अजूनकाही
...एकाएकी संपूर्ण पोट ढवळून मोठाल्या वांतीचा उमाळा यावा आणि पोटातलं काहीतरी भडाभडा बाहेर ओकलं जावं, तसं काहीसं झालं. माझं मेंदूमन अगदी तळापासून ढवळलं गेलं आणि काहीतरी बाहेर आलं. काहीतरी मला माहीत असलेलं आणि नसलेलंही.
हृषीकेश गुप्ते यांची ‘दंशकाल’ ही नवी कादंबरी नुकतीच राजहंस प्रकाशनाकडून प्रकाशित झाली आहे. या कादंबरीची ही झलक...
.............................................................................................................................................
दहाव्याचे विधी चटकन आटोपले. कावळाही जणू पिंडाची वाट पाहतच टपलेला होता. पिंड ठेवायला आणि त्यावर कावळा तुटून पडायला जवळपास एकच गाठ. किंबहुना या शहरातल्या कावळ्यांना माणसाची एवढी भीडभाड नसावी.
दहाव्यालाही भूगावाहून गर्दी लोटली. पहाटे साडेपाचच्या रोहा-दिवानं माणसं आली आणि दुपारी साडेतीनच्या दादर रत्नागिरीनं परतली. त्यातही एक मोठा झुंड चार वाजता बंगल्यावर जमला. त्यांचा उद्देश कळेस्तोवर माझ्यावर आवाक होण्याची वेळ आली.
हरिनाना चौलकर, मोरेश्वर वाळके आणि नारायण वाडेकर तात्यांनी नंदाकाकाची सूरत घालण्याचा कार्यक्रम काढला. त्यांना सूरत घालण्याचं आमंत्रण नेमकं कुणी दिलं हे मला माहीत नव्हतं. पण मेलेल्या माणसाच्या दहाव्याला पितरं जागवण्याचा मान भूगावातल्या कुंभारांकडे असतो. या वेळी मेलेल्या माणसाच्या नावानं गाणी म्हणून म्हणून त्याला यमपुरीतून आवताण धाडलं जातं. मग मेलेली व्यक्ती घरातल्याच कुणाच्या तरी अंगात येते आणि आपल्या शेवटच्या इच्छा, राहिल्याउरल्या गोष्टी बोलून दाखवते. भूगावाकडे मेलेल्या माणसाला अशा प्रकारे तात्पुरतं यमपुरीतून बोलावणं धाडण्याच्या प्रकाराला त्याची ‘सूरत उतरवणं’ म्हणतात.
मी आत आलो तर तोवर हॉलमध्ये नंदाकाकाचा फोटो लावलेलाच होता. फोटोसमोर एक सडपातळशी उदबत्ती धूर ओकत होती. सूरत उतरवण्यासाठी आणि पाहण्यासाठी जमलेली माणसं पटापटा खाली बसली. सगळेच ओळखीचे चेहरे. प्रत्येकाकडे लक्ष जाताच हसावं लागत होतं. हरिनाना मांड ठोकून खाली बसले. शिरस्त्याप्रमाणे मांडीखाली आवळलेली ढोलकी होती. मोरेश्वर वाळकेनं हातात तांब्याचं मोठालं ताट आणि लांबट सुरी धरली. सुरी जुनाट होती आणि तिची धार पारच नाहीशी झाली होती, हे तिच्या पात्याकडे लक्ष जाताच कळत होतं.
“या घरातल्या लोकांनी ह्या इथं बसा रिंगण करून.” मोरेश्वर वाळक्यानं कुटुंबातल्या लोकांना फोटोसमोर गोल करून बसायला सांगितलं.
आधी आजी उठून तरतर चालत पुढे आली. खाली बसली. मग तिच्या शेजारी आत्या, मग काकू, मग अनू, मग भानूकाका बसले. मी हॉलमधून वर आमच्या बेडरूमकडे जाणाऱ्या जिन्याच्या पायरीवर बसलो होतो.
“नान्या तूही ये. बस.” मोरेश्वरनं मलाही हाक मारली. पण मी उठलो नाही. ‘मी इथंच बसतो’ असं नुसत्या हातानेच खुणावलं.
“आरे असं कसं? तू तर नंद्याचा पुतण्या. तुला यायलाच लागेल. कुणाचा जीव कुणात अडकला असेल काही भरवसा नाही.” मोरेश्वर पुन्हा म्हणाला. मग मला उठावंच लागलं. भयंकर वेडसर प्रकार वाटत होता तो. पण मी उठलो आणि जाऊन रिंगणात बसलो.
“वयनी तुम्हीपण या.” मोरेश्वरनं अनूलाही बोलावलं. तीही येऊन माझ्याशेजारी बसली. अनूच्या आई गार्गीला घेऊन अनूच्या ठाकुर्लीतल्या मामेभावाकडे गेलेल्या, म्हणून गार्गी तेवढी सुटली.
मी गोलाकार नजर फिरवली. आम्ही सगळेच देशमुख फेर धरून बसलो होतो. माझ्यासमोरच आजी, मग आत्या, मग काकू, मग भानूकाका, मग मी आणि अनू. तो नंदाकाकाच्या मृत्यूचा परिणाम होता का अजून काही हे माहीत नाही; पण त्या दिवशीच्या भिवलीबारच्या जागरणानंतर भानूकाका तसा शांतशांतसा आणि बराचसा भनूकाकासारखाच दिसत होता. दादुमियाच्या अस्तित्वाच्या पुसटशा खुणाही त्याच्या अविर्भावात जाणवत नव्हत्या.
एकाएकी हातात धरलेल्या तांब्याच्या ताटावर मोऱ्या वाळकेनं बिनधारेची सुरी घासायला सुरवात केली.
कर्र कर्र कर्कश.
कान फाडत जाणाऱ्या त्या करकरत्या आवाजानं उभा हॉल शहारला. मी कानावर हात ठेवणार एवढ्यात त्या आवाजावर कुरघोडी करणारा तात्या वाडेकरांचा हेल कानावर पडला.
“आला आला गाडा
यमाजीचा वाडा
यमाजीच्या वाड्यातनं
महानंदाला धाडा.”
त्या आवाजाला, त्या हेलला कोणत्याही उपमा-अलंकाराच्या साच्यात बसवता आलं नसतं. तो एक अनाहत ध्वनी होता. हेल काढून एका विशिष्ट सुरात गाणं गाता गाता तात्या वाडेकर उठून गोलाकार बसलेल्या आम्हा देशमुखांच्या मागून फिरायला लागले. मला लहानपणी खेळलेल्या ‘मामाचं पत्र हरवलं’ या खेळाची आठवण झाली. वाटलं, तात्या कधीही हातात धरलेला रुमाल खाली बसल्या आमच्यापैकी कुणाच्या तरी पाठीमागे टाकतील आणि मग लक्ष नसताना त्याच रुमालानं आम्हाला झोडपायला सुरुवात करतील.
“महानंद देशमुखांचं
कुटुंब समोर बसलंय.
पापपुण्याच्या त्याचा
हिशोब फेडायला बसलंय.
यमाजीच्या वाड्यातनं
महानंदाला धाडून द्या
जमिनीवरली देणीघेणी
इथल्या इथं फेडून घ्या.
आवो आला आला गाडा
यमाजीचा वाडा
यमाजीच्या वाड्यातनं
महानंदाला धाडा.”
तात्या वाडेकरांच्या तोंडातून उमटणाऱ्या शब्दांवर लक्ष थांबतच नव्हतं. लक्ष सतत जात होतं ते त्यांच्या घशातून खोलवर उमटणाऱ्या त्या आवाजाच्या जातकुळीवर. आयुष्यातली महत्त्वाची वर्षं कोकणात आणि मग उरलेली मुंबईतल्या माणसांच्या फापटपसाऱ्यात गेलेल्या माझ्यासाठी ना माणसं नवी होती, ना माणसांचे आवाज. नाना तऱ्हेच्या माणसांचे नाना तऱ्हेचे आवाज मी आजवर ऐकले होते. पण तो आवाज वेगळाच होता. आजवर न ऐकलेला. त्या आवाजाला नेमका असा उगम नव्हता. तात्यांच्या घशातून तो प्रसवतोय असं म्हणायला जागा नव्हती, कारण तात्यांच्या मार्दवानं भरलेल्या तोंडवळ्याआड हा असला भयाण आवाज निर्माण करण्याची ताकद असू शकते, हे मनाला पटत नव्हतं. आणखी काही काळ तो प्रकार चालता, तर आमच्यापैकी कुणा ना कुणाच्या कानातून रक्ताच्या धारा नक्कीच वाहायला लागल्या असत्या.
“यमाजीच्या वाड्यात
मिळे रगताची च्या
काळजाची भाकर
त्यान बुडवून खा
मायेला प्रेमाला
हिथं न्हारी थारा
जितंतितं सुटलाय
मरणाचा वारा.
आला आला गाडा
यमाजीचा वाडा
यमाजीच्या वाड्यातनं
म्हानंदाला धाडा.”
माझ्या आत काहीतरी हळूहळू आचके देऊ लागलं. माझ्या आत हळूहळू काहीतरी जागं होऊ लागलं.
“आई ह्ये भाऊ ह्ये
भावाचा सावू ह्ये
सावाची बाय ह्ये
भयणीची माय ह्ये
रक्ताच्या नात्याचा
जमलाय गुताळा
यमाजीच्या वाड्यातनं
म्हानंदाला धाडा.”
‘महानंदाला धाडा, महानंदाला धाडा’चा घोषा लावत तात्या रिंगण करून बसलेल्या आमच्या मागून गोलाकार फिरत होते. तात्यांच्या आवाजातनं आता एक आवाहन ओझरत होतं. तात्यांचा आवाज आमच्या भोवतालच्या प्रत्येक प्रदक्षिणेनुसार जास्तच आग्रही बनत चाललेला. त्यांच्या प्रत्येक शब्दाशब्दातून एक वेगळाच मायावी स्पर्श मनाला जाणवत होता. त्यांच्या आवाजाच्या स्पर्शाने माझ्या आतलं काहीतरी ढवळलं जात होतं. बाहेर येण्यासाठी ढुशा मारत होतं. इच्छा नसूनही मनातलं काहीतरी बाहेर टाकण्यासाठी शरीर प्राण पणाला लावून झटतंय असं वाटत होतं. उलटीचे उमाळे आल्यागत. जणू कुणीतरी माझ्या शरीराचा ताबा घेण्यासाठी जिवापाड प्रयत्न करत होतं. कुणीतरी बाहेरचं माझ्यातल्या मला बाजूला सारून माझ्या मेंदूमनाची लूट करू पाहत होतं.
माझ्यात नंदाकाका येऊ पाहात होता की काय?
हा असा विचार मनात आला आणि क्षणभर मी थबकलोच. थांबलोच. एकाएकी समोर चाललेला प्रकार मला हास्यास्पद वाटू लागला होता. एका यत्किंचित सामूहिक संमोहनाच्या प्रकाराला माझ्यासारखा माणूस बळी पडू पाहत होता. अंगावर अचानक पडल्या पालीसारखा तो विचार मला किळसवाणा वाटला. मुळात मी त्या रिंगणात जाऊन बसलोच का? मुळात या असल्या हास्यास्पद आणि अंधश्रद्ध विचारांवर आधारित प्रकाराला मी माझ्या घरात अनुमती दिलीच का?
विजेच्या झटका बसावा तसं त्या विचारांनी मला गदगदा हलवलं.
नको त्या कल्पनांचे-विचारांचे फटाके मनात फुटायला लागले आणि अव्याहत फुटतच गेले. क्षणभर मी स्वत:लाच नंदाकाकाच्या भूमिकेच्या आरशात पाहायला लागलो.
मी नंदाकाका झालो.
नंदाकाकाच्या त्या क्षणभर, अगदी क्षणभर उसन्या घेतलेल्या भूमिकेनंही मला मुळापासून हादरवलं. प्रचंड क्षमतेच्या विद्युतकणांनी भारलेल्या एखाद्या सळसळत्या जिवंत विजेला स्पर्श केल्यासारखा झटका बसला. त्या झटक्यानं काळीज लुळावलं आणि मेंदू सून्न झाला. नेमकं काय झालं ते कळलं नाही, पण त्या अगदी ओझरत्या क्षणी माझ्या अस्तित्वाला नंदाकाकाच्या अस्तित्वाचा स्पर्श झाला होता हे नक्की. निव्वळ स्पर्शच नव्हता तो. त्या एका निमिषात नंदाकाका माझ्याशी एकरूप झाला होता. माझ्या अस्तित्वाच्या मूल प्रतिमेवर नंदाकाकाची प्रतिमा चपखल बसली होती. नंदाकाकाच्या त्या स्पर्शाने जणू माझ्यातल्या मला झटकून टाकलं आणि एका नव्या अस्तित्वानं माझ्या शरीराची जागा घेतली. तो एक क्षण आला आणि सरला, पण नंदाकाच्या त्या क्षणकालिक अस्तित्वाने जणू मला कायमचं पतित करून टाकलं. कदाचित; कदाचित तो क्षण चिरंतनही होऊन गेला असता; पण नेमकं त्याच वेळी समोर बसलेल्या नवन्याच्या अंगात वारं भरल्यासारखं झालं आणि तो जागच्या जागी थडथडा उडू लागला. गोलाकार फिरणारे वाडेकर तात्या थांबले. त्यांचा तो कान फाडत काळजापर्यंत जाणारा धारदार आवाजही थांबला. तो आवाज थांबल्यानेच जणू माझ्या अस्तित्वावर उमटू पाहणारी नंदाकाकाची तप्तमुद्रा पुसली गेली. त्या क्षणी मी भानावर आलो आणि नेमक्या त्याच क्षणी हॉलमधल्या प्रत्येकाचं लक्ष बसल्या जागी उभं अंग थडथडा उडवणाऱ्या नवन्यानं वेधलं.
“माझ्या जलमाची सोबतीण आह्ये भूगावात. तिला वाऱ्यावर टाकू नका.” नवन्या विचित्रश्या आवाजात म्हणाला.
“तू कोण आहेस?” वाडेकर तात्यांनी पुढे होत विचारलं.
“आवताण धाडता आणि मी कोण विचारता?” नवन्या कर्कश आवाजात ओरडला. “मी म्हानंद देशमुख.”
खरं तर माझं डोक गरगरत होतं. मेंदूला झिणझिण्या आलेल्या; पण तरीही मला नवन्याचे ते शब्द ऐकून हसावं का रडावं ते कळेना. नवन्याच्या अंगात त्या क्षणी भानूकाका आला होता.
“पुरावा हवा. पुरावा.” तात्या वाडेकर ओरडले.
“कसला पुरावा?”
“तू महानंद असल्याचा पुरावा.”
“कुणाला हवा?”
“महानंदाच्या कुटुंबाला.”
“महानंदाचं कुटुंब भूगावात. इथं कोणेय माझं?”
“इथे तुझी आय आह्ये. भयीण आह्ये. जाव आह्ये. पुतण्या आह्ये.”
“माझ्या कुटुंबाला कसला पुरावा हवा? घरात घडलेला अधर्म सांगू, का कोण कुणाच्या पोटचं ते सांगू.”
नवन्यानं हे नेमके शब्द उच्चारले आणि आम्हा देशमुखांच्या गोतावळ्याच्या चेहऱ्यावरचे रंग बदलले.
“हा तर नंद्याच. माझा नंद्या.” आजी मध्येच ओरडली.
“मिळाला पुरावा. माझ्या आईनं ओळखलं मला. आता अजून काय हवं?” नवन्या चिरकत म्हणाला.
“सांग काय शेवटची इच्छा तुझी?”
“माझ्या जन्माची सोबतीण. तिचं नाव नवनी. नारायणराव कुंभाराच्या घरात जन्माला आलीय ती. माझ्या इस्टेटीतला अर्धा वाटा तिला द्या नायतर माझा आत्मा तळतळेल. फिरत राहील इथंतिथं. उभ्रा घराण्याचा घात करील. नवनी माझी बाय आह्ये. तिला वाऱ्यावर टाकू नका देशमुखोऊऽऽ” तोंडातून विचित्रसा आवाज काढत नवन्या तिथंच मूर्च्छित होऊन पडला.
बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. मला भयंकर हसू यायला लागलं होतं. नंदाकाका दुसऱ्या कुणाच्या अंगात न येता नवन्याच्या अंगात आला होता आणि त्यानं इस्टेटीचा अर्धा वाटा नवन्यालाच द्यायला सांगितला होता.
“देऊन टाका बाई नवन्याला त्याचा अर्धा वाटा. नाहीतर नंद्याचा तळतळाट होईल.” आजीनं मघापासून पसरलेली अस्वस्थ शांतता भंग केली.
“आई काहीही काय बोलतेरस?” आत्यानं तोंड उघडलं.
पुढं जो घडला तो प्रकार तसं पाहता हास्यास्पद होता आणि काहीसा करुणही.
आत्यानं तोंड उघडलं आणि मागोमाग काकूनंही तोंडाचा पट्टा सुरू केला. धनाकाकाने तर उठून मूर्च्छित पडण्याचं नाटक करणाऱ्या नवन्याच्या अंगावरच लाथ घातली. क्षणार्धात वातावरणाने एक वेगळंच रूप धारण केलं.
“मी तुला म्हणत होते, हे असले प्रकार करायला परवानगी देऊ नकोस म्हणून.” काकू अनूकडे वळत म्हणाली.
मला घरात नेमकं काय चाललं होतं तेच कळेना. पण एक झालं. हळूहळू आवाज वाढत गेले. एकमेकांमध्ये मिसळून गेले. मला एक आठवतं की, मी रिंगणातून उठून वर बेडरूमकडे जाणाऱ्या जिन्याच्या पायरीवर जाऊन बसलो. माझ्या डोक्यातून कळा येऊ लागल्या होत्या. वेगवेगळ्या आवाजांचे भडिमार कानावर पडत होते. काही स्वर ओळखीचे होते. काही आठवून ओळखावे लागत होते. धनाकाका, आजी, काकू, हरिनाना, वाडेकर तात्या, आत्या, नवन्या, मग अजून कोणी. आवाज. आवाज. आवाज. त्या आवाजांचा अर्थ मात्र गवसत नव्हता. भुसभुशीत दाणेदार वाळूतून चालताना जसा पाय आत आत धसत जातो, तसा माझा मेंदू घडणाऱ्या घटनांचे अर्थ काढताना आत आत धसत चालला होता. मग एकाएकी संपूर्ण पोट ढवळून मोठाल्या वांतीचा उमाळा यावा आणि पोटातलं काहीतरी भडाभडा बाहेर ओकलं जावं, तसं काहीसं झालं. माझं मेंदूमन अगदी तळापासून ढवळलं गेलं आणि काहीतरी बाहेर आलं. काहीतरी मला माहीत असलेलं आणि नसलेलंही.
पुढं काय घडलं त्यातलं मला काहीच आठवत नाही. मला फक्त एवढंच आठवतं की, मी जिन्याच्या पायरीवरून उठून उभा राहिलो आणि समोर माजलेल्या गदारोळाकडे तोंड करत खणखणीत आवाजात म्हणालो, “एका बापानं झवून काढले असतील, तर या आणि माझ्याशी बोला.”
.............................................................................................................................................
दंशकाल - हृषीकेश गुप्ते
राजहंस प्रकाशन, पुणे, पृष्ठे - ४२० मूल्य – ५०० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4257
.............................................................................................................................................
लेखक ऋषिकेश गुप्ते कादंबरीकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment