दिवाळी अंक : लसाविमसावि
पडघम - सांस्कृतिक
टीम अक्षरनामा
  • साधना, अंतर्नाद आणि सकाळ शब्ददीप यांची मुखपृष्ठं
  • Wed , 09 November 2016
  • दिवाळी २०१६ संपादक अक्षरनामा Aksharnama Divali 2016

साधना

अलीकडच्या काळात ‘साप्ताहिक साधना’च्या दिवाळी अंकानं एक नवीन मानदंड निर्माण केला आहे. रूढ दिवाळी अंकांच्या परंपरेला फाटा देत केवळ सात-आठ दीर्घ लेख वा मुलाखती असं या अंकाचं स्वरूप जाणीव आणि विचारपूर्वक ठेवलं जात आहे. कथा, कविता, ललितलेख, प्रवासवर्णन, सेलिब्रेटींच्या केवळ सेलिब्रेट करण्यासाठी घेतलेल्या मुलाखती आणि तथाकथित परिसंवाद या सर्वांना फाटा देत ‘साधना’चा या वर्षीचाही अंक आकाराला आला आहे. यंदा त्यात दोन मुलाखती, एक भाषण आणि पाच लेखांचा समावेश आहे. अंकाची सुरुवात होते ती हमीद दलवाई यांच्या मुलाखतीनं. २६ ऑगस्ट १९७३च्या साप्ताहिक ‘मनोहर’मध्ये प्रकाशित झालेल्या मूळ मुलाखतीचं हे पुनर्मुद्रण आहे. ४०हून अधिक वर्षांनंतरही दलवाईंची निर्भय आणि तर्कशुद्ध मांडणी जाणून घेण्यासाठी आणि हिंदू-मुस्लीम प्रश्नाकडे कसं पाहावं यासाठी ही मुलाखत प्रत्येकानं वाचलीच पाहिजे. दुसरी मुलाखत आहे डॉ. रावसाहेब कसबे यांची. त्यांच्या या दीर्घ मुलाखतीचं निमित्त मराठा मोर्चा हे असलं तरी ‘कुठल्याही जातीला आरक्षणाची गरज लागणार नाही अशी समाजव्यवस्था निर्माण करू असं माझं स्वप्न आहे’ असं कसबे यांनी म्हटलं असलं आणि ते शक्य नसलं तरी मराठा-मराठेतर तणाव समजून घेण्यासाठी ती उपयुक्त आहे. यावर्षी शेक्सपिअरची ४००वी जयंती साजरी झाली, त्यानिमित्ताने महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांनी शेक्सपिअर रशियाचं कसं आराध्यदैवत आहे, याचा त्यांच्या अनलंकृत शैलीत आढावा घेतला आहे. तर याच वर्षी प्रसिद्ध वास्तुरचनाकार लॉरी बेकर यांचं जन्मशताब्दी वर्षं सुरू झालं. त्यानिमित्तानं त्यांच्या कारकिर्दीचा आढावा अतुल देऊळगावकर यांनी घेतला आहे. ब्रेग्झिटनंतर ब्रिटनच्या पंतप्रधान झालेल्या थेरेसा मे यांचं भाषण त्यांना समजून घ्यायला मदत करतंच, पण ब्रिटनचं राजकारण किती अभ्यासपूर्ण पद्धतीने केलं जातं यावरही प्रकाश टाकतं. ओबामा यांच्या कारकिर्दीचा आढावा त्यांच्यावर मराठीमध्ये पहिलवहिलं पुस्तक लिहिणाऱ्या संजय आवटे यांनी घेतला आहे. राहुल कलकर्णी या एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं दुष्काळी भागाची डायरी लिहिली आहे. तो ‘आँखो देखा हाल’ आपल्या राज्यातील ग्रामीण भागाचं विषण्ण चित्र निर्माण करतो. विनय हर्डीकर यांनी शेतकरी संघटनेचे संस्थापक नेते शरद जोशी यांच्या कारकिर्दीचं नेमकेपणानं मूल्यमापन करत, त्यांच्याकडून कळत-नकळत झालेल्या चुका सांगत त्यांच्या नंतरच्या शेतकरी संघटनेनं काय करायला हवं हेही तपशीलवार सांगितलं आहे.

सर्वोत्तम (लेख\कथा) –  ...तरीही मी मुसलमान आहे! (हमीद दलवाई), बर्मिंगहॅम अधिवेशनातील भाषण (थेरेसा मे)

उत्तम मध्यम – सत्य आम्हां मनी (विनय हर्डीकर), बेकरायण (अतुल देऊळगावकर)

मध्यम मध्यम – रावसाहेब कसबे यांची मुलाखत (निखिल वागळे), शेक्सपिअर : रशियाचे आराध्यदैवत (गोविंद तळवलकर)

‘साधना’, संपादक विनोद शिरसाठ, पाने - १९८ , मूल्य –  १२० रुपये.

......

अंतर्नाद

‘अंतर्नाद’ हे वाङ्मयीन मासिक असल्याने त्याचा दिवाळी अंक हा विशेषकरून साहित्यविषयक मजकुराला प्राधान्य देणारा असतो. यावर्षीचा अंकही त्याच प्रकारचा आहे. परंतु कुठल्याही एकाच विषयावर संपूर्ण अंक बेतला नसल्याने तो वेगवेगळ्या विषयांना सामावून घेणारा झाला आहे. किंबहुना त्यामुळेच चांगलाही झाला आहे. उदाहरणादाखल नावंच सांगायची तर न्या. नरेंद्र चपळगावकरांनी राजाजी यांचं लिहिलेलं व्यक्तिचित्र, विवेक गोविलकर यांनी जे.के.रोलिंग यांच्याविषयीचा लेख आणि भानू काळे यांच्या शरद जोशींच्या आगामी चरित्रातील एक प्रकरण हे या अंकातले सर्वाधिक वाचनीय लेख आहेत. मात्र विनय हर्डीकर यांनी गोविंदराव तळवळकर यांच्या सांगितलेल्या आठवणी उत्तम आहेत. महाराष्ट्रात तळवळकरांशी मतभेद व्यक्त करणाऱ्या आणखीही काही व्यक्ती असतील, पण ते अशा प्रकारे लेखस्वरूपात लिहिणारे हर्डीकर हे बहुधा मराठीतलं पहिलंच नाव असावं. त्यामुळे या लेखाला विशेष महत्त्व आहे. सुरेश द्वादशीवार यांनी आद्य शंकराचार्य यांच्याविषयी लिहिलेला लेखही तितकाच मननीय आहे. ज्याला ऐवज म्हणता येईल असा या अंकात एवढाच मजकूर आहे. बाकी अनुभवकथनं, ललित, लेख, कथा, कविता, वाचकपत्रं आणि एक पुस्तकपरीक्षणही आहे. अंतर्नादमध्ये कधीही फारशी चांगली कविता वाचायला मिळत नाही. त्यामुळे तेवढा विभाग वगळता बाकी मजकूरही वाचनीय आहे. तेव्हा ज्या वाचकांना या प्रकारच्या मजकुरामध्ये स्वारस्य आहे, त्यांच्यासाठी तो नक्कीच चांगला आहे. पण त्यातून फार काही वेगळं म्हणावं असं हाती लागत नाही.

सर्वोत्तम (लेख\कथा) –  ...गोविंदराव, आय मिस यू (विनय हर्डीकर), श्रीमद आद्य शंकराचार्य (सुरेश द्वादशीवार)

उत्तम मध्यम – राजाजी (नरेंद्र चपळगावकर), अटकेपार (भानू काळे)

मध्यम मध्यम – जे.के.रोलिंग (विवेक गोविलकर), खाणे-पिणे (माणिक खेर)

‘अंतर्नाद’, संपादक भानू काळे, पाने – १७०, पाने – २०० रुपये.

सकाळ शब्ददीप

गेल्या दोनेक वर्षांत देशात देशहित, देशभक्ती, देशद्रोही, राष्ट्रवाद या शब्दांना खूपच महत्त्व आलं आहे. त्यांचा वापर अनेकदा सोयीस्करपणेही होतो आहे. मात्र हे सगळं भारतातच घडतं आहे असं नाही. थोड्याफार फरकानं ते जगभरच घडतं आहे. आपल्याकडे सध्या त्याला चांगले दिवस आले आहेत एवढंच. त्यामुळे या अंकाची सुरुवातच मुळी ‘राष्ट्रभक्ती म्हणजे काय?’ या परिसंवादानं होते. त्यात दत्तप्रसाद दाभोळकर, श्रीराम पवार, विनय सहस्रबुद्धे, नीलोत्पल बसू आणि प्रफुल्ल केतकर यांचे लेख आहेत. हे सर्वच लेख वाचनीय आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पटकथाकार सलीम खान यांचे लेख आहेत. ते त्यांच्याशी बोलून शब्दांकन करून तयार झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा उल्लेख अनुक्रमिणेत ‘मुलाखत’ असा केला असला तरी ते प्रथमपुरुषी एकवचनी लेखच आहेत. मुख्यमंत्री हल्ली स्वत:च राजीनामा देण्याची भाषा मधूनमधून करत असतात. त्यामुळे या अंकातला ‘मी मुख्यमंत्री होईन असं वाटलंच नव्हतं’ हा लेख जरूर वाचनीय ठरतो. तर सलमान खान हा सतत वावदूक विधानं करून त्याच्या वडलांना म्हणजे सलीम खान यांना अडचणीत आणत असतो. त्या सलीमनी त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या दिवसाविषयी लिहिलं आहे. ते सध्याच्या काळात अधिकच सयुक्तिक ठरणार आहे. दुसरा परिसंवाद आहे – जागतिकीकरण आमच्या नजरेतून. त्यात पाचही तरुण लेखकांचे लेख आहेत. ती त्यांच्या दृष्टीकोनातून जागतिकीकरणाची मांडणी करतात. हेतू प्रामाणिक आहे, निरीक्षणेही योग्य आहेत मात्र निष्कर्ष काढताना घाई झालेली आहे असे हे लेख वाचताना वाटते. प्रकाश पवार यांचा मराठा समाजावरचा प्रदीर्घ लेख अॅकेडॅमिक असला तरी तो सध्याच्या मराठा समाजाविषयी सम्यक आकलन देण्याचं काम करतो. ब्रिटिश नंदी यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत शेक्सपिअर महाराष्ट्रात आला तर काय होईल, याचं केलेलं मनोरंजन फर्मास झालं आहे. डॉ. सदानंद मोरे यांनी आजच्या आणि शंभर वर्षांपूर्वीच्या गावगाड्याचा घेतलेला वेधही चिंतनीय, मननीय आहे. वर्तमानपत्रांचे दिवाळी अंक जेमतेमच वाचनीय असतात. हा अंक त्याच्या दोन पावलं पुढे जातो इतकंच.

सर्वोत्तम (लेख\कथा) –  मराठा क्रांती मोर्चा : अस्तित्वशोधाचा शांततामय लढा (प्रकाश पवार)

उत्तम मध्यम – गावगाडा : शतकापूर्वीचा आणि सध्याचा (डॉ. सदानंद मोरे), मराठीच्या अंगणात बार्ड (ब्रिटिश नंदी)

मध्यम मध्यम – दोन्ही परिसंवाद आणि दोन्ही मुलाखती (?).

‘सकाळ शब्ददीप’, संपादक श्रीराम पवार, पाने – १८४, मूल्य – १०० रुपये.

 

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......