अजूनकाही
गेली चाळीसेक वर्षं अमेरिकेत स्थायिक असलेला आमचा मित्र आणि त्याहीपेक्षा अमेरिकेतल्या नाटकवाल्यांचा आणि मुंबईतून अमेरिकेत व्यावसायिक तसंच कुठल्याही प्रकारची नाटकं घेऊन जाणाऱ्या नाटकवाल्यांचाही लाडका नेपथ्यकार किशोर पाठारे याने परवा एक्झिट घेतली.
या तमाम नाटकवाल्यांना तो कायम हवाहवासा वाटायचा. कारण तो कसलीही अपेक्षा न बाळगता झोकून देऊन काम करायचा. स्वतःचं पोटापाण्याचं काम बाजूला ठेवून पदरचे पैसे बेहिशोबी खर्च करत अमेरिकेच्या कानाकोपऱ्यात कुठेही सेट लावायला जायचा. अपेक्षा असलीच तर एवढीच असायची की, त्याचं आणि त्याच्या सेटसचं सर्वांनी कौतुक करावं. त्यावरून आम्ही जवळचे मित्र त्याची फिरकीही घ्यायचो- ‘किशोरचा सेट कसा? तर अफलातून!’ एवढी एक गोष्ट सोडली तर तो अंतर्बाह्य एक सच्चा रंगकर्मी होता.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या भल्याथोरल्या शिवसृष्टी या नाट्याविष्काराचा तितकाच भव्यदिव्य सेट अमेरिकेत त्यानंच उभा केला. त्यावर खूश झालेले बाबासाहेब म्हणाले, ‘अमेरिकेतून काही न्यायचं असेल तर मी किशोर पाठारेंना नेईन.’ दर दोन वर्षांनी होणाऱ्या बृहन महाराष्ट्र अधिवेशनाच्या तीनही दिवसांच्या कार्यक्रमाचे एकूण एक सेट गेली कित्येक वर्षं तोच उभे करायचा आणि तेही वर म्हटल्याप्रमाणे आतबट्याचा व्यवहार करत. आपल्याला पैसे किती मिळतील, किमान खिशातले खर्च झालेले तरी मिळतील का, याचा काही एक विचार न करता तो नशेत असल्यागत सेटस उभारत राहायचा.
डेट्रोइट आणि शिकागोमध्ये सुधीर भट याच्या सुयोगच्या सकाळी एक आणि दुपारी एक अशा दोन दोन नाटकांचे सेटस तहानभूक विसरून उभे करताना मी त्याला जवळून पाहिलंय. तो आमचा 'गफूरभाई' आणि आम्ही त्याची मंडळी म्हणजे सहाय्यक असं या दोन ठिकाणी आणि अटलांटा, सिएटल, फिलाडेल्फिया या तीन अधिवेशनात मी त्याच्या बरोबर काम केलं होतं. त्यानं काही तरी खावं म्हणून सुधीर भट त्याच्या आगेमागे फिरायचा. मला सांगायचा की त्याला काही तरी चटकन खाऊन घ्यायला सांग. पण किशोर खातपित बसला तर सेट लावणार कोण? नाटक कसं होणार?
सिएटलला तर मी सोललेलं केळं घेऊन त्याच्या मागून फिरत होतो. माझ्या ‘खा रे थोडं’ला कंटाळून चालता चालताच थोडं खायचा आणि आमची वरात तेवढं केळं खाऊन होईपर्यंत तशीच पुढे त्याच्या वेगानं सरकत रहायची.
अटलांटाला तर त्यानं कमालच केली. सेट लावताना तो पडला. त्याचा हात मोडला तर या पठ्ठ्यानं त्याही अवस्थेत मोडका हात गळ्यात बांधून पेनकिलर खात आपलं काम तसंच चालू ठेवलं. तिकडच्या हॉलच्या इन्शुरन्सच्या कटकटी टाळण्यासाठी... हे आपण आपल्या जबाबदारीवर करत आहोत असं लिहून दिलं, पण काम थांबवलं नाही...
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
अशा किती तरी गोष्टी सांगता येतील. मुंबईतल्या दोन मोठ्या वर्तमानपत्रांना एक छोटा लेख पाठवतो म्हटलं, पण त्यांनी पाठव म्हटलं नाही. कारण साधं आहे. किशोर कुणी सेलिब्रेटी नव्हता. ते सोडा किशोरचा इथं आणि अमेरिकेत एवढा मोठा मित्र परिवार आहे, पण सोशल मीडियावरदेखील त्याची कोणी दखल घेतली नाही. मुंबईत नाट्यसृष्टीत त्याचे माझे एवढे कॉमन मित्र आहेत, पण कुणालाही त्याची याद जागवावीशी वाटली नाही. वेळ आली की कुणी तरी एक्झिट घेतं आणि नाटक मात्र पुढे चालू राहतं...
किशोर, राजा यालाच नाटक म्हणतात रे! परंतु नाटक उभं राहण्याआधीचा तुझा तो रंगमंचावरचा वावर आम्ही विसरू शकत नाही. तो खरोखरच अफलातून होता...
लेखक अशोक राणे ख्यातनाम सिनेअभ्यासक आहेत.
ashma1895@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment