हा गुणवंत लेखक या आधीच कीर्तीवंत व्हायला हवा होता
ग्रंथनामा - झलक
सुनील कर्णिक
  • ‘अध्यात-मध्यात’चं मुखपृष्ठ
  • Fri , 13 October 2017
  • ग्रंथनामा Granthanama झलक अध्यात-मध्यात हेमंत कर्णिक सुनील कर्णिक सदामंगल पब्लिकेशन

प्रसिद्ध स्तंभलेखक हेमंत कर्णिक यांचा ‘अध्यात-मध्यात’ हा लेखसंग्रह नुकताच सदामंगल पब्लिकेशन, मुंबई यांनी प्रकाशित केला आहे. या पुस्तकाला पत्रकार-संपादक सुनील कर्णिक यांनी लिहिलेली प्रस्तावना...

.............................................................................................................................................

हेमंत कर्णिक हे पत्रकार होता होता राहिलेले गृहस्थ आहेत. त्यांनी वर्तमानपत्रात भरपूर लेखन केलं; पण पत्रकारिता केली नाही. बातम्यांमध्ये नेहमीच कहाणी (स्टोरी एलिमेंट) दडलेली असते; तर यांच्या लिखाणात विपुल विचार असतो. बातम्यांची भाषा साधीसोपी असते, तर यांची नसते. त्यामुळे की काय, पत्रकार मंडळींच्या घोळक्यात ते सहसा दिसत नाहीत किंवा प्रेस क्लबमध्ये रात्री रंगणाऱ्या पार्ट्यांमध्येही कधी आढळत नाहीत. पण बहुधा त्यामुळेच आजचं वर्तमानपत्र जशी उद्याची रद्दी होते, तसं त्यांच्या लेखनाचं झालेलं नाही आणि म्हणूनच त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह प्रसिद्ध होत आहे.

अर्थात रोज शेकडो मराठी दैनिकं प्रसिद्ध होतात आणि त्यात हजारो स्तंभलेखक लेखन करतात; पण त्यांची पुस्तकं सहसा निघत नाहीत. तर मग यांचं कसं काय निघतं?

त्याचं असं आहे की, आज तुम्ही ज्या पायरीवर असाल तिथं तुमच्यात काही खास वैशिष्ट्य आढळलं, तर तुम्हाला वरच्या पायरीवर पदोन्नती मिळते. या न्यायानं हेमंत कर्णिकांच्या लेखनात निश्चितच काही सत्त्व आणि स्वत्व आहे. म्हणूनच आज ते ग्रंथकार म्हणून रसिकांसमोर येत आहेत.

अशी कोणती वैशिष्ट्यं आहेत या लेखकाच्या लेखणीत? त्याची विषयाची निवड खास आहे. त्याची मांडणी, भाषाशैली, विचारीपण, वाद-विवादाचं कौशल्य, संयत धीटपणा, विज्ञान-गणित-क्रीडा यांमधली पारंगतता या सगळ्यामुळे या लेखनाला छान आगळेपण आलं आहे. इतर मराठी लेखकांमध्ये नाहीत, असे काही खास गुण या लेखकामध्ये आहेत आणि ते निश्चितच पुस्तकरूपानं संग्रहित होण्याजोगे आहेत. त्यातले काही छोटेमोठे उतारे, सुभाषितवजा वाक्यं पुढे दिली आहेत. ती वाचल्यावर त्यातला सकसपणा मनाला भावल्याखेरीज राहणार नाही.

१. ‘... म्हणून गरिबांना एखाद्या स्थानिक दादाचा, बेधडक प्रवृत्तीचा जास्त आधार वाटतो. याच भावनेतून मुंबईतला ‘खालचा वर्ग’ शिवसेनेला मत देत आला. हीच भावना जेव्हा महाराष्ट्राच्या अंतर्भागात पसरली, तेव्हा तिथेही शिवसेनेचा पाठिंबा वाढला. गुंडच राज्य करणार, तर तो आपला गुंड असावा, या भावनेतून हे झालं. पण गुंड आपला-तुमचा नसतो, स्वत:चाच असतो. आपण निर्माण केलेला भस्मासुर केव्हा ना केव्हा आपल्यावर उलटतोच.’

२. ‘जगताना घेतलेल्या अनुभवांवरून जरी लिखाण केलं, तरी अनुभव घ्यायला मन लागतं आणि मन म्हणजे नुसती चाळणी नसते. अनुभवांची निवड करणारी; मन भट्टीसारखं असतं, अनुभवांना शिजवून त्यांना नवीन चव मिळवून देणारं. प्रत्येक भट्टी वेगळी.’

३. ‘जे विसरून जायचं, ते शिक्षण कसं असेल?’

४. ‘बलात्कार करणारा तुर्की वा देशी मुसलमान वा परदेशी इंग्रज असण्याऐवजी इथलाच हिंदू मराठा असला, तरी बलात्कार सुखकारक होत नाही.’

५. ‘गुणवत्ता ती गुणवत्ता. पाकिस्तानचा संघ जर असेलच भारतापेक्षा श्रेष्ठ, तर पाकिस्तानच जिंकायला पाहिजे.’

हे नमुने वाचल्यावर सहज जाणवतं की, हे लेखन खणखणीत आणि सणसणीत आहे. पण ते ‘आवाजी’ नाही. जे बोलायचं ते सरळ आणि स्पष्ट. त्यात आरंभापासून अखेरर्पंत एक निश्चित भूमिका आहे. प्रगल्भता आहे आणि पुरोगामित्वही आहे.

त्यात खरी रंगत येते ती ‘शत्रु’ पक्षाचीही मांडणी नेटकेपणाने केल्याने. ‘कोणीतरी, देशच्या देश, त्या देशाची सारी लोकसंख्या आपला विनाकारण द्वेष करते; आपल्याशी शत्रुत्व धरते, असं म्हणणं नुसत्या आत्मकेंद्रितपणाचं नव्हे, तर माथेफिरू आत्मकेंद्रितपणाचं लक्षण आहे,’ अशी भेदक टीका त्यांनी केली आहे. ‘या मूर्ख माणसांना किक्रेटरसिक म्हणणं म्हणजे मला माझा अपमान वाटतो.’ अशी स्पष्टोक्ती म्हणजे त्यांची खासीयत आहे आणि ‘शिवसेनेचा शिवाजी म्हणजे नुसती गुंडगिरीची प्रेरणा.’ यात तर कडक आसूडाचा संयत फटकारा आहे. लेखकाची परिपक्वता, समाजसन्मुखता अंतरीची आहे.

पण त्याचबरोबर ही लेखणी अनाग्रही आहे. ऋजू आहे आणि मृदूही आहे. त्यांची सुभाषितवजा वाक्यं इतकी देखणी आहेत की, वाचकांची दाद मिळवल्याखेरीज राहणार नाहीत.

‘भूतकाळ म्हणजे इतिहास नव्हे; इतिहास म्हणजे वर्तमानात वावरणारा भूतकाळ.’

‘डोंट लेट स्कूलिंग इंटरफिअर विथ युअर एज्युकेशन!’

‘सर्वांत मधुर पेय कुठलं’ या प्रश्नाला ‘पाणी’ असं उत्तर द्यायला मी चुकणार नाही.’

‘केव्हा केव्हा साधा कॉमनसेन्स यालाही साक्षात्कार व्हावा लागतो.’

‘कायदा म्हणजे आपल्या बाजूच्या लोकांच्या संरक्षणासाठी आणि आपल्या विरुद्ध पार्टीतल्यांना धडा शिकवण्यासाठी वापरण्याचं हत्यार नव्हे; कायदा हा आपल्या डोक्यावर बसणारा राजा आहे, असं इंग्लंडमध्ये समाजमूल्य आहे.’

असा हा कसदार आणि गुणवंत लेखक खरं तर या आधीच कीर्तीवंत व्हायला हवा होता. पण जिथं वसंत पळशीकरांचीही उपेक्षा होते, तिथं हेमंत कर्णिकांची का कथा? त्यातून आपला समाज आता टिळकांपासून ठाकऱ्यांर्पंत घसरलेला असल्याने १९९५ सालच्या सुमाराला केलेल्या या लेखनाला ग्रंथरूप मिळण्यासाठी २०१७ साल उजाडावं लागलं आहे. तेही अर्थातच, स्वागतार्ह आहे; पण त्याचं खरं चीज होईल ते वाचकांच्या पसंतीची पावती मिळेल तेव्हा आणि ते मात्र आजच्या काळात बरंचसं कठीण वाटतं.

का? त्याची कारणं मी नव्यानं सांगायला नकोत. ती सर्वांना ठाऊक आहेत. गावोगावची गंथालयं बंद होताहेत, वगैरे ...

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

पण यापेक्षा व्यापक असा एक मुद्दा आहे.

आपला महाराष्ट्रीय समाज गेली अनेक वर्षं किती उथळ, वरवरचं जीवन जगत आहे. मुंबई आपल्या हातातून सुटत चालली असली, तरी आपण किती बेफिकीर आहोत? आपल्या वर्तमानपत्रातली बातमी सहसा देशभर गाजत नाही. आंबेडकर, लता, सचिन या तिघांखेरीज चौथं नाव भारतभर प्रसिद्ध नाही. कुठल्याही क्षेत्रात नेत्रदीपक नेतृत्व उभं राहत नाही. सर्व जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहं नाहीत. आश्रमशाळांची स्थिती अत्यंत वाईट आहे. दारिद्रयरेषेखालील वंचितांना कोणी वाली नाही. तृतीपंथीय या सर्वांत उपेक्षित समाजघटकाला सर्वांनीच वाऱ्यावर सोडलेलं आहे.

याचा अर्थ असा की महाराष्ट्रीय समाजाला उज्ज्वल भविष्काळ नाही. कदाचित येत्या पन्नास वर्षांतच तो नामशेष होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर आपली मूळ आडनावं बहुधा लोप पावतील आणि सिंग, ठाकूर आदी इतर आडनावांचा आपण स्वीकार करू.

पण आज तरी चांगल्या वाचकांच्या अभावी ‘अध्यात-मध्यात’सारखी सकस पुस्तकं बाजूला पडू द्यायची नसतील, तर त्याची इंग्रजी आवृत्ती प्रसिद्ध व्हायला हवी. या संग्रहाचे कर्ते हेमंत कर्णिक हे हातखंडा इंग्रजी लेखन करू शकतात. त्यांनी या सूचनेचा अवश्य विचार करावा, अशी आग्रहाची विनंती आहे.

अध्यात-मध्यात - हेमंत कर्णिक

सदामंगल पब्लिकेशन, मुंबई, मूल्य - २२५ रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4262

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vinod jamale

Fri , 27 October 2017

सुनील कर्णिकांच्या नेहमीच्या अडाणी आत्मपीडेचा प्रत्यय याही लेखात आला. "असा हा कसदार आणि गुणवंत लेखक खरं तर या आधीच कीर्तीवंत व्हायला हवा होता. पण जिथं वसंत पळशीकरांचीही उपेक्षा होते, तिथं हेमंत कर्णिकांची का कथा?" हे विधान 'उपेक्षा' म्हणजे काय? असा नवीन प्रश्न उपस्थित करते. हेमंत कर्णिक यांची पुस्तके मनोविकास प्रकाशन, अक्षर प्रकाशन आदींनी काढली आहेत. अक्षर दिवाळी अंकाचे संपादन ते करत आले आहेत. त्यांचे इतरही कर्तृत्व किमान मराठी वाचकवर्गात तरी परिचित आहे. याची आकडेवारी सुनीलरावांनी दिलेली नाही, मीही ती देऊ शकत नाही. परंतु 'उपेक्षा' असे बोलून संपूर्ण समाजाचे मूल्यमापन होत नसते. केवळ उरबडवेपणा होत असतो. देशभर ज्ञात असलेली मराठी नावे असे म्हटल्यावर सुनीलरावांना केवळ 'आंबेडकर, लता, सचिन' एवढीच नावे आठवली, हे अडाणीपणाचे लक्षण आहे. किंवा केवळ मराठी वर्तमानपत्रे वाचल्याचे लक्षण आहे. कोसंबी पितापुत्र, माधुरी दीक्षित, शरद पवार, सुखदेव थोरात, कुमार केतकर, यशवंतराव चव्हाण, मिलिंद सोमण- अशी एक ना अनेक विविध क्षेत्रांतील मराठी नावे आहेत. यात गुणावगुण विचारात घेतलेले नाहीत. केवळ 'मराठी' असणे लक्षात घेतलेले आहे. मराठी समाजात दोष नाहीत असे नव्हे. त्यांचे मूल्यमापन व्हायलाच हवे. परंतु या कर्णिकांसारखे लोक केवळ मुंबईतून आखुड दुर्बिण लावून विनाकारण सार्वजनिक अवकाशात पिंका टाकत बसतात, हे गैर आहे. परंतु ते तसेच असणार. ते का, हे मुळात कर्णिकांनी आत्मचिकित्सेने वाटले तर शोधावे. अन्यथा बाहेरचे एकच बोट पाहात खेद व्यक्त करण्यात आनंद मानावा. असो.


Gamma Pailvan

Mon , 16 October 2017

शिवसेना = गुंडगिरी हे समीकरण डोळ्यात पक्कं बसल्यावर दुसरं काय सुचणार म्हणा. त्याचं काय आहे की शिवाजी महाराज देखील सिंहासनावर बसेपर्यंत 'गुंड', 'दरोडेखोर', 'बगावतखोर' असेच होते. ही बिरुदं पुसून काढण्यासाठी राजांनी सिंहासन धारण केलं. टिळक व सावरकर सुद्धा राजद्रोहीच होते. शिवसेनेस उगीच नावं ठेवल्याने हेमंत कर्णिकांच्या मनात महाराष्ट्रीय ओळखीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी माणसाचं मानस कधीतरी यांना कळेल काय? अशांनी मराठी जाणीवेच्या नावाने भाकड शोकच करावेत. काल पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढा जोमदारपणे पेटला होता. आज पंजाब आणि बंगाल अर्धे कापले गेलेले आहेत. एक आहे तो महाराष्ट्र. भारताचं वैचारिक नेतृत्व करायची क्षमता महाराष्ट्रात खचितच आहे. बोला करणार का कर्णिकसाहेब तुम्ही? सुरुवात म्हणून बाळासाहेबांनंतरची शिवसेना हा भाऊ तोरसेकर यांचा लेख वाचून पहा म्हणून सुचवेन. लेख इथे आहे : http://bhautorsekar.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87/ -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......