अजूनकाही
२००८साली बराक ओबामांचं आगमन झालं, तेव्हा सगळीकडे उत्साहाचं वारं संचारलेलं होतं. अमेरिकेतल्या गरीब, पीडित, शोषित - ज्यात मुख्यत: काळे व मेक्सिकन आहेत – यांचा ओबामांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक होता. क्विन्सी जोन्स हा अमेरिकेतला मोठा काळा निर्माता आहे. त्याला 'क्यू' या टोपणनावानं ओळखलं जातं. त्याला अमेरिकेत भयानक मान आहे. तो ओबामांच्या मागे ठामपणे उभा राहिला.
कलाकार आले की सगळं दृश्य बदलून जातं. हे आपण आणीबाणीतही पाहिलं आहे (उदा. पु.ल.देशपांडे, दुर्गा भागवत). लोक लगेच त्यांच्याशी जोडले जातात. हे सिनेमांतल्या कलाकारांच्या बाबतीतही काही प्रमाणात घडतं. अशा प्रकारे कलाकार-लेखक ओबामांच्या बाजूने गेले. शिवाय त्यांच्या पक्षाचे पारंपरिक मतदार होतेच. डेमॉक्रॅटिक पक्षाचे भारतीय, आशियाई, आफ्रिकन मतदार ओबामांच्या बाजूने गेले. शिवाय त्या वेळी अमेरिकेतली ज्यू लॉबी ओबामांचं समर्थन करत होती.
त्यामुळे ओबामा अमेरिकेचे पहिले मुस्लीम राष्ट्राध्यक्ष ठरले. ते स्वत:ला मुस्लीम म्हणत नसले, तरी ते मुस्लीमच. ते अलास्कामधून आलेले. त्यांचा वॉशिंग्टन डी.सी.शी काहीही संबंध नव्हता. तेव्हा ओबामा क्रांती करणार असं चित्र अमेरिकेत आणि जगभर निर्माण झालं होतं.
त्यांचं बोलणं आणि चारित्र्य अप्रतिम आहे. त्यांचं राहणीमान साधं आहे. शिवाय ओबामांना ज्यूंनी पाठिंबा दिला. त्यांच्यासाठी फंडिंग जमवणारा रॅम इम्यॅन्युअल हा माणूस पुढे 'चीफ ऑफ स्टाफ' झाला. ‘चीफ ऑफ स्टाफ’ हा 'शॅडो प्रेसिडेंट' असतो (आपल्याकडे जसं पंतप्रधान मोदी देशाबाहेरच्या गोष्टींवर जास्त लक्ष देतात आणि अमित शहा देशातल्या गोष्टींवर लक्ष देतात तसं). पुढे तो इतका पॉवरफुल झाला की, त्याला शेवटी शिकागोला गव्हर्नर म्हणून पाठवावं लागलं; पण त्या माणसाचं बळ, ताकद, बुद्धी हे सगळं ओबामांच्या मागे होतं. त्यामुळे रॅम दूर गेल्यानंतर ओबामा एक प्रकारे एकाकी पडले. तरीपण अमेरिकेतली तरुण मुलं ओबामांकडून काही विशेष घडण्याची आशा बाळगून होती, पण ओबामा दुसऱ्या टर्ममध्ये विशेष काही करू शकले नाहीत. त्यांनी काही गोष्टी केल्या; नाही असं नाही. आरोग्य योजना राबवली, फार युद्धखोरी केली नाही, दोन एअरक्राफ्ट कॅरिअर कापले; पण नोबेल मिळवणं हेच त्यांचं ध्येय होतं. ते स्वत:च्या प्रेमात होते.
अमेरिका एकीकडे ज्ञानाची भयंकर उपासना करते, तर दुसरीकडे तेवढीच मनगटशाहीही करत असते. म्हणजे अप्रतिम विद्यापीठं, पेंटॅगॉन आणि फेड हे त्रिकूट महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मीसारखं आहे. हे तिघंही रचनाबद्ध रीतीने काम करतात. पण ओबामांचं आणि पेंटॅगॉनचं कधी जमलं नाही. वॉशिंग्टन डी.सी.मधल्या पेंटॅगॉनचं आणि जिथून अमेरिकेची सूत्रं हलवली जातात, त्या ‘कॅपिटल हिल’चं नातं अतूट आहे. हे दोघं मिळून सगळे निर्णय घेतात. त्याप्रमाणे ‘फेड’ ही अमेरिकेची रिझर्व्ह बँक पैशांचं नियंत्रण करते. म्हणजे कुठल्या देशाला काय द्यायचं, काय नाही हे फेड ठरवतं. कोण राष्ट्राध्यक्ष होणार हे ‘कॅपिटल हील’ ठरवतं. त्यानुसार प्रयत्न केले जातात. त्यात १०० टक्के यश येतंच असं नाही, पण जो त्यांच्या कलानं घेईल त्या उमेदवाराच्या पारड्यात भरपूर वजन पडतं.
पेंटॅगॉनला ओबामांची दुसरी टर्म नको होती. तरीपण जनमताच्या रेट्यानं त्यांना ती मिळाली. तेव्हा मात्र ओबामांना 'आता आपलं आयुष्य सार्थकी लागलं', असं वाटलं. त्यांनी जगातल्या महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन लोकांना भेटायला सुरुवात केली. त्याची सुरुवात कैरोपासून केली. कारण ते एक प्रकारे मुस्लीम देशांचं मुख्यालय आहे. ओबामांची प्रत्येक भेट मुत्सद्देगिरीतून ठरवली गेली होती. त्यानंतर ते भारतात आले आणि इंग्लंडच्या भेटीने त्यांनी भेटींचा शेवट केला. ते क्युबालाही गेले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीमध्ये ओबामांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांच्याकडून काहीतरी भरीव कामगिरी होणार असं वाटलं होतं, पण काही झालं नाही.
ओबामांच्या या भेटी-गाठी पेंटॅगॉनला मान्य नसाव्यात. त्यामुळे व्हाइट हाउस आणि पेंटॅगॉनमध्ये मतभेद निर्माण झाले; पण त्याच वेळेला तेलाच्या किमती गडगडायला लागल्या. मात्र अमेरिका तेलाबाबत सक्षम होत गेल्याने अमेरिकेची तिजोरी भरलेली राहिली (ती आपल्याकडेही आणि रशियामध्येही राहिली. या तिन्ही देशांच्या आर्थिक सुबत्तेचं महत्त्वाचं कारण तेलाच्या किमती हे आहे). त्यामुळे अमेरिकेलं रोजगारांचं प्रमाण पूर्वीपेक्षा चांगलं राहिलं आणि अमेरिकत अंतर्गत असंतोष खूप कमी तयार झाला. थोडक्यात, ओबामांना आर्थिक मंदीचा फारसा फटका बसला नाही. कारण २००८नंतर अमेरिकेची स्थिती सुधारतच गेली.
पण ओबामांच्या काळात अमेरिकेने ज्या चुका केल्या, त्या या देशाला खूप महागात पडणार आहेत.
पहिली चूक - त्यांनी होस्नी मुबारकला उडवलं. त्याला उडवायला नको होतं. कारण त्याने इजिप्त अत्यंत चांगल्या रीतीने नियंत्रणात ठेवलं होतं. इजिप्शियन आर्मी ही जगातली सर्वांत मोठी मुस्लीम आर्मी आहे. मुबारकला उडवल्यामुळे मुस्लीम ब्रदरहूड सत्तेत आलं. तेही अमेरिकेला नको होतं. त्यामुळे तेही गेलं. त्यानंतर तिथं अराजक माजलं. जे आजही थांबलेलं नाही.
दुसरी चूक - त्यानंतर ओबामांनी गडाफीला उडवलं. जोपर्यंत गडाफी होता, तोपर्यंत निर्वासित वगैरे विषय नव्हते. कारण गडाफी गुंड होता. त्याला सगळे घाबरायचे. मात्र गडाफीला उडवण्याचं श्रेय ओबामांना मिळालंच नाही. त्यांच्याआधी फ्रान्सच्या सारकोझीने बॉम्बर पाठवून ते श्रेय लाटलं.
या दोन्ही चुका गंभीर आहेत.
तिसरी चूक - ओबामांनी सौदी अरेबियाला सिरियावर हल्ला करायला सांगितलं आणि इराणबरोबरचे संबंध अचानक बदलवले. यामुळे अमेरिका सुन्नींपासून लांब आणि शियांच्या जवळ गेला. हा पॅराडाइम शिफ्ट होता. याबद्दल इस्राइल आधी आरडाओरडा करत होता, पण तो खोटा असल्याचं नंतर समोर आलं.
आता असं दिसतं आहे की, बॉल आणि बॉम्ब हे दोन्ही रियाधच्या मैदानात आहेत. तिथं ज्या देशांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, त्यांच्यातला सर्वांत मोठा देश रशिया आहे. पुतिन आणि अमेरिकेचा होणारा किंवा होणारी राष्ट्राध्यक्ष काय करतात, यावर अरब जगताचं आणि जगाचं भवितव्य ठरणार आहे.
हे सगळं घडत असताना ओबामा मात्र स्वतःच्या नोबेलमध्येच अधिक गुंतलेले होते. गडाफीविषयी ओबामांचं एखादं विधान आठवतं? मुबारकच्या वेळेला ओबामा काही बोलल्याचं आठवतं? वास्तविक, त्या वेळी त्यांनी भूमिका घ्यायला हवी होती.
ओबामांच्या चारित्र्याविषयी आपण काही बोलू शकत नाही. तो त्यांचा प्लस पॉइंट आहे; पण निरुपयोगी लोकांचं सज्जनपण काही कामाचं नसतं. नुसतंच चारित्र्य खूप लोकांकडे असतं; पण ते करत काही नाहीत. सांगायचा मुद्दा हा की, क्लिंटन, केनेडी, जॉर्ज डब्ल्यू, सिनीअर बुश या पूर्वाश्रमीच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या पैशांच्या, स्त्रियांच्या, कंपन्यांच्या खाजगीतल्या अनेक भानगडी असतात, पण अमेरिकेत त्यांचा फारसा अडसर येत नाही. अमेरिकेला स्वच्छ चारित्र्याचा नेता लागतो, अशातली बाब नाही. अमेरिकेत ढोंग नाही. अमेरिकी माणूस तुम्हाला तोंडावर सांगतो, 'तू हलकट आहेस'. तो मागून बोलत नाही. तो डोळ्यात डोळा घालून प्रश्न विचारतो. मुळात तसं करण्याची ओबामांची ताकदच नव्हती. त्यासाठी माणूस मुत्सद्दी असावा लागतो. ते काही सज्जन लोकांचं काम नाही. ओबामा इज नॉट अ हार्डलायनर अॅट ऑल!
आता ओबामांनंतर कोण?
कॅपिटल हिलने ठरवलं, तर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले, तर अमेरिका पुन्हा अति उजव्या धोरणांकडे जाईल, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. मात्र मी न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन डी.सी.मध्ये ज्या अमेरिकी विश्लेषकांना भेटलो, त्यांच्यातल्या रिपब्लिकनांचं म्हणणं वेगळं आहे. ते म्हणाले की, ‘जेव्हा आम्ही रेगनला आणलं, तेव्हा तुम्ही म्हणालाच होतात, ना 'हा काऊबॉय काय करणार? याला राजकारणाशी काय देणं-घेणं आहे?' पण त्यानं ‘रेगनॉमिक्स’ नावाचं नवीन अर्थशास्त्र अमेरिकेसाठी आणलं. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था प्रचंड बळकट झाली. मग आम्ही जॉर्ज डब्ल्यू बुशला आणलं. त्याचे तुम्ही विनोद सांगत होतात. 'तो किती मूर्ख आहे, त्याला कसं काही कळत नाही.' पण त्याने अर्थव्यवस्था वर नेली.'
आपल्याला काय कळत नाही, हे माहीत असलं की बरं असतं. मग ज्याला कळतं, त्याला आपण विचारतो. ‘मलाच सगळं कळतं’, अशी भावना असेल, तर याचा अर्थ ‘मला काहीच कळत नाही’ असा होतो. रेगन-बुश या दोघांना ‘आपल्याला काय कळत नाही’ हे माहीत होतं. रिपब्लिकन विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार तेच ट्रम्पचं आहे. आत्ता ट्रम्प जसं वागतायत तसे ते मुळात नाहीत. हा त्यांनी धारण केलेला मुखवटा आहे. याला ट्रम्पच्या बिझनेस स्कूलमधल्या एका प्राध्यापकानेही दुजोरा दिला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की, ‘ट्रम्प अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा माणूस आहे.’ आत्ता ज्या प्रकारे लोकांसमोर ते स्वत:ला सादर करतायत, तसे ते अजिबात नाहीयेत. त्यांची आत्तापर्यंतची सगळी बिझनेस मॉडेल्स यशस्वी झाली आहेत.
कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करायचा नाही, ताबडतोब प्रतिकार करायचा आणि शत्रूला केवळ नेस्तनाबूदच नाही, तर नष्ट करायचं, हे अमेरिकेचं तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान अमेरिकेतल्या ‘बायबल बेल्ट’चं आहे (आपला हिंदी भाषिकांचा जो पट्टा आहे, त्याला आपण 'काऊ बेल्ट' म्हणतो. तसाच तिकडे बायबल बेल्ट आहे). आपल्याला फार थोडी अमेरिका माहीत आहे. त्यापलीकडेही एक अमेरिका आहे. उदा. नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना इ. त्यांना ट्रम्प भुरळ घालणार. फक्त एक स्त्री राष्ट्राध्यक्ष व्हावी म्हणून अमेरिकेतल्या किती स्त्रिया हिलरीला मतं देतील, हा कळीचा मुद्दा आहे.
लेखक ‘कालनिर्णय’ प्रकाशनाचे संचालक आहेत.
jayraj3june@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment