अजूनकाही
महात्मा गांधींनी १९२०-२१1 सालापासून अस्पृश्यतानिवारण करण्याच्या दृष्टीने ‘अस्पृश्यांच्या प्रश्नावर’ वेळोवेळी विचार मांडलेले आहेत. व त्यांनी तशी कृतीची पावलेही टाकली; पण या अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी त्यांनी टाकलेली पावले फारच जपून व काळजीपूर्वक टाकली होती. ब्रिटिश सरकारविरोधी स्वातंत्र्यासाठी गांधीजी जी क्रांतिकारक उठावाची, सत्याग्रहाची भूमिका घेत होते, तशी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी भूमिका ते घेऊ शकले नाहीत, हे त्यांच्याच या प्रश्नावरील विचारावरून दिसते.
“अस्पृश्यता हा हिंदूधर्मावरील कलंक आहे, तो नष्ट केला पाहिजे.” या गांधीजींच्या सुप्रसिद्ध विचारात या प्रश्नाची त्यांना खोल जाणीव आहे, व हा प्रश्न सोडविला पाहिजे अशी त्यात कळकळ व सहानुभूतीचा ओलावा आहे हे दिसून रेते. अस्पृश्यांचा अवघड प्रश्न पाहून गांधीजींच्या मनात दयाबुद्धी निर्माण होते आणि त्यातूनच ते अस्पृश्यतेच्या उग्र स्वरूपाबद्दल उफाळून बोलतात व संतापाने आपली मते व्यक्त करतात. एखाद्याचे दु:ख पाहून एखाद्या संताला साधूला जसा संताप रेतो, त्यातून तो बोलतो, तसे गांधीजींचे या प्रश्नावर वारंवार घडले आहे.
अस्पृश्यांची दु:खे, यातना, छळ पाहून गांधीजींच्या मनात सहानुभूती, दया निर्माण होते. गांधीजींनी येरवड्याच्या तुरुंगातून ५ नोव्हेंबर १९३२ रोजी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. त्या पत्रकात ते म्हणतात, “हरिजनांवर आपण आजपर्यंत केवढा अन्याय केला आहे याची आपणास जाणीव करून दिली तर ते गैर होणार नाही. सामाजिकदृष्ट्या हरिजनांना महारोग्राप्रमाणे वागविले जाते. आर्थिकदृष्ट्या गुलामापेक्षाही त्यांची स्थिती वाईट होत आहे. ज्याचे आपण देवालये (मंदिरे) असे वर्णन करतो, त्या ठिकाणी हरिजनांना मात्र धार्मिकदृष्ट्या बंदी केली जाते. सार्वजनिक रस्ते, सार्वजनिक शाळा, सार्वजनिक इस्पितळे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक नळ, उद्याने, अशा ठिकाणी एका विशिष्ट मर्यादेच्या आत हरिजनांनी येणे हा एक सामाजिक गुन्हा समजला जातो. व कित्येक ठिकाणी तर हरिजनांचे तोंडही पाहाणे हे पाप समजले जाते.
शहरात व खेडेगावात त्यांची वसाहत अगदी त्याज्या जागी करण्यात येऊन सार्वजनिक सोयींचा त्यांना व्यावहारिकदृष्ट्या मुळीच उपभोग घेऊ दिला जात नाही.
अशा स्थितीत हरिजन जात धरून राहिले आहेत व अद्यापही हिंदूधर्माच्या कक्षेबाहेर गेले नाहीत, हेच आश्चर्य होय. ते जुलमाखाली इतके चिरडले गेले आहेत की, जुलूम करणाऱ्याविरुद्ध बंड करण्याचीही ताकद त्यांच्यात राहिलेली नाही.
डॉ. आंबेडकर यांनी आपल्या कटू अनुभवाचे जे कित्येक हृदयद्रावक प्रसंग सांगितले, त्याचा मी येथे पुनरुच्चार करीत नाही. त्यांचे म्हणणे मला पटले व इतरांनाही ते पटेल अशी मला आशा आहे. अस्पृश्यतेची कीड किती दूरवर पसरली आहे व तिने राष्ट्राचा पाया कसा पोखरला आहे याची आपणास सान्निध्यामुळे योग्य जाणीव नसते. अस्पृश्यतेने सर्व वातावरण दूषित झाले आहे म्हणून ही वाळवी मुळातच नाहीशी केली पाहिजे...”
गांधीजींना या प्रश्नाची एवढी जाणीव असूनही या प्रश्नासंबंधी ते सत्याग्रहाची, उठावाची भूमिका घेऊ शकले नाहीत. अशी कडक भूमिका घेऊन त्यांना हिंदूंनाही दुखवावयाचे नव्हते असेच म्हणावे लागते. सेवाधर्म म्हणून आपण अस्पृश्यांवर दया दाखविली पाहिजे व अस्पृश्यता निवारण केले पाहिजे असे म. गांधींना वाटते. एका अर्थाने अस्पृश्यता नष्ट करण्यात, न कळत का असेना पण उपकारकर्त्याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण होते. आणि त्या दयेच्या पोटी म. गांधीजी अस्पृश्यता निवारण करण्याच्या मार्गाने काळजीपूर्वक व जपून पावले टाकतात.
“आम्हाला तुमचे उपकार नकोत, आम्हाला आमचे जे जन्मजात माणुसकीचे हक्क आहेत ते पाहिजेत.” ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जशी खणखणीत व रोखठोक सवालाची भूमिका होती तशी भूमिका गांधीजी घेऊ शकले नाहीत. केलेल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणूनच पश्चात्तापदग्ध होऊन ते (पाप) फेडण्यासाठी आपण अस्पृश्यतानिवारण केले पाहिजे. अशीच गांधीजींची भूमिका होती.
“अस्पृश्यतेचे उच्चाटन करणे, ते सवर्ण हिंदूंनी हिंदूधर्मासाठी व स्वत:साठी ‘पश्चात्ताप’ म्हणून केले पाहिजे....”- (यंग इंडिया, १६-१२-१९२४) असे महात्मा गांधींना वाटते. म्हणून अस्पृश्याचे जन्मजात अधिकार व हक्क म्हणून त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत, या मताशी म. गांधीजी सहमत दिसत नव्हते.
या अस्पृश्यतेच्या प्रश्नावर, अस्पृश्यता निवारण्याच्या प्रश्नावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गांधीजी यांच्या विचारात मतभिन्नता होती. डॉ. आंबेडकर यांनी आपल्या विचारप्रणालीने व प्रत्यक्ष कार्याने अस्पृश्य वर्गात स्वाभिमान महत्त्वाकांक्षा व जागृती निर्माण केली. स्वत:चा उद्धार स्वत: केला पाहिजे, आपण स्वयंप्रकाशित झाले पाहिजे, याची जाणीव होऊन दलित वर्ग अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामात उतरला व त्या दिशेने वाटचाल करू लागला.
उपकारकर्ता, सहानुभूतीदार यांच्याच भूमिकेने प्रायश्चित्त म्हणून पतितांचा उद्धार करावयाचा, त्यांना पुनीत करावयाचे, अशी गांधीजींची, त्यांच्या विचाराची छाप पडलेल्या हरिजनोद्धारकार्यकर्त्यांची व समाजसेवकांची समजूत होती. म. गांधी स्वत: म्हणत की, “मी सनातनी आहे (I claim myself to be a Sanatanist.).” यावरून म. गांधींना हिंदुधर्म शास्त्रे व त्यांतील विचार मान्य होते हे स्पष्टच आहे. त्यावरूनच सुरुवातीची त्यांची कर्म, वर्ण, जातिव्यवस्था यांवरील मते मोठी सनातनी वाटतात. म्हणूनच हिंदुधमशास्त्राच्या आधारानेच म. गांधी हे अस्पृश्यता निवारण्याच्या प्रश्नाकडे सुरुवातीस पाहात होते. अर्थात काळ, परिस्थिती व लोकमत यांचे दडपण म. गांधींवर सारखे पडत असावे असेही वाटते; म्हणूनच ते हिंदुधर्म शास्त्राच्या आधाराने अस्पृश्यांच्या प्रश्नाकडे पहात व त्या दृष्टीने हिंदूंना न दुखवता ते आपली मते व्यक्त करीत होते.
“स्वराज्यप्राप्तीपूर्वी अस्पृश्यांची मुक्ती झाली पाहिजे. अशी माझी अट आहे (१९२१) असे. म. गांधींना वाटत होते. जोपर्यंत अस्पृश्यतेचा कलंक आहे, तोपर्यंत स्वराज्य मिळाले तरी ते खरेखुरे स्वराज्य नव्हे, असे एकदम सनातनी विचाराला धक्का देणारे विचार त्यांनी मांडले आहेत; पण त्याचबरोबर “मला जातिपद्धती मान्य आहे, मला वर्णाश्रमव्यवस्था मान्य आहे.” असेही विचार म. गांधींनी सुरुवातीला प्रकट केलेले आहेत.
“मनुष्याच्या अवस्थेस त्याचे कर्म हे जबाबदार आहे.” - (‘यंग इंडिया’, १२-९-१९२१). “हिंदुधर्म-श्यद्धेप्रमाणे माणूस ज्या वर्णात जन्मला तो त्या वर्णाचा समजावा. त्याने त्याचा वर्ण सोडल्याने तो स्वत:ची हिंसा करून घेतो आणि त्याची अधोगती होऊन तो पतित होतो.” - (My soul’s Agony, 1933, Page 42)
“जाति व्यवस्था सामाजिक गरजेसाठी आहे. आणि वर्णाश्रमाचा आधार हिंदुशास्त्र आहे. जाती असंख्य आहेत; पण वर्ण चारच आहेत. माझी वर्णाश्रमावर ठाम श्रद्धा आहे. मी आजही स्पष्ट सांगतो की हिंदूंचा वर्णाश्रमधर्म ही मानवजातीला एक देणगी आहे.” - (‘हरिजन’, १२-२-१९३३). “भंगी जातीत जन्माला आलेल्या माणसाने त्याचा जीवनचरितार्थ भंगी कामातच मिळवावा, आणि नंतर वाटल्यास काहीही करावे. भंगीकामाचा दर्जा वकील व राष्ट्रपती यांच्याप्रमाणेच आहे. - (‘हरिजन’, ६-८-१९३७)
गांधीजींची ही मते व विचार पाहिल्यावर त्यांना वर्णाश्रमपद्धती पूर्णतया मान्य होती इतकेच नाही तर वर्णव्यवस्था ही हिंदुधर्माने दिलेली देणगी आहे, या भूमिकेपर्यंत त्यांची मजल गेलेली होती असे दिसते. प्रत्येक माणसाने त्याचा वडिलोपार्जित धंदा करावा, असाही म. गांधींचा आग्रह होता. भंग्याने त्याचे काम करावे, असेही त्यांचे मत आहे.
वंशपरंपरागत वडिलोपार्जित, रुढिबद्ध अशा हीन प्रकारच्या धंद्यांनी व जातीय पद्धतीवर आधारलेल्या चातुर्वर्ण्य पद्धतीने अस्पृश्यांना अस्पृश्यतेच्या गुलामगिरीत कायम डांबले. अशा वर्गातील माणसांना, जाणत्या व्यक्तींना गांधीजींचे हे विचार वाचून व ऐकून संताप येतो, चीड येते. आणि गांधींनी असे विचार का मांडावेत असाच प्रश्न उभा राहतो.
अर्थात गांधीजींनी हे जे विचार मांडले त्यात कालांतराने त्यांच्या विचारात बऱ्याच अंशी बदल झालेला आहे.
डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा गांधीजींच्या विचारांवर झालेला परिणाम म. गांधीजींच्या या विचारात पुढे पुढे जो बदल झाला त्याला मुख्य कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या विषयावरील मूलगामी, शास्त्रोक्त विचार हे होर. १९३२ साली पुणे येथील रेरवडा जेल मध्ये ‘पुणे करार’ झाला. त्याच वेळी गांधीजींच्या नेतृत्वाखाली हरिजन सेवक संघाची स्थापना झाली. आणि या अस्पृश्यतेच्या, चातुवर्ण्याच्या प्रश्नावर डॉ. आंबेडकर व म. गांधी एकमेकांच्या समोर आले. आणि गांधीजींना डॉ. आंबेडकराचे विचार ऐकून त्यावर चिंतन करावे लागले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १९३७ साली प्रसिद्ध झालेल्या ‘जातीयतेचे उच्चाटन’ (Annihilation of Caste) या प्रबंधांतील विचारांचा व त्यातील सिद्धान्तांचा गांधीजींच्या विचारांवर मोठा परिणाम झालेला दिसतो. गांधीजींनी हा प्रबंध (पुस्तक) काळजीपूर्वक वाचलेला होता. हा प्रबंध वाचल्यावर यावर गांधीजींनी स्वत: हरिजनमध्ये ( ११ व १८ – ७ - १९३६) दोन लेख लिहिले होते. त्यात सुरुवातीलाच ते म्हणतात, “कोणाही समाजसुधारकाला हे टाळता रेणार नाही. सनातनी माणसाला ते वाचून फायदा होईल. त्यात मतभेदाचे मुद्दे आहेत. डॉ. आंबेडकर हे हिंदुधर्माला एक आव्हान आहे” (Dr. Ambedkar is a challenge to Hinduism).
डॉ. आंबेडकरांचे या पुस्तकातील विचार, तसेच त्यांनी वारंवार या विषयावर प्रकट केलेली मते यांचा गांधीजींच्यावर परिणाम झालेला होता, असे म्हणता येते. म्हणूनच सुरुवातीला सनातन्यांप्रमाणे जातीय व्यवस्थेसंबंधी मते मांडणाऱ्या गांधीजींच्या विचारात पुढे पुढे मोठा बदल झालेला दिसतो.
“सहभोजन आणि आंतरजातीय विवाह यांची अस्पृश्यता निवारण्यासाठी जरुरी नाही, असे मला वाटते. माझी वर्णाश्रमधर्मावर श्रद्धा आहे; तरी मी भंग्याबरोबर जेवतो ... .... माझ्या योजनेत आंतरजातीय विवाहाला स्थान नाही एवढेच मी सांगतो.” - (यंग इंडिया, २२-१-१९३५) असे १९२५ साली आपले मत सांगणारे म. गांधी पुन्हा १९४६ च्या २८ जुलैच्या ‘हरिजन’मध्ये म्हणतात, “सहभोजन हा अस्पृश्यता निवारण्याच्या कार्यक्रमाचा आवश्यक असा भाग नाही, असे मी एकेकाळी म्हटले आहे. पण मी स्वत: सहभोजनवादी आहे. हल्ली मी या कार्याला उत्तेजन देतो. वास्तविक आज मी त्याही पुढे जात आहे.” - (‘हरिजन’, २८-७-१९४६). यासंबंधी त्यांचे आंतरजातीय विवाहाबद्दलचे बदललेले मत महत्त्वाचे आहे.
गांधीजी म्हणतात, “जर एखाद्या सुशिक्षित हरिजन मुलीने सवर्ण हिंदूबरोबर लग्न केले तर त्या जोडप्याने अस्पृश्यता निवारण्याच्या कार्याला वाहून घ्यावे... एका हरिजन मुलीने चांगल्या वर्तणुकीच्या शीलवंत सवर्ण हिंदूबरोबर लग्न केल्यास त्यामुळे सर्व हरिजन सवर्ण हिंदूंचे चांगले मित्र होतील आणि हे चांगले उदाहरण होईल. ‘सवर्ण हिंदू मुलीने आपला भावी सहकारी पती म्हणून हरिजनाची निवड करावी हे अधिक योग्य होईल. त्यापुढे जाऊन मी म्हणेन, हे अधिक चांगले होईल.... मी माझ्या मार्गाने जावयाचे ठरविले तर ज्या मुलींवर माझे नैतिक वजन आहे अशा सवर्ण मुलींनी हरिजन पतीची निवड करावी असे मी त्यांना आवाहन करीन.” - (‘हरिजन’, ७-७-१९४६)
गांधीजींच्या जीवनात जातीयतेच्या प्रश्नावर झालेला हा बदल महत्त्वाचा आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना गांधीजी म्हणतात, “कोणत्याही स्वरूपात अस्पृश्यता मानणे घटनेने गुन्हा ठरविला जाईल अशी मी माझ्या वजनाने तरतूद करू शकेन.”
घटना परिषदेचे काम सुरू झाले तेव्हा त्यांनी हे म्हटले आहे. पण राज्यघटना अंमलात आल्यानंतर अठरा वर्षांनी दिलेल्या गोळवलकर गुरुजी यांच्या पहिल्या मुलाखतीत व नंतरच्या खुलाशात विशेष असा काहीच बदल झालेला दिसत नाही. म्हणूनच त्याचे आश्चर्य वाटते. म. गांधीजी जातीय व्यवस्था आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी क्रांतिकारक भूमिका घेण्यास तयार नव्हते, या प्रश्नावर मुख्यत: त्यांची सुधारणावादी भूमिका होती. इतर स्पृश्यवर्गीय समाजसुधारकांनी अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्याच्या प्रश्नावर जी ‘मतपरिवर्तनवादाची’ भूमिका घेतली तीच म. गांधीनींही घेतली. म. गांधीजींची मतपरिवर्तनावर मोठी श्रद्धा होती.
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
म. गांधीजींचे अस्पृश्यतानिवारण व जातीयतेचे उच्चाटन या प्रश्नांवरील विचार पाहून डॉ. आंबेडकरांनी आपल्या दृष्टिकोनातून म. गांधींवर अनेक वेळा प्रखर टीकाही केली होती.
डॉ. आंबेडकर व म. गांधीजी यांच्यात या प्रश्नावरील विचारात मतभिन्नता होती. तरीही या दोन महापुरुषांनी आपापल्या विचाराला धरून ‘अस्पृश्यतानिवारण व जातीयतेचे उच्चाटन’ करण्यासाठी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत कार्य केले हे विशेष होय.
गांधीजींनी आपल्या विचाराने व कृतीने भारतीय स्पृश्य सवर्ण समाजात अस्पृश्य वर्गांबद्दल एक प्रकारची दया व सहानुभूती निर्माण केली. आणि स्पृश्य वर्गाला अस्पृश्य वर्गाचे दु:ख, त्यास, छळ यांची हळूहळू जाणीव होऊ लागली. सुशिक्षित, जाणकार, व विचारी वर्गात अस्पृश्यता निवारण्याच्या कार्याला चालना मिळाली. गांधीजींनी त्यांच्याच विचारदृष्टीने का असेना, अस्पृश्यता निवारण्याच्या प्रश्नाला चालना दिली व स्पृश्य वर्गापुढे त्यांनी हा प्रश्न सतत ठेवला. म. गांधीचे कार्य मोलाचे व महत्त्वाचे आहे.
त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात अस्पृश्यतेच्या प्रश्नावर आपल्या विचाराने व कृतीने प्रखर हल्ले चढविले आणि सवर्ण हिंदूसमाज या अस्पृश्यांच्या प्रश्नासंबंधी गाढ झोपेतून खडबडून जागा झाला. त्याचबरोबर या जाग्या झालेल्या स्पृश्य वर्गावर म. गांधीच्या विचारांचाही परिणाम झाला.
अस्पृश्यतेच्या प्रश्नाची हेळसांड
गांधीजींच्या मृत्यूनंतर मात्र अस्पृश्यतेच्या प्रश्नांकडे भारतीय नेत्यांनी दुर्लक्ष केले असे म्हणणे भाग पडते. म. गांधींनंतर या प्रश्नाकडे जिव्हाळ्याने कोणीच पाहिना म्हणून पुन्हा हा प्रश्न तसाच रेंगाळत मागे पडला आहे असे म्हणावे लागते. गांधीजींनी निर्माण केलेली या प्रश्नासंबंधीची परंपरा खंडित झालेली आहे, हीच या प्रश्नाची आज शोकांतिका आहे. केवळ काही उत्सव प्रसंगांच्या निमित्तानेच या प्रश्नाची भारतीय व प्रांतिक नेत्यांना आठवण होते. बाकी हा प्रश्न सत्तास्पर्धेत, प्रांतिक वादात, भाषावादांत बाजूला, अडगळीत पडलेला दिसतो. आणि अस्पृश्यतानिवारणाचा अस्पृश्यता नष्ट करण्याचा कारदाही कपाटात धूळ खात पडल्यासारखा दिसतो.
गांधीजींचे शिष्य वारस व त्यांना मानणाऱ्या व्यक्ती यांना अस्पृश्यांच्या प्रश्नांचे स्मरण होत नाही ही दु:खाची गोष्ट आहे.
(‘गांधी नावाचे महात्मा’ या रॉय किणीकर संपादित आणि डायमंड पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित (२०१२) पुस्तकातून साभार.)
.............................................................................................................................................
गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_list
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment