(हा लेख रॉय किणीकर यांनी टोपणनावाने लिहिला असावा.)
गांधीजींचे यशापयश
हिंदू-मुसलमान ऐक्याच्या बाबतीत गांधीजींना अपयश आले, ही गोष्ट नाकारण्यात अर्थ नाही. जातीय आधारावर देशाची फाळणी करणे भाग पडले, हाच या अपयशाचा धडधडीत पुरावा. या बाबतीत ज्यांचे दुमत आहे, ज्यांना गांधीजींचे अपयश मान्य नाही, त्यांच्याशी वाद करण्यात अर्थ नाही. परंतु वादाचा मुद्दा यानंतर उपस्थित होतो. काही लोकांच्या मते, हिंदू-मुस्लिम समस्या इतकी जटिल होती, तिची पाळेमुळे इतिहासामध्ये इतकी खोलवर गेलेली होती की कोणाही व्यक्तीला ती समस्या सोडविताच आली नसती. ती सोडविण्यात आलेले अपयश दु:खदारक असले तर ही समस्या पुष्कळच सुटण्याच्या मार्गावर आली असती; परंतु गांधीजींचे सांगणे इतरांनी विशेषत: बहुसंख्य असणाऱ्या हिंदूनी न ऐकल्यामुळे ते त्या कार्यात अयशस्वी झाले. त्यांचे हे अपयश, म्हणूनच उज्ज्वल ठरते.
याच्या उलट काही लोक असे मानतात, की गांधीजींचा मार्ग चुकीचा होता. त्या मार्गाने जाऊन ही समस्या सुटण्याची शक्याता तेव्हाही नव्हती व आताही नाही. म्हणून त्या मार्गाच्या श्रेष्ठत्वाचा स्वीकार करता येत नाही आणि गांधीजींचे अपयश उज्ज्वलही ठरत नाही. सावरकर वगैरे मंडळी ज्या मार्गाचा पुरस्कार करीत होती, तोच मार्ग त्यावेळीही योग्य होता आणि यापुढेही त्याच मार्गाने हा प्रश्न सुटेल.
माझे स्वत:चे मत या दोन मतांहून थोडे वेगळे, किंबहुना दोन टोकांच्या मध्यभागी असणारे आहे.
मुसलमान समाजाची कृतघ्नता
तटस्थ निरीक्षकाच्या भूमिकेवरून पाहिल्यास महात्माजींनी अस्पृश्य व मुसलमान या दोन समाजांच्या उद्धारासाठी जेवढे कार्य केले, तेवढे त्या समाजाच्या तथाकथित नेत्यांनीही केले नाही, हे मान्य करावे लागेल. त्याकरिता गांधीजींनी किती हाल सोसले, याची नुसती कल्पना मनात आली तरी त्यांच्याबद्दल आदराने मान लवते. परंतु या दोन समाजांनी त्यांना आपला मित्र अथवा नेता कधीच मानले नाही. इस्लामची मूलभूत तत्त्वे आदरणीय मानून ती आपल्या आचरणात आणण्याची धडपड करणारे गांधीजी मुसलमानांना नेहमीच काफीर वाटले. सरहद्द गांधी बादशाहखान, डॉ. अन्सारी, हकीम अजमलखान, डॉ. झाकिर हुसेन, मौलाना आझाद यांसारखे काही थोडे बोटांवर मोजता येतील असे मुस्लिम पुढारी आणि बहुसंख्य पठाण जनता ही वगळल्यास गांधीजींना आपले मित्र मानणारे मुसलमान या देशात फारच थोडे होते व आजही त्यांची संख्या फारशी असल्याचे दिसत नाही. याच्या उलट इस्लामविषयी आणि मुस्लिम जनतेविषयी तुच्छताबुद्धी बाळगणारे आणि एकाही इस्लामी तत्त्वाचे पालन न करणारे बॅ. जिना यांनाच मुसलमानांनी आपले नेते मानले. स्वातंत्र्योत्तर काळात तर भारतातील मुसलमानांचे खरे त्याते गांधीजीच होते. प्रा. नरहर कुरुंदकर यांनी उपरोधिकपणे म्हटल्याप्रमाणे, “पिसाटपणे गांधीजींचा वध जर झाला नसता तर या देशात मुसलमानांना त्यावेळी कुणी त्याता नव्हता. गांधीजींच्या मृत्यूचा धक्काच इतका मोठा होता, त्या हौतात्म्याचा कडकडाट एवढा प्रचंड होता की, सगळा भारत शुद्धबुद्ध सोडून क्षणभर स्तब्ध झाला आणि जातीय दंगली एकदम बंद पडल्या. खरे म्हणजे मुसलमानांनी कधी तरी नथुरामाचे आभार मानायला हवेत. कारण गांधीवधामुळे मुसलमानांना फार मोठे संरक्षण अकल्पितपणे मिळाले.” हे झाले गांधीजींच्या बलिदानाने केलेले कार्य. त्यांनी जिवंतपणी मुसलमानासंबंधी हिंदूंच्या मनात असणारे गैरसमज दूर करण्याची जी धडपड केली, सरदार वल्लभभाईवर दडपण आणून त्यांना मुसलमानांना अनुकूल निर्णय घ्यावयास लावण्यासाठी जो जीवाचा आटापिटा केला, श्रद्धानंदांच्या खुनापासून फाळणीपर्यंत मुसलमानांनी केलेले जे अनंत अत्याचार त्यांनी पोटात घातले, त्याचे फळ त्यांना काय मिळाले? मुस्लिम समाजाची कृतघ्नता! ‘कृतघ्नता’ हा शब्द काही लोकांना आवडणार नाही. परंतु माझ्या मते मी तो फारच सौम्य शब्द वापरला आहे असे वाटते.
ही गोष्ट अस्पृश्यांच्या बाबतींतही म्हणता येईल. परंतु या लेखाचा तो विषय नसल्यामुळे तिची चर्चा मी करीत नाही.
मूल्यमापन चुकले
हे असे का घडले? मुसलमानांची खरी ओळख त्यांना पटली नव्हती की काय? ‘Every Hindu is a coward and every Muslim is a bully.’ प्रत्येक हिंदू हा भ्याड असतो आणि प्रत्येक मुसलमान हा पुंड असतो, असे उद्गार काढणाऱ्याला हे समजले नव्हते, असे समजणे अज्ञपणाचे होईल. काही लोक असे मानतात की, मुसलमानांचे सारे दुर्गुण माहीत असूनही ब्रिटिश सत्तेविरुद्ध करावयाच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी हिंदूंबरोबर राहावे, स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या सैन्यात दुफळी दिसू नये, यासाठी त्यांनी मुसलमानांना लाख खून माफ करण्याची भूमिका घेतलेली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे मुसलमान मोठ्या संख्येने स्वातंत्र्ययुद्धात सामील झाले असते तर देशानेही गांधीजींप्रमाणे त्यांना लाख खून माफ केले असते. परंतु बहुसंख्य मुस्लिम समाज स्वातंत्र्ययुद्धापासून अलिप्तच राहिला. त्यावरून असे म्हणावेसे वाटते की, त्या समाजाच्या बाबतीतील गांधीजींचे मूल्यमापन साफ चुकले.
मुसलमान हा सुरुवातीपासून आतापर्यंत शक्तिपूजक राहिलेला आहे. त्याला फक्त सामर्थ्याचीच भाषा कळते. त्याच्याशी सौजन्याने मिळते घेऊन पड खाऊन तुम्ही बोलू लागतात तर तुमच्याबद्दल त्याचा गैरसमज होतो आणि तो तुमच्या डोक्यावर चढून तुम्हाला गाडून टाकण्याचा प्रयत्न करतो. ही वस्तुस्थिती कदाचित गांधीजींनाही कळली असेल. फरक एवढाच की पाशवी सामर्थ्याऐवजी अहिंसक सामर्थ्याचा परिणाम त्याच्यावर होईल, अशी आशा त्यांना वाटत असावी. परंतु ते अहिंसक सामर्थ्य कधीच निर्माण होऊ न शकल्यामुळे त्यांच्या भूमिकेचा विपर्यास झाला आणि मुसलमान अधिक शिरजोर बनला. मुसलमानाला फक्त सामर्थ्याचीच भाषा समजते, हे विधान हिंदू जातीयवाद्यांच्या तोंडीच शोभणारे आहे, याची मला कल्पना आहे. परंतु त्याचा उत्तरार्ध मात्र त्याच्याहून अगदी वेगळा आहे. तो असा की मुसलमानाला फक्त सामर्थ्याचीच भाषा समजते, म्हणून आपण सामर्थ्यवान बनून त्याला दडपून टाकावे, असे हिंदू जातीयवादी म्हणतील तर राष्ट्रवादी शक्ती दुबळ्या नसून त्यांनाही मुस्लिम समाजाच्या उत्थानाची तेवढीच आस्था आहे, हे त्याला पटवून देण्यासाठी राष्ट्रवादी शक्तींनी आपल्या सामर्थ्याची चुणूक त्याला दाखवावी, असे माझे म्हणणे आहे. याबाबतीत गांधीजींची भूमिका सुरुवातीपासून सदोष राहिली असे मला वाटते.
खिलाफतीच्या संदर्भातील भूमिका
उदाहरणार्थ खिलाफतीच्या पुनरुज्जीवनासाठी मुसलमानांना गांधीजींनी जे सहकार्य दिले ते रोग्य नव्हते, असे आता आढळून येते. डॉक्टर जाफर रजा या मुस्लिम विद्वानांनी ‘मुक्तधारा’ या दिल्लीच्या साप्ताहिकात (२३-११-१९६८) या संबंधी जे विचार मांडले आहेत ते येथे उद्धृत करण्यासारखे आहेत. ते म्हणतात, “काँग्रेस का इतिहासही अपनी लिबलिबी (ढिसाळ) उदेश्यहीन उदारता का द्योतक है। इसकी शुरूआत उस समर हुई जब महात्मा गांधीने ‘खिलाफत तहरीक’ (चळवळ) को राष्ट्रीय आंदोलन से मिला दिया। खिलाफत की माँग संकीर्णता, प्रतिक्रियावादिता और धार्मिक प्रतिगामिता से प्रभावित थी। भारतीय मुसलमानों की सामाजिक एवं राजनीतिक समस्याओ सें उसका कोई तालमेल न था। इस सौदेबाजी का उद्देश्य केवल मुठ्ठीभर मुस्लिम नेताओं को खुश करना ही था। नतीजे में (परिणामत:) कुछ लोग मुस्लिम लीग से काँग्रेस में आ गये, किंतु इसका परिणाम राजनीतिक आन्दोलन की मूलधाराको गलत (चूक) रास्तोपर डालनाही हुआ। स्वतंत्रता आन्दोलन में मुसलमानों का प्रतिनिधित्व मुल्ला-मौलवी द्वारा होने लगा। मुस्लिम प्रबुद्धवर्ग छूटता गया और मुस्लिम साम्प्रदारिकता को फलने-फूलनेका अवसर मिल गया। मिस्टर जिनाह की सफलता का रहस्य भी रही था कि काँग्रेसने मुसलमानों के पढे-लिखे वर्ग को नजरअंदाज (दुर्लक्ष) कर के मुसलमानों की समस्याओं को मुल्ला-मौलवियों की नजरों से देखना शुरू कर दिया था।”
खिलाफतीच्या मुस्लिम मागणीला गांधीजी व काँग्रेस यांनी पाठिंबा देऊन इंग्रजांविरुद्धच्या आपल्या लढ्यास मुसलमानांचा पाठिंबा मिळविला खरा, परंतु त्याकरिता आपण केवढी किंमत देत आहोत याचा सखोल विचार त्यांनी केला नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. खिलाफतीची मागणीच मुळी जुनाट, बुरसटलेली, प्रतिगामी व संकुचित स्वरूपाची होती. इस्लामचा आधारस्तंभ असलेल्या अरबांनी ती मागणी कधीच केली नाही. आणि ज्या तुर्कांच्या अखत्यारीत खिलाफत होती त्यांनीच तिची बोळवण केली. हा इतिहास पाहाता भारतीय मुसलमानांच्या मागणीचे वैयर्थ लक्षात येते. मुसलमानांचे सहकार्य स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळी मिळवावयाचे तर त्यांच्या त्या खुल्या मागणीला पाठिंबा देणे भागच होते, असे काही लोक मानतात. याचा अर्थ राजकारणात सौदेबाजी सदैव चालणार, असे ते गृहीत धरतात. मला हे गृहीतकृत्य मान्य नाही. सौदेबाजी न करिताही राजकारण करिता आले पाहिजे, असे मी मानतो. परंतु सुरुवातीपासून आपणाकडे सारेच पक्ष सौदेबाजी करीत आले असल्यामुळे तिच्याखेरीज राजकारण करणे अशक्यच आहे असा ग्रह आम्हा भारतीयांमध्ये निर्माण झाला आहे. आमचे ध्येय हे आहे, आमचा मार्ग हा आहे. ज्या कोणाला यात सहभागी व्हावयाचे असेल त्याने यावे. आमची दारे सर्वांना उघडी आहेत. एवढे घोषित करून काँग्रेस दृढपणे आपल्या मार्गाने चालत राहिली असती तर तिला मुस्लिम जनतेकडून मिळालेल्या पाठिंब्यात फारशी घट झाली नसती. कुणी सांगावे, कदाचित वाढच झाली असती.
प्रतिगाम्यांशी सौदेबाजी
डॉ. जाफर रजा यांचा आक्षेप सौदेबाजीला नाही, प्रतिगाम्यांशी सौदेबाजी करण्याला आहे. मुसलमानांमधील पुरोगामी, सुशिक्षित लोकांशी सौदेबाजी केली असती तर मुस्लिम जातीयवाद फोफावला नसता हे त्यांचे मत मात्र फारसे पटण्यासारखे नाही. त्याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण असे की सुशिक्षित मुसलमानांशी सौदेबाजी केली असती तरी बहुसंख्याकांच्या रेट्यापासून आपले संरक्षण व्हावे म्हणून त्यांनीही अव्वाच्या सव्वा मागण्या पुढे मांडल्याच असत्या; आणि आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून आपल्यामागे मुस्लिम जनता आहे हे दाखविण्यासाठी त्यांनीही त्या जनतेला चुचकारण्याचा प्रयत्न केला असता. आज जनसंघामधील अनेक बुद्धिमान मंडळींना गोहत्येचा प्रश्न हा शुद्ध आर्थिक प्रश्न आहे हे मनोमन पटलेले असूनही अज्ञ जनतेचा पाठिंबा मिळविण्यासाठी तो भावनेचा, स्वाभिमानाचा प्रश्न आहे, असा आभास ते निर्माण करतातच ना? तीच स्थिती सुशिक्षित व पुरोगामी मुसलमानांची झाली असती.
दुसरे कारण असे की, त्या काळचा राष्ट्रीय हिंदूही मनाने सनातनीच होता. स्नानसंध्या, पूजाअर्चा, शेंडीजानवे याबाबतीत तो जुनी बंधने तोडण्यास किंवा जुन्या प्रथा मोडण्यास तयार नव्हता. म्हणजे वस्तुत: हिंदू नेतेही त्यावेळी खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष भूमिकेवर उभे नव्हते. त्यामुळे मुसलमानांनी त्या भूमिकेवर यावे, आणि आपण मात्र जुन्याच पातळीवर राहावे, असे ते उघडपणे सांगू शकत नव्हते. म्हणजे एका अर्थाने ती हिंदू प्रतिगामी यांच्यातीलच सौदेबाजी होती. गांधी-नेहरू किंवा बादशाहखान, युसूफ मेहरेअली यांच्यासारखे काही उदारमनाचे व बुद्धिवादी लोक सोडले तर दोन्ही बाजूंना परंपरेच्या गर्तेत रुतलेलेच लोक होते. अशा स्थितीत गांधी-नेहरूंनी बुद्धिवादी मुसलमानांशी समझोता करण्याचा प्रयत्न केला असता तरी तो तात्त्विक पातळीवरच राहिला असता. प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा काही उपयोग झाला नसता. मुस्लिम समाजाला ब्रिटिश सरकारच्या प्रभावाखालून बाहेर काढून स्वातंत्र्यसंग्रामात सामील होण्याची प्रेरणा देण्याचा जो उद्देश भारतातील राष्ट्रीय नेत्यांसमोर होता त्यामुळे त्यांना या मार्गाने जाऊन कितपत यश आले असते याविषयी शंका वाटते. म्हणजे शेवटी या साऱ्या प्रकरणात परिस्थितीचे दडपण हाच मोठा भाग ठरतो. त्यावेळच्या परिस्थितीत गांधीजींना त्यांनी जे केले त्यापेक्षा वेगळे काही करणेच शक्य नव्हते, असे जे लोक म्हणतात, त्यांच्या त्या म्हणण्यातील तथ्य एवढ्या मर्यादित अर्थाने खरे मानावे लागते. तिसरे कारण असे की, या जातीय त्रिकोणातील तिसरी बाजू, म्हणजे ब्रिटिश सरकारची बाजू फार भक्कम होती. किंबहुना तिच्या पायावरच तो आधारलेला होता. देशातील राष्ट्रीय पुढाऱ्यांनी मुस्लिम बुद्धिवंतांना ऐक्याचे आवाहन करून स्वातंत्र्ययुद्धात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला असता तरी त्यात त्यांना फारसे यश मिळाले नसते. कारण मुसलमानांना वाटेल ते प्रलोभन दाखविण्याचे ब्रिटिशांचे सामर्थ्य फार मोठे होते. त्यांच्या जोरावर ते बुद्धिजीवी मुसलमानांना आपले गुलाम करू शकत होते. किंबहुना त्यांनी तसे केलेच होते. एका अर्थाने जिना आणि त्यांची मुस्लिम लीग हे ब्रिटिशांचे हस्तक होते. ब्रिटिशांनी कळसूत्री बाहुल्याप्रमाणे त्यांना नाचविले नाही काय? तेव्हा बुद्धिजीवी मुसलमानांशी समझोता करणे राष्ट्रवादी पुढाऱ्यांना शक्य झाले नसते असेच म्हणावे लागते.
मनधरणी नको होती
येथे असा प्रश्न उपस्थित होतो की, बुद्धिजीवी वर्गाला राष्ट्रीय लढ्यात सामील करून घेणे शक्य नाही. हे स्पष्टच झाल्यानंतर राष्ट्रवादी पुढाऱ्यांनी किंवा गांधींनी काय करावयास हवे होते? मला वाटते, कोणत्याही जाती-जमातीची मनधरणी करण्याऐवजी एक निश्चित कार्यक्रम हाती घेऊन गांधीजी पुढे जात राहिले असते तर मनधरणीचा वापर करून त्यांना जेवढे मुसलमान अनुयायी मिळाले, तेवढेच अनुयायी स्वयंप्रेरणेने त्यांच्या भोवती गोळा झाले असते. आणि ते कोणत्याही प्रलोभनाने आलेले नसल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास अथवा आशाभंग झाला नसता आणि पहिल्या प्रकारच्या प्रतिगामी व जात्यंध मुसलमानांप्रमाणे त्यांना मध्येच सोडून निघून न जाता शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिले असते. कारण ते दुसऱ्या कोणत्याही प्रलोभनाने आलेले नव्हते.
परंतु या संदर्भात आणखी एक मुद्दा विचार करण्यासारखा आहे. ज्यांना विशिष्ट कार्यासाठी लोकसंग्रह करावयाचा असतो असे सर्वच लोक या ना त्या रूपात लोकानुनय करीत आले आहेत. या बाबतीत गांधीजींनी स्वत: एके ठिकाणी असे उद्गार काढले आहेत की, “अनुनयाचे धोरण नेहमीच वाईट असते असे नाही. काही काही वेळा ते कर्तव्य होऊन बसते.” - (‘हरिजन’ – ९-११-१९४७), या दृष्टीने पाहिल्यास गांधीजींनी मुसलमानांचा केलेला अनुनय क्षम्य समजता येईल; परंतु त्याची निष्पत्ती पाहिल्यानंतर मात्र असे म्हणावे लागते की, त्यांचा तो प्रयोग फसला. त्यांनी अनुनय केला नसता तर बरे झाले असते, निदान परिस्थिती अधिकच बिकट तर नक्कीच झाली नसती.
गांधीजींचा धार्मिक मन:पिंड
असे घडले नाही, याचे मुख्य कारण गांधीजींचा मन:पिंड धार्मिक होता, हे होय. ते भोळसट धर्मनिष्ठ नव्हते, राजकारणाचे डावपेच त्यांना कळत होते. प्रसंगानुरोधाने ते त्यांचा वापरही करीत असत. हे खरे असले तरी त्यांच्या कार्याची प्रेरणा धर्म हीच होती. त्यांचा धर्म खूप विशाल, व्यापक सर्वसमावेशक होता. किंबहुना तो ‘सेक्युलर’च होता, त्याचे कर्मकांडाशी काही नाते नव्हते, त्यांचे खरे नाते अध्यात्माशी होते. हे सारे खरे. परंतु धर्माला वगळून ते विचार किंवा आचार करू शकत नव्हते ही त्यांची मर्यादा आपण ओळखली पाहिजे. आपल्या भूमिकेवरूनच ते सर्व जातीजमातींकडे पाहात. त्याचा त्यांना, भारतीय राष्ट्रवादाला व स्वातंत्र्यसंग्रामाला भरपूर उपयोगही झाला. धर्मलिप्त बहुजन समाजाला त्यांची भाषा कळली, ते आपल्यातलेच आहेत असे त्याला वाटले आणि तो त्यांच्या मागे फार मोठ्या संख्येने आला. भारतीय जनतेला भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करविण्याची, तोपर्यंत कोणालाही शक्य न झालेली अद्भुत कामगिरी त्यांनी करून दाखविली. त्यांच्या त्या यशाचे बरचसे श्रेय त्यांच्या धार्मिकतेला, आध्यात्मिक भाषेला द्यावे लागेल. अशा स्थितीत मुसलमानांना आवाहन करताना त्यांनी धर्माचा आधार घेणे कसे शक्य होते? एकाच वेळी दोन भूमिका त्यांना वठविता आल्याच नसत्या. धार्मिक भूमिका घेतल्यामुळे मुसलमानांना ते काही गोष्टी स्पष्टपणे सांगू शकले, हेही मान्य करावे लागेल. उदाहरणार्थ स्वामी श्रद्धांनंदजींची हत्या एका मुसलमानाने केल्यानंतर सारा हिंदू समाज मुसलमानांवर संतप्त झाला असताना एकीकडे ते हिंदूना असे सांगून शांत करीत होते की, “हिंदू क्रोधाला वश झाले तर ते हिंदू धर्माला काळिमा फासतील आणि होऊ घातलेले हिंदू-मुस्लिम ऐक्य लांबणीवर टाकतील. उलट त्यांनी संयम पाळला तर उपनिषदांच्या व क्षमामूर्ती असलेल्या युधिष्ठिराच्या संदेशास आपण पात्र आहोत, असे ते सिद्ध करतील, एका व्यक्तीचा अपराध सर्व जमातीला आपण लागू करू नये. तसेच आपण आपल्या चित्तांत सूडबुद्धी बाळगू नये. एका मुसलमानाने एका हिंदूवर अन्याय केला असे न मानता, एका प्रमादशील बंधूने एका वीरावर अन्याय केला, असे आपण समजले पाहिजे.”- (यंग इंडिया, ३०/१२/१९२६)
परंतु त्याच वेळी मुसलमानांनाही सत्याची जाणीव करून देण्यास ते मागेपुढे पाहात नव्हते. कारण त्याच अंकात ते म्हणतात- “मुसलमान लोक सुरे व पिस्तुले यांचा वापर सढळपणे करीत असतात, यात शंका नाही. समशेर ही काही इस्लामची खूण नव्हे. पण इस्लाम अशा परिस्थितीत जन्माला आला की तेथे सर्वश्रेष्ठ कायदा समशेरीचा होता आणि तो अजूनही आहे. येशूचा संदेश फोल ठरला. याचे कारण तो ग्रहण करण्याला परिस्थिती परिपक्व झालेली नव्हती. पैगंबराच्या संदेशाचेही असेच झाले. अजूनही मुसलमानांमध्ये समशेर फार चमकताना दिसते. इस्लाम म्हणजे शांतता, हे जर खरे ठरावयाचे असेल तर ती समशेर त्यांनी म्यान केली पाहिजे.” - (यंग इंडिया, ३०/१२/१९२६)
अर्थांत त्यांचा हा सारा उपदेश म्हणजे अरण्यरुदनच ठरले, आणि येशू व पैगंबर यांच्या संदेशाची जी गत झाली तीच त्यांच्याही संदेशाची झाली. संदेश देणाऱ्या प्रेषिताला परिस्थितीची अपरिपक्वता कळत नसावी असाच निष्कर्ष यावरून निघतो!
मुसलमानांची अडचण
या ठिकाणी मुसलमानांच्या एका मानसिक अडचणीचाही आपण विचार केला पाहिजे. इस्लाम हा भूमीशी, मातीशी निष्ठा बाळगणारा धर्म नाही. त्याची निष्ठा फक्त कुराणावर आणि मक्केवर असते. त्यामुळे कोणत्याही भूमीवर तो सर्वस्व पणाला लावून प्रेम करू शकत नाही. मुसलमान भारताला आपली मातृभूमी मानीत असते तर तिच्या विच्छेदनाला ते कदापि तयार झाले नसते. हा विचार अधूनमधून गांधीजींनाही सतावीत असावा असे दिसते. एके ठिकाणी ते म्हणतात, “पाकिस्तानाचे धोरण काहीही असो, भारत हा हिंदू, मुसलमान, शीख, पारशी, ख्रिस्ती वगैरे लोकांचे आश्रयस्थान पूर्वी होता आणि पुढेही तसाच राहील. जे जे म्हणून भारताला आपली मातृभूमी मानतात ते सारे भारतीय होत, आणि त्या सर्वांना नागरिकत्वाचे समान हक्क आहेत.” - (‘हरिजन’, २७/७/१९३७)
“देशाच्या राजकारणात मुसलमान लोक कमी लक्ष घालतात, याचे कारण ते अजून हिंदुस्थानाला आपली मायभूमी मानीत नाहीत. आणि तिच्याविषयी अभिमान बाळगीत नाहीत. आपण विजेत्यांचे वंशज आहोत, असे ते स्वत:विषयी समजतात. पण ते अगदी चूक आहे, असे मला वाटते.”- (‘हरिजन’, २/२/१९४७) मुसलमानांची ही अडचण म्हणा किंवा उणीव म्हणा, गांधीजींना समजत असली तरी ती दूर करण्याचे सामर्थ्य मात्र त्यांच्यात नव्हते. ते कार्य एखाद्या मुसलमान नेत्यालाच करता आले असते. परंतु त्यांच्या नेत्याने त्याच्या बरोबर उलट भूमिका घेऊन मुसलमानांमध्ये भारताविषयी परकेपणाची भावनाच वाढविली.
अपयशाची जाणीव
भारतीय स्वातंत्र्याचा लढा जसजसा उग्र बनत चालला तसतशी गांधीजींना हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या बाबतीतील आपल्या अपयशाची जाणीव तीव्रतेने होऊ लागली. १९४२च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या आधी या अपयशाची खंत त्यांना विशेषकरून जाणवू लागली. २१/६/१९४२ च्या ‘हरिजन’ मध्ये ते लिहितात- “हिंदू मुसलमानांच्या ऐक्याचा मी एक फार जुना भोक्ता आहे, आणि आजही मी तसाच आहे. माझ्यासह अनेक लोकांनी ते ऐक्य प्रस्थापित करण्याचे जे प्रयत्न मनोभावे केले, ते सारेच्या सारे फसले. अगदी पूर्णपणे फसले. असे का व्हावे, असा प्रश्न मी स्वत:लाच विचारतो. मुसलमान समाजातील माझी प्रतिष्ठा पार ढासळली आहे. आणि काही मुस्लिम वृत्तपत्ये तर मला ‘भारतातील इस्लामचा सर्वांत मोठा शत्रू’ म्हणून संबोधतात. या गोष्टीची जबाबदारी मी तिसऱ्या शक्तीवर, ब्रिटिश सत्तेवर टाकतो. तिच्या मनात असो वा नसो, हिंदू-मुसलमानांचे ऐक्य ती घडू देणार नाही. म्हणून मी नाइलाजाने असा निष्कर्ष काढतो की, भारतातून ब्रिटिश सत्तेचा अंत जेव्हा कायमचा होईल, तेव्हा या दोन्ही जमाती एकत्र येतील.”
परंतु गांधीजींचं हे भाकीतही साफ खोटं ठरलं. ब्रिटिश सत्ता येथून नाहीशी झाल्यानंतरही हिंदू व मुसलमान यांच्यातील अंतर मुळीच कमी झाले नाही. एवढेच नव्हे तर त्या प्रश्नापायी गांधीजींना जे बलिदान करावे लागले त्याचाही परिणाम फार अल्पकाळ टिकला आणि आज पुन: एकदा फाळणीपूर्व परिस्थितीसारखी स्थिती निर्माण होईल की काय अशी भीती वाटू लागली आहे. केरळमध्ये मुसलमानांनी एक लहानसे पाकिस्तान आपल्या कूटनीतीच्या जोरावर जवळजवळ पदरात पाडून घेतल्यासारखेच आहे. इतरत्रही अशीच पाकिस्ताने निर्माण करण्याची खटपट केली जात आहे. त्याकरिता डावे साम्यवादी, अस्पृश्य, ख्रिस्ती, आदिवासी यांपैकी ज्या कोणाचा उपयोग होण्याची शक्यता दिसेल त्यांना हाताशी धरण्याची तयारी मुस्लिम जातीयवाद्यांनी चालविली आहे. त्याचे जे काही परिणाम होतील त्याची जबाबदारी तिसऱ्या शक्तीवर टाकण्यासाठी ब्रिटिशसत्ता मात्र आपल्याजवळ असणार नाही; ती जबाबदारी आपल्यालाच आपल्या शिरावर घ्यावी लागेल.
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
गांधीजींच्या अपयशापासून घ्यावयाचा धडा
गांधीजींनी आपल्या अपयशाची कबुली दिली खरी, परंतु आपले मूल्यमापन चुकले किंवा आपला मार्ग बदलला पाहिजे, असे मात्र त्यांना शेवटपर्यंत वाटले नाही. ‘हिंदू-मुसलमानांचा प्रश्न कसा हाताळावा?’ या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जे स्पष्टीकरण दिले त्यावरून त्यांची ही भूमिका स्पष्ट दिसून येते. ते म्हणतात - “त्या बाबतीत मला माझा पराभव कबूल केला पाहिजे. सध्या माझे बोलणे हे अरण्यरुदन आहे, मी जाणतो. तरी तो प्रश्न सोडविण्याचा माझा मार्ग व्यवहार्य आहे, असा माझा दावा आहे. एखाद्या विशिष्ट जमातीच्या काही लोकांनी अमानुष कृत्ये केली म्हणून त्या सर्व जातीचा सर्रास धिक्कार करावा आणि त्या जातीला आपल्यातून बाहेर ठेवावे हे मला कधीच मान्य होणार नाही. मुस्लिम लीग हिंदूंना शिव्या देऊन हिंदुस्थान हे ‘दारुल हर्ब’* (पापभूमी) आहे असे म्हणेल! आणि तेथे ‘जिहाद’ (धर्मयुद्ध) चालू आहे. म्हणून काँग्रेसशी सहकार्य करणारे सारे मुसलमान पंचस्तंभी आहेत, समूळ नाश करण्याच्या लायकीचे आहेत असेही ती म्हणेल. अशी बेफाम बडबड चालू असली तरी साऱ्या मुसलमानांना मित्र बनविण्याची व आपल्या प्रेमाने त्यांना वश करून घेण्याची आकांक्षा आपण सोडता कामा नये....” (‘हरिजन’, ६-१०-१९४६)
आज भारतातील मुस्लिम जातीयवादी संघटना पुन्हा असाच प्रचार करू लागल्या आहेत आणि त्यांना पाकिस्तानाकडून वृत्तपत्रे व रेडिओ यांच्याद्वारे दररोज चिथावणी दिली जात आहे. अशा वेळी आपण कोणता मार्ग स्वीकारावयाचा? जो मार्ग गांधीजींनाही पेलला नाही, तो त्यांच्यापेक्षा लाखपटीनी दुर्बल असलेल्या समाजाला पेलेल, असे समजणे म्हणजे कल्पनासाम्राज्यात विहार करणे होय. तेव्हा तो फसलेला मार्ग सोडून देऊन आपण अधिक व्यावहारिक मार्ग चोखाळला पाहिजे. या देशाची राज्यघटना धर्मनिरपेक्ष असेल, येथे कोणीही व्यक्तीवर ती अमुक जातीची किंवा धर्माची आहे म्हणून अन्याय केला जाणार नाही, हे जितके खरे, तितकेच जर कोणी फुटीरपणाची भावना वाढवीत असेल, आपला सवतासुभा स्थापू पहात असेल तर त्याचीही गय केली जाणार नाही, हे आपण साफ व निक्षून सांगितले पाहिजे. ज्यांना भारत ही पापभूमी वाटत असेल त्यांनी वाटेल त्या पुण्यभूमीत निघून जावे. त्यांना कोणी अडवू नये. परंतु या पापभूमीचे त्यांच्या कल्पनेतील पुण्यभूमीत रूपांतर करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू दिले जाणार नाहीत, हे आपण त्यांना खंबीरपणे बजावले पाहिजे. अर्थात या देशातील अल्पसंख्य समाज या देशाचे नागरिकच आहेत. त्यांच्या अडचणी समजावून घेऊन दूर करणे हे या देशाच्या राज्यकर्त्यांचे कर्तव्यच आहे. अट एवढीच की त्याअडचणी खऱ्या असाव्यात. खोट्या, कांगावखोरपणा करण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या नसाव्यात.
.............................................................................................................................................
* जेथील राज्यकर्ते बिगर मुस्लिम (काफिर) असून आपल्या मुस्लिम प्रजेला धर्मस्वातंत्र्र देत नाहीत त्या देशाला ‘दार-उल्-हर्ब’ असे म्हणतात. अशा देशाविरुद्ध मुसलमान ‘जिहाद’ (धर्मयुद्ध) पुकारू शकतात.
.............................................................................................................................................
(‘गांधी नावाचे महात्मा’ या रॉय किणीकर संपादित आणि डायमंड पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित (२०१२) पुस्तकातील दीर्घ लेख संपादित स्वरूपात साभार.)
.............................................................................................................................................
गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_list
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 04 October 2017
नमस्कार! या लेखात एक गोष्ट चर्चेस आली नाही. ती म्हणजे गांधी ब्रिटीशांचा चमचा होता. त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतल्या हालचाली बघितल्या की लगेच कळून येतं. आंबेडकरांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत Gandhi is just a media mahatma असा स्पष्ट उल्लेख केला आहे. तर 'मीडिया महात्मा' म्हणजे 'इंग्रजी मीडियाचा महात्मा'. याचाच सोप्या भाषेत 'ब्रिटीशांचा चमचा' असा अर्थ होतो असो. लेखातली काही गृहितकं पटली नाहीत. पहिलं म्हणजे तत्कालीन हिंदू सनातनी होता. त्याच्या पुष्ट्यर्थ त पूजाअर्चा, जानवं, स्नानसंध्या, इत्यादि उल्लेख केले आहेत. ही सारी ब्राह्मण मनुष्यांची लक्षणे आहेत. सर्वसामान्य हिंदू या गोष्टी करंत नाही. कट्टर मुस्लिम देशतोड्या आहे म्हणून कट्टर हिंदू देशतोड्या होत नसतो. जरी कट्टरता वाईट असली तरीही कट्टर हिंदू भारतास कधीच खंडित करणार नाही. दुसरं खटकलेलं गृहीतक म्हणजे हिंदू सदासर्वदा भित्रा व बावळट राहिला आहे. लेखकास नेताजी सुभाषांचा पराक्रम ठाऊक आहे का, असा प्रश्न पडतो. असो. काही निसटलेले मुद्दे : १. गांधींनी कोणतंही आंदोलन यशस्वीपणे चालवलं नव्हतं. त्यांच्या चळवळींची फलनिष्पत्ती शून्य वा अत्यल्प असे. २. गांधींनी पाकिस्तानास ५५ कोटी रुपये देण्यासाठी उपोषण केलं. यास टेररिस्ट फायनान्सिंग म्हणतात. ३. गांधींना नको तिकडे हातपाय घालायची खाज होती. खिलाफतीत उगीच लक्ष घातलं आणि मुस्लिमांचे मसीहा आहोत असा आव आणला. तुर्कस्थानात खिलाफत मोडीत काढून त्याजागी लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या मुस्तफा कमाल पाशाने ब्रिटीशांचा चमचा अशा उघड शब्दांत गांधींना फुटवलं (इ.स. १९२१ च्या आसपास). पुढे दहा एक वर्षांनी हैदराबादेच्या निजामाची ओथमन सम्राटाशी गाठ घालून देण्यात मध्यस्थाची भूमिका बजावली. याच वेळेस सम्राटाने आपल्याकडच्या दोन मुली हैदराबादेच्या निजामास सून म्हणून दिल्या. हा व्यवहार गांधींच्या मध्यस्थीने पार पडला. यावरून गांधींना ओथमन साम्राज्याची काळजी कशाला पडली होती याचं उत्तर मिळतं. हा नसता चोंबडेपणा करायला कोणी सांगितला होता गांधींना ! असो, प्रतिसाद बराच लांबला. गांधींच्या चाळ्यांवर लिहायचं झालं तर मेगाबायटी खर्ची पडतील. तेव्हा आवरतं घेतो. आपला नम्र, -गामा पैलवान