शंकर : कॅमेरा हा ज्याचा तिसरा डोळा आहे असा दिग्दर्शक
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • तमिळ चित्रपट दिग्दर्शक शंकर आणि त्यांच्या सिनेमांच्या तेलुगु आवृत्त्यांची पोस्टर्स
  • Sat , 07 October 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar

दिल्लीमध्ये भाजप आणि काँग्रेससारख्या प्रस्थापित राजकीय पक्षांचा पराभव करून अरविंद केजरीवाल सर्वप्रथम सत्तेत आले, त्याला अनेक सामाजिक आणि राजकीय घटक कारणीभूत होते. आपच्या समर्थकांनी अतिशय चतुराईनं केलेल्या सोशल मीडिया कॅम्पेनचा या विजयात वाटा होता. वाचकांना आठवत असेल तर 'नायक' या चित्रपटामधल्या शिवाजीराव गायकवाड या राज्याच्या भ्रष्ट आणि गर्विष्ठ मुख्यमंत्र्याला आवाहन देऊन एक दिवसाचा मुख्यमंत्री बनणाऱ्या पात्राचा केजरीवालांची प्रतिमानिर्मिती करण्यासाठी आपच्या मीडिया मॅनेजर्सनी खुबीनं वापर करून घेतला होता.

'नायक'मधला शिवाजीराव गायकवाड हा प्रामाणिक, ध्येयवादी आणि प्रस्थापित भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान देणारा होता. 'नायक'मधले संवाद-प्रसंग वापरून केजरीवाल हे प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणारे 'नायक'च आहेत, असा प्रचार आप समर्थकांनी केला होता. काँग्रेस-भाजप म्हणजे भारतातल्या सडलेल्या राजकीय व्यवस्थेचं प्रतीक असलेला बलराज चौहान (‘नायक’मधलं अमरीश पुरी यांनी केलेलं भ्रष्ट मुख्यमंत्र्यांचं पात्र) आहे, अशी भावना  मतदारांच्या जाणिवां-नेणिवांमध्ये जागृत करण्यात 'आप'वाले यशस्वी झाले होते. 'आप'च्या आणि पर्यायानं केजरीवालांच्या यशामध्ये अशा प्रकारे एका चित्रपटानं छोटासा का होईना वाटा उचलला. केजरीवाल खरोखर शिवाजीराव गायकवाडसारखे नायक झाले का याचा फैसला दिल्लीकर पुढच्या विधानसभा निवडणुकीत करतीलच. पण 'नायक' चित्रपट ज्याने बनवला तो दिग्दर्शक शंकर आपल्या चित्रपटाचं यश आपल्याला ज्या भागातली भाषादेखील बोलता येत नाही, त्या भागात राजकीय उत्पात घडवताना बघून मनातल्या मनात नक्कीच खुश झाला असेल. कारण चित्रपटांमधून राजकीय विधान करण्यात शंकरचा हातखंडा आहे.  

आश्चर्य वाटेल, पण आज बिग बजेट चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक शंकर जेव्हा तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला, तेव्हा त्याला यथार्थ, छोट्या बजेटचे, चकचकटापेक्षा कथेला प्राधान्य देणारे सिनेमे बनवायचे होते. आज शंकरची फिल्मोग्राफी बघून हे खरंही वाटणार नाही. बॉलिवुडच नव्हे तर देशभरातल्या अनेक प्रादेशिक फिल्म इंडस्ट्रीमध्ये इंजिनीअरिंग केलेले लोक मोठ्या प्रमाणावर दिसतात. शंकरनेही आपलं मॅकेनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केलं होतं. त्या पार्श्वभूमीचा फायदा शंकरला फिल्ममेकिंगमध्ये झाला असणार. फिल्ममेकिंगची अनेक डिपार्टमेंट्स दिग्दर्शक म्हणून सांभाळणं आणि कुठल्याही प्रॉडक्टचे शेकडो नटबोल्ट व्यवस्थित घट्ट पिरगाळणं यात बरंच साम्य आहे. कुठलाही एखादा नटबोल्ट नीट बसवला नाही तर प्रॉडक्ट फेल जाण्याची शक्यता असते. संघर्षाच्या काळात शंकरचा आदर्श यथार्थ सिनेमे बनवणाऱ्या जे. महेंद्रन या तमिळ दिग्दर्शकाचा होता. शंकरनं आपल्या पहिल्या चित्रपटासाठी जी कथा लिहिली होती, ती स्त्रीप्रधान होती. पण तेव्हा तमिळ सिनेमात ‘लार्जर दॅन लाईफ’ नायक, हाणामाऱ्या, गाणं, अंगप्रदर्शन अशा घटकांचा समावेश असणाऱ्या मसाला सिनेमाची चलती होती. शंकरला आपल्या स्त्रीप्रधान चित्रपटासाठी निर्माताच मिळेना. शेवटी शंकर आपला पहिला चित्रपट बनवण्यासाठी प्रचलित व्यवस्थेला शरण गेला. त्याचा सर्व व्यावसायिक चित्रपटांचे गुणधर्म अंगी असणारा पहिला चित्रपट 'जेंटलमॅन' सुपरहिट झाला आणि शंकरनं नंतर मागं वळून बघितलं नाही. यशाची चव चाखलेल्या शंकरनं मग यथार्थ सिनेमाकडे ढुंकूनही बघितलं नाही. आज शंकर म्हणजे मसाला चित्रपटांचं समानार्थी नाव बनलं आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करणारी माणसं स्वतःच व्यवस्थेचा भाग बनतात, तेव्हा किती बदलतात याचं हे उदाहरण आहे.

शंकर हा तसा तब्येतीत भरपूर वेळ घेऊन काम करणारा माणूस. जवळपास पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यानं अवघे चौदा सिनेमे दिग्दर्शक म्हणून केले आहेत. त्याचे काही सिनेमे सुपरहिट आहेत, काही हिट आहेत तर काही सरासरी चालले आहेत. पण एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यानं अपयशाचं किंवा फ्लॉपच तोंड बघितलं नाहीये. मोठ्या कारकिर्दीत फ्लॉप सिनेमा न देण्याचं कर्तृत्व असलेले फार कमी लोक आहेत. चटकन आठवणारी दोन नावं म्हणजे राजू हिरानी आणि ‘बाहुबली’ फेम राजामौली. 

शंकरचा स्वतःचा आवडता दिग्दर्शक मणिरत्नम आहे. पण तो मणिरत्नमसारखे सिनेमे तयार करण्याच्या फंदात कधी पडला नाही. मला स्वतःला शंकर दिग्दर्शक म्हणून कधी आवडतो, तर कधी आवडत नाही. पण त्याच्या चित्रपटांनी काही आयुष्यभर आठवत राहतील अशा गोष्टी दिल्या आहेत हे नक्की. त्याच्या 'जेंटलमॅन'मध्ये प्रभुदेवा नावाच्या चमत्काराला पडद्यावर पहिल्यांदा नाचताना बघितलं. त्याच्या सिनेमात रहमाननं अदभुत गाणी (‘माया मछिंद्रा’ किंवा ‘टेलिफोन धून में हसनेवाली’ असे अतिशय विचित्र लिरिक्स असणारी) दिली आहेत. त्याचा 'इंडियन' आता कितीही बटबटीत वाटत असला, तरी तेव्हा त्यातल्या भ्रष्टाचारविरोधी संदेशामुळे खूप आवडला होता. मुख्य म्हणजे त्याचे 'नायक', 'रोबोट' आणि 'शिवाजी द बॉस' हे सिनेमे मला त्यातली सगळी अतर्क्यता लक्षात येऊनही बेहद आवडतात. पण शंकरचा मला सगळ्यात जास्त आवडलेला सिनेमा म्हणजे 'अपरिचित-द स्ट्रेंजर'. मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असणारा एक आदर्शवादी माणूस भ्रष्ट लोकांना कसं संपवतो याची कथा चित्रपटात होती. शंकरच्या नावावर एक नकोसा रेकॉर्डही आहे. त्याचे 'इंडियन' आणि जुळ्या भावंडांची प्रेमकथा सांगणारा 'जीन्स' हे दोन सिनेमे ऑस्करसाठी भारताकडून पाठवले गेले होते. अजूनही ऑस्करसाठी पाठवल्या गेलेल्या सर्वांत वाईट चित्रपटांची यादी बनते, त्यात हे दोन चित्रपट सगळ्यात वर असतात. 

शंकरच्या चित्रपटांमध्ये नेहमीच एक राजकीय अंडरकरंट असतो. रजनीकांत तर शंकरच्या सिनेमातून आपल्या राजकीय भूमिका स्पष्ट करतो अशी त्याच्या चाहत्यांची श्रद्धा आहे. 'शिवाजी द बॉस'मधला खलनायक आठवतोय? तो डिट्टो करुणानिधीसारखा होता. तोच काळा गॉगल, तीच ढब  तेच व्यक्तिमत्त्व. 'शिवाजी द बॉस'  आला तेव्हा करुणानिधी सत्तेत होते. वैयक्तिक आयुष्यात रजनीकांतचे करुणानिधींशी सौहार्दाचे संबंध असले तरी सार्वजनिक आयुष्यातले त्यांचे संबंध लव्ह-हेट रिलेशनमधले आहेत. या चित्रपटामधला शिवाजी या करुणानिधीसारख्या दिसणाऱ्या खलनायकाला कसं पराभूत करतो, हे बघून प्रेक्षकांनी टाळ्या पिटल्या होत्या.

राजकारण आणि राजकारणी हे शंकरच्या चित्रपटात सतत येत असतात. प्रभुदेवा नायक असणारा 'हमसे है मुकाबला' हा चित्रपट एक प्रेमकथा होती. त्यातही गिरीश कर्नाडांनी रंगवलेला खलनायक राजकारणी होता. 'हिंदुस्थानी' आणि 'नायक' या चित्रपटांनी राजकारण्यांचं एक काळंकुट्ट चित्र रंगवलं आहे. देशात एकूणच राजकारण्यांबद्दल जो सार्वकालिक असंतोष असतो, त्याचा पुरेपूर उपयोग शंकर आपल्या चित्रपटांमधून करून घेतो. त्याच्या 'रोबोट २.०'मधून रजनीकांत त्याच्या राजकारणामधील प्रवेशावर भाष्य करेल अशा अटकळी बांधल्या जात आहेत. 'जीन्स' आणि 'थ्री इडियट्स'चा रिमेक असणारा 'नंबन' हे फक्त अपवाद.

‘भव्यता’ हे शंकरच्या चित्रपटांचं व्यवच्छेदक लक्षण. 'जीन्स'मधल्या एकाच गाण्यात त्यानं जगातल्या सात आश्चर्यांची सफर प्रेक्षकांना घडवून आणली होती. त्याच्या सिनेमातल्या एका गाण्यात त्यानं तब्बल पंधराशे ज्युनियर आर्टिस्ट्सचा वापर केला होता. त्याच्या या भव्यतेच्या सोसामुळे त्याला ‘तमिळ सिनेमामधला जेम्स कॅमेरॉन’ अशी पदवी त्याच्या चाहत्यांनी दिली आहे. शंकर आणि कॅमेरॉनचा वाढदिवस एकाच महिन्यात येतो हा योगायोग. शंकरच्या सिनेमाला वर्णगंडाचा एक पैलू आहे. एकूणच भारतीय लोकांमध्ये आणि विशेषतः दाक्षिणात्य लोकांमध्ये गोऱ्या कातडीबद्दल आणि पर्यायानं विदेशाबद्दल प्रचंड आकर्षण असतं हे एक उघड गुपित आहे. शंकरच्या सिनेमातली पात्रं ही अनेक वेळा विदेशात शिकलेली असतात किंवा परदेशी स्थायिक झालेली असतात. 'शिवाजी द बॉस'मधला नायक आपल्या विदेशातल्या उज्ज्वल करिअरवर लाथ मारून देशाची सेवा करण्यासाठी वापस येतो. त्यातून त्याची त्यागमूर्ती अशी इमेज निर्माण होते. शंकरच्या सिनेमाधल्या गाण्यांमध्ये गोऱ्या ज्युनिअर आर्टिस्टचा भरणा असतो. या गोऱ्या कातडीच्या आकर्षणातूनच 'आय' या चित्रपटाच्या ऑडिओ लाँचला अरनॉल्ड श्वॉर्जनेगरला बोलावण्याची कल्पना शंकरच्या सुपीक डोक्यातून आली असावी. 

दिग्दर्शक म्हणून शंकर कधीच देशातल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांच्या यादीत येऊ शकत नाही. मग त्याची नोंद का घेतली जावी? पंचवीस वर्षांमध्ये एकही फ्लॉप सिनेमा बनवला नाही म्हणून? त्याचे चित्रपट भव्यदिव्य असतात म्हणून? तो रजनीकांत आणि कमल हसनचा लाडका दिग्दर्शक आहे म्हणून? त्याचे चाहते त्याची तुलना जेम्स कॅमेरॉनशी करतात म्हणून? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ‘नाही’ असंच आहे.

शंकरची नोंद घेणं आवश्यक आहे ते त्यानं 'मासेस'ला आवडतील असे चित्रपट सातत्यानं बनवले म्हणून. मासेसनं सुपरहिट केलेल्या चित्रपटांचं चित्रपटसृष्टीच्या अर्थकारणात खूप महत्त्वाचं स्थान असतं. मासेससाठी सिनेमा बनवणारे सलमान खान, रजनीकांत, शंकरसारखे लोक म्हणजे इंडस्ट्रीची फुप्फुसं आहेत. हे लोक इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक चलनवलन घडवून आणतात म्हणून अनेक चांगल्या प्रायोगिक चित्रपटांची निर्मिती होण्याचा रस्ता मोकळा होतो. या लोकांचं नाव काढल्यावर तुच्छतेनं बघण्याचं आणि नाक मुरडण्याचं स्वातंत्र्य अर्थातच सगळ्यांना आहे, पण या वरील लोकांची गंभीर लिखाण करणाऱ्या लोकांनी नोंद न घेणं हा त्यांच्यावरचाच अन्याय नसेल तर ते ज्या लाखो-करोडो लोकांसाठी सिनेमा बनवतात, त्या मासेसवर पण अन्याय असेल.

ज्या देवाच्या नावावरून शंकरचं नाव ठेवलं आहे, त्या शंकराला तिसरा डोळा होता. शंकराला राग आला की, तो तृतीय नेत्र उघडून समोरच्याला क्षणार्धात भस्मसात करे. शंकर या दिग्दर्शकाकडे कॅमेरारूपी तिसरा नेत्र आहे. त्या कॅमेऱ्यातून राजकीय नेते, भ्रष्ट व्यवस्था यांच्यावर शंकरच्या तिसऱ्या नेत्राचा रोख आहे. जोपर्यंत जनमानसात राजकारण्यांबद्दल, व्यवस्थेबद्दल असंतोष आहे, तोपर्यंत शंकरच्या एकही फ्लॉप नसणाऱ्या कारकिर्दीला गालबोट लागणार नाही हे नक्की. 

.............................................................................................................................................

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Bharat D

Sat , 07 October 2017

गौतम वासुदेव मेनन यांच्यावरही आता एक जोरदार लेख येऊ द्या! आणि तरूण दिग्दर्शक शशीकुमारवरही. मराठी प्रेक्षकांना यांची ओळख तुम्हीच समर्थपणे करून देऊ शकाल!


Bharat D

Sat , 07 October 2017

चांगला लेख. एक बरीकसा तपशील म्हणजे जी पोस्टर्स दाखवली आहेत ती डब केलेल्या तेलुगू आवृत्त्यांची आहेत, मुळ तमिळ चित्रपटांची नाहीत. मुळ तमिळ शिर्षक, कंसात तेलुगू शिर्षक आणि मुख्य भुमिका याप्रमाणे: जेंटलमॅन (जेंटलमॅन): अर्जून, मधू. महेश भटने यावरून चिरंजीवी आणि जुहीला घेऊन हिंदी जंटलमॅन काढला. आपटला जोरात. कादलन(प्रेमिकूडू): प्रभुदेवा, नगमा. (हिंदी डबींग: हम से है मुकाबला) इंडीयन (भारतीयुडू): कमल, मनिषा, उर्मीला (हिंदी डबींग: हिंदुस्तानी) मुदलवन् (ओक ओक्कूडू): अर्जून, मनिषा. हिंदिमध्ये अनिल कपूर आणि राणी मुखर्जीचा नायक बॉयीज् (बॉयीज): सिद्धार्थ, जेनीलीया, भरत आणि इतर. हा हिंदीत आला नाही. जीन्स (जीन्स): प्रशांत, ऐश्वर्या. हिंदीतही नाव तेच आहे. फक्त अन्नीयन् (अपरीचितडू, हिंदीत अपरीचित) वगळता इतर सर्व चित्रपटांना रेहमानचं संगीत आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......