आमच्या राखेतून उडू दे तुमचे स्वप्नपक्षी!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Fri , 06 October 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar प्रधानसेवक Pradhan Sewak नरेंद्र मोदी Narendra Modi

स्वागत आहे ‘सेवक’ नामधारी प्रधानसेवकाचे

साठ वर्षांत ना असा सेवक पाहिला ना प्रधान.

खरं तर साठ वर्षांचा भीषण काळोख

तुमच्या भव्य स्वप्नांच्या, दिव्य दृष्टीच्या आणि धाडसी

पावलाने असा उजळला

जणू शतकांचा अंधार दूर झाला!

 

कोण होतो आम्ही? पृथ्वीच्या निर्मितीनंतर

उसळलेल्या लाव्हांच्या लाटा, थंडगार शिळा झाल्या

त्या शिलांचेच तर वंशज आहोत आम्ही.

ना आकार, ना उकार, ना माती, ना पाणी

ना हवा, ना जीव, ना हालचाल.

मृतावस्था या शब्दाची निर्मिती होण्याआधीची

कितीतरी अश्मयुगीन शतकांची ‘साठी’

सोसत होतो, तुम्ही येण्यापूर्वी गेली साठ वर्षे.

 

कुणी एक डार्विन म्हणाला- माकडापासून माणूस

उत्क्रांत झाला, पण मागच्या साठ वर्षांत आमची

माणसाची माकडं झाली.

आमचा सरळ, ताठ मानवी कणा माकडासारखा

धनुष्यकारी होताना, काहींनी आम्हाला गांधींची माकडे

म्हणूनही गौरवूनही पाहिले.

 

माकडातून मनुष्य जन्माच्या सार्थकतेचs

प्रतीकात्मक शिक्षण देणारा मोहनदास करमचंद गांधी

नावाचा पंचाधारी महात्मा झाला, तर त्याला मारणारा

नथुराम झाला हुतात्मा गेल्या साठ वर्षांत. गांधीवर गांधी

आले, त्याचे प्रतिध्वनी म्हणून नथुरामही अवतरले.

 

तुमच्याविषयी आम्हाला आदर, अभिमान

आणि अंध:विश्वास जबरदस्त कारण तुम्ही

अख्खा मोहनदास पुसून, निव्वळ त्याचा चष्मा ठेवलात

आणि या दोन काचा कम खाचा वगळता

इतर सगळ्या गांधींना तुम्ही उखडून टाकलेत.

तुमच्या शौर्याला निव्वळ ५६ इंचाचे कोंदण म्हणजे

हिमालय, कुण्या दर्जीच्या टेपने मोजण्याचा अश्लाघ्य प्रकार.

 

पुरुषप्रधान व्यवस्था तर आम्हाला जन्मजात

ओळखीची, पण तुमच्यासारख्या प्रधान सेवकाचा

पुरुषार्थ पाहता आता पुरुषत्वाचीही नवी व्याख्या

करावी लागेल. तुमच्या भाषणात जी शक्ती, त्याहून

जास्त शक्ती तुमच्या मौनात.

 

तुमच्या नजरेच्या धाकात कॅबिनेटसह पार्लमेंट.

तुमच्या गोटातल्या गोटात गोट, तिथे श्वासावरही

नियंत्रण तुमचे. तुमच्या बंधनांचे शोभिवंत पट्टे

आम्ही समर्था घरच्या श्वानासागी लाजवेल अशा

उत्साहाने स्वत:हून बांधून घेतलेत, गेल्या साठ वर्षांत

प्रथमच!

 

गेली साठ वर्षं आम्ही होतो निव्वळ भटकी कुत्री

देहधर्माला आवश्यक खांबही होते दुर्लभ!

तुम्ही आलात आणि आमचे सौभाग्य उजळले.

वीजेच्या वेगाने तुम्ही रोवलेत खांब

साठ वर्षांत प्रथमच आम्ही केली सुखाने टांग वर!

 

साठ वर्षे नाही तर साठ, नव्हे सहाशे, सहा हजार,

सहा लाख, सहा कोटी, सहा अब्ज, वर्ख, खर्व वर्षे

आम्ही जो प्रश्न विचारत होतो एकमेकांना

भांडत राहिलो पुरोगामी-प्रतिगामी म्हणून, आस्तिक-नास्तिक

म्हणून, सश्रद्ध अश्रद्ध म्हणून की

देव आहे?

हा प्रश्नच निकाली काढलात तुम्ही सेवक प्रधान

आता योग, निव्वळ एक क्रिया, कारण मन:शांतीचे

प्रमुख कारणच मुळी तुम्ही सदेह झालात प्रधानसेवक!

 

किती आरत्या, स्त्रोत्रं, गाथा, पुराणं खर्ची घातली

आम्ही अकारण सगुण निर्गुणाच्या शोधात

कदाचित गुतानुगतांची, शतकानुशतकांची ही भक्ती

ही तपश्चर्याच आता फळाला आली आपल्या रूपात.

रूप पाहता लोचनी का काय म्हणतात तेच उतरलं सत्यात!

 

किती अपात्रांच्या भजनी लागलो होतो गेल्या

साठ वर्षांत! गांधीवाद, समाजवाद, साम्यवाद,

राजेशाही, पेशवाई, शिवशाही, रामराज्य, लोकराज्य,

लोकशाही, एक ना दोन!

नॅचरल जडीबुटीची एकत्रित औषधी असावी

तशी तुमची एकाधिकारशाही, कशी ऑरगॅनिक

स्वदेशी-विदेशी मशागतीवर पोसलेल्या सर्व

वैचारिक किटकांचा नाश करून, गोमातेच्या शुद्ध

मलमूत्रतुपासारखी साजूक, सात्त्विक आणि गुणकारीही.

 

बाबासाहेब पुरंदरेंचे शिवचरित्र आणि मंगेशकर भावंडांचे

शिवकल्याण राजा अळणी वाटावे असे तुमचे चरित्र अन

कार्य सेवक प्रधान. अश्वमेघ यशाचा अश्व अगदीच

खेचर भासतो तुमच्या झंझावती यशासमोर.

नेपोलियन, अलेक्झांडर, चेंगिझखान, नाझी, बुश, ट्रम्प

सगळेच नरपुंगव भासतात हिमगौरीचे सात बुटके तुमच्यासमोर.

 

चराचरातील फक्त मनुष्य प्राण्यास मेंदू आहे

निव्वळ या जैविक सत्यावर विश्वास ठेवून आम्ही

विविध विषयांतल्या तज्ज्ञांना शरण गेलो. १४ कला, ६४ कला,

केवढा तो प्रचंड पसारा! त्यात नव्या तंत्र विज्ञानाने

जन्माला घातलेले प्रसार-प्रसाराचे ऑक्टोपस

तज्ज्ञ, विचारवंत, गुणवंत, प्रज्ञावंत अशा उपाध्यांनी

लडबडलेल्या द्विपाद प्राण्यांवर केवढे ते आमचे

परावलंबित्व सेवक प्रधान गेला साठ वर्षांत!

 

तुम्ही आलात आणि अलगद तो मोतीबिंदू काढलात

तुम्ही जाणीव दिलीत, मेंदू आहे म्हणजे तो चालतो

असे म्हणणे म्हणजे अपार जैवविज्ञान निरक्षरता

आणि १२५ कोटींच्या आपल्या जनसागरात मेंदू असावा

तर कसा याचा आरसाच तुम्ही आम्हासमोर ठेवलात.

गुंडांच्या अड्ड्यावर निडर नायक एकटाच शिरतो आणि

शंभर जणांच्या टोळीवर दरडावतो, ‘सब अपने अपने हथियार

जमीन पर रख दे और हाथ उपर!’

साधारण असेच आम्ही आपण येताच आपआपले मेंदू

जमिनीवर ठेवून हात वर केलेत, गेल्या साठ वर्षांत

प्रथमच सेवक प्रधान.

 

आमच्या या शरणागतीची काहींनी निर्भत्सना केली,

काहींनी तुम्हाला हुकूमशहा म्हटले, काहींनी तुम्हाला हेकट,

हडेलहप्पी म्हटले, तर काहींनी आणखी काही.

पण गेल्या साठ वर्षांत प्रथमच १२५ कोटी सर्वसामान्यांना

नाही, तर त्यातील एकमेवाद्वितीय अनन्य साधारणाचाच आवाज

सर्वदूर पोहचेल अशी चिरेबंदी व्यवस्था तुम्ही केलीत

प्रधानसेवक. बहु गलबलाऐवजी एकच बह्मवाक्य

ही सुटसुटीत शक्यता भोंगळ लोकशाहीत आम्ही तपासूनच

पाहिली नाही गेल्या साठ वर्षांत प्रधान सेवक!

 

आम्ही या हिंदुस्थानी धरतीवरचे राष्ट्रप्रेमी

धर्मनिरपेक्ष लोकशाहीतही धर्माचरण विसरलेलो नाही कारण

तसे सर्वच धर्म सांगतात- ‘धरतीवर पुण्य केलेत तर स्वर्गात

जागा मिळेल!’ इथे भूतलावर जमिनीचा तुकडा जपताना पडणारे

फाके, शहरात घर बांधण्यासाठी, घेण्यासाठी द्यावे लागणारे

कंबरडे मोडणारे बाजारभाव, डाळीपासून इंधनापर्यंतची सततची

दरवाढ, रोज घडणारे घातपात, जगण्यातली,

अन्नातील भेसळ, दवाखान्यांची बिलं, गुंडांची दहशत, चोऱ्यामाऱ्या

खून, बलात्कार कायद्याच्या जेजुरी गडाच्या दसपट पायऱ्या आणि

प्रतिस्पर्धी वकिलाकडे असलेल्या आठशे खिडक्या, नऊशे दारं!

अशा वेळी धर्म म्हणतो पुण्य करा, फळाची अपेक्षा धरू नका

मरणोत्तर केवळ सन्मानच सन्मान. मुळातच किटकसदृश्य आमच्या

मरणाला कुणी ‘शेतकरी आत्महत्या’, ‘प्रवाशांचा मृत्यू’, ‘हकनाक मृत्यू’

रस्ते अपघात-गैरसोयीची मालिका, गाडीतून पडून मृत्यू, गाडीत बुडून

मृत्यू, गाडी वाहून मृत्यू, गाडी घसरून मृत्यू.

 

हे असे कृमी किटकांच्या मृत्यूचे भांडवल करणारे अज्ञानी

मूर्ख! जन्माला येणारा जीव कधीतरी मरणारच आणि शेवटी

जो तो आपल्या मरणाने मरतो मग नाशिक, गोरखपूर,

एल्फिन्स्टन ही स्थलकाल दुय्यम!

 

आम्हीही खूप आहारी जातो कधी कधी अशा गोंधळ गारुड्यांच्या

तुम्ही आलात आणि या गोंधळ गारुड्यांना लगाम बसला.

आम्ही विसरलो ते वचन, जे म्हणते- लाख मेले तरी चालतील

लाखांचा पोशिंदा मरता कामा नये!

 

तुम्ही आलात तेच पुष्पक सदृश्य वाहनातून. आपला नियमित

प्रवासही त्यातूनच. सतत गगनाला गवसणी घालणारा

प्रधानसेवक आम्हाला प्रथमच लाभला गेल्या साठ वर्षांत.

गगनाला गवसणी घालणाऱ्याची स्वप्नेही गगनविशाल

ती पूर्ण करायची तर तुम्हाला चिंतन, मननासाठी झोपही

मोठीच हवी. झोप नाही तर किमान स्वप्न वगळता इतरत्र कानाडोळा.

 

आता आमच्या पूर्ण लक्षात आलेय तुमच्या महास्वप्नांचा

यज्ञ पूर्ण करायचा असेल तर त्यात आमची आहुती

आवश्यक. कळसाच्या निर्मितीसाठी पायाचे दगड तयार आहेत

प्रधानसेवक. तेही थोडे थोडके नव्हे १२५ कोटी!

 

तुम्ही गगनातून खाली जमिनीचे तोंड पाहूच नका. तिथे

आम्ही आमच्या अस्तित्वाची राख करून सगळे सपाट केलेय

आता या राखेतूनच उडू दे तुमचा स्वप्नपक्षी

जो आम्हाला स्वर्गात येऊन नक्कीच भेटेल आणि त्याच

मृदू स्वरात म्हणेल- ‘भाईयों और बहनों, मित्रों…’

..................................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......