अजूनकाही
१. दिवाळीच्या काळात राज्यात फटाक्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावाबद्दल बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार काही दिवसांपूर्वीच दिल्लीत फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टानंही निवासी भागात फटाकेविक्रीचे परवाने रद्द करण्याचा आदेश दिला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांड बंद करा, असे आदेश निघायचेच बाकी आहेत. ते देखील काढा हवं तर. अशीही आपल्याकडच्या सणांची रया गेली आहेच. शांततेचा अतिरेक झाला तर एक दिवस असंतोषाचा स्फोट होईल, अशा शब्दांत उद्धव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नाहीतर काय? चीनचे फटाके आणि ख्रिस्ती नाताळचे कंदील यांच्या समन्वयातून आपण हिंदूंचा सण म्हणून केवढी सर्वसमावेशक दिवाळी साजरी करतो? गणपतीत आणि नवरात्रात आपल्याच बांधवांचे कान फोडून झाले की, दिवाळीत कान फोडण्याबरोबरच डोळेही आंधळे करून त्यांना धुरात गुदमरवून टाकण्याची गंमत सर्वोच्च न्यायालयाला माहिती नाहीये. अशा सणांमुळेच हिंदूंची प्रतिकारशक्ती वाढेल, ते चर्चच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या न्यायालयांना आणि पुरोगामी हिंदूंना नको आहे. सण साजरे करण्याच्या सगळ्या शांत, समंजस आणि सात्विक पारंपरिक पद्धती बुळ्या आहेत; यापुढे सगळे सण हे हिंस्त्र धार्मिक शक्तिप्रदर्शन म्हणूनच आम्ही साजरे करणार.
.............................................................................................................................................
२. एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरी प्रकरणात पश्चिम रेल्वे प्रशासनाने रेल्वे अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली आहे. पाऊस आणि अफवेमुळे ही दुर्घटना घडल्याचं पश्चिम रेल्वे प्रशासनानं चौकशी समितीच्या अहवालात नमूद केलं आहे. २९ सप्टेंबरला एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी पश्चिम रेल्वेच्या पाच सदस्यीय समितीनं केली. अहवालासाठी रेल्वे पुलांवरील गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या पर्यायांची यादी देण्यात आली आहे. मात्र या दुर्घटनेसाठी रेल्वे अधिकारी जबाबदार नसल्याचा निष्कर्ष काढत रेल्वे प्रशासनानं हात वर केले आहेत. ‘पाऊस आल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात रेल्वे पुलावर जमले होते. पुलावरील गर्दी वाढल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. पुलावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. प्रत्येकजण पुलावरुन पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता आणि चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरता येणार नाही,’ असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंदर भाकेर यांनी सांगितलं.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. एखाद्याच्या भाळी रेल्वे स्टेशनावरच्या चेंगराचेंगरीत मृत्यूच लिहिला असेल, तर ते विधिलिखित कोण बदलू शकेल? या स्टेशनांमध्ये गर्दीच्या वेळी इतकीच गर्दी असते आणि लोक एकमेकांना न तुडवता पुढे सरकत असतात. तेव्हा चेंगराचेंगरी होत नाही. त्याच दिवशी झाली, हा दैवाचा खेळ नाही का? कधीतरी पाऊस पडेल, तेव्हाच नेमक्या सर्व प्लॅटफॉर्मांवर एकावेळी गाड्या येतील आणि फुलं पडलीचं लोक पूल पडला, असं ऐकतील, हे गृहीत धरून मुळात ब्रिटिशांनी रेल्वेची, स्टेशनांची उभारणी केली नाही, ही खरं तर त्यांची चूक आहे.
.............................................................................................................................................
३. गुजरातमध्ये निवडणुकांच्या गदारोळात पोरबंदर या जन्मस्थळीच असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसतं. पोरबंदरच्या चौकात उभारण्यात आलेल्या गांधीजींच्या पुतळ्याला चष्मा घातलेला नाही. तीन दिवस स्थानिक प्रशासनानं या पुतळ्याकडे लक्ष दिलं नाही. आता ट्विटरवरुन या पुतळ्याचं छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणी चौकशी समितीनं तीन देशांचा दौरा करून दिलेल्या अहवालात असं म्हटलं आहे की, चष्मा नसण्याची तीन कारणं संभवतात. समाजाच्या हितासाठी जे राजकारण बापूजींनी भारतात रुजवण्याचा प्रयत्न केला, तो आता पोरांच्या बंदरगिरीचा खेळ झाल्यामुळे बापूंनी असह्य होऊन स्वत:च चष्मा फेकला असावा. गुजरातमधली स्थिती पाहवत नाही, म्हणून बापूंनी चष्मा फेकलाय आणि डोळेही मिटलेत, अशा अफवा काही समाजकंटक पसरवत असले तरी प्रत्यक्षात गुजरातमधल्या विकासाचा प्रकाश असह्य झाल्यामुळेही बापूंनी हा निर्णय केला असल्याची शक्यता आहे.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
४. निश्चलनीकरण आणि जीएसटी या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक महत्त्वाच्या सुधारणा असल्याचं सांगून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांचं समर्थन केलं आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला मंदीनं घेरले असल्याची भावना जागतिक स्तरावर अस्तित्वात नसल्याचंही जेटली म्हणाले. अर्थव्यवस्थेसंबंधी सुयोग्य जाण नसलेली भारतीय मंडळीच मंदीची ओरड करतात, असा टोला त्यांनी लगावला. न्यूयॉर्कमध्ये कोलम्बिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, केंद्र सरकारनं हाती घेतलेल्या जीएसटीसारख्या आर्थिक सुधारणा या महत्त्वपूर्ण संस्थात्मक आणि रचनात्मक सुधारणा असून, दीर्घावधीत त्यांची गोड फळे चाखता येतील. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अधिक मजबुतीने वाट खुली करणाऱ्या या उपाययोजनांची आवश्यकताच होती, असं ते म्हणाले.
या मंडळींनी घालून ठेवलेला घोळ भविष्यात कुणी निस्तरला आणि अर्थव्यवस्था रूळावर आणली, तर तीही नोटबंदी आणि जीएसटीची मधुर फळं आहेत, असं सांगण्याची ही पूर्वतयारी दिसते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक या संस्था भारतातच झुमरीतलय्याला आहेत की काय? त्यांचं सोडा, सगळं बरोबरच चाललंय, हे निदान सरकारनंच ठिकठिकाणी नेमलेल्या अर्थतज्ज्ञांनी तरी सांगायला हवं, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयांमध्ये तरी त्याचे पडसाद उमटायला हवेत. ते का होत नाहीये?
.............................................................................................................................................
५. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहा याची पाठराखण केल्याबद्दल यशवतं सिन्हा यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपने जी नैतिकता इतके दिवसात कमावली होती, ती जय शहा यांच्या कृत्यांचं समर्थन केल्यानं मातीमोल झाली आहे, असं सिन्हा यांनी सांगितलं. जय शहा यांच्या उद्योगाची सोळाशे पटींनी जी अचानक वाढ झाली त्याबाबत वृत्त देणाऱ्या ‘दी वायर’ या संकेतस्थळावर १०० कोटींचा बदनामीचा खटला भरण्याच्या कृतीचाही त्यांनी निषेध केला आहे. माध्यमांची अशी मुस्कटदाबी करणं टाळायला हवं, जय शहा यांच्या बचावात केंद्रीय मंत्र्यांनी उडी घेण्याचं कारणच नव्हतं. ते केंद्रीय मंत्री आहेत, जय शहा यांचे सनदी लेखापाल नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं होतं, असेही सिन्हा म्हणाले.
सिन्हा यांच्या दाव्यांनी भारतीय जनता पक्षात प्रचंड खळबळ उडाली आहे म्हणे आणि पक्षात कसून शोध घ्या, असे वरिष्ठांचे आदेश आहेत. सिन्हा यांनी जी मतं मांडली आहेत, तीच अनेकांनी याआधीच मांडून झालेली असल्यानं त्यांच्यात काहीच नावीन्य नाही. मात्र, भाजपनं इतके दिवसात कमावलेली नैतिकता या त्यांच्या शब्दप्रयोगानं सगळा गोंधळ उडवून दिला आहे. ती कधी, कोणत्या गुणांवर कमावली होती, हेच कुणाला माहिती नाही आणि पक्षाची (कसली का असेना) एक कमाई ‘मोटा भाईं’ना माहिती कशी नाही, यावर सगळा धुरळा उडाला आहे.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment