आहे. कथानकं वेगळी आहेत, पण क्लृप्ती तीच. संपूर्णपणे खोटी यंत्रणा उभी करून आपल्या टारगेटला फसवायचं.

फक्त एक महत्त्वाचा फरक आहे. ‘खोसला..’ आणि ‘ब्लफमास्टर’मध्ये फसवणूक झालेल्या व्यक्तीनं बदला घेण्यासाठी म्हणून ज्यानं आपल्याला फसवलं, त्याला ट्रॅपमध्ये ओढण्यासाठी सगळं नाटक उभं केलं. ‘मॅचस्टिक मॅन’मध्ये एका चोरानं दुसऱ्या चोराला गंडवण्यासाठी जाळं रचलं. ‘द स्टिंग’मध्ये मात्र मुळात नायक म्हणवणाऱ्या न-नायकानंच कुरापत काढलेली आहे. ती कुरापत त्याच्या अंगलट येते, तो ज्याला मेंटॉर समजत असतो, त्या वरिष्ठ सहकाऱ्याला जीव गमवावा लागतो आणि त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून तो मुळात त्याने ज्याची कुरापत काढली आहे, त्याला धडा शिकवण्यासाठी एक फसवी यंत्रणा उभी करतो.

वाचून गोंधळ उडाला ना? गोष्ट थोडीशी गोंधळात टाकणारीच आहे.

काळ आहे १९३६चा. ग्रेट डिप्रेशनमधून अमेरिका अद्यापही पुरती सावरलेली नाही. डॉइल लॉनिगन (रॉबर्ट शॉ) हा वरवर पांढरपेशा असामी प्रत्यक्षात जुगाराचं मोठं रॅकेट चालवतोय. वेगवेगळ्या शहरांमधून दररोज एके ठिकाणी कॅश जमा होते. एके दिवशी शिकागोमधल्या केंद्रावरून कॅश घेऊन निघालेल्या लॉनिगनच्या माणसाला जॉनी हुकर (रॉबर्ट रेडफोर्ड) आणि लुथर कोलमन (रॉबर्ट अर्ल जोन्स) हे ठकसेन बनावट गोष्ट रचून फसवतात आणि त्याच्याकडचे जवळपास ११ हजार डॉलर लांबवतात. ही रक्कम म्हणजे लॉनिगनच्या अजस्त्र यंत्रणेसाठी दर्या में खसखस. पण प्रश्न इभ्रतीचा असतो. शिकागोच्या रस्त्यावरच्या दोन भुरट्या चोरांनी लॉनिगनचे पैसे लंपास केले, हे ‘इंडस्ट्री’तल्या लोकांना कळलं तर दरारा कसा टिकून राहील? त्यामुळे लॉनिगनची माणसं कुलुंगी कुत्र्यांप्रमाणे हुकर आणि कोलमनच्या मागे लागतात.

इकडे आपण नक्की कोणाच्या पैशावर डल्ला मारलाय, हे या दोघांच्या गावीही नाही. अनपेक्षितपणे इतकी मोठी लूट हाती लागल्यामुळे सुखावलेला कोलमन धंद्यातून ‘निवृत्ती’ जाहीर करतो आणि हुकरला हेन्री गोंडॉफ (पॉल न्यूमन) या नामी ठकसेनाकडून पुढचे धडे घ्यायला सांगतो. हुकर नाखुषीनंच तयार होतो. स्नायडर या पोलिस अधिकाऱ्याला हुकरचा कारनामा कळतो. तो तोंड बंद ठेवण्याच्या बदल्यात पैसे उकळण्यासाठी हुकरच्या मागे लागतो. लॉनिगनच्या माणसांकडून कोलमन मारला जातो आणि त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून हुकर गोंडाफला गाठतो. कोलमनसाठी म्हणून दोघे मिळून लॉनिगनला जाळ्यात अडकवण्याचा कट रचतात. बऱ्याच प्रयत्नांनी लॉनिगन जाळ्यात अडकतो आणि तेवढ्यात...!

त्यातल्या त्यात सरळसोट पद्धतीनं कथानक सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे गोष्ट सांगूनही २५ टक्के देखील सांगितलेली नाही. ‘द स्टिंग’ हा आशयाच्या पातळीवर अजिबात ग्रेट सिनेमा नाही. तो व्यावसायिक चौकटीतला, केवळ मनोरंजनासाठीच बनवलेला उत्तम करमणूक प्रधान चित्रपट आहे. पण डोक्याने बनवलेला अतिशय बुद्धिमान मनोरंजक चित्रपट ही अतिशय दुर्मीळ चीज आहे. त्यामुळेच ‘द स्टिंग’ बघताना बहार येते.

यातला सगळ्यात रोचक भाग हा अर्थातच लॉनिगनला जाळ्यात खेचण्याचा आहे आणि तोच या सिनेमाचा गाभा आहे. हा संपूर्ण भाग थेट चित्रपटातच बघायचा. हुकरनं एकदा लॉनिगनचा विश्वास संपादन केल्यानंतर तो आणि गोंडॉर्फ मिळून रेसकोर्सवरच्या बुकिंगची एक खोटी यंत्रणा उभी करतात. सगळंच खोटं. माणसं खोटी, बुकिंग खोटं, कॉमेंट्री खोटी... फक्त दोन गोष्टी खऱ्या.. एक म्हणजे लॉनिगनला देण्यात येणारी टिप आणि दुसरी म्हणजे त्या टिपनुसार लागणारे रेसचे निकाल. आता ते कसं तेही पडद्यावरच बघायचं. पण यामुळे लॉनिगनचा विश्वास बसतो आणि तो मोठा जुगार खेळायला तयार होतो.

खरं म्हणजे लॉनिगनला जाळ्यात खेचण्यापासून त्याला पूर्णत: फसवण्यापर्यंतच्या कुठल्याच टप्प्यावर हुकर आणि गोंडॉफ समोर खऱ्या अर्थाने कठिण असं आव्हान उभं राहात नाही. हुकर अधूनमधून अडचणीत येत राहातो. कधी लॉनिगनची माणसं, तर कधी स्नायडर त्याच्यापर्यंत पोहोचता पोहोचता तो अगदी शेवटच्या क्षणी त्यांच्या हातावर तुरी देण्यात यश मिळवतो. पण तरीही लॉनिगनला गंडवण्यासाठी त्यांनी जो बनाव रचलाय, जो खेळ उभा केलाय, त्याच्यासमोर कधीच अडथळे निर्माण होत नाहीत. हुकर किंवा गोंडॉर्फसमोर कुठलंही चॅलेंजच दिग्दर्शकाने उभं केलेलं नाही.

तरीही हा सामना एकतर्फी राहात नाही. लॉनिगनची भूमिका साकारणाऱ्या रॉबर्ट शॉ या कलाकाराने एरवी काहीशी कमकुवत होऊ शकणाऱ्या लॉनिगनच्या व्यक्तिरेखेला भक्कमपणा दिलाय. त्याचा कठोर चेहरा, चालण्याची विशिष्ट पद्धत आणि आवाजातून जाणवणारी जरब यामुळे सुरुवातीपासूनच हरणारं युद्ध खेळत असूनही लॉनिगन विनोदी किंवा केविलवाणा होत नाही. लॉनिगनचा अंतिमत: पराभवच होणार आहे, हे प्रेक्षक म्हणून आपल्याला माहिती असूनही हा खेळ बघण्यात एक विलक्षण गंमत आहे.

.............................................................................................................................................

नवनवीन पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

कथेचा गाभा हा तद्दन व्यावसायिक मनोरंजक आहे, पण चित्रपटाच्या बाह्य आवरणाला दिग्दर्शक जॉर्ज रॉय हिल याने वास्तववादी डुब दिली आहे. चित्रपटात आपल्याला नेहमीची चकचकीत अमेरिका दिसत नाही. पहिल्याच प्रसंगात गबाळे फुटपाथ, फुटपाथवर झोपलेले भिकारी, रेशनच्या रांगेत उभे असलेले गरीब, काहीही काम नसल्यामुळे हताशपणे बसून असलेले लोक, रस्त्याच्या कडेला असलेले कचऱ्याचे ढिग, कचऱ्यातून काहीतरी शोधणारा कोणीतरी, रंग उडालेल्या भिंती असं सगळं दाखवून मंदीचा प्रभाव अजूनही टिकून असल्याची बाब दिग्दर्शक ठसवतो. पुढच्या काही प्रसंगांमध्येही शहराचे जे काही भाग दिसतात ते प्रामुख्यानं कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा कामगार वर्गातल्या लोकांचा वावर असलेले आहेत. त्यामुळे चित्रपटाची जी चौकट आहे, ती आपसूक वास्तववादी होते आणि या वास्तववादी चौकटीत पटकथाकार आणि दिग्दर्शक तद्दन फिल्मी गोष्ट उभी करतात.

‘द स्टिंग’नं न्यूमन, रेडफोर्ड आणि हिल हे ‘बुच कॅसिडी अँड द सनडान्स किड’ या गाजलेल्या चित्रपटाचं त्रिकुट पुन्हा एकत्र आणलं. एक चित्रपट गाजला म्हणून लगेच त्याच टीमने एकत्र येऊन दुसरा चित्रपट करायचा, असला टिपिकल बॉलिवुडी धंदेवाईक दृष्टिकोन त्यामागे नव्हता. युनिव्हर्सल पिक्चर्सनं ‘द स्टिंग’ची पटकथा बऱ्याच दिग्दर्शकांकडे फिरवली होती. न्यूमनला या पटकथेविषयी कळलं होतं आणि तो तिच्याकडे आकर्षित झाला होता. दरम्यान युनिव्हर्सलनं हिलला दिग्दर्शक म्हणून करारबद्ध केलं. न्यूमनला काहीही करून हा चित्रपट करायचा होता. न्यूमन हे त्यावेळेपर्यंत मोठंच नाव होतं. त्याने तो चित्रपट पदरात पाडून घेतला. वास्तविक न्यूमनने साकारलेली गोंडॉफची व्यक्तिरेखा महत्त्वाची असली तरी चित्रपटाचा खरा नायक आणि भावखाऊ व्यक्तिरेखा हुकरची आहे. खरा संघर्ष आणि हुकर आणि लॉनिगन यांच्यातला आहे. तरीही न्यूमननं गोंडाफ या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडणं आश्चर्यकारक होतं. अर्थात तो मुरब्बी कलाकार असल्यामुळे पडद्यावर त्याने स्वत:च्या अशा जागा काढल्याच आहेत. लॉनिगनला गळ टाकण्यासाठी म्हणून चित्रपटातला जो जुगार खेळण्याचा प्रसंग आहे, तो तर न्यूमन बघता बघता खिशात टाकून जातो. आणि त्याचे ते जगप्रसिद्ध निळे डोळे? उफ्फ!

हिल आणि न्यूमन एकत्र आले म्हटल्यावर त्रिकोणाचा तिसरा कोन रेडफोर्डनं पूर्ण केला आणि ‘बुच कॅसिडी...’ नंतर अवघ्या चारच वर्षांनी या त्रिकुटानं हा बहारदार चित्रपट दिला. ‘बुच कॅसिडी...’पेक्षाही तो अधिक चालला. आजही तो अमेरिकेतल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत २२व्या क्रमांकावर आहे.

पण केवळ आर्थिक कमाई इतकंच त्याचं महत्त्व नाही. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या अनेक चित्रपटांवर त्याने आपला प्रभाव टाकला. दिग्दर्शक हिलनं चित्रपटाची मांडणी एपिसोडिक पद्धतीने केली आहे. टॅरँटिनोने ९०च्या दशकात चित्रपटांतर्गत घडणाऱ्या घटनाक्रमांना वेगवेगळी शीर्षकं देऊन तशा प्रकारच्या मांडणीची पद्धत (किल बिल, जॅकी ब्राऊन) सुरू केली. त्याची मुळं ‘द स्टिंग’मध्ये दिसतात. ‘द स्टिंग’च्या पटकथेतली एक क्लृप्ती नीरज पांडेने ‘स्पेशल २६’मध्ये वापरली आहे. पण शेवटी बाप बाप होता हैं। तब्बल ४५ वर्षांपूर्वी आलेला ‘द स्टिंग’ आजही चित्रपटांवर प्रभाव टाकतोय आणि हेच त्याचं मोठेपण आहे.

.............................................................................................................................................

लेखक चिंतामणी भिडे मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......