CRD : अमूर्त काव्यमय थरार
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
संदेश कुडतरकर
  • ‘CRD’चं एक पोस्टर
  • Sat , 07 October 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie सीआरडी CRD

दिग्दर्शक क्रांती कानडे यांचा 'चैत्र' हा लघुपट पाहिला होता, तेव्हाच हा माणूस एक अजब रसायन आहे, हे जाणवलं होतं. जी. ए. कुलकर्णींच्या कथेला सर्वार्थानं न्याय देणारा तो सुंदर दृश्यानुभव आयुष्यभर पाठ सोडणार नाही आता. म्हणूनच CRDचा ट्रेलर पाहिला तेव्हाच वेड लागलं होतं आणि कधी एकदा हा चित्रपट पाहतोय असं झालं होतं. त्या वाट पाहण्याचं आज सार्थक झालं. दर शुक्रवारी पाट्या टाकल्यागत येणाऱ्या आणि दोन दिवसांत गडप होणाऱ्या गल्लाभरू चित्रपटांच्या गर्दीत अशा सर्वार्थानं वेगळ्या चित्रपटाचं असणं हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे. असा चित्रपट अनेक वर्षांतून एखादा येतो.

पुरुषोत्तम करंडकबद्दल ऐकलं नाही, असा मराठी माणूस विरळाच. पण या स्पर्धेशी ज्यांचा दुरान्वयेही संबंध नसेल, अशा व्यक्तींनाही हा चित्रपट आपल्यासोबत अक्षरशः फरफटत नेतो. नंतर हिप्नोटाईज झाल्यासारखा प्रेक्षक स्वतःहून दिग्दर्शकाच्या मागे गुमान जाऊ लागतो. पडद्यावर जे चाललंय, त्यानं मेंदूची शकलं होण्याची वेळ येते आणि तरीही हा इंटेन्स ड्रामा आपण एखाद्या ड्रगच्या नशेसारखा एन्जॉय करत राहतो. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतला थरार, त्यातलं राजकारण, गटबाजी हे सगळं या चित्रपटात इतकं उत्तम उतरलं आहे की बस्स… चांगला ओरिजिनल कन्टेन्ट असलेले चित्रपट आपल्या मातीत बनत नाहीत, असा गळा काढणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग आपल्या समाजात अस्तित्वात आहे. हा चित्रपट म्हणजे दिग्दर्शकानं अशा प्रेक्षकांना दिलेलं सडेतोड उत्तर आहे.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

चित्रपटाची प्रत्येक फ्रेम दृष्ट लागावी इतकी सुबक आणि देखणी. मधे कथेच्या अनुषंगानं येणारं अॅनिमेशन पुढे काय वाढून ठेवलंय, याची सूचक कल्पना देऊन जातं. पुण्यात असताना एकदाच एका परीक्षेच्या निमित्तानं मी फर्ग्युसनला गेलो होतो. त्या कॉलेजच्या भिंती अतिशय बोलक्या आहेत. त्या वास्तूत प्रवेश केल्यावर काहीतरी वेगळंच फीलिंग येतं, भारून गेल्यासारखं. चित्रपटातही ते जाणवतं. चित्रपटातल्या अॅबस्ट्रॅक्ट दृश्यांचा, काही संवादांचा कृपया अर्थ लावायला जाऊ नये. आपल्या चित्रपटांनी आणि मराठीच्या आपल्या पाठ्यपुस्तकांतील काव्य विभागातल्या प्रश्नांनी जी सगळ्याच गोष्टींतून काहीतरी अर्थ शोधण्याची जी घाणेरडी सवय आपल्याला लावली आहे, ती मोडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. अमूर्त गोष्टींचं सौंदर्य त्या अमूर्त असण्यातच असतं, हे कधीतरी असे दिग्दर्शक आपल्याला अधूनमधून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. प्रेक्षक म्हणून निदान असं काही समजून घेण्याचे प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे. मध्येच मोबाईल चेक करणाऱ्यांसाठी हा चित्रपट नाही. धिस इज समथिंग रिअली सिरिअस.

चित्रपटाची दृश्यात्मक श्रीमंती सांगताना आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जात येत नाही. या चित्रपटात पर्सिस आणि चेतनचा एक न्यूड सीन आहे. मी आजवर पाहिलेल्या चित्रपटांतील अशा प्रकारचं हे सर्वांत सुंदर दृश्य... डोळ्यांचं पारणं फेडणारं. मानवी शरीराचे घाट आणि वळणं यात किती अमाप सौंदर्य निसर्गानं ओतलंय, हे आपल्याला अलीकडे जाणवून द्यावं लागतं. सतत. वारंवार. ते हा चित्रपट डोळे उघडून 'पहा' म्हणून दाखवतो. चित्रपटाची कथा सांगत बसण्यात अर्थ नाही. कारण 'कौल'नंतरचा हा एक वेगळा अनुभव आहे. यात एका प्रसंगात नाट्यक्षेत्रातील मातब्बर लिखाणाच्या प्रक्रियेविषयी बोलतात, तेव्हा क्षणभर कविता महाजन यांचं 'ग्राफिटी वॉल' आठवतं. पण जेव्हा दोन पुरुषांच्या चुंबनाचं एक दृश्य पाहून माझ्या पुढच्या सीटवरची मुलगी 'ईSS' म्हणून किंचाळली, तेव्हा असे चित्रपट पेलवायला थोडा अवधी जावा लागेल, हे प्रकर्षानं जाणवलं.

मृण्मयी गोडबोले, सौरभ सारस्वत आणि विनय शर्मा यांच्या अभिनयाला तोड नाही. त्यांना अभय महाजन, गीतिका त्यागी, इशा केसकर आणि छोट्याशा भूमिकेतील मोहित टाकळकर यांची उत्तम साथ लाभली आहे. इतर तांत्रिक बाबतींतही चित्रपट पॉलिश्ड आहे.

थोडक्यात, खग्रास सूर्यग्रहणासारखा दुर्मिळ योग जसे अवकाशप्रेमी चुकवत नसतात, तसं हाडाचे चित्रपटप्रेमी म्हणवणाऱ्यांनी हा चित्रपट मुळीच चुकवू नये.

लेखक संदेश कुडतरकर मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीड म्हणून कार्यरत आहेत.

msgsandesa@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......