अजूनकाही
१. पंतप्रधानांनी वर्षभरापूर्वी देशाला संबोधित करताना जाहीर केलेल्या नोटाबंदीचा झटका सर्वांना बसला होता. पण सुरुवातीला कोणी ते मान्य केलं नाही. भाजप सरकारशी लागेबांधे असणाऱ्या काळे पैसेवाल्यांनी आधीच नोटा बदलून घेतल्या. सर्वसामान्य नागरिक कित्येक दिवस रांगेत उभे राहिले. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली अशी तोफ माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी डागली. प्रारंभी या निर्णयाचं समर्थन करणाऱ्या पवार यांची भूमिका आता पूर्णपणे बदलल्याचं अधोरेखित झालं आहे. फडणवीस सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचं जेवण आहे. शेती-शेतीपूरक सर्वच प्रकारचं कर्ज माफ झालं पाहिजे. राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांची सामूहिक ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. जागतिक बाजारात इंधनाचे दर कमी होऊनही त्याचा लाभ नागरिकांना दिला नाही. कराच्या माध्यमातून सरकारनं नागरिकांची लूट सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.
पवार हे देशातले एक सर्वांत जाणते आणि मुरब्बी राजकारणी पुढारी म्हणून ओळखले जातात. पंतप्रधानही त्यांचं बोट धरून राजकारणात आल्याचा दावा करतात. त्यांना नोटबंदी जाहीर झाली, तेव्हा या सगळ्याचा अंदाज आला नव्हता? भाजपच्या जवळच्या मंडळींनी नोटा बदलून घेतल्या, असं ते म्हणतात, त्याच काळात ते भाजपच्या या अर्थघातकी निर्णयाचं स्वागत करत होते, या दोन गोष्टींची विपरीत सांगड कुणी घातली तर काय अर्थ निघतो, याचा अंदाज पवारांना नसेल का?
.............................................................................................................................................
२. रशियानं अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूनं जनमत तयार करण्यासाठी फेसबुकचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केल्याचं पुराव्यानिशी समोर आल्यानंतर फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग यानं माफी मागितली आहे. गेल्या वर्षभरात माझ्याकडून जे लोक दुखावले गेले, त्यांची मी जाहीर माफी मागतो. माझ्या कामामुळे लोक एकत्र येण्याऐवजी ते अधिक दुरावले गेले, त्यामुळे हे दु:ख अधिक आहे. ही परिस्थिती मी नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेन, असं म्हणत मार्कनं फेसबुकवर भावना व्यक्त केल्या.
बाबारे, हा माफीनामा आता किमान अधिकृत भाषा म्हणून मान्यता असलेल्या भारतातल्या सगळ्या भाषांमध्येही अनुवादून ठेव. इथं तर तू लोटांगण घालून, गालफडांवर फडाफडा मारून घेत माफी मागावी, असा भारी उपयोग झालाय फेसबुकचा. पण, गड्या, तू इतकं का मनाला लावून घेतोस? तू तुझं काम केलंस. एक साधन तयार केलंस. त्याचा वापर कसा करायचा याची बुद्धीही तूच देशील, असं व्हायला तू काय जगन्नियंता आहेस का? तू फक्त गैरवापराची शक्यता असलेली भोकं बुजवून यंत्रणा भक्कम करत राहा.
.............................................................................................................................................
३. सिनेमागृहात राष्ट्रगीतावेळी उभं न राहता व्हीलचेअरमध्ये बसून राहिलेल्या एका अपंग हक्क कार्यकर्त्याला ‘पाकिस्तानी’ म्हणून संबोधल्याचा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. गुवाहटी येथील मल्टिप्लेक्समध्ये नुकताच हा प्रकार घडला. अरमान अली (वय ३६) असं या अपंग व्यक्तीचं नाव आहे. अली ‘शिशू सरोथी’ या ना नफा, ना तोटा तत्त्वावरील अपंगांसाठीची संघटना चालवतात. ते आपल्या नातेवाईकांसोबत ‘लखनऊ सेन्ट्रल’ हा सिनेमा पाहायला गेले होते. यावेळी सिनेमागृहात त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. अली यांना जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी हा आजार झाला असून यामुळे त्यांना स्वतःच्या पायांवर उभं राहता येत नाही. त्यामुळे फिरण्यासाठी ते व्हीलचेअरचा वापर करतात. अली म्हणाले, सिनेमा सुरू होण्यापूर्वी सिनेमागृहात जन गण मन सुरू झाल्यानंतर प्रेक्षक उठून उभे राहिले. मात्र, मला उभं राहता येत नसल्यानं मी व्हीलचेअरमध्ये ताठ मान करून बसून राष्ट्रगीत म्हणू लागलो. त्याच वेळी माझ्या मागे उभ्या राहिलेल्या एका प्रेक्षकाने ‘सामने एक पाकिस्तानी बैठा है’ असं म्हटलं. यावेळी मी शांत राहिलो. देशात सध्या जमावाकडून मारहाणीच्या घटना घडत असल्यानं मी त्याला या शेरेबाजीचा जाब विचारला नाही. मी मुस्लिम असल्याचं सिनेमागृहातील प्रेक्षकांना कळलं असतं तर परिस्थिती चिघळली असती, असं त्यांनी सांगितलं.
‘जन गण मन’ किंवा ‘वंदे मातरम’ वाजेल तेव्हा उठायची वेळ येऊ नये, म्हणून अली यांनी व्हीलचेअरवर बसण्याचं नाटक चालवलं आहे किंवा म्हणूनच त्यांनी स्वत:ला आजार जडवून घेतला आहे, इथपर्यंत तर्कटं लढवली असतील आपल्या देशभक्तांनी. चुकून आपले पाकिस्तानबरोबरचे संबंध सुरळीत झाले, तर हे सगळे देशभक्त जत्रेत हरवलेल्या लेकरांसारखे भिरभिरे होऊन भटकत राहतील. पाकिस्तानचा आणि मुस्लिमांचा द्वेष यापलीकडे त्यांच्या देशभक्तीची मजलच जात नाही.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
४. पाकिस्तानच्या दडपशाही वृत्तीला गिलगिट-बाल्टिस्तानातील लोक कंटाळले असून भारतात सामील होण्यासाठी भारताच्या बाजूनं त्यांचा कल असल्याचे बलवारिस्तान नॅशनल फ्रन्टचे (BNF) अध्यक्ष अब्दुल हमीद खान यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या उत्तरेकडील गिलगिट बाल्टिस्तान या प्रांतावर पाकिस्तानचं अधिपत्य आहे. मात्र, येथील लोकांच्या बाबतीत पाकिस्तान नेहमीच दुजाभाव करतो. भारतापासून वेगळं झाल्यानंतर गेली ६९ वर्षं आम्ही पाकिस्तानचा अन्याय सहन करतो आहोत. या देशातील ७२ हजार चौ. किमी. भूभागावरील तुरुंगात राहत असल्यासारखी आमची स्थिती आहे. आम्हाला मत द्यायची वेळ आली तर ते पाकिस्तानसाठी असणार नाही, तर ते भारतात राहण्यासाठी असेल, असं खान यांनी म्हटलं आहे.
बलुचिस्तानातील हस्तक्षेपाची कबुली, आता या मंडळींची भारतात सामील होण्याची तयारी, हा सगळा काश्मीर प्रश्नाच्या धाडसी मार्गानं सोडवणुकीच्या पूर्वतयारीच्या रंगीत तालमीचा भाग वाटतो आहे. प्रतिनेहरू बनू पाहणाऱ्या पंतप्रधानांना पाकिस्तानचा आणखी एक लचका तोडून प्रति इंदिरा बनून दाखवण्याचेही वेध लागले असल्यास आश्चर्य नाही. मात्र, या सगळ्या उद्योगात आपण काश्मीरबरोबरच ईशान्य भारतातल्या फुटीरवाद्यांना सार्वमताचा मार्ग खुला करू, हेही लक्षात घ्यायला हवं.
.............................................................................................................................................
५. जागतिक पर्यटनदिनीच उत्तर प्रदेश सरकारनं जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहलाला पर्यटन यादीतून वगळल्याचं वृत्त सोमवारी पसरताच चौफेर टीकेचा मारा झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने एक निवेदन जारी करून ताजमहालासाठी १५६ कोटींची तरतूद असल्याचे जाहीर केलं. राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी ३७० कोटी रुपयांची तरतूद केली असून त्याअंतर्गत ताजमहाल आणि परिसराच्या विकासासाठी ही रक्कम ठेवण्यात आली आहे. ताजमहल आणि आग्राच्या विकासाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं प्राधान्य असेल, असं पर्यटनमंत्री रिटा बहुगुणा यांनी म्हटलं आहे. नव्या पर्यटनस्थळांच्या यादीत गोरखधाम मंदिराला स्थान देण्यात आलं आहे. त्या पुस्तिकेचं पहिलं पान वाराणसी येथील गंगा आरतीला समर्पित करण्यात आलं आहे. योगी सरकारनं आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात (२०१७-१८) ताजमहालाला सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केलं नव्हतं. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ताजमहालला भारतीय संस्कृतीचं प्रतीक मानण्यास नकार दिला होता.
मुख्यमंत्री हे पाच किंवा त्याहून कमी काळासाठी जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींपैकी एक कामकाजाच्या सोयीसाठी नेमलेले प्रमुख असतात, राज्याचे सम्राट वगैरे नसतात, हे कळणारा मुख्यमंत्री उत्तर प्रदेशाला कधी लाभेल? याआधी मायावतींनी स्वत:चे पुतळे उभारले होते. हे आपल्या मतदारसंघातल्या मंदिरांचा उदो उदो करतायत. त्यांच्या मान्यतेवर ताजमहालाची किंवा गंगेची किंवा गोरखधाम मंदिराची सांस्कृतिक महत्ता ठरत नाही, हा धडा ते शिकले असतील, तर ताजमहालातला शंकरच पावला म्हणायचा.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment