‘हमो’ नावाचा न झुकलेला डेरेदार वृक्ष!
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • नागपूरच्या अ. भा. म. साहित्य संमेलनातील अभिरूप  न्यायालयात 'आरोपी' ह. मो. मराठे प्रतिवाद करताना. 'वकील' सुधीर गाडगीळ आणि प्रवीण बर्दापूरकर (छायाचित्र- शेखर सोनी, नागपूर)
  • Sat , 07 October 2017
  • संकीर्ण श्रद्धांजली ह. मो. मराठे H. M. Marathe अरुण साधू Arun Sadhu

पक्कं आठवतं, १९७३चा तो जानेवारी महिना होता. नेहरू युवक केंद्राच्या आम्ही काहींनी औरंगाबाद ते पुणे आणि परत अशी सफर सायकलवरून केली. पुण्यात फिरत असताना  किर्लोस्कर प्रेसची पाटी दिसली आणि मी आत शिरलो. चौकशी करून ह. मो. मराठे यांना गाठलं आणि त्यांच्या ‘निष्पर्ण वृक्षावर...’ या कादंबरीवर भडाभडा बोलायला सुरुवात केली. शिडशिडीत बांधा, गव्हाळ वर्ण, लालभडक शर्ट, केस मागे वळवलेले, सस्मित चेहरा आणि चष्म्यातून रोखून पाहणारे नितळ डोळ्यांचे ते हमो फोटोप्रिंटसारखे मेमरीत कायमचे शूट झालेले आहेत. अस्मादिकांच्या बोलण्याचा भर ओसरल्यावर हमोंनी कुठून आले, काय करता वगैरे चौकशा केल्या. मग आम्हाला एका रेस्तराँत (बहुदा नीलायम चित्रपटगृहाजवळ ते होतं.) नेऊन अगत्यानं खाऊ-पिऊ घातलं. पुन्हा आम्ही प्रेसवर गेलो. सायकलींसोबत आमचं एक ग्रुप छायाचित्र काढण्यात आलं. ‘सायकलवर फिरणारे युवक’ असा एक छोटासा मजकूर त्या छायाचित्रासह प्रकाशित झाला. हमोंची ती पहिली भेट अजूनही स्मरणात आहे. काहीतरी वेगळं लिहिणारा लेखक आणि वाचक असलेल्या, अशा त्या ओळखीचं रूपांतर पुढे अकृत्रिम उबदार स्नेहात होणार आहे, हे तेव्हा कळलेलं नव्हतं. 

मग आम्ही दोन-तीन वेळा असेच भेटलो. पुढे मी पत्रकारितेत आलो. नागपूरला ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकात स्थिरावल्यावर भटकंती वाढली. दरम्यान हमोंशी संपर्क वाढला. त्यांना ‘हमो’ असं संबोधावं अशी सलगी निर्माण झाली. गेल्या साडेचार दशकांत पुणे, नागपूर, कोल्हापूर, मुंबईत बोरीवली, अशा ठिकाणी आमच्या भेटी झाल्या. कधी कार्यक्रमात, कधी कोणाच्या तरी घरी निवांत, तर कधी टपरीवर आम्ही गप्पा मारल्या. अधूनमधून फोन, पत्रव्यवहार सुरू झाला. अंबाजोगाईच्या मराठी साहित्य संमेलनात हमो, वीणा आलासे, प्रकाश देशपांडे आणि मी अशा आम्ही चौघांनी इतकी धम्माल केली की, लोकांना अक्षरश: वात आणला! हमो आणि वीणाताई वय विसरून आमच्यात रंगले. नागपूरला आले की, हमो आमच्या घरी उतरत. पुण्याला माझी चक्कर झाली की, एक जेवण त्यांच्याकडे होतच असे. याच दरम्यान बहुदा १९८३मध्ये केव्हा तरी मी जबलपूर लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक कव्हर करायला गेलो. सायकल रिक्षात हवा भरल्यावर पाच पैसे न मिळाल्याच्या वादातून चक्क खून झाल्याची घटना तेव्हा मी डोळ्यादेखत अनुभवली... ते रक्त... उताणं निष्प्राण कलेवर... त्या कलेवरावर दाटून आलेलं गडद दारिद्रय... हत्या करणाऱ्या माणसाचा पश्चातापदग्ध विदिर्ण चेहरा मनात रेंगाळत राहिला. नागपूरला पोहोचल्यावर ती घटना पत्रानं हमोंना कळवली. त्यांचं पोस्टकार्ड आलं, ‘मी या घटनेवर कथा लिहितो आहे’. त्यांनी पुढे कथा लिहिली. ती कथा प्रकाशित झालेला दिवाळी अंकही पाठवला. नंतर एकदा या कथेचा हवाला देत नागपूरच्या एका कार्यक्रमात ‘प्रवीण मला कथाबीजं पुरवतो’ असं त्यांनी आवर्जून सांगितलं. हमो तेव्हा ‘स्टार’ लेखक आणि संपादक झालेले होते. त्यामुळे त्यांनी हे सांगितल्यावर नागपूरच्या साहित्य वर्तुळात माझा भाव वधारला.

याच दरम्यान, वेडातून बरा झालेल्या तरीही लालफीतशाहीमुळे वेड्याच्या इस्पितळात प्रदीर्घ काळ राहावं लागलेल्या आणि या वास्तव्यात तिथं फळा-फुलांची बाग फुलवणाऱ्या माणसाच्या बातमीसाठी मला ‘भाला’कार भोपटकर पारितोषिक मिळालं. हे पारितोषिक मिळवणारा विदर्भातील मी पहिलाच पत्रकार ठरलो. पारितोषिक वितरण पुण्यात झालं. सदा डुम्बरे, किशोर कुळकर्णी, रमाकांत बेळगावकर या मित्रांची हजेरी अपेक्षितच होती, पण कार्यक्रमाच्या काही वेळ आधी चक्क हमो आले आणि माझं अभिनंदन करून श्रोत्यात बसले. दुसऱ्या दिवशी किर्लोस्कर कार्यालयात भेट झाल्यावर त्यांनी पारितोषिक प्राप्त ती बातमी नीट ऐकून घेतली. दिलीप कुळकर्णीला माझं एक छायाचित्र काढायला लावलं. ‘किर्लोस्कर’ मासिकाच्या पुढच्या महिन्याच्या अंकात शेवटच्या पानावर माझ्यासंबंधीचा मजकूर, त्या एका ऐटदार छायाचित्रासह हमोंनी प्रकाशित केला. पारितोषिकासाठी माझी प्रवेशिका संपादकांनी पाठवली होती, पण त्यांनी जे कौतुक केलं नाही त्यापेक्षा जास्त हमोंनी केलं.

सहकारीच नाही तर परिचितांचं असं कौतुक करण्याचा उमदा स्वभाव हमोंचा होता. जात-धर्म-पंथ आड न येता अनेकांच्या पाठीवर हमोंच्या कौतुकाची थाप पडली; अनेकांना त्यांनी लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं. पत्रकारितेतील अनुभवांवर आधारित माझ्याशी गप्पांचा -​अनसेन्सॉर्ड गप्पा- एक कार्यक्रम गेल्या वर्षी गिरीश लाड यानं पुण्यात आयोजित केला. त्या कार्यक्रमाला हमो (आणि विद्याताई बाळ) आले. मी संकोचून गेलो. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त केली तर हमो म्हणाले, ‘अरे तुझंच ऐकायला आलोय’. कार्यक्रम संपल्यावर कौतुक करून ‘नुसत्याच गप्पा मारू नकोस, हे सगळं नीट संगतवार लिहून काढ’, असा दम देऊन लांब ढांगा टाकत गेले.

एखादा चित्रपट तयार होण्याआधी जसं तुकड्या-तुकड्यांत शुटिंग होतं; तसे हमो मनावर उमटत गेले. कधी भेटीतून, कधी त्यांच्या लेखनातून, कधी कथांतून. पण, हमो समजले आहेत असा दावा नाहीच, कारण प्रचंड अभावगस्ततेत बालपण करपलेला हमो मराठे नावाचा माणूस आणि लेखक, आवाक्यात न येणारा रसरशीत बहुपेडी वृक्ष होता आणि आहेही. ‘निष्पर्ण वृक्षावर...’, ‘काळेशार पाणी’ ही त्यांची तत्कालीन समाजमनाला सहजासहजी न पचणारी आणि पेलवणारीही बंडखोरी होती.

हमो कथाकार होते, कथेत त्यांनी शैलीचे अनेक प्रयोग केले. वृत्तकथा, कार्पोरेट जगताच्या कथा, मध्यमवर्गीयांची घुसमट असे अनेक पैलू त्यांच्या कथांना होते. ‘एक दिवस, एक माणूस’मधून त्यांनी व्यक्तीचित्रणाचा नवा ट्रेंड मराठी साहित्यात निर्माण केला. ‘बालकांड’ आणि ‘पोहरा’तून त्यांनी अभावग्रस्ततेला जात नसते हे बेडरपणे समोर आणलं.

संपादक म्हणून ते प्रयोगशील होते. ‘किर्लोस्कर’, ‘लोकप्रभा’, ‘घरदार’, ‘मार्मिक’, ‘पुढारी’ असा त्यांचा संपादक म्हणून प्रवास झाला. ‘किर्लोस्कर’, ‘लोकप्रभा’ आणि ‘घरदार’चा प्रत्येक अंक त्यांच्यातल्या संपादकीय प्रयोगशीलतेचा मासला आहे. त्यातील त्याचं लेखन तिरकस आणि उपरोधिक लेखनाचं प्रमाण आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आग्रहाखातर ‘मार्मिक’चं संपादन करताना त्यांच्यातल्या पत्रकाराची एक वेगळी चुणूक दिसली. (बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीचा वृतान्त कथन करणारा हमोंचा लेख लाजवाब आहे.) लेख, अग्रलेख, विपुल स्तंभ लेखन, रिपोर्ताज असे अनेक फॉर्म संपादक म्हणून त्यांनी लीलया हाताळले. नितळ आत्मपर लेखनाचे मापदंडच त्यांनी निर्माण केले. इतकंच कशाला, त्यांचं प्रचारकी लेखनही वैशिष्ट्यपूर्ण आहे. पण...देशीवाद्यांनी अरुण साधू आणि हमोंना ना कादंबरीकार म्हणून मान्यता दिली, ना कथाकार म्हणून (देशीवादात तशीही कथा येतच नाही म्हणा!). ब्राह्मणांना अभावग्रस्तता कशी समजणार म्हणून ‘बालकांड’ची हेटाळणीही झाली आणि मराठी पत्रकारितेतल्या (स्वघोषित) बलदंड संपादकांनी त्यांच्या बिरादरीत हमोंचा शिरकावच होऊ दिला नाही. तरीही वाद घालत आणि अनेक वादळं अंगावर घेत हमो त्यांच्या मस्तीत जगले!

माधव गडकरी ‘स्कूल’चा मी विद्यार्थी आणि हे हमोंना चांगलं ठाऊक होतं तरी संपादक म्हणून हमो जिथे गेले तिथं त्यांनी मला लिहिण्याची संधी आणि त्या लेखनाचं आवर्जून मानधन दिलं. हे सांगण्याचं कारण जरा वेगळं आहे. हमो संपादक असताना ते आणि ‘लोकप्रभा’ साप्ताहिक, हेवा वाटावा अशा लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचलं. ‘लोकप्रभा’चा खप लाखाचा आकडा ओलांडता झाला. मराठी मुद्रण माध्यमातील ती अभूतपूर्व घटना होती. मात्र अचानक हमोंना ‘लोकप्रभा’ सोडावं लागलं. त्या संदर्भात बरीच उलट-सुलट चर्चा रंगली. ‘लोकप्रभा’ सोडावं लागल्याबद्दल ते माधव गडकरी यांच्यावर रुष्ट होते. दोन-तीनदा ‘तुझ्या गडकरींनी माझा गेम केला’ असं हमोंनी बोलूनही दाखवलं. एकदा ‘मंतरलेल्या पाण्या’च्या साक्षीनं माधवरावांकडे मी हा मुद्दा छेडला. त्यांना ते काही फारसं आवडलं नाही. जरा जरबेच्या आवाजात माधव गडकरी म्हणाले, ‘तुझं अजून वय नाही अशा विषयात पडायचं. त्यापेक्षा आणखी चार चांगल्या बातम्या देण्यावर लक्ष केंद्रित कर. आणि हो, तुझ्या त्या ‘हमों’च्या राजीनाम्याची कारणं नॉनजर्नालिस्टीक आहेत.’ मी चमकलो आणि गप्प झालो. मग हा विषय माझ्या बाजूनं कायमचा संपवून टाकला.  

लेखनाचे माझेही लाड हमोंनी आवर्जून पुरवले. मी संपादित केलेल्या अंकांचं कौतुक करताना सुधारणा कोणत्या करायला हव्यात हेही तिरकसपणे बजावून सांगितलं. अशात त्यांनी माझ्या ‘आई’ या प्रकल्पासाठी लेखन सहाय्य केलं. ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता’ या समजाला छेद देत आईकडे एक स्त्री म्हणून बघितलं पाहिजे, स्त्री केवळ मातृत्वाचं नव्हे तर असंख्य अव्यक्त वेदना व कष्टाचं प्रतीक आहे, अशी धारणा त्या प्रकल्पामागे होती. हा प्रकल्प करायचा ठरल्यावर अपार कष्ट उपसणारी, अथांग दारिद्र्यात राहिलेली आणि मरण पावलेली ‘बालकांड’मधली हमोंची आई आठवली. मी हमोंना तो मजकूर मागितला. त्यांनी ते मान्य करताना ‘बालकांड’मधून मजकूर घे असं सांगितलं. पण प्रचंड कामात अडकलेलो असल्यानं तो मजकूर संपादित आणि संकलित करण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. पत्रकाराला शोभेसा कोडगेपणा दाखवत, पण खरं कारण सांगून ते काम करून देण्याचं हमोंनाच सुचवलं. दुसरा कोणी असता तर केवळ वैतागलाच नाही संतापला असता, कायमचा रुष्ट झाला असता, पण माधुरी तळवलकर यांच्याकडून ते काम करवून घेऊन हमोंनी माझा हट्ट पुरवला.

आणखी एक, मुख्य प्रवाहातल्या म्हणजे दैनिकाच्या कुणाही संपादकाइतकंच नाही तर, हमो संपादक व लेखक म्हणून काकणभर जास्तच चौकस होते. जेथे जात तिथलं राजकारण आणि राजकारणातली गटबाजी, साहित्य क्षेत्रातली कंपूशाही, जातीय आणि धार्मिक समीकरणं जाणून घेण्याची मोठी उत्सुकता हमोंना असे. एका अर्थानं ‘उत्सुकता चाळवलेला संपादक’ असंही त्यांचं वर्णन करता येईल!

हमो आणि माझ्यात एकदा वाजलंच, आणि तेही जोरात! त्यांनी स्वीकारलेला ब्राह्मण्यवाद मला साफ अमान्य होता. त्यावरून आमचा एकदा वाद झाला; तोही बऱ्याच उंच स्वरात. ‘माझ्या ब्राह्मण्य समर्थनात अन्य जाती किंवा धर्मांचा द्वेष तुला कुठे दिसतो?’, या त्यांच्या प्रश्नावर मी निरुत्तर झालो. वैयक्तिक जीवन आणि पत्रकार व लेखक म्हणूनही हमो कुठेच जातीयवादी वागलेले नाहीत, हा माझाही अनुभव होता, पण त्यांची ती ब्राह्मण्यवादी भूमिका स्वीकारणं अवघड होतं. मी अडून बसलो. अखेर हमोंनी तोडगा काढला, ‘आपल्यात एका मुद्द्यावर मतभेद आहेत, मनभेद तर नाहीत ना? मग तो एक मुद्दा बाजूला ठेवून आपण नेहमीसारखं वागत जाऊ यात.’ आयुष्यात आलेलं हमो नावाचं रसिलं, डेरेदार, एखादं गाव मनात वस्तीला आल्याचं समाधान देणारं झाड गमावण्याची माझी अर्थातच इच्छा नव्हती. त्यांचा तोडगा स्वीकारताना ‘बंडखोर लेखक आणि प्रयोगशील पत्रकार ते ब्राह्मण्य समर्थक हा तुमचा प्रवास अध:पतनाचा आहे’, असं मी म्हटलं.

 ‘अध:पतन’ या शब्दानं हमो घायाळ झाले. ते त्यांनी स्पष्ट बोलूनही दाखवलं. पण बाण सुटून गेलेला होता, तरी मी ‘सॉरी’ म्हटलं. ‘ठीके ते’ म्हणत ते ठाम स्वरात पुढे म्हणाले. ‘हे बघ माणूस स्खलनशील आहे. अभिव्यक्ती आणि सर्जन वगळता काम, क्रोध, प्रेम, लोभ अशा सर्वच पातळ्यांवर माणूस कधी ना कधी, कुठे ना कुठे कळत-नकळत अध:पतित होतच असतो. फक्त ते मान्य करण्याची अनेकांची तयारी नसते. माझं ब्राह्मण्य समर्थन कुणाला कमी लेखणारं किंवा जातिव्यवस्थेचं समर्थनही करणारं नाही, तर ते स्वसमर्थन आहे. चल, पुरे झाला वाद. आता आपण हा वाद बिअरच्या ग्लासात विरघळवून टाकू यात!’ मग हा विषय तिथंच थांबला आणि आमच्यातला मैत्रीचा प्रवाह पुन्हा खळाळू  लागला.

पुढे ‘घरदार’ मासिकाच्या प्रकल्पात केवळ हमोंमुळेच मी जॉईन झालो. हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे, हे कळायला मला फारच उशीर झाला. ‘घरदार’ प्रकल्प डब्ब्यात गेला आणि हमोंसह अनेक जण अडचणीत आले. या प्रकरणात मला चांगलाच आर्थिक फटका बसला, कर्जाचा डोंगर झाला तरी हमो आणि माझ्या कोणताच दुरावा निर्माण झाला नाही. कारण ‘घरदार’ डब्ब्यात जाण्यासाठी हमो जबाबदार नाहीतच याची खात्री मला होती, पण मी अडचणीत सापडलो होतो हे मात्र खरं. एकदा हमो काळजीच्या स्वरात म्हणाले, ‘तुझी ओढाताण पाहावत नाहीये रे, मी काही मदत करू का? दहा-पंधरापर्यंत क्षमता आहे माझी’. तेवढ्यात कुणी तरी समोर आल्यानं तो विषय तिथंच थांबला, पण ‘घरदार’मुळे बदनामीच्या खाईत असणाऱ्या हमोंनी मदतीची मारलेली हाक मनाला भिडली...

व्यक्तीगत आणि सार्वजनिक आयुष्यात हमो अनेक वादळं आणि वादांना सामोरे गेले. कधी हे ठरवून झालं, तर कधी नकळत. वाद घालताना किंवा वादळाशी झुंजताना हमो कधी कुणासमोर झुकले नाहीत, तसंच खचले आहेत, असं कधी त्यांच्या चेहऱ्यावरून तरी जाणवलं नाही. त्यांच्यात एक निश्चलता कायम असायची. ‘४९८ अ’ प्रकरण घडल्यावर आणि त्या बातम्या वाचल्यावर मी हादरलो. काही दिवसांनी ठरवून पुण्याला भेटायला गेलो, तर ‘अटक झालेला हमो कसा दिसतो हे पाह्यला आलास का तू नागपूरहून?’, अशा शब्दांत घरात एकटेच असलेल्या हमोंनी स्वागत केलं. जे काही घडून गेलेलं होतं, त्याच्या खुणा चेहऱ्यावर अस्पष्ट होत्या; मनावर असलेल्या दिसणं शक्यच नव्हतं. मी गप्पच होतो. मग हमोंनी काय झालं ते सविस्तर सांगितलं. त्यामागचा बनावही सांगितला. ते सलग सव्वा-दीड तास बोलत होते. एक मोठा सुस्कारा टाकून उठत म्हणाले, ‘आल्यापासून तुला पाणीही विचारलं नाहीये. चल, खिचडी लावतो आता. भूकेची वेळ झालीये.’ त्या तणावातही त्यांनी माझ्या भूकेची काळजी करावी हे विलक्षण होतं!

नंतरच्या काळात ‘लोकप्रभा’, ‘घरदार’, ‘ब्राह्मण्य’ असे वाद झाले. सर्व वाद आणि वादळातून हमो सहीसलामत बाहेर पडले, तरी आतून ते ढासळत होतेच. त्याचा परिणाम प्रकृतीवर होणं स्वाभाविकच होतं. तरीही हमोंच्या चेहऱ्यावरचं स्मित मावळणं तर सोडाच किंचितही कमीही झालं नाही. त्यांच्यातला हजरजबाबी तिरकसपणा कधी बोथट झाला नाही आणि तडफ मावळली नाही. झालेला एकही व्रण त्यांनी जगाला कधीच दाखवला नाही. असं वागायला लागणारा आणि अपवादानं आढळणारा कातळी आत्मकेंद्रित निर्धार त्यांच्याकडे होता.

या सर्वच वाद आणि वादळांनंतर हमोंनी त्यासंबधी जे आत्मपर लिहिलेलं आहे, ते प्रांजळपणाचा उत्कट अविष्कार आहे!

हमोंनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली, त्याची एक कथाच आहे. एक दिवस हमोंचा फोन आला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी त्यांना पाठिंबा द्यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ह. मो. मराठे माझे आवडते लेखक. शिवाय तोपर्यंत आमच्यात चाळीसपेक्षा जास्त वर्षं मुरलेला अकृत्रिम स्नेह होता. ‘ब्राह्मण्य बाजूला ठेवणार असाल तर मी तुमच्यासोबत आहे’, असं मी त्यांना बजावलं. मग सेवानिवृत्त विंग कमांडर अशोक मोटे भेटले. ते हमो आणि माझे समान मित्र. वायुसेनेतील अनुभवांवर आधारित कथालेखन करणारे, वायुसेनेच्या ‘एअर शो’चं आकाशवाणीवरून समालोचन करण्याची प्रथा सुरू करणारे अशोक मोटे चोखंदळ वाचक आणि एकदम जिंदादिल आदमी! हमोंनी ब्राह्मण्य बाजूला ठेवण्याची अट त्यांचीही होती. हमोंनी ती मान्य केली. मग आम्ही कामाला लागलो. उमेदवारी अर्ज सादर झाले. विदर्भातून मी सूचक आणि अशोक मोटे अनुमोदक होते. प्रचाराचा एक राऊंड ब्राह्मण्य आड न येता पार पडला. आम्हाला विजयाची खात्री वाटू लागली, कारण सव्वा ते साडेचारशे मतांची बेगमी झाल्याचा अंदाज आला होती.

...आणि अचानक हमोंचं एक जुनं निवेदन ताजं म्हणून समोर आणलं गेलं. माध्यमांनी; विशेषत: प्रकाश वृत्तवाहिन्यांनी कोणतीही शहानिशा न करून घेता नेहमीची घाई दाखवली. हमो गप्प राहणं शक्यच नव्हतं. वातीला वात लागली आणि ब्राह्मण्याचा मुद्दा भडकला. सूचक असूनही हमोंच्या ब्राह्मण्याच्या भूमिकेशी सहमत नसल्याचं मी जाहीर केलं. त्यामुळे आमच्या संभाव्य मतांत मोठी फाटाफूट झाली. निवडणुकीला वेगळं वळण मिळालं. वाद, गुन्हे दाखल होणं, तांत्रिक का असेना पण अटक, कोर्टकचेऱ्या, मानहानी... पुन्हा एकदा त्याच दुष्टचक्रात हमो अडकले, पण झुकले नाहीत. तो हमोंचा स्वभावच नव्हता. आम्ही निवडणूक हरलो; इतकी सगळी उलथापालथ झाल्यावर आम्ही निवडणूक जिंकणार नव्हतोच!

हा बनाव घडवून आणणारे कोण आहेत ते नंतर आमच्या लक्षात आलं. त्यासाठी दिली गेलेली किंमतही कळली, पण कुरापती काढाव्यात, बदला घेण्यासाठी उचापती कराव्यात, असा खुजा स्वभाव हमो आणि माझाही नाही. यानिमित्तानं ‘हे’ सर्व घडवून आणणाऱ्यांपेक्षा हमोंची उंची कशी बावनकशी आणि निर्विवाद मोठी आहे हे कळलं. या काळात हमोंचा अनुभवायला मिळालेला कणखरपणा अचंबित करणारा होता.

अशात आमच्या लेकीच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी ना सांगता-कळवता अचानक पोहोचून हमोंनी आम्हाला आश्चर्याचा मोठा सुखद धक्काच दिला. तोवर आम्ही दिल्ली सोडून औरंगाबादला डेरा टाकलेला होता. पुण्याहून औरंगाबादपर्यंत खाचखळग्यातला साडेपाच-सहा तासांचा बसचा प्रवास करून आलेले हमो थकल्यासारखे वाटत होते. स्वागत समारंभ सुरू होण्यास अवधी होता. तासभर आराम करून हमो आमच्यात सहभागी झाले आणि रमले. आमच्या सिंधी जावई आणि व्याह्यांशीही त्यांनी मस्त गप्पा मारल्या. जेवण आटोपल्यावर ते परत पुण्याला जायला निघाले. आम्ही दोघंही प्रथमच त्यांच्या पाया पडलो. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्याचं जाणवलं. पाठमोरे झालेल्या हमोंमधलं वार्धक्य चेहऱ्यावर जाणवलेलं होतं, खांदे किंचित झुकले होते तरी कणा ताठ होता, देहबोली ठाम होती, त्यांची पाऊलं गतीनं पडत होती. आणखी कितीही वादळं आली तरी हे झाड झुकणार नाही... मोडणार तर नाहीच, नाही याची खात्री त्यांची चाल देत होती!

.............................................................................................................................................

नवनवीन पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

नागपूरला झालेलं मराठी साहित्य संमेलन अरुण साधू आणि हमोंनी गाजवलं. या संमेलनात हमोंना आरोपीच्या पिंजऱ्यात बसवून मी आणि सुधीर गाडगीळनं फैरीवर फैरी झाडल्या. सर्वसाधारणपणे अशा कार्यक्रमाची आखणी आधी केली जाते, पण आम्ही तिघं थेट कार्यक्रमस्थळीच पाच-सात मिनिटं आधी; तेही प्रेक्षकांच्या गराड्यात कसेबसे भेटलो आणि कार्यक्रमाबद्दल कसंबसंच बोललो. तरी अभिरूप न्यायालय रंगलं. आमच्या फैरींना हमोंनी मस्त टोलावलं. ‘आरोपांकडे दुर्लक्ष करा आणि आमचं भावजीवन असंच समृद्ध करणारं लिहित रहा’, असा निवाडा ‘न्यायमूर्ती’ मदन धनकर यांनी दिला. ‘मी खरं तर शिक्षा ठोठावणार होतो, पण हमोंनी बाजी मारली अन नकळत हा निकाल दिला’, अशी कबुली मदन धनकर यांनी मोकळेपणानं दिली!

आठ दिवसांच्या अंतरानं अरुण साधू आणि ह. मो. मराठे हे दोघेही अचानक मृत्यू नावाच्या अज्ञात प्रदेशात प्रवेश करते झाले. साधू आणि हमो लेखक आणि माणूस म्हणून, ज्यावर पक्षांचा मंजूळ किलबिलाट सुरू आहे, अशा डेरेदार वृक्षासारखे होते. त्या दोघांच्याही संपन्न  अभिरुचीची शीतल छाया किमान मला तरी नक्की मिळाली. साधू आणि हमो आज आपल्यात नसले तरी, तशी संपन्न, शीतल छाया प्रत्येकाला अन्य कोणा-न-कोणाकडून नक्की मिळो...

(पूरक संदर्भ सहाय्य - शुभदा फडणवीस/शेखर सोनी, नागपूर)        

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......