अजूनकाही
देवेंद्र फडणवीस सरकारवर रोष व्यक्त करणाऱ्या समाज घटकांची दिवसेंदिवस वाढच होताना दिसतेय. आधीच शेतकरी, अंगणवाडी कर्मचारी रागात आहेत. मुंबईत लोकल प्रवासी २३ जणांच्या चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूने संतप्त आहेत. पेट्रोलच्या भाववाढीने मध्यमवर्गात अस्वस्थता आहे. जीएसटीने छोटे व्यापारी चिडलेत. त्यात आता वारकरी आणि शिर्डीच्या साईबाबांचे भक्तही सरकारवर संताप व्यक्त करत आहेत. वारकरी काल १० ऑक्टोबरला मुंबईत आझाद मैदानात जमून सरकारचा टाळ-मृदंग वाजवून हरिनामाचा गजर करत निषेध केला. तिकडे शिर्डीत साईभक्त पत्रकं काढून निषेध नोंदवताहेत. सरकार साईबाबांच्या स्मृतिशताब्दी वर्षात बाबांच्या विचाराला मारक कृती करतंय, आमच्या श्रद्धा-भावनांना डिवचतंय, असा साईभक्तांचा रोष व्यक्त होतोय.
वारकरी का आंदोलन करताहेत?
वारकऱ्यांनी आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन मागणी केली होती की, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर राजकारण्यांना न घेता वारकऱ्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करा. वारकऱ्यांचा देव वारकऱ्यांच्या ताब्यात द्या, पुढाऱ्यांची मुजोरी इथं नको. आम्ही ४० वर्ष संघर्ष करून बडवे, उत्पात, सेवेकरी हटवले. आता पुन्हा आमच्या देवाला पुढाऱ्यांचा गराडा पडलाय. मंदिर समितीच्या ११ सदस्यांपैकी बहुतांश पुढारी आहेत. अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे कराड (सातारा)चे अतुल भोसले यांची नेमणूक केलीय. ही नियुक्ती ३ जुलै २०१७ रोजी झाली. तेव्हापासून वारकरी संघर्षाच्या पवित्र्यात होते. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसमोर वारकऱ्यांनी, प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली तरी काही दाद मिळाली नाही. त्यानंतरही वारकऱ्यांनी सरकारला वेळ दिला, पण काहीच घडत नव्हतं. त्यामुळे नाईलाजानं वारकऱ्यांना मुंबईत यावं लागतंय, असं वारकऱ्यांचे नेते राजाभाऊ चोपदार यांचं म्हणणं आहे.
कालच्या आंदोलनाला फडणवीस सरकार काय प्रतिसाद देतंय ते दिसलंच. या वारकरी आंदोलनाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत; तर पुढचं आंदोलन राज्यभर नेण्याचा बंडातात्या कराडकर, राजाभाऊ चोपदार, श्यामसुंदर सोन्नर यांचा निर्धार आहे. राज्यातले सर्व कीर्तनकार, प्रवचनकार या आंदोलनात आघाडीवर आहेत. वारकरी संस्था, संघटनांची संघटित शक्ती आहे. या शक्तीला प्रतिसाद न देणं सरकारला खूप महागात पडेल. कारण कीर्तनकार, प्रवचनकार यांचा समाजमनावर मोठा प्रभाव पडतो. या वर्गानं सरकारविरोधी रान उठवलं, तर सरकारच्या विश्वासार्हतेला नक्कीच झटका बसेल. वारकऱ्यांना असं वाटतंय की, आपल्याला हे सरकार सन्मान देत नाही. तसंच साईभक्तांनाही वाटू लागलंय की, आपल्या श्रद्धांना हे सरकार डिवचत आहे. जाणूनबुजून एक शक्ती साईबाबांच्या विचारांवर हल्ला करतेय.
साईभक्तांना असं का वाटतंय?
सध्या साईभक्तांची स्मृतिशताब्दी सुरू आहे. १८५८ साली साई शिर्डीत १६ व्या वर्षी प्रकटले आणि १५ ऑक्टोबर १९१८ रोजी साईंनी समाधी घेतली. स्मृतिशताब्दीच्या निमित्तानं नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात उल्लेख केला की, साईबाबांची जन्मभूमी पाथरी जि. परभणी हे गाव असून त्या गावाचा विकास सरकार करेन. राष्ट्रपतींचा शब्द हा खूप महत्त्वाचा असतो. त्या भाषणाचं सरकारी रेकॉर्ड होतं. पाथरीच्या उल्लेखानं शिर्डीकर दुखावले गेले. पाथरीचा जावई शोध कुणी लावला? खरं म्हणजे स्वतः साईबाबांनी त्यांचं कूळ आणि मूळ गुढ ठेवलं. त्यांची जात, त्यांचा धर्म याबद्दलची माहिती संदिग्ध आहे. त्यामुळे साई सर्व धर्मियांना आपले वाटतात. हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, जैन, लिंगायत असे वेगवेगळ्या धर्माचे लोक म्हणूनच ‘शिर्डीस पाय लागो’ची भावना मनी धरतात. लांबहून येतात. साईंचा ‘श्रद्धा आणि सबुरी’चा, ‘सबका मलिक एक है’ हा विचार घेऊन जातात. एका अर्थानं शिर्डी हे ‘सेक्युलर’ देवस्थान बनलंय. पण राष्ट्रपतींच्या दौऱ्यात पाथरीचा उल्लेख झाल्यानं पाथरीत प्रति शिर्डी उभी करायचा तर सरकारचा मानस नाही ना? अशी शंका शिर्डीकरांनी व्यक्त केलीय. यापूर्वी साईभक्तांनी प्रति शिर्डी, प्रति साई मंदिर उभारायला संघटित विरोध केला होता, हा इतिहास आहे.
पाथरीच्या उल्लेखाविषयी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की, साईंच्या कुठल्याही अधिकृत चरित्रात पाथरीचा उल्लेख नाही. मग बाबांचा पाथरीचा जन्म ही माहिती राष्ट्रपतींना कुणी दिली? ही माहिती खोटी आहे, असं साईभक्त मानतात. उद्या राष्ट्रपतींना माहितीच्या अधिकारात कुणी साई भक्तानं विचारलं की, ही खोटी माहिती तुम्हाला कुणी पुरवली? तर राष्ट्रपतींना माफी मागावी लागेल. या प्रकरणात राष्ट्रपतींची केवढी विश्वासार्हता पणाला लागेल. खोटी माहिती एक विशिष्ट अजेंडा ठेवून पुरवण्यात येतेय, असा साईभक्तांना संशय आहे.
.............................................................................................................................................
नवनवीन पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
हा संशय बळावणाऱ्या इतरही काही घटना राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या वेळी शिर्डीत घडल्या. सगळीकडे भगवे झेंडे लावले गेले. यापूर्वी असे झेंडे शिर्डीत कधी दिसले नव्हते. मंदिर परिसरात ध्वजस्तंभ उभारला. हा ध्वजस्तंभ कुंभ मेळ्यातला आहे. ध्वजस्तंभावर त्रिशूळ आहे. या त्रिशुळाचं शिर्डीत काय काम? असा प्रश्न साईभक्त विचारताहेत. साईबाबांनी सबुरीचं सुफी तत्त्वज्ञान सांगितलं. तिथं एका धर्माशी संबंधित आणि परत ते हिंस्त्रतेचं प्रतीक, कुणाला तरी मारण्यासाठीचं शस्त्र शिर्डीत का आणलं जातंय? याची चर्चा आता हळूहळू सर्वदूर साई भक्तांत पोहोचत चाललीय. ध्वजस्तंभ हे वैदिकांच्या विजयाचं प्रतीक चिन्ह मानलं जातं. साईभक्तांमध्ये वैदिक-अवैदिक, हिंदू, मुस्लीम असे सर्व जात-धर्मीय आहेत. त्यांना साईबाबांच्या शिर्डीत ध्वजस्तंभ उभारणं खटकल्याशिवाय राहणार नाही. उद्या हा ध्वजस्तंभ हटवा, अशी चळवळ उभी राहिली तर आश्चर्य वाटायला नको. त्याचा जर भाजपविरोधी राजकीय पक्षांनी फायदा घेतला तर शांत शिर्डीत अशांतता पसरायला वेळ लागणार नाही.
यापूर्वी एका शंकराचार्यांनी साई हे देव नव्हेत, तिथं हिंदूंनी जाऊ नये, अशी साईबाबांची निंदानालस्ती केली होती. त्याला उत्तर म्हणून शंकराचार्यांचा शिर्डीत निषेध झाला होता. साईभक्तांनी तीव्र आंदोलनं केली होती. राज्यात भाजप सरकार आल्यानंतर नवी मुंबईतले बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे यांची साई संस्थानचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. हावरे यांच्यावर बांधकाम व्यवसायात आर्थिक गुन्ह्यांच्या केसेस दाखल झाल्या होत्या. त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधीलकी सर्वज्ञात आहे. हावरे यांच्या नियुक्तीलाही साईभक्तांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आता नव्यानं राष्ट्रपतींच्या दौऱ्यानंतर साईभक्तांची अस्वस्थता आणखी वाढली आहे.
पंढरपूर, शिर्डी ही ठिकाणं महाराष्ट्राच्या समन्वयी सांस्कृतिक, अध्यात्मिक परंपरेचा वैभवशाली वारसा असलेली केंद्र आहेत. पंढरपूरच्या देवस्थानात राजकारण करणं किंवा साईबाबांच्या शिर्डीत त्रिशुळ आणून सबुरी आणि सर्वसमावेशक तत्त्वज्ञानाला नख लावणं. भक्तांच्या श्रद्धा दुखावणं. या फंदात शहाण्या राज्यकर्त्यांनी पडू नये हेच सोयीस्कर असतं. धर्म, अध्यात्म, श्रद्धा या नाजूक गोष्टींशी खेळणारे राज्यकर्ते बदनाम होतात. पुढे धुळीस मिळतात, हा इतिहास सर्वच राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवलेला बरा. अन्यथा सिंहासन संकटात आहे, हे खुशाल समजावं.
.............................................................................................................................................
लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment