देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची घोषणा, अगदी देश स्वतंत्र होण्यापूर्वीच सुरू झाली होती...
ग्रंथनामा - झलक
कुमार केतकर
  • डावीकडे ‘ज्वालामुखीच्या तोंडावर’च्या दुसऱ्या, मध्यभागी चौथ्या आणि उजवीकडे तिसऱ्या आवृत्तीचे मुखपृष्ठ
  • Fri , 13 October 2017
  • ग्रंथनामा Granthanama झलक ज्वालामुखीच्या तोंडावर Jwalamukhichya Tondawar कुमार केतकर Kumar Ketkar ग्रंथाली Granthali काँग्रेसमुक्त भारत Congress-mukt Bharat

‘ज्वालामुखीच्या तोंडावर’ या ज्येष्ठ पत्रकार-संपादक कुमार केतकर यांच्या गाजलेल्या पुस्तकाची नुकतीच चौथी सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली आहे. ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या या आवृत्तीला केतकरांनी लिहिलेलं हे मनोगत…

.............................................................................................................................................

‘ज्वालामुखीच्या तोंडावर’च्या या चवथ्या आवृत्तीचे निमित्त आहे, इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दीचे. पहिली आवृत्ती १९७९च्या अखेरीस आणि १९८०च्या सुरुवातीस प्रसिद्ध झाली होती. पुस्तकाचे लेखन जनता पक्षाचे सरकार सत्तेत असताना झाले होते. त्या आवृत्तीत असे ‘भाकीत’ केले होते की, जनता सरकार फार काळ टिकणार नाही आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत येऊन पंतप्रधान होतील! हे ‘भाकीत’ कोणतीही कुंडली न मांडता आणि कोणत्याही ग्रह-ताऱ्यांना न विचारता केले होते. जनता पक्षाचा जन्म, जयप्रकाशांचे बेभरवशाचे व दिशाहीन राजकारण आणि इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची राजकीय शैली यांचा वेध घेऊन ते भाकीत केलेले होते. ती आवृत्ती दीड-दोन महिन्यांतच संपली.

जनता पक्षाची राजवट मार्च १९७७ ते जुलै १९७९. म्हणजे मोरारजी देसाई पंतप्रधान असल्याचा सुमारे सव्वादोन वर्षांचा काळ. त्यानंतर, म्हणजे मोररजी सरकार गडगडल्यानंतर, चरणसिंग पंतप्रधान झाले. पण ते एकही दिवस लोकसभेसमोर येऊ शकले नाहीत. लोकसभेत विश्वासदर्शक ठराव यायच्या आतच त्यांचे सरकार अंतर्धान पावले. जानेवारी १९८०मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने निवडून येऊन चवथ्यांदा पंतप्रधान झाल्या. (१९६६, १९६७, १९७१ आणि १९८०).

परंतु हा चार वर्षांचा काळ विलक्षण चित्तथरारक आणि महाभयंकर अशा घटनांनी व्यापलेला होता.

पुस्तकाची दुसरी आवृत्ती संजय गांधी यांच्या आपघाती निधनानंतर (२३ जून १९८०) दोन वर्षांनी प्रसिद्ध झाली आणि तिसरी आवृत्ती इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्येनंतर – म्हणजे ३१ ऑक्टोबर १९८४नंतर!

आता सुमारे ३३ वर्षांनंतर ही चवथी आवृत्ती प्रकाशित होत आहे. हा काळही सर्वार्थाने झपाटलेला, द्वेषमूलक राजकारणाने बहकलेला, हिंसाचाराने वेढलेला आणि एका अनिश्चिततेच्या भोवऱ्यातून बाहेर येताच दुसऱ्या भोवऱ्यात सापडत जाणारा काळ आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सातच वर्षांनी राजीव गांधींची हत्या झाली – २१ मे १९९१.

त्यानंतर तो आजतागायत नेहरू-गांधी कुटुंबापैकी कुणीही थेट, अप्रत्यक्षपणे सरकारमध्ये नाही. परंतु तरीही गेली २६ वर्षे नेहरू-इंदिरा-राजीव यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, धोरणांचा, राजकारणाचा प्रभाव आणि संदर्भ टिकून आहे. किंबहुना काँग्रेसचेच नव्हे तर देशाचेच राजकारण त्यांच्या जीवनाच्या आलेखापासून वेगळे करता येत नाही.

देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची गर्जना आणि वल्गना सध्या खूपच वरच्या आवाजात चालू आहे. ‘काँग्रेस’ म्हणजे ‘भ्रष्टाचार’ आणि ‘भ्रष्टाचारी व्यवस्था’ म्हणजेच ‘काँग्रेस संस्कृती’ अशी मांडणीही तमाम मीडियामध्ये, विशेषत: ‘सोशल मीडिया’त सुरू आहे. अशी मांडणी करणारे आंधळे आणि बहिरे नाहीत. त्यांनी जाणीवपूर्वक सध्याच्या मोदी राजवटीत सुरू असलेला काळा बाजार, काळ्या पैशाचे प्रचंड व्यवहार, बेबंदशाही आणि बेमुर्वतशाही याकडे पाहायचे नाही वा त्यासंबंधी ऐकायचे नाही, त्याविषयी लिहायचे नाही वा जाहीर बोलायचे नाही असे ठरविले आहे. अनेक भोळसट वा मूर्ख माणसांनीही चेहऱ्यावर बुरखा चढविला आहे.

परंतु देश ‘काँग्रेसमुक्त’ करायचा विडा उचलणारे फक्त नरेंद्र मोदी-अमित शहा नाहीत. त्या घोषणेचा ‘कॉपीराईट’ही त्यांच्याकडे नाही! देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची घोषणा, अगदी देश स्वतंत्र होण्यापूर्वीच सुरू झाली होती. लॉर्ड कर्झन (बंगालची फाळणी करणारे इंग्रज राजवटीचे स्वयंभू शहेनशहा) यांनी देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची प्रतिज्ञा सुमारे ११० वर्षांपूर्वीच केली होती. काँग्रेस तेव्हा पंचवीस वर्षांचीही नव्हती, पण लॉर्ड कर्झन आणि पर्यायाने इंग्रज साम्राज्यवाद्यांनी तेव्हाच काँग्रेसचा धसका घेतला होता. पुढे तीच गर्जना राम मनोहर लोहियांनी केली. त्यानंतर देशाला ‘काँग्रेसमुक्त’ आणि ‘भ्रष्टाचारमुक्त’ करण्याचा विडा जयप्रकाश नारायणांनी उचलला होता. तोच अर्धवट उरलेला विडा विश्वनाथ प्रतापसिंग यांनी उचलला. पण जनता पक्ष आणि जयप्रकाश नामोहरम होऊन इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या होत्या. काँग्रेसचा आणि खुद्द इंदिरा गांधींचा १९७७मध्ये पराभव झाल्यावर तशाच जल्लोषात जाहीर केले गेले की, ‘इंदिरा गांधी संपल्या’ आणि काँग्रेसही!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

इंदिरा गांधी जाऊन ३३ वर्षे झाली तरी आजही त्यांना ‘संपविण्याचे’ प्रयत्न चालू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत जनसंघाला आणि त्याच्या भारतीय जनता पक्ष या १९८०च्या अवताराला आणि नरेंद्र मोदीरूपी त्यांच्या महा-अवताराला तर नेहरू प्रणालीची व कुटुंबाची इतकी धास्ती वाटते की, जशी कंसाला वसुदेवाच्या मुलांबद्दल (जन्माला आलेल्या व न आलेल्या) वाटावी तशी!

नेहरू, इंदिरा  वा राजीव यांचे नाव, चिन्ह आणि प्रतिमा व संस्था मुळापासून उखडून काढण्याचा संघपरिवाराचा अक्राळ-विक्राळ प्रयत्न चालू आहे. पंडित नेहरूंनी उभे केलेले ‘प्लॅनिंग कमिशन’ उर्फ नियोजन आयोग असो वा इंदिरा गांधींनी आणलेले बॅंक राष्ट्रीयीकरण असो – त्या सर्व गोष्टींना विस्मृतीत ढकलून नवे ‘हिंदू राष्ट्र’ निर्माण करण्याचे जोरदार, आक्रमक आणि हिंस्र प्रयत्न सुरू आहेत. नरेंद्र मोदी हे नेहरू-इंदिरा-राजीव या सर्वांपेक्षा श्रेष्ठच नव्हे तर भारताच्या इतिहासात न भूतो-न भविष्यती असे मसीहा आहेत, असे चित्र सर्व मीडिया-सोशल मीडियाला दावणीला बांधून रंगविले जात आहे.

तरीही त्यांना इंदिरा गांधींना संपविता आलेले नाही – कारण इंदिरा गांधींचे स्थान कोट्यवधी लोकांच्या हृदयात कोरले गेलेले आहे. त्यांची प्रतिमा मीडियाला हाताशी धरून निर्माण केली गेली नव्हती. इंदिरा गांधींच्या काळात इतके खासगी टीव्ही चॅनेल नव्हते, इंटरनेट नव्हता, सोशल मीडिया नव्हता आणि तरीही त्यांचे कार्यकर्तृत्व आणि त्यांच्या प्रतिभेची प्रतिमा लखलखीत आहे. त्या कार्यकर्तृत्वाचा आणि प्रतिभेचा शोध आणि वेध या चवथ्या आवृत्तीत पुन्हा घेत आहे.

.................................................................................................................................................................

‘ज्वालामुखीच्या तोंडावर’ या कुमार केतकर यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4256

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 16 October 2017

मोहनदास करमचंद गांधींनाही भारत काँग्रेसमुक्त करावासा वाटंत होता. यामागचं जे तत्कालीन कारण होतं तेच कारण आज २०१७ सालीही आहे. मग मोदींच्या नावाने बोंबाबोंब कशाला? अशी फुकाची अपप्रचारामुळे मोदींना मतं मिळतात. असो. राष्ट्रनिर्मिती म्हंटली की हिंसा होतेच. कुठलंही राष्ट्र त्यातनं सुटलं नाहीये. अगदी शिवाजीमहाराजांनाही राष्ट्रनिर्मितीसाठी हिंसेचाच आधार घ्यावा लागला. मग कुणाची तरी एव्हढी का फाटलीये? -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......