अजूनकाही
१. मु्ंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाकडून तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, अनिस इब्राहिम आणि इक्बाल कासकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकानं २०१५ मध्ये बोरीवलीतील गोराईमध्ये ३८ एकरची जागा घेतली होती. यासंदर्भात जमीनमालक आणि व्यावसायिकामध्ये करार झाला. मात्र काही कारणास्तव बांधकाम व्यावसायिकाला हा करार मार्गी लावता आला नाही. या कालावधीत जमीनमालकानं बांधकाम व्यावसायिकाकडे आणखी पैशांची मागणी केली. जमिनीचा भाव वधारल्याने जमीनमालकाने पैशांचा तगादा लावला. मात्र हा करार रद्द करताना दोन कोटी रुपये दिल्याचे सांगत बांधकाम व्यावसायिकाने आणखी पैसे देण्यास नकार दिला. शेवटी हा वाद रिअल इस्टेट एजंटकडे पोहोचला. रिअल इस्टेट एजंटनं या प्रकरणात इकबाल कासकरची मदत घेतली.
इक्बाल कासकरविरोधात मूळ तक्रार करणारा बिल्डर आणि इक्बालचा एक साथीदार यांची, एका डान्स बारमधली एकत्र नाचतानाची छायाचित्रं प्रसिद्ध झाली आहेत. इक्बालविरुद्ध आताच अॅक्शन का सुरू झाली आहे, हे संशयास्पद असताना आता दाऊदच्या विरोधात गुन्हा दाखल करून ठाणे पोलिस नेमकं काय साध्य करतायत आणि कुणासाठी करतायत, अशी शंका निर्माण होते. ‘दाऊदला फरपटत’ आणण्याच्या वचनपूर्तीच्या दिशेनं तर ही पावलं पडत नाहीत ना? तेही त्याच्या सोयीनं आणि इच्छेनंच होईल, याबद्दल मात्र शंका नाही.
.............................................................................................................................................
२. आक्रमक हिंदुत्ववादी अशी प्रतिमा असलेले उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ हे डाव्यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात केरळमध्ये भाजपच्या जनरक्षा यात्रेत सहभागी होण्यासाठी गेल्यामुळे केरळमधील डाव्या-उजव्यांचा संघर्ष तीव्र झाला आहे. उत्तर प्रदेशातील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये ऑगस्ट महिन्यात ऑक्सिजन न मिळाल्यानं ७० लहान मुलं दगावली. या दुर्घटनेचा आधार घेऊन डाव्यांनी आदित्यनाथांवर खवट टीका केली आहे. रुग्णालयं कशी चालवली जातात, मुख्यमंत्र्यांची जबाबदारी काय असते, हे शिकवण्यासाठीच आम्हीच त्यांना केरळमध्ये निमंत्रित केलं आहे, असा टोला सीपीआय(एम)नं लगावला आहे. आदित्यनाथ आणि भाजपचे इतर मुख्यमंत्री यांनी केरळ सरकारकडून सत्ता कशी चालवायची याचे धडे घ्यावेत, असा तिखट शब्दांतील टोलाही सीताराम येचुरी यांनी लगावला.
आपल्या राज्याची अवस्था काय आहे, कायदा-सुव्यवस्थेचे काय धिंडवडे निघाले आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून आदित्यनाथांना देशाच्या इतर भागांमध्ये पाठवलं जातं आहे, ते कशासाठी? उत्तर प्रदेशात सुशासनाचा किमान देखावाही ते (भाजपनेते असूनही) उभा करू शकलेले नाहीत. त्यांना केरळसारख्या राज्यात पाठवणं हे हात दाखवून अवलक्षण करून घेणंच होतं. आदित्यनाथांची ज्वलंत प्रतिमा चमकवायला ते आता निव्वळ तोंडाळ खासदार नाहीत, एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत, हे लक्षात घ्यायला हवं होतं त्यांच्या परिवारातील धुरिणांनी.
.............................................................................................................................................
३. गुजरातमध्ये दलित तरुणानं मिशी ठेवल्याच्या कारणावरून आणखी एक हल्ल्याची घटना घडली आहे. गांधीनगरमध्ये एका १७ वर्षाच्या मुलावर दोन अज्ञात व्यक्तींनी ब्लेडने वार केले होते. यापूर्वीही मिशी ठेवल्याच्या कारणावरून दोन दलित तरुणांना मारहाण करण्यात आली होती. आणंद जिल्ह्यात नवरात्रीच्या काळात गरब्यामध्ये सहभागी झाल्यानं एका दलिताची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली होती. दलितांवरच्या या हल्ल्यांना विरोध म्हणून सोशल मीडियावर मिशीधारी सेल्फी शेअर करण्याचा ट्रेंड उसळला आहे. गुजरातमधील शेकडो तरुणांनी व्हॉट्सअॅपवरचा डीपी बदलून मिशीचा डीपी ठेवत आहेत. या मिशीच्या छायाचित्राखाली मिस्टर दलित असं लिहिलेलं असून मुकुटाचं चित्र देखील आहे. त्याचबरोबर फेसबुक आणि ट्विटरवर #DalitWithMoustache या हॅशटॅगच्या माध्यमातून प्रोफाईल फोटोही बदलण्यात आले आहेत. दलितांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मिशी रॅलीचं आयोजन करण्याचाही गुजरातमधील तरुणांचा विचार आहे.
दलितद्वेष्ट्यांची मिशी उतरवण्याचाच उपक्रम आहे हा! गुजरातच्या विकासाचे पवाडे गाणाऱ्यांना त्या राज्यातले काही भागांतले गुळगुळीत रस्ते आणि बड्या शहरांमधले काही प्रकल्प सोडल्यास फारसं काही दाखवता येत नाही. राज्यात सर्व धर्मजातीच्या नागरिकांना सौहार्दानं राहता येणं, हा विकासाचा खरा अर्थ आहे, हे त्यांच्या गावी नाही. त्यांचा तथाकथित विकास वेडा झाला आहे, हे आता देशभरात समजलं आहेच. तो एवढा वेडा झाला असेल, अशी कल्पना मात्र कोणीच केली नसेल.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
४. नोटाबंदीच्या काळात लोकांच्या सोयीसाठी बँक कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइममध्ये कामं करावी लागली. मात्र, ११ महिने उलटून गेले तरी अद्याप कर्मचाऱ्यांना त्यांच्या ओव्हरटाइमचे हक्काचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा धमकी दिली आहे. पैसे मिळणार नसतील तर न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारनं ५०० आणि १००० रुपये किमतीच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. देशातील एकूण चलनापैकी हे चलन ८६ टक्के इतकं होतं. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आणि बदलून घेण्यासाठी लोकांच्या देशभरातील बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या. या परिस्थितीत जनतेच्या सोयीसाठी बँक कर्मचाऱ्यांना नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ काम करावं लागलं होतं. त्याचबरोबर त्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या होत्या. सुमारे तीन महिने बँक कर्मचाऱ्यांना अधिक काळ काम करावं लागत होतं.
मित्रों, बडे दुख की बात है की बँक कर्मचाऱ्यांना देशासाठी केलेल्या कामाचे पैसे हवे आहेत. देशातल्या आर्थिक क्रांतीचे आपण शिलेदार होतो, हे पिढ्यानपिढ्यांना अभिमानानं सांगण्याची संधी असताना त्यांना क्षुद्र आर्थिक भरपाई हवी आहे. सीमेवर जवान लढत असताना इथं दोन-तीन तास अधिक काम करून देशातला सगळा काळा पैसा, दहशतवाद्यांची रसद वगैरे एका फटक्यात तोडणाऱ्या नोटबंदीत खारीचा वाटा उचलला, तर त्याची किंमत पैशात करताय? या कर्मचाऱ्यांमध्ये देशभक्ती जागवण्यासाठी बँकेत दर अर्ध्या तासानं ‘जनगणमन’ वाजवावं काय? की थेट ‘वंदे मातरम’चाच डोस द्यावा?
.............................................................................................................................................
५. राज्यातील राजकीय अस्थिरता वाढू नये तसेच सत्ता पुन्हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या हातामध्ये जाऊ नये, यासाठी शिवसेना सत्तेत आहे, अशी भूमिका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मांडली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली. त्यावर राऊत म्हणाले, शरद पवार हे काहींसाठी होकायंत्र तर काही जणांसाठी धोकायंत्र आहेत. त्यांना सर्व गोष्टी लवकर कळतात. मुंबईतील लोकल सेवा सुरळीत होत नाही, तोपर्यंत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या राज ठाकरे यांनी हा मुद्दा शिवसेनेकडूनच उचलला आहे, असा आरोप त्यांनी केला. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पात वीट नसते तर रूळ असतो. ते उखडण्याचं धाडस फक्त शिवसेनाच करू शकते, अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
राज्याच्या स्थैर्यासाठी शिवसेना केवढा त्याग करून सत्तेत आहे आणि आपण नतद्रष्ट त्यांना सत्तालोलूप म्हणून हिणवतो, या विचारानं कित्येक जणांचे डोळे पाणावले असतील. बुलेट ट्रेनच्याबद्दल, खासकरून मुंबईकर लोकलप्रवाशांच्या मनात असलेल्या खदखदीवरही शिवसेनेचा कॉपीराइट आहे, ही नवीच माहिती मिळाली. बाकी शिवसेना रूळ उखडू शकते, यावर कोणीही शंका घेणार नाही. त्यांना हे उखडाउखडीचे उद्योग सर्वांत उत्तम जमतात. त्यांच्याकडून काही उभारणी होणार नाही, विध्वंसात मात्र पहिला नंबर. हा लौकिक राज ठाकरेही हिरावून घेऊ शकत नाहीत.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment