अजूनकाही
माझा काही दोष नाही तसा, पण उगाचच अपराधी वाटतंय. ‘त्या’ २२ जणांचे चेहरे आठवत आहेत.. पायरीवरचे रक्ताचे डाग दिसत आहेत आणि गर्दीच्या हलकल्लोळाचा आवाज ऐकू येतोय. त्या २२ जणांपैकी काही चेहरे परिचित होते, तर काही फारसे न दिसलेले. रोज ‘निष्काम कर्मयोग्या’चं रूप धारण करणाऱ्या मला आज लोकांचे प्राण घेणाऱ्या क्रूरकर्म्यासारखं उगाचच वाटतं आहे. उभा जन्म लोकसेवा करण्यात गेल्यावर आता हा एक कलंक माथी मिरवावा लागणार आहे!
‘वर्दळ’ हा खरं तर माझा स्थायीभावच! मध्य लोकल आणि पश्चिम लोकल यांना मी एकाच स्टेशनला जोडत असल्यानं प्रवाशांनी मला प्राधान्य न दिलं तरच नवल. दादरच्या गर्दीला मनोमन दूर सारणारे आपसूकच मला जवळ करतात. बरं, लोकजत्रेतलं इतकं वैविध्य बघण्याचं भाग्यही मलाच लाभतं!
इंडिया बुल्ससारख्या कंपन्यांमधून काम करणारा नवमध्यमवर्गीय, दादरच्या महाविद्यालयामध्ये शिकायला जाणारे तरुण, लालबागच्या दर्शनाला जाणारे भाविक, केइएमसारख्या रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी कुठून कुठून येणारे आशावादी रुग्ण आणि हातावर पोट असणारे आणि डोक्यावर ओझं घेतलेले फेरीवाले.
स्वभाव-वैविध्याचीसुद्धा कमी नाही. गर्दी सरावी म्हणून कोपर्यात ताटकळत थांबलेला कुणी म्हातारा, ६.४०ची अंधेरी गाठण्यासाठी डोक्यावर भाजीची गाठोडी वाहणारी कल्याणवरून आलेली कुणी कमळाक्का, शरीर इथं तर मन ‘सोशल मीडिया’मध्ये ठेवून चालणारे असंख्य युवक-युवती, तर कधी एकमेकांना शिव्या घालत-कधी मदत करत पुढे चालणारे चाकरमानी.
याशिवाय माझ्यावर उपजीविका मांडणारे विक्रेते, तिकीट देणारा स्टाफ, प्रसंगी गर्दी नियंत्रित करायला असलेला पोलीस स्टाफ – हे वेगळेच!
‘प्लाटफॉर्म नंबर दो पे आनेवाली गाडी थाने के लिए....’ अशी सततची धूनपण सोबतीला.
खूप पावसाळे बघितले. म्हणजे अनुभवाचे पावसाळे तर बघितलेच, पण खरेखुरे पावसाळेसुद्धा... चिंब गर्दी करणारे आणि खूप गणेशोत्सव-रमजानपण बघितले, धुंद गर्दी करणारे...
आजूबाजूचं जग गेल्या दशकांमध्ये खूप बदललं. बाजूला असलेल्या काचेच्या उत्तुंग इमारतींचा कधी कधी मला मत्सर वाटतो. दादरच्या स्वयंचलित जिन्याबद्दल ऐकलं किंवा विलेपार्ले स्टेशनच्या भित्तीचित्रांबद्दल ऐकलं, तेव्हा हेवा वाटून गेली होता खरा, पण हे सगळं तेवढ्यापुरतंच. ‘एल्फिन्स्टनचं नाव प्रभादेवी करणार आहेत’ – असल्या बिनकामी नाविन्यावर मी जगत राहिलो. वाहून घेण्याची क्षमता पंचवीस एक वर्षांपूर्वीच संपली होती, पण क्षमतेहून अधिक ओझं वाहत राहिलो. रोजचे गर्दीचे महापूर बघत, दोन गाड्या एकाच वेळेला आल्यावर होणारी चेंगराचेंगरी बघत, शिवीगाळ-भांडणं बघत, महिलांना होणारे नकोसे स्पर्श बघत, पाकीटमारी बघत आणि ‘मुंबईच्या स्पिरीट’चीही काळी बाजू अनुभवत.
कालचा प्रसंग हा जरी माझ्यावरचा कलंक असला, तरी सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे, हे नक्की. कदाचित माझा वर्षानुवर्षांचा असंतोष असा बाहेर पडला असावा.
शहर वाढतं आहे, गर्दी वाढते आहे यात लोकांचा दोष नाही. एका बाजूला गावं दुष्काळामुळे, विकासकर्त्यांनी लक्ष देण्याचं नाकारल्यामुळे ओसाड पडत आहेत म्हणल्यावर स्थलांतर होणार. शहराच्या सीमा विस्तारणार, शहरीकरण वाढणार; पण त्या वेगानं जर प्रशासकीय व्यवस्था वाढत नसतील, पुरेशा विस्तारत नसतील तर ताण येणारच. मी तर फक्त एक उदाहरण आहे; पण हा ताण सर्व क्षेत्रांवर – रस्ते, घरं, पाणी, वीज, दळणवळण, कचरा व्यवस्थापन, आरोग्य – पडतोय. तो पुरेसा लक्षातही घेतला जात नाहीये आणि त्याच्यावर मात करण्याची राजकीय इच्छाशक्तीही दिसत नाहीये. आणि त्याच्यावर उपाययोजनाही केली जात नाहीये.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
म्हणलं तर मी फक्त एक वास्तू आहे, पण तरी मी निव्वळ वास्तू नाही, तर कित्येक वर्षांच्या स्थित्यंतराची साक्षीदार असलेली वास्तू आहे. माझ्यासारख्या मुंबईकराचं जिणं सुसह्य होईल, अशा चार गोष्टी माझ्या अल्पमतीला सुचतात.
शहराचं प्रभावी नियोजन
ज्यामध्ये माझ्यासारख्या विविध वास्तूंचा ताण लक्षात घेतला जाईल, लोकसंख्येच्या अंदाजानं आमची संख्या आणि गुणवत्ता तपासली जाईल; सुधारली जाईल. आवश्यक तेवढं मानवी संसाधन पुरवलं जाईल. माझ्यासारख्यांचं रुंदीकरण, फेरीवाल्यांना मनाई, गर्दीचं व्यवस्थापन, सुरक्षा यंत्रणा, आवश्यक तिथं अतिरिक्त सुविधा अशा उपायांपासून सुरुवात करता येईल. कारण देशाची आर्थिक राजधानी जर तणावात असेल, तर अर्थव्यवस्थेचे आजार जडायला वेळ लागत नाही.
विकासकामांचा योग्य प्राधान्यक्रम
दररोज जीव मुठीत धरून लोंबकळत प्रवास करणारे प्रवासी आणि तणावग्रस्त लोकलसेवा बघणाऱ्या मला बुलेट ट्रेनसारखी स्वप्नं हास्यास्पद न वाटली तरच नवल! स्टेशनची मूलभूत सुधारणा केल्यानंतर आपण त्याचं नाव बदलत बसलो, तर ते अधिक आनंददायी असेल.
मुंबईकरांचं स्पिरीट, पण दुर्घटनेपूर्वी
मृत्यूचं तांडव झाल्यावर जाब विचारणारी संवेदनशील मनं रोज मरणप्राय जीवन जगत असताना कुठे गायब असतात? त्यांना त्यांचा वॉर्ड, प्रशासन व्यवस्था आणि त्यातल्या त्रुटी यांपैकी काहीही माहिती नसतं. अर्थात, काही जण माझी बिकट अवस्था प्रशासनापर्यंत पोहोचवत होते, ट्वीट करत होते; पण त्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकी होती. बाकी जण गर्दीला शिव्या हासडून, कातावून निघून जाण्यातच धन्यता मानत होते. मुंबईचं स्पिरीट जर सातत्यानं दिसलं, दुर्घटना व्हायच्या आधी दिसलं, तर ते स्वागतार्ह असेल.
सक्षम आपत्ती व्यवस्थापन
नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती म्हणजे वाढत्या शहरीकरणाचा अपरिहार्य दुष्परिणाम. यामध्ये नुकताच झालेला पाऊस असो किंवा कालची चेंगराचेंगरी. त्याच्यासाठी मार्गदर्शन व्यवस्था आणि यंत्रणा तयार असणं महत्वाचं आहे. जितकी दुर्घटनेनंतर हानी कमी, तितका शहरवासियांचा शहर-प्रशासनावर ‘भरवसा’ जास्त.
मनात निराशा असली, तरी संध्याकाळच्या गर्दीला वाहून नेण्यासाठी मी पुन्हा उभा राहिलोच. गर्दीच्या मनात आणि माझ्याही मनात सकाळच्या घटनेमुळे हुरहूर होती, पण ‘शो मस्ट गो ऑन’ या न्यायानं तेसुद्धा पुढे निघाले आणि मीसुद्धा.
आता पाहू या, काय होतंय...
कदाचित थोडे दिवस शांतता पसरेल आणि पुन्हा तोच गोंधळ सुरू होईल. ‘स्पिरीट’च्या लेबलखाली मुंबईकर रोजच्या चाकरीत गुरफटून जातील. राजकीय पक्षांचे आरोप-प्रत्यारोप होतील. एखादी समिती या घटनेच्या पाहणीसाठी नेमली जाईल आणि पुढची घटना घडेपर्यंत शहर निद्रित होईल.
किंवा
कदाचित प्रशासनासाठी आणि लोकांसाठीही हा एक धडा ठरेल. चार चांगल्या गोष्टींचा पाया यातून रचला जाईल, शहर-सुधारणेचे काही छोटे उपक्रम सुरू होतील. असं झालं, तर ही त्या २२ जणांना खरी श्रद्धांजली ठरेल!
लेखक अनुज घाणेकर मानवशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.
anujghanekar2@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment