अजूनकाही
कौटुंबिक नातेसंबंध हे शेवटी परस्परांवर अवलंबून असतात. या नातेसंबंधांबाबत परस्परांकडून अविश्वास निर्माण झाला की, निष्कारण गैरसमज निर्माण होऊन ते धोक्यात येऊ शकतात. आणि टोकाची भूमिका घेतली तर ते या जन्मात तरी सुधारतील का, असं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. बदलत्या काळामुळे हल्ली बऱ्याच कुटुंबात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नातेसंबंध टिकवून ठेवणं हीच मोठी समस्या निर्माण झाली आहे. निपुण धर्माधिकारी यांच्या 'बापजन्म' या नवीन मराठी चित्रपटात मुलांपासून दुरावलेल्या अशाच एका बापाची हळवी कथा मोठ्या मिश्किल पद्धतीनं सादर करण्यात आली आहे. विषय तसा गंभीर असूनही आणि त्याची मांडणी खेळकर पद्धतीनं केली असली तरी विषयांमधील गंभीरता कुठेही हरवलेली नाही. त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर एका 'बाप'माणसाची हळवी कथा पाहिल्याचं समाधान मिळतं.
बदलत्या काळातील कुटुंबव्यवस्थेवर नजर टाकल्यास चित्रपटाची कथा कोणत्याही कुटुंबात घडू शकणारी अशी आहे. ती ताजी आहे. कथेतील काही प्रसंग 'अविश्वसनीय' वाटत असूनही असंही घडूही शकतं यावर विश्वास ठेवणारी आहे. त्यामुळे ती मनोरंजक तर बनली आहेच, शिवाय अंतर्मुख करणारीही आहे.
भास्कर पंडित (सचिन खेडेकर) आणि त्याच्या कुटुंबाची ही कथा आहे. भास्कर पंडित हे 'रॉ' या गुप्तहेर संघटनेमधील सेवानिवृत्त अधिकारी असतात. या संघटनेच्या नियमानुसार त्यांना आपण नेमकं कोणतं काम करत आहोत हे सांगण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीसह त्यांची दोन मुलंही (विक्रम आणि वीणा) लहानपणापासून त्यांच्या कामाबाबत अनभिज्ञ आहेत.
''आपण एक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीत आहोत आणि कामासाठी नेहमी आपल्याला बाहेर जावं लागतं एवढंच त्यांनी घरी सांगून ठेवलेलं असतं. मात्र 'रॉ'मधील कामामुळे आणि 'ड्युटी फर्स्ट' या त्यांच्या बाण्यामुळे त्यांच्या वागण्यात साहजिकच कठोरता आलेली असते. त्याचा त्यांच्या लहान मुलांवर विपरीत परिणाम होतो आणि मुलं लहानपणापासून त्यांच्यापासून दुरावत जातात. आणि नंतर ती मोठी होऊन त्यांच्या संसारात रमली तरी त्यांच्यामधील हा दुरावा कायम राहतो. आणि 'बाप' म्हणून त्यांना त्यांच्याबद्दल कसलीच माया व आस्था राहत नाही. पुढे त्यांच्या पत्नीचंही निधन होते आणि भास्कर पंडित यांना एकाकीपणाची भावना निर्माण होते. माऊली नावाचा घरकाम करणारा नोकर आणि 'टायगर' नावाचा कुत्रा हीच त्यांच्या घरात राहणारी जिव्हाळ्याची माणसं. त्यातच त्यांना आपल्याला जीवघेणा आजार झाल्याचं समजतं.
शेवटी तरी आपल्या मुलांनी आपल्या घरी यावं आणि आपण त्यांच्या कुटुंबात रमावं अशी त्यांची तीव्र इच्छा होते. आपली ही इच्छा पूर्ण होण्यासाठी ते 'रॉ'मधील त्यांचा माजी सहकारी अशोक आणि माऊलीच्या मदतीनं एक 'मिशन' आखतात. त्यांचं 'मिशन' नेमकं कोणतं असतं आणि ते कसं पूर्ण होतं यासाठी 'बापजन्म' पडद्यावर पाहायलाच हवा.
.............................................................................................................................................
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
हे 'मिशन' पूर्ण होण्यासाठी भास्कर पंडित जे 'नाटक' करतात, ते खरोखरच खूप इंटरेस्टिंग आहे. ते 'नाटक' वठवताना वास्तवाचा विचार करता काही गोष्टी अविश्वसनीय वाटतात खऱ्या, मात्र ते शेवटी 'नाटक'च आहे म्हटल्यावर त्याकडे आपोआपच दुर्लक्ष होतं आणि त्यामधील औत्स्युक्य वरचेवर वाढत जातं.
या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी हे मुळात रंगकर्मी असल्यामुळे त्यांना हे 'नाटक' चांगलं वठवता आलं आहे. या नाटकासाठी त्यांनी 'सीसीटीव्ही' या आधुनिक उपकरणाचा फार सुरेख उपयोग करून घेतला आहे. शिवाय 'आपटे' (माधव वझे) नावाच्या पंडित यांच्या म्हाताऱ्या मित्राचं प्रकरण कथेशी सुसंगत असल्यामुळे ते कथेची रंगत वाढवतं. मुलांच्या भेटींच्या आंतरिक तळमळीनं पुनर्जन्म घेऊ पाहणाऱ्या भास्कर पंडित यांच्या 'वैकुंठा'पर्यंतचा प्रवास तर चांगलाच रंजक झाला आहे. मात्र ज्या प्रसंगामुळे मुलगा विक्रम याचा पंडित यांच्याबद्दल मोठा गैरसमज निर्माण होतो, तो विमानतळावरचा 'थ्रिलिंग' प्रसंग उठावपूर्ण झाला असता तर कथेची रंजकता आणखी वाढण्यास मदत झाली असती.
समर्पक संवाद ही या चित्रपटाची मोठी जमेची बाजू आहे. गंभीर विषय असूनही तो खेळकर शैलीत मांडण्यासाठी 'माऊली'च्या तोंडून वदवलेले मिश्किल संवाद चित्रपटात चांगली विनोदनिर्मिती करतात. कथेशी पूरक ठरलेली संगीतकार गंधार यांनी शब्दबद्ध केली दोन गाणी श्रवणीय झाली आहेत.
जीवन आणि मृत्यू यांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या आणि दुरावा निर्माण झालेल्या मुलांच्या भेटीची आंतरिक तळमळ असणारा भास्कर पंडित सचिन खेडेकर यांनी अतिशय समर्थपणे उभा केलाय. सत्यजित पटवर्धन (विक्रम), शर्वरी लोहोकरे (वीणा), आकाश खुराणा (अशोक) यांनीही आपापल्या भूमिकांना चांगला न्याय दिला आहे. पुष्पराज चिरपुटकर यानं 'माऊली'च्या भूमिकेत मजा आणल्यामुळे तो या चित्रपटातील 'विरंगुळा वीर ' ठरला आहे.
थोडक्यात, नात्यांमधील दुरावा नष्ट करण्यासाठी आणि पुन्हा नवी नाती निर्माण करण्यासाठी प्रसंगी तुम्हाला 'पुनर्जन्म'ही घ्यावा लागेल, हे बदलत्या काळातील वास्तव या चित्रपटात अतिशय खेळकर शैलीत मांडलं आहे. त्यामुळे नात्यांचा विचार करता हा चित्रपट अंतर्मुख करायला लावणाराही आहे.
लेखक श्रीकांत ना कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment