टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • जय शहा, अशोक शर्मा, राजनाथ सिंह आणि राधे माँ
  • Mon , 09 October 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya अमित शहा Amit Shah जय शहा अशोक शर्मा राजनाथ सिंह राधे माँ

१. पोलिसांमध्येही वादग्रस्त स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँच्या भक्तांची संख्या काही कमी नाही, हे नवी दिल्लीत उघड झालं. विवेक विहार पोलीस ठाण्यात राधे माँचं स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या प्रमुखांच्या खुर्चीवरही ती ‘विराजमान’ झाली होती. राधे माँसमोर पोलीस अधिकारी हात जोडून उभा असल्याचं या छायाचित्रात दिसत आहे. ठाण्यातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी तिचं दर्शन घेतल्याचं वृत्त आहे. यामुळे संबंधित पोलीस अधिकारी वादात सापडल्याचं सांगण्यात येत आहे.

अरे, या पाखंडी मंडळींना ‘गंगा जमना’, ‘दीवार’, ‘मदर इंडिया’ वगैरे दाखवा, कुणीतरी, ‘श्यामची आई’ वाचायला द्या, किमान दादा कोंडकेंची आये तरी दाखवा- म्हणजे त्यांना माँ अर्थात मातेची महती कळेल. ज्या देशात गाईला माता मानलं की, तिच्यापुढे माणसांच्या प्राणांची पर्वा केली जात नाही, तिथं राधे माँसारखी (म्हणजे दयाळू, ममताळू) भक्तांना मांडीवर बसवणारी किंवा स्वत: त्यांच्या मांडीवर, कडेवर बसणारी माँ मिळाल्यावर कोण तिच्या भक्तीत रममाण होणार नाही. पोलीस प्रमुखपदाची खुर्ची ही काय ‘माँ की गोद’पेक्षा अधिक मौल्यवान असते की काय?

.............................................................................................................................................

२. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा हे संचालक असलेल्या कंपनीचा डोळे दिपवणारा विकास कसा झाला, याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केलेल्या आरोपांनुसार जय शहा संचालक असलेल्या टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं यंदाच्या वर्षी ८०.०५ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल केली आहे. गेल्या वर्षीच्या उलाढालीच्या तुलनेत इथं तब्बल १६,००० पटींना वाढ झाली आहे. या कंपनीकडे कोणत्याही मालाचा साठा किंवा संपत्ती नसूनही त्यांनी इतका उत्कर्ष कसा साधला, सत्ताबदल झाल्यानंतर हे सर्व घडलं आहे, आता पंतप्रधान सीबीआयला या सगळ्याची चौकशी करायला सांगणार आहेत का? जय शहा यांना अटक होईल का? पंतप्रधान शहा यांच्या मुलाची चौकशी करण्याचा प्रामाणिकपणा दाखवणार का, असे सवाल सिब्बल यांनी विचारले.

यातलं काहीही होणार नाही, कारण मुळात जय शहा यांनी काही गुन्हाच केलेला नाही. गुन्हा करायला ते काय रॉबर्ट वड्रा आहेत का? उलट सतत ‘कुठे आहेत अच्छे दिन, कुठे आहे विकास’ नतद्रष्ट काँग्रेसींना जय यांनी दोन्हीचा पत्ता दिला आहे. त्यांचा विकास झाला आहे, त्यांच्या कंपनीचे ‘अच्छे दिन’ आले आहेत, हा भाजपच्या धोरणांचाच विजय आहे. त्यांचे वडील त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांचे ‘साहेब’ पंतप्रधान आहेत, त्याच पक्षाच्या खासदाराच्या व्याह्यानं त्यांच्या कंपनीला विनातारण कर्ज दिलं आहे, हे फुटकळ योगायोग महत्त्वाचे मानायचे की, विकासाला महत्त्व द्यायचं? विकास थोडासा डोक्यावर परिणाम झाल्यासारखा वागत असला म्हणून काय झालं?‌

.............................................................................................................................................

३. भारतीय बँकाचे तब्बल नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याने किंगफिरशर एअरलाईन्ससाठी २००० कोटींचे कर्ज मंजूर करवून घेण्यासाठी काही अधिकाऱ्यांद्वारे निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचं त्याच्या ईमेल व्यवहारावरून उघड झालं आहे. अर्थ खात्यातील काही अधिकाऱ्यांनी एसबीआय, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया या बँकांना किंगफिशर एअरलाईन्सला कर्ज देण्याचा सल्ला दिला होता. मल्ल्यानं स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी राजकारणी, सरकारी अधिकारी यांना मोफत विमानप्रवास, पर्यटन अशा अनेक सुविधा देऊन उपकृत केल्याची माहिती समोर आली आहे. मल्ल्या नागरी हवाई वाहतूक खात्याच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यांकडून प्रवाशांची संख्या, बाजारातील गुंतवणूक यासंबंधीची माहिती इतरांच्या आधी मिळवायचा आणि त्यानुसार किंगफिशर एअरलाईन्सच्या प्रवाशी भाड्यात चढ-उतार करत असे. त्यामुळे किंगफिशरला अधिक फायदा मिळत असे. मल्ल्या अनेक राजकारण्यांना विमानप्रवासात विशेष सूट देत असे. या राजकारण्यांना इकॉनॉमी श्रेणीच्या तिकीटाच्या किमतीत बिझनेस क्लासनं प्रवास करता येत असे. निवडणुकीच्या काळात मल्ल्या अनेक राजकारण्यांना चार्टर्ड विमान आणि हेलिकॉप्टरची सुविधा पुरवत असे. केंद्रीय अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांना किंगफिशरच्या प्रथम किंवा बिझनेस श्रेणीतून मोफत प्रवासाची सुविधा असे.

यातलं विजय मल्ल्या हे नाव वाचलं की, तथाकथित देशभक्तांच्या रक्ताला उकळी वगैरे येत असेल. हे सगळं करून तो निवांत परदेशात मजा मारतोय, याने त्यांना सात्त्विक संतापही येत असेल. पण, शांत डोक्यानं विचार केला, तर भारतात आता यशस्वी असलेल्या बड्या उद्योगपतींपासून ते रस्त्यावरच्या ठेलेवाल्यांपर्यंत बहुतेकांच्या यशाचा मार्ग याच कार्यपद्धतीतून जात नाही का? आपापल्या पातळीवर हे न करता यशस्वी होता येतं का? मल्ल्या पकडला गेला नव्हता, तेव्हा ‘आदर्श’ आयुष्य जगत नव्हता का?

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

४. भारत बलाढ्य देश असल्यामुळेच चीनसोबत असलेला डोकलामचा तिढा सुटला. भारत कमकुवत असता तर हा प्रश्न कधीच सुटला नसता,असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. भारताची प्रतिमा आणि महत्त्व यामध्ये जागतिक स्तरावर सकारात्मक बदल झाला आहे, असंही सिंह बंगळुरात म्हणाले. भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये डोकलामचा वाद ७० दिवस सुरू होता. दोन्ही देशांकडून सैन्य मागे घेण्याचे इशारे आणि युद्धाचे इशारे देण्यात येत होते. मात्र, भारतानं हा प्रश्न अत्यंत समंजसपणे हाताळला. चीननं डोकलाममध्ये रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं होतं. ते बेकायदेशीर असल्याचं भारत आणि भूतान या दोन्ही देशांचं म्हणणं होतं. यावरून डोकलामचा वाद सुरू झाला होता.

राजनाथ हे भाषण देत असतानाच डोकलाममध्ये रस्ताबांधणीचं काम पुन्हा सुरू झालं, हे त्यांना कुणी सांगितलं नाही का? चीन हा भारतापेक्षा नुसताच बलाढ्य नाही, तर सुपरबनियाही आहे. त्याच्या फायद्याचा व्यवहार सुरू असतो, तेव्हा तो त्यात विक्षेप आणणारं काही करत नाही. तो पूर्ण झाला की मग आपलं घोडं पुढे दामटायलाही चुकत नाही. तेव्हा चीनच्या संदर्भात अनावश्यक, अवास्तव दावे करण्याची चूक पुन्हा नको- नाहीतर नेहरूंवरच्या टीकेचा एक यशस्वी मुद्दा हातातून जायचा.

.............................................................................................................................................

५. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणावरून आता भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरुद्ध हिंदू महासभा यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगली आहे. महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणात न्यायालयाच्या मदतीसाठी अमायकस क्युरीची (न्यायमित्र) नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, संघ आणि भाजपने यापासून दूर राहावं, असा इशारा हिंदू महासभेने दिला आहे. या प्रकरणातील गुंतागुंत वाढवण्यासाठी संघ आणि भाजपकडून जाणूनबुजून बंदुकीतील चौथ्या गोळीचा उल्लेख केला जात आहे, असा आरोप हिंदू महासभेनं केला आहे. हिंदू महासभेच्या नथुराम गोडसेनं बापूंची हत्या केली होती, हे सर्वांना माहिती आहे. हा आमचा वारसा आहे. भाजप आणि संघ आमच्याकडून हा वारसा हिरावून घेऊ शकत नाही, असे हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मांनी म्हटलं. नथुराम गोडसेंचं हिंदू महासभेशी अतूट नातं होतं. मात्र, आता गोडसेंना बाजूला सारून संघ आणि भाजपकडून महात्मा गांधींच्या हत्येचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.

एका नि:शस्त्र म्हाताऱ्यावर गोळ्या झाडून नथुरामनं फार मोठं देशकार्य केलं आहे, ही भावना हिंदू महासभेनं जाहीर बोलून दाखवली, हे बरंच झालं. त्याचं ‘श्रेय’ आमचं आहे, असं ते किती अभिमानानं बोलून दाखवतात. हिंदू महासभेला हिंदुबहुल भारतात निवडून यायचं नसल्यामुळे हे सांगण्यात अडचण वाटत नाही. भाजपची केविलवाणी पंचाईत वेगळी आहे. तिकडे नथुरामला क्लीन चिट द्यायची आणि इकडे बापूजींचा उदो उदो करायचा, ही त्यांची व्यावहारिक गरज आहे. त्यांना ‘श्रेय’ही उघडपणे घेता येत नाही.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 09 October 2017

च्यायला, ८० वर्षांचा नि:शस्त्र म्हातारा म्हणून गांधीला फुकट डोक्यावर चढवून ठेवण्यात आलंय. हाच थेरडा ५५ कोटी रुपयांचं टेररिस्ट फायनान्सिंग करीत होता त्याचं काय? टेररिस्ट फायनान्सरला टपकावला म्हणून नथुराम अस्सल देशभक्त आहे. उगीच कुठल्याशा तुरुंगात पंचतारांकित कारावास भोगणारा बनिया नाहीये तो. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......