‘देऊळ’ : एक कल्ट क्लासिक
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘देऊळ’चं एक पोस्टर
  • Sat , 07 October 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie देऊळ उमेश कुलकर्णी गिरीश कुलकर्णी

दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार आणि संवादलेखक उमेश-गिरीश कुलकर्णी यांचा ‘देऊळ’ हा सिनेमा १० ऑक्टोबर २०११ रोजी साउथ कोरियातल्या Pusan International Film Festivalमध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाला (हा सिनेमा भारतात, महाराष्ट्रात ४ नोव्हेंबर २०११ रोजी प्रदर्शित झाला.), त्याला येत्या १० ऑक्टोबरला सहा वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं हा विशेष लेख…

.............................................................................................................................................

दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार आणि संवादलेखक उमेश-गिरीश कुलकर्णी या जोडीचा ‘वळू’ हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा चित्रपट आहे. तब्बल नऊ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'वळू' हा मी थिएटरमध्ये पाहिलेला पहिला चित्रपट. या जोडीचा प्रत्येक चित्रपट काहीतरी वेगळा अनुभव देऊन जातो. २०११ साली आलेला, राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'देऊळ' हादेखील असाच एक चित्रपट. 

गिरीशच्या स्टोरीटेलिंगची आणि उमेशच्या दिग्दर्शकीय हाताळणीची, दोन्हींची एक स्वतंत्र पद्धत आहे. म्हणजे गिरीश एखादी गोष्ट सांगताना, ती अगदी समोर उभी करतो. तिला एक आपलेपणाचा आणि ग्रामीण भाषेचा एक बाज आणतो. असं करताना त्यात तो कुठेही कृत्रिमता जाणवू देत नाही. मग तो ‘वळू’मधील विनोद असो की, ‘देऊळ’मधील टाळ्या घेणारे संवाद. शिवाय, त्याच्या कथेतील आणि पूर्ण कथानकातील पात्रं आणि त्यांची मांडणी अगदी आपलीशी भासवणारी असते. शिवाय, संवादांमध्ये एक उपहास दडलेला असतो.

हेच उमेशच्या दिग्दर्शनाबाबत. उमेशची स्टोरीटेलिंगची पद्धत मस्त आहे. मुळात तो 'एफटीआयआय'चा विद्यार्थी. त्यामुळे त्याला आपली गोष्ट कशी मांडायची आणि दाखवायची, हे ठाऊक असतं. त्याच्या काही सीन्समध्ये एक संथपणा जाणवत राहतो. शिवाय, तो जसा कॅमेरा फिरवतो, त्यामागेही काहीतरी कारण असतं. दोन वेगवेगळे सीन्स आणि दोन वेगवेगळ्या फ्रेम्स जोडणं, हे त्याला चांगलंच अवगत आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘वळू’मधील जवळपास प्रत्येक दृश्य. दोन वेगळ्या फ्रेम्स एकत्र जोडण्यासाठी यात तो भिंत, दगड वगैरे गोष्टी योग्यरीत्या वापरतो. शिवाय कॅमेरा सर्रकन फिरण्याऐवजी त्यातील म्युझिकप्रमाणे संथपणे हॉरिझंटली स्क्रोल केल्यासारखा जो एक भास तो निर्माण करतो, ते खरंच सुंदर आहे.

असेच सीन्स (कुलशॉव्ह इफेक्ट) ‘देऊळ’च्या शेवटच्या अर्ध्या-पाऊण तासात प्रकर्षानं आढळतात. यातून त्याचं दिग्दर्शकीय कौशल्य दिसून येतं. म्हणजे एकीकडे देवळात निव्वळ बाजार मांडण्यासाठी नवीन मूर्ती आणली जात आहे, तर दुसरीकडे केशव पूर्ण श्रद्धेनं जुन्या मूर्तीशी संवाद साधतोय वगैरे एकदम विरुद्ध गोष्टी दाखवताना भिंतीचं रूपक दाखवणं त्याचं दिग्दर्शकीय कौशल्य अधोरेखित करतात. 

उमेशच्या चित्रपटांमध्ये संगीत हा एक महत्त्वाचा भाग असतो. मग तो ‘वळू’ असो की ‘देऊळ’. ‘देऊळ’ला मंगेश धाकडे यांनी संगीतबद्ध केलंय. यातील पार्श्वसंगीत ही सर्वांत सुंदर गोष्ट म्हणता येईल. यातील बीट्स, बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे लक्षात राहतं. 

पण झाल्या त्याच्या तांत्रिक बाजू. ‘देऊळ’चं खरं यश आहे ते त्याच्या कथेत. ती साधी सरळ आहे. 

उंबरा गावातील नेत्याच्या, भाऊसाहेब गलांडेच्या (नाना पाटेकर) घरी काम करणाऱ्या केशवला (गिरीश कुलकर्णी) त्यांची गाय करडीला चरायला घेऊन गेल्यावर ‘साक्षात्कार’ होतो आणि त्याला दत्त 'दिसतात'. भाबडा केशव ही गोष्ट सर्वांना सांगत सुटतो. आणि तिथून सगळ्या गोष्टी बदलत जातात. 

गावातील संवेदनशील व्यक्ती असलेल्या अण्णांना ही गोष्ट कळते. ते केशवला ही गोष्ट फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवण्याचा सल्ला देतात आणि देव ही एक वैयक्तिक बाब कशी आहे, हे समजावतात. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. 

मात्र एकीकडे पत्रकार महासंग्राम हा एखाद्या 'न्यूज'च्या शोधात असतो, तर दुसरीकडे भाऊंचा लहान भाऊ त्यांच्या वर्चस्वामुळे आणि डॉमिनेटिंग नेचरमुळे आपल्याला योग्य वागणूक मिळत नाही, या भावनेनं त्रासलेला असतो. यामुळेच तो राजकारणामध्ये उतरण्याच्या प्रयत्नात असतो. यासाठी त्याला मदत होते ती केशवला झालेल्या साक्षात्काराची.

केशवला झालेल्या साक्षात्काराचा प्रत्येक जण - भाऊ, पार्टी चीफ इ. - आपल्या फायद्यासाठी कसा वापर करून घेतात, याची गोष्ट म्हणजे ‘देऊळ’. 

या प्रवासात, या देवळाच्या राजकारणातून गावाचा विकास (!?) होतो खरा. पण त्याहून जास्त हा प्रकार काही लोकांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोगात आणला जातो. शिवाय या राजकारणानं आणि तथाकथित विकासानं गावाची भौतिक प्रगती जरी होत असली तरी नैतिकदृष्ट्या गाव आणखी मागं पडत जातं. हा प्रश्न केवळ काही लोकांच्या अथवा एका गावाच्या श्रद्धा अथवा अंधश्रद्धेचा राहता नाही, तर आपल्याच समाजाचं एक रूप म्हणून प्रतिबिंबित होऊ लागतो. 

हे झालं त्याच्या कथानकाविषयी आणि दिग्दर्शक लेखकाला अभिप्रेत अर्थाविषयी. इथून पुढे चित्रपट दोन पातळींवर चालू लागतो. एक म्हणजे गावातील तथाकथित विकासाचं राजकारण आणि दुसरं म्हणजे त्या राजकारणात होणारी केशवची घुसमट आणि या सगळ्यांपासून कित्येक कोस दूर असलेला देव. 

हे राजकारण दाखवताना गिरीशनं लिहिलेलं कथानक आणि संवाद दोन्हीही महत्त्वाचे ठरतात. कारण राजकारणातून गावपातळीवरील अगदी अंतर्गत पातळीवर अस्तित्वात असलेल्या आणि घडणाऱ्या गोष्टी दाखवण्यात येतात. पण त्यात आपण खूप महत्त्वाचं सांगतोय असा बडेजाव नाही किंवा आपण जे काही दाखवतोय, ते बौद्धिक दिल्याप्रमाणे, वैचारिक पातळीवर दाखवण्याचा अट्टाहासही नाही. त्यामुळे चित्रपटात जे काही घडतं त्यात प्रेक्षकाला आपल्या जवळपास, गावात, शहरात दिसणाऱ्या राजकारणाचं प्रतिबिंब दिसायला लागतं. 

त्यामुळे ही पात्रं आपल्यासमोर जिवंतपणे उभी असल्यासारखी भासतात. असं घडण्यामागे त्यांच्या भाषेच्या लहेजाचं जितकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व ही पात्रं उभी करताना, प्रत्येक पात्राची बॅकस्टोरी दाखवताना थोडक्यात कॅरेक्टर डेव्हलपमेंटला देण्यात आलंय. आणि यामुळे ती पात्रं थेट आपल्याला भिडतात. 

याखेरीज जागतिकीकरणाचाही एक दृष्टिकोनही दाखवला आहे. पण तोही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मांडलाय. यात ‘वळू’सारखी लक्षात न येणारी मेटॅफर नाहीत. त्यामुळे लेखक-दिग्दर्शकाला जे काही सांगायचंय, ते हा चित्रपट स्पष्टपणे सांगतो.

या सगळ्याखेरीज आपल्याला आस्तिकता आणि नास्तिकता यांच्याशी संबंधित प्रत्येक पात्रं सापडतं. अशा पात्रांचे (थोडक्यातच समाजातील व्यक्तींचे) साधारण चार प्रकार पाडता येतात.

एक, आस्तिक, पण देवाकडून काहीच अपेक्षा न ठेवणारे केशवसारखे लोक

दुसरा, आस्तिक पण इतरांच्या श्रद्धेचा आपल्या राजकारणासाठी आणि फायद्यासाठी उपयोग करून घेणारे भाऊसारखे लोक

तिसरा, आस्तिक, पण देवानं आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात असा ज्यांचा अट्टाहास आहे अशी इतर सगळी पात्रं

आणि चौथा व सर्वांत महत्त्वाचा, विवेकी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि नास्तिक असलेले अण्णांसारखे लोक. 

यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारची माणसं आपल्याला सर्वत्र, अगदी पावलोपावली आढळून येतात. पण महत्त्वाची ठरतात ती दोनच पात्रं- केशव आणि अण्णा. जी त्यांच्यासारख्याच इतर लोकांचे प्रतिनिधी म्हणून चित्रपटात दिसतात. ही दोन्हीही पात्रं आपापल्या जागी योग्य वाटतात. त्यातील अण्णांचं पात्र किती योग्य आहे, हे सांगण्याची गरज नाही. पण केशवचं पात्रही तितकंच योग्य वाटतं. अर्थातच ते स्वतःच्या श्रद्धेमुळे, भाबडेपणामुळे आणि अविवेकी विचारांमुळे वैयक्तिक आणि सामाजिक नुकसानाला कारणीभूत ठरतं. इथं खरं तर चित्रपट आपल्याला एक ग्राउंडब्रेकिंग रिअॅलिटी दाखवतो. केशव हे पात्र समाजातील बहुतांशी लोकांचं प्रतिनिधित्व करतं. जे केवळ श्रद्धा ही संकल्पना लक्षात न आल्याने तिच्या (जी बहुतेक वेळा लवकरच अंधश्रद्धेत रूपांतरित होते) आहारी जातात.  

चित्रपट शेवटाकडे जात असताना पुन्हा एकदा केशवला (आणि खरं तर आपल्याला आणि समाजालाही) अण्णा या पात्राची गरज भासते. पण अण्णा याआधीच सर्व जाचातून दूर गेलेले असतात. तिथून पुढे सुरू होतो केशवच्या आत्मभानाचा प्रवास.

आपल्या दत्ताला रोज देवळाच्या शटरआड बंद होताना पाहून, तथाकथित विकासाच्या नावाखाली भौतिक सुखांमध्ये रममाण झालेल्या आपल्या कुटुंबाला व गावाला पाहून त्या सर्वांवर आणि स्वतःवर चिडलेला केशव दत्ताला रोजच्या ठरावीक वेळेत उघडणाऱ्या आणि बंद होणाऱ्या देवळाच्या आणि भक्तांच्या अपेक्षांच्या जाचातून मुक्त करू पाहतो. 

हा शेवटचा अर्धा तास पडद्यावर जसा दाखवलाय, त्यातही पुन्हा मोंटाजेस्, कॅमेरा वर्क, कुलशॉव्ह इफेक्ट्स, साउंड डिझाइन आणि पार्श्वसंगीताचा केलेला अप्रतिम वापर या सगळ्यांमुळे केशवचा हा आत्मशोध कुठेतरी आपल्यालाही आत्मभान देऊन जातो. आणि इथंच खऱ्या अर्थानं हा चित्रपट यशस्वी ठरतो. 

पण चित्रपट इथंच थांबत नाही. ढोलताशांच्या गजरात दत्ताच्या नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. केशवच्या एका चुकीमुळे सुरू झालेला, भाऊ आणि इतरांनी मांडलेला देवाचा बाजार त्याच्या आत्मभानानं किंवा त्यानं उचललेल्या पावलानं थांबत नाही. तो अजून जोरात आणि प्रसिद्धीच्या जोरावर आणखी जोमानं सुरूच राहतो. आणि पुन्हा एकदा शटरच्या आड दत्त बंद करून ठेवला जातो, या फ्रेमनं चित्रपट संपतो. 

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

थोडक्यात हा चित्रपट फक्त मनोरंजन करत नाही तर कुठल्याही बडेजावाचा आव न आणता तो समाजातील परिस्थिती आपल्यासमोर मांडतो.  

आता हा चित्रपट आठवण्याचं कारण म्हणजे लवकरच या चित्रपटाला सहा वर्षं पूर्ण होतील. आज हा चित्रपट मुखोद्गत असणाऱ्या कितीतरी लोकांना मी ओळखतो. आता हा चित्रपट एक कल्ट क्लासिक बनलाय, असं म्हटल्यास वावगं होणार नाही. 

पण हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वेळी आणि त्यानंतर झालेला गदारोळ अजूनही बऱ्यापैकी आठवतो. उमेश-गिरीशला आलेले धमक्यांचे फोन, जातीचा उल्लेख करून केलेली टीका वगैरे वगैरे. या चित्रपटानं मांडलेली परिस्थिती आजही फार काही बदललेली नाही. अर्थात यात काही नवल नाही. जिथं हॉलिवुड आणि जागतिक चित्रपट अशा घटनांपासून वाचू शकत नाही, तिथं मराठी-हिंदी चित्रपटांची काय कथा! 

लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख