अजूनकाही
सुरुवातीला टाइट क्लोज अपमध्ये बंदुकीची लांबलचक नळी दिसते आणि मागे ऑफ फोकस हवेवर भुरभुरणारे कोणाचे तरी केस. मग त्या नळीच्याच भोकातून ती नळी जिच्यावर ताणली गेली आहे ती व्यक्ती दिसते. हळूहळू कॅमेरा मागे मागे सरकतो आणि वाइड अँगलमध्ये गजबजलेलं सॅनफ्रॅन्सिस्को शहर दिसू लागतं. गगनचुंबी इमारती, त्या इमारतींना विशिष्ट कोनांमध्ये अलग करणारे रस्ते आणि त्या रस्त्यांवरून लगबगीने धावणाऱ्या गाड्या. अशाच एका एका गगनचुंबी इमारतीच्या गच्चीवरील स्विमिंग पुलात पोहण्याचा आनंद लुटणाऱ्या त्या तरुणीला आपल्यावर कोणीतरी नेम धरून आहे, याची कल्पनाही नाही. अचानक बंदुकीचा खटका दाबला जातो, गोळी सुटते आणि लक्ष्याचा अचूक वेध घेते.
कट टु
टेरेसचं दार उघडून डिटेक्टिव्ह हॅरी कॅलाहनचं आगमन होतं.
आणि पडद्यावर अक्षरं उमटतात
डर्टी हॅरी
........
हॅरी कॅलाहन ऊर्फ डर्टी हॅरी... सॅनफ्रॅन्सिस्को पोलिस खात्याच्या गले की हड्डी. ना उगली जाये, ना निगली जाये... हॅरी कॅलाहन म्हणजे असून अडचण नसून खोळंबा. हॅरी कॅलाहनची काम करण्याची पद्धत, गुन्हेगारांशी त्याची वागण्याची तऱ्हा त्याच्या वरिष्ठांना पसंत नाही; पण तरीही सगळी घाण निपटायला ऐनवेळी त्यांना हॅरी कॅलाहनच लागतो. म्हणून तो डर्टी हॅरी.
रात्री पॅट्रोलिंग करत फिरत असताना तो ज्याच्या मागावर आहे, तशीच व्यक्ती दिसल्याचा भास झाल्यानं तिचा पाठलाग करत तो एका अरुंद बोळात शिरतो. ती व्यक्ती एका घरात शिरते. हा तिथलंच एक मोठं कचऱ्याचं डबडं घेऊन त्याच्यावर उभा राहून खिडकीतून डोकावतो. आत त्याला ती व्यक्ती आणि त्याची पत्नी दिसते. तिच्यासाठी आणलेले नवीन कपडे तो तिला दाखवतो आणि तिने ते लगेचंच घालावेत, म्हणून तिचा ड्रेस काढतो. हे सगळं हॅरी बघत असतानाच त्याला खालून कोणीतरी खेचतं. लोकांच्या घरात लपूनछपून डोकावून बघणारा कोणीतरी आंबटशौकीन आहे, असं समजून चार लोक त्याला मारहाण करू लागतात. इतक्यात त्याच्यासोबत नुकताच जॉइन झालेला त्याचा सहकारी तिकडे पोहोचतो आणि हॅरीची सुटका करतो.
हॅरीला होणाऱ्या मारहाणीचं कारण कळल्यावर तो उत्स्फूर्तपणे उद्गारतो, ‘आता मला कळलं तुला डर्टी हॅरी का म्हणतात!’
पुढच्याच प्रसंगात एका उंच इमारतीवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या सुटकेसाठी पोहोचण्याची सूचना त्याला वायरलेसवर मिळते. हॅरी आणि त्याचा सहकारी तिकडे पोहोचतात. स्पॉटवर असलेले पोलिस कर्मचारी आणि फायर ब्रिगेडच्या लोकांनी हात टेकलेत. ते सगळे हॅरीला वर जाऊन त्या माणसाची कशीबशी समजूत घालून त्याला खाली आणायला सांगतात. हॅरी चरफडत क्रेनमध्ये बसतो आणि त्या माणसापर्यंत पोहोचतो. त्याला बोलण्यात फसवून खाली घेऊन येतो आणि क्रेनमधून उतरून सहकाऱ्याला म्हणतो, ‘आता कळलं मला का डर्टी हॅरी म्हणतात?’
तर, पहिल्याच प्रसंगात ज्याने तरुणीचा बळी घेतला तो स्कॉर्पिओ (हे अर्थातच टोपण नाव) शहराच्या मेयरला पत्र पाठवतो. १ लाख डॉलर दे, अन्यथा रोज एका व्यक्तीला मारणार. त्या तरुणीच्या खुनाचा तपास तोवर कॅलाहननं सुरू केलेलाच असतो. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणच त्याच्याकडे येतं. स्कॉर्पिओला बेसावध ठेवण्यासाठी म्हणून त्याची मागणी मान्य असल्याचा निरोप त्याच्यापर्यंत पोहोचवण्यात येतो. पण दरम्यानच्या काळात कॅलाहननं रचलेल्या ट्रॅपमध्ये अडकता अडकता तो निसटतो. मेयर आणि पोलिसांनी डबलक्रॉस केल्यामुळे खवळलेला स्कॉर्पिओ एका १४ वर्षांच्या मुलीला किडनॅप करतो आणि २ लाख डॉलरची मागणी करतो.
१९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘डर्टी हॅरी’ची कथा ही अशी अगदीच साधी, खरं तर कुठल्याही चीप थ्रिलरची असावी तशी आहे. चित्रपटाचं नावच नायकावरून ठेवलेलं असल्यामुळे चित्रपटभर नायकाचंच वर्चस्व असणार हे ही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. चित्रपटाला खूप वेगवेगळे कंगोरे आहेत किंवा तो खूप काहीतरी सांगू पाहातोय, अशातला भाग नाही. तो फक्त एकच पण महत्त्वाचा प्रश्न विचारतो, ‘विकृत गुन्हेगाराशी कसं वागावं?’ कायद्यानं जे संरक्षण गुन्हेगारांनाही बहाल केलंय, त्याचे फायदे अशा विकृतांना मिळावेत का? कायद्यासमोर अशा गुन्हेगारांना उभं केल्यानंतर कायद्यातील पळवाटांचा लाभ घेऊन ते सहीसलामत सुटतात. त्यामुळे पोलिसांनीच कायदा हातात घेणं न्याय्य ठरतं का?
वर वर निव्वळ थरारपट वाटणाऱ्या आणि हाताळणीही तशीच असलेल्या ‘डर्टी हॅरी’नं प्रत्यक्षात मात्र या एका प्रश्नामुळे बराच गोंधळ माजवला होता. चित्रपटाचे समर्थक आणि विरोधक असे सरळ सरळ दोन गट पडले होते. बॉक्स ऑफिसवर चित्रपट चांगला यशस्वी ठरला, पण जवळपास सर्वच समीक्षकांनी मात्र त्याच्यावर जोरदार टीका केली. रॉजर एबर्टसारख्या ख्यातकीर्त समीक्षकालाही या निव्वळ धंदेवाईक चित्रपटात फॅसिस्ट विचारधारेचं प्रतिबिंब दिसलं होतं.
चित्रपटातल्या एका प्रसंगात हॅरी कॅलाहनच्या गोळीने स्कॉर्पिओ त्याच्यासमोर रक्तबंबाळ होऊन पडलाय. हा आता आपल्याला पूर्णच मारणार या भीतीने स्कॉर्पिओ गयावया करू लागतो, वकिलाची मागणी करू लागतो. ‘आय हॅव अ राइट टू अ लॉयर’ तो जोरात ओरडतो. हॅरी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याच्या पायात ज्या ठिकाणी गोळी लागलेय, त्या जखमेवर आपल्या टाचेने जोर देत राहतो... स्कॉर्पिओ विव्हळत राहतो.
कट टू
डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या केबिनमध्ये हॅरीची खरडपट्टी काढणं चालू आहे. वॉरंट नसताना स्कॉर्पिओच्या घरात घुसणं, त्याच्यावर गोळी चालवणं, त्याला टॉर्चर करणं, त्याला वकील नाकारणं... पोलिस तपासाच्या कुठल्याच कायदेशीर प्रक्रियेचं तू पालन केलेलं नाहीस. नशीब समज मी तुझ्यावरच कुठला आरोप ठेवत नाहीये, या शब्दांत डिस्ट्रिक्ट अॅटर्नी हॅरीची हजेरी घेतो. हॅरी वैतागतो. त्याने जमा केलेले पुरावे, हस्तगत केलेली बंदूक, स्कॉर्पिओनं आजवर केलेले खून, बॅलिस्टिक रिपोर्ट या सगळ्याला काहीच अर्थ नाही? ‘कोर्ट हे पुरावे ग्राह्य धरणार नाही, कारण तू कायदेशीर पद्धतीनं ते गोळा केलेले नाहीस’ डिस्ट्रिक्ट अॅटर्नी त्याला थंडपणे सांगतो. चरफडत तिथून निघून जाण्याशिवाय हॅरीच्या हाती काहीच उरत नाही.
या एका प्रसंगामुळे प्रेक्षक आपसूक हॅरीच्या बाजूनं झुकतो. गर्दीची मानसिकता ही बऱ्याचदा फॅसिस्ट वृत्तीला उचलून धरणारी असते. गर्दीला नेहमीच झटपट न्याय हवा असतो. ‘डर्टी हॅरी’ पाहायला प्रेक्षकांनी ज्या प्रमाणात गर्दी केली ते पाहता एक तर त्यांना कायदा हातात घेऊन स्वत:च न्याय करण्याची हॅरीची भूमिका (फॅसिस्ट!) मान्य होती किंवा मुळातच त्यांना चित्रपटाच्या केंद्रस्थानी असा काही विषय आहे हेच उमगलं नसावं. केवळ मनोरंजनासाठी चित्रपट बघणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकांना असे काही प्रश्न पडत नाहीत. निव्वळ थ्रिलर म्हणून ‘डर्टी हॅरी’ त्यांचं पुरेपूर मनोरंजन करणारा होता, एवढी एक गोष्ट त्यांच्यासाठी पुरेशी होती.
आज ‘डर्टी हॅरी’ बघताना त्यातल्या गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगाराचा बिमोड करण्यासाठी हॅरी कॅलाहन जी पद्धत वापरतो, त्या पद्धतीचंही विशेष असं काही वाटत नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच्या जवळपास साडेचार दशकांत गुन्ह्यांच्या पद्धतीही बदलल्या आहेत, विकृतपणा आणि नृशंसपणाचा नवनवा कळस गाठणारे कितीतरी गुन्हेगार वास्तव आयुष्यात बघायला मिळाले आहेत आणि अजूनही मिळत आहेत. असल्या विकृत गुन्हेगारांना कशाप्रकारे वागणूक मिळायला हवी किंवा शिक्षा व्हायला हवी, याबाबतीत समाज म्हणून आपण बऱ्यापैकी निबर झाल्याचं काही काही प्रकरणात जाहीर फाशी देण्याच्या वगैरे मागण्या होत असतात, त्यावरून दिसून आलेलं आहे. त्यामुळे आजच्या काळात ‘डर्टी हॅरी’ कदाचित फारच सौम्य वाटण्याची शक्यता आहे. पण तरीही या चित्रपटामध्ये काहीतरी खास आहे. दिग्दर्शक डॉन सिगलची हाताळणी आणि डर्टी हॅरीची मध्यवर्ती भूमिका बजावणारा क्लिंट ईस्टवूड हे दोघं मिळून ‘डर्टी हॅरी’ला खास बनवतात. सिगलनं अतिशय स्टायलाइज्ड पद्धतीनं या विषयाची हाताळणी केली आहे. तरीही तो व्यक्तिरेखांना पुरेसा वेळ देतो. हॅरी आणि स्कॉर्पिओ यांच्यातील द्वंद्व हा या चित्रपटाचा गाभा आहे, हे अचूक ओळखून तो शैलीला फारसं वरचढ होऊ देत नाही.
या चित्रपटानंतर सिगलची ओळख पोलिसी चित्रपटांचं मर्म उत्तमपणे ओळखणारा अशी झाली. ‘डर्टी हॅरी’च्या चार वर्षं आधी त्याचा ‘मॅडिगन’ हा पोलिसीपट गाजला होता. त्याच्याच पुढेमागे ईस्टवूडबरोबरच्याच ‘कूगन्स ब्लफ’ या आणखी एका पोलिसीपटाला चांगलं यश मिळालं होतं. ईस्टवूडसाठी ‘डर्टी हॅरी’ हे त्याच्या डॉलर ट्रायलॉजीमधल्या व्यक्तिरेखेचंच एक प्रकारे एक्स्टेंशन होतं. केवळ प्रदेश आणि व्यक्तिरेखेचं बाह्यरूप बदललं होतं. तिथं तो अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमा भागातल्या, कायद्याचं अस्तित्व नसलेल्या प्रदेशातला, फारसा विधिनिषेध न बाळगणारा, पण त्यातल्या त्यात माणुसकी शिल्लक असलेला अनाम काऊबॉय होता. त्याची ती ‘मॅन विथ नो नेम’ व्यक्तिरेखा प्रचंड गाजली. आजही ईस्टवूड म्हटलं की, तोंडात सिगार, डोक्यावर हॅट आणि कमरेला रिवॉल्वर लावून एका पायावर रेलून टेचात उभा असलेला तो काऊबॉयच प्रथम आठवतो. ‘डर्टी हॅरी’मधला हॅरी कॅलाहन हा कायद्याच्या बाजूने असला तरी कायद्याची प्रत्येक वेळी तो चाड राखतोच असं नाही. संस्कृतीची पुटं चढलेल्या शहरांच्या सोफेस्टिकेटेड जगात पोलिस असला तरी त्यानं कायदा हातात घ्यायचा नसतो. हॅरी नेमकं तेच करत असतो. इथं त्याच्या वाट्याला टीका येते, तिथं (म्हणजे वेस्टर्नपटात) खलनायकांच्या डोक्यावर ठेवलेल्या बक्षिसाचा तो धनी होतो. तिथल्या आणि इथल्या प्रदेशाच्या अंतरंगातही फारसा फरक नाही. तिथल्या रखरखित, अभावग्रस्त आणि कायद्याचं अस्तित्वच नसलेल्या प्रदेशात माणसांकडून नीतीनं वागण्याची अपेक्षाच अनाठायी असते. इथं सॅनफ्रॅन्सिस्कोसारखं शहर वरून चकचकीत दिसत असलं तरी त्याच्याही अंतरंगात गुन्हेगारी दडून बसलेलीच आहे. एकटा विकृत माणूस अख्खं शहर वेठीला धरतो. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी हॅरीला कायद्याची चौकट झुगारूनच काम करावं लागतं. मॅन विथ नो नेम पासून ज्याच्या नावानंच धडकी भरावी अशा या व्यक्तिरेखेपर्यंत ईस्टवूडच्या सिनेमांचं एक वर्तुळच एकप्रकारे पूर्ण होतं.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
‘डर्टी हॅरी’ ईस्टवुडच्या संस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्याने ज्या प्रकारच्या नो नॉनसेन्स व्यक्तिरेखा साकारल्यात, त्याचा अर्क ‘डर्टी हॅरी’मध्ये दिसतो. ‘डर्टी हॅरी’ हा रंजक गुन्हेगारीपट असला तरी त्याने खोल ठसा उमटवला. ही मुख्य व्यक्तिरेखा किंवा त्याचा गाभा पकडून पुढे अनेक सिनेमे आले. स्वत: ईस्टवुडनं दिग्दर्शित केलेल्या ‘द रूकी’ आणि ‘ग्रॅन टॉरिनो’ या चित्रपटांमध्ये डर्टी हॅरी या व्यक्तिरेखेचं प्रतिबिंब पडलंय. फ्रँक मिलरनं ‘सिन सिटी’ या आपल्या कॉमिक सिरीजमधलं ‘दॅट यलो बास्टर्ड’ हे कथानक डर्टी हॅरीवर बेतलं होतं. मिलरच्या म्हणण्यानुसार, ‘डर्टी हॅरी’ चित्रमालिकेतला ‘द डेड पूल’ हा अखेरचा चित्रपट बघून तो कमालीचा निराश झाला आणि संतापला देखील. इतक्या जबरदस्त व्यक्तिरेखेचा शेवट इतक्या मिळमिळीत चित्रपटानं होता कामा नये, या विचारानं पेटून त्याने ‘दॅट यलो बास्टर्ड’चा घाट घातला. पुढे रॉबर्ट रॉड्रिगेज या कमाल दिग्दर्शकानं रुपेरी पडद्यावर मिलरची अफलातून कॉमिक सिरीज आणली त्यावेळी ‘दॅट यलो बास्टर्ड’मधला तथाकथित डर्टी हॅरी अर्थात डिटेक्टिव्ह हार्टिगन ब्रुस विलिसनं रंगवला.
‘डर्टी हॅरी’च्या यशानंतर याच मालिकेतील ‘मॅग्नम फोर्स’, ‘द एन्फोर्सर’, ‘सडन इम्पॅक्ट’ आणि ‘द डेड पूल’ हे चार चित्रपट आले. पण त्यातल्या एकाचंही दिग्दर्शन सिगलनं केलं नाही. हे चारही चित्रपट उतरत्या क्रमानं निष्प्रभ ठरत गेले. ‘सडन इम्पॅक्ट’चं दिग्दर्शन तर स्वत: ईस्टवूडनं केलं होतं. तरीही तो फारसा प्रभावी ठरला नाही. कदाचित वर म्हटल्याप्रमाणे समाज बनचुकेपणाकडे वेगानं वाटचाल करत होता. ईस्टवूडनं ‘द डेड पूल’नंतर वयाचं कारण देत डर्टी हॅरी न साकारण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर या चित्रमालिकेची अखेर झाली. पण अमेरिकन समाजमन ढवळून काढणारा चित्रपट म्हणून ‘डर्टी हॅरी’चं स्थान कायम राहील.
लेखक चिंतामणी भिडे मुक्त पत्रकार आहेत.
chintamani.bhide@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment