भानू काळे यांचे प्रकट चिंतन वजा स्वगत वजा निरीक्षण आणि आपण!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 11 October 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar अंतर्नाद मासिक Antarnad Magzine भानू काळे Bhanu Kale

‘अंतर्नाद’ या नावाने निघत असलेले (आणि पुण्यातून प्रकाशित होणारे) मराठी मासिक बंद करावे लागेल अथवा वार्षिक दिवाळी अंक स्वरूपात काढावे लागेल अथवा कुणा योग्य माणसाकडे ते चालवण्यासाठी मालकी हस्तांतरण करावे लागेल, असे निवेदनवजा आवाहन वजा स्वगत वजा प्रकट चिंतन या मासिकाचे संपादक भानू काळे यांनी ताज्या अंकात छापलेय. जे आता प्रसिद्धी माध्यमांतही फिरतेय.

अक्षयकुमार काळे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, तेव्हा ‘कोण हे अक्षयकुमार काळे?’ असा जाहीर प्रश्न विचारण्यात आला. त्याच धर्तीवर ‘कोण हे भानू काळे आणि कसलं त्यांचं ‘अंतर्नाद’ मासिक?’ असा प्रश्न विचारला जाऊ शकतो?

ढोबळ विभागणी केली तर ज्यांना अक्षयकुमार काळे माहीत नाहीत, त्यांना भानू काळे नक्कीच माहीत असणार आणि जे अक्षयकुमार काळेंना ओळखतात त्यांना ‘कोण हे भानू काळे?’ असा प्रश्न पडू शकतो. आणि या दोन गटांच्या बाहेर जो एक मोठा समूह आहे, त्याला हे दोन्ही काळे (काळे की गोरे!) माहीत असण्याची शक्यता नाही.

तर मुद्दा किंवा गोष्ट किंवा बातमी अशी की, आणखी एक मासिक बंद पडणार असे उसासे वर्तमानपत्री पहिल्यापासून आतल्या पानापर्यंत टाकू जाऊ लागलेत.

खरे तर बंद पडण्यासाठीच सुरू होतात असा मराठी नियतकालिकांचा इतिहास आहे. मग ते साप्ताहिक\ पाक्षिक\ मासिक\ त्रैमासिक\ अर्धवाषिक\ वार्षिक अशा कुठल्याही कालमापनाने प्रसिद्ध होत असो. अशी बंद पडलेली नियकालिकेही अनेकांसाठी पीएच.डी.चा विषय झालीत. हे म्हणजे साहित्यिक अवयवदानच! मराठी ‘प्रकाशने’ सुरू झाल्यापासून अगदी आज २०१७पर्यंत सर्व कालखंडात नियतकालिके सुरू झाली व बंदही पडली!

आज १२ कोटीच्या महाराष्ट्राच्या तुलनेत, लोकसंख्येने कमी असलेल्या महाराष्ट्रातही हजार-दोन हजार वर्गणीदार जमत नसत आणि आजच्या बारा कोटीच्या महाराष्ट्रातही जमत नाहीत. जमले तर टिकत नाहीत. त्यातूनही काही टिकले तर नियतकालिकच टिकत नाही.

असे असले तरी परंपरा सांगण्यात आपला हात कुणी धरत नाही. विद्यापीठीय परिभाषेत मग १९व्या शतकापासून जी यादी सुरू होते, ती नेहमीची नावे, त्यांचे संपादक, संस्थापक यांच्या सनावळ्या देत संपते. म्हणजे दोन-तीन पॅराग्राफ भरतील एवढा मजकूर मराठी नियतकालिके असे नुस्ते उच्चारले तरी सत्यनारायणाच्या पूजेसारखा ‘प्रा. मंडळी’ वाचून, लिहून दाखवतात.

पण नियतकालिकांच्या सांस्कृतिक मिरासदारीचा प्रश्न साठच्या दशकात ‘सत्यकथा’च्या निमित्ताने अधिक मोठ्याने विचारला गेला. आज साठोत्तरी म्हणून जे ओळखले जातात, त्या सर्वांनी ‘सत्यकथा’, ‘मौज’, श्रीपु, राम पयवर्धन यांसह खटाववाडी धारेवर धरली आणि खटाववाडीतच ‘सत्यकथा’ची होळी केली. (होळीसाठी सत्यकथाचा अंक आंदोलकांकडे नव्हताच, मग पटवर्धनांनीच तो कसा दहनासाठी पुरवला, या इतिहासाची व त्याच्या पुनर्मुद्रणाचीही आता पन्नाशी उजाडेल!)

आज भानू काळेंनी जी कारणे ‘अंतर्नाद’साठी दिलीत, साधारण तीच कारणे ‘सत्यकथा’ बंद करताना (किंवा थांबवताना) भागवतांनी दिली होती. (प्रकृतीचे काळेंचे कारण ‘सत्यकथा’च्या वेळी नव्हते.)

आज अक्षयकुमार काळे कोण? असा प्रश्न विचारणारा जो वर्ग आहे, जो ‘अंतर्नाद’साठी सुस्कारे सोडतोय, त्यांच्याच पूर्वसुरींनी ‘सत्यकथा’साठी उसासे सोडले होते. मदतीचे, सत्पात्री दानाचे अनेक हात त्यावेळीही पुढे आले होते. पण शेवटी ‘सत्यकथा’ थांबले.

‘सत्यकथा’ थांबले तरी त्या काळात म्हणजे ५०-६०च्या दशकांत महाराष्ट्रात एक ग्रंथालय संस्कृती जीवंत होती. शासकीय ग्रंथालयासह तालुका पातळीवरच्या लायब्रऱ्या या वाचनाची आडवी-तिडवी भूक असणाऱ्या वाचकांच्या भुका भागवत होत्या. शासकीय ग्रंथालयांचा किंवा नगर वाचन मंदिर म्हणून शहरातल्याच किंचित अभिजनांनी सुरू केलेल्या ग्रंथलयांचा चेहरा गंभीर, निमगंभीर. काही ग्रंथालये इतकी मोठी ती व्यसनी वाचक तिथली भली थोरली टेबल्स व बाकडी सोडत नसत. याउलट तालुका पातळीवरच्या लायब्रऱ्या म्हणजे फास्ट फुडसारख्या ‘टेकअवे’ प्रकारातल्या. अनामत रक्कम + मासिक शुल्क आणि एका वेळी एक\दोन\तीन पुस्तके घरी वाचायला नेता येत. उपवर मुलामुलींसाठी भेटीगाठी व चिठ्ठ्या-चपाट्या हस्तांतरणासाठी हे एक मोठे माध्यम होते. वाचपती गोविंदराव तळवलकरांचे प्रेम अशाच ठिकाणी फुलले! इथे प्रस्थापित पु.ल., रणजित देसाई, माडगूळकर, दमा, शिवाजी सावंत, सावरकर, पुरंदरे, दांडेकर यांच्या जोडीने अर्नाळकर, एस.एम. काशीकर, गुरुनाथ नाईक, बाबा कदम, सुहास शिरवळकर, व.पु., शन्ना, शैलजा राजे, कुमुदिनी रांगणेकर अशा ‘वाचकप्रिय’ लेखकांचा चलनी राबता असे.

या लायब्रऱ्यांनीच मराठी नियतकालिकातील मासिक नावाचा प्रकार व दिवाळी अंक जगवले. ‘धनुर्धारी’, ‘वाङ्मयशोभा’, ‘माहेर’, ‘मेनका’, ‘जत्रा’, ‘हंस’, ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’, ‘अमृत’, ‘फुलबाग’ अशा मासिकांसाठी\दिवाळी अंकांसाठी नंबर लागलेले असत. साक्षरता कमी असताना, मुद्रणकला प्रगत नसताना व प्रसार-दळणवळणाची संपर्काची माध्यमे मर्यादित (काही ठिकाणी एकमेव. उदा. पोस्ट) असतानाही वाचक त्यामानाने उदंड होते. वर्गणीदारांपेक्षा लायब्ररी मेंबर जास्त असत.

पण जसजसं साक्षरतेचे प्रमाण वाढत गेले, मुद्रणकला आधुनिक तंत्रांनी विस्तारली, अधिक निर्दोष झाली, प्रसार-दळणवळणाची माध्यमे वाढली आणि आजतर या सर्व व्यवस्थांचा प्रस्फोट झाला असताना मराठी नियतकालिके माना टाकताहेत. संगणक युगाने तर कंबरडेच मोडले.

हा झाला सामाजिक, सांस्कृतिक इतिहास, पण ‘सत्यकथा’ बंद पडताना आणि आज ‘अंतर्नाद’ बंद पडताना उसासे टाकणाऱ्यांच्या पिढ्या मराठी माध्यमाकडून इंग्रजी माध्यमाकडे वळल्या आणि मराठी प्राथमिक शाळेपासूनच मराठी जगतातून उखडली गेली. आता तर मराठी शाळाच जमीनदोस्त होताहेत. तेव्हा हे अभिजन उसासे ठराविक पेठा, शहरे आणि अमेरिकेत अधिक उमटताहेत. परंतु या पापाची जबाबदारी हा वर्ग घेणार नाही. याउलट भाऊराव पाटील, अण्णासाहेब शिंदे यांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना दलित, बहुजन वर्गात नेऊन शिक्षणाचा प्रसार केला, साक्षरता वाढवली.

यशवंतराव चव्हाणांसारख्या राज्यकर्त्यांनी तर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ते लक्ष्मण माने असाच पूल बांधला, पण अभिजनांना आनंद कराडच्या संमेलनात यशवंतरावांना प्रेक्षकांत ‘जागा’ दिली (किंवा दाखवली). मात्र त्यानंततर आता राजकारण्यांशिवाय संमेलन होतच नाही! यांचा ‘दुर्गावतार’ दोन संमेलनात संपला.

.............................................................................................................................................

नवनवीन पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

 http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

ब्रेनड्रेनच्या काळात मराठी साहित्य जिवंत, वास्तववादी, समाजभानासह अधिक संपृक्त केले लिटिल मॅगझिन चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ व दलित-आदिवासी-भटक्या साहित्याने. खऱ्या अर्थाने मराठी साहित्य जागतिक झाले. पण खटाववाडीने या बदलाची नोंद शेवटपर्यंत घेतली नाही! ना कौतुकाचे दोन शब्द, मान्यता तर दूरच!

या बदलाची ज्यांनी नोंद घेतली, दखल घेतली, यातली सृजनात्मकता ओळखली ते ‘साधना’, ‘अस्मितादर्श’, ‘कवितारती’, ‘मिळून साऱ्याजणी’,‘ परितवतर्नाचा वाटसरू’, ‘सुगावा’ यांशिवाय गावोगावची अनेक अनियतकालिके ‘खेळ’, ‘ऐवजी’, यांच्या जोडीने ‘मुक्त शब्द’ही चालू आहे. आणि या सगळ्या ठिकाणी ‘अंतर्नाद’च्या भानू काळ्यांना न दिसलेले लेखक सातत्यपूर्ण व कसदार लेखन करताहेत! तेही कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, नाटक अशा सर्व साहित्य प्रकारांत. स्त्रियांचंही प्रमाण लक्षणीय आहे. नवे लेखक नाहीत हा भानू काळेंचा दावा किंवा निरीक्षण वस्तुस्थिती निदर्शक नाही. तुम्हाला ग्रेस दिसतो, पण अक्षयकुमार काळे दिसत नाहीत, हा दोष त्या दोघांचा नाही तर भानू काळ्यांसारख्या मनोरा संपादकांचा आहे!

भानू काळेंनी प्रकृतीचं दिलेलं कारण शंभर टक्के मान्य करून त्यांना निरोगी दिर्घायू लाभो ही सदिच्छा!

पण समाजातले लेखक, त्यांच्यातले लेखनगुण शोधावे लागतात, त्यांना लिहिते करावे लागते. ते करत असताना आपल्या चष्म्याच्या काचा आधी पुसून घेऊन, त्यांची अक्षरे वाचून-समजून घ्यावी लागतात. यासाठी आपला परिघ वाढवावा लागतो आणि थकल्या शरीरात ताजं टवटवीत मन ठेवावे लागते. हा उद्योग सोपा नसतो. कष्टदायक तर असतोच असतो, पण संपादकाला पुढचे दिसावे लागते, बदल आत्मसात करावा लागतो. स्वागतोत्सुक राहावे लागते. मनोऱ्यातून बाहेर पडावे लागते.

हे काम श्री. ग. माजगावकर, साने गुरुजी ते विनोद शिरसाठ व्हाया थत्ते, गोरे, जोशी, बापट, दाभोलकर, श्री. ग. मुणगेकर, दिनकर गांगल, म.सु.पाटील, पुरुषोत्तम पाटील, गंगाधर पानतावणे, विलास वाघ, सदा डुम्बरे, विद्या बाळ, निखिल वागळे अशांनी केले… म्हणूनच ना त्यांचा वाचक दुरावला, ना त्यांचे प्रकाशन थांबले. लेखकांची वानवा तर त्यांना कधीच नव्हती. भानू काळेंनी ‘अंतर्नाद’ ऐकतानाच बाहेरचा आवाजही ऐकावा. तो कदाचित मोठा, कर्कश वाटेल, पण सनईत कितीही श्वास भरलात तरी ती ‘तुतारी’ नाही होणार!

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......