अजूनकाही
बरोबर ६६ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी महात्मा गांधींची हत्या झाली. देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात गांधीजींचे विरोधक अनेक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून कम्युनिस्ट नेते कॉम्रेड बी. टी. रणदिवे यांच्यापर्यंत; आणि श्रीगुरुजी गोळवलकर यांच्यापासून ते एम. एन. रॉय यांच्या पठडीतील सर्व मराठी विचारवंतांपर्यंत; आणि स्वा. सावरकरांपासून ते अगदी नामवंत मराठी साहित्यिक-कवींपर्यंत. परंतु गांधी हत्येमुळे ज्यांना आनंद होईल, असे विरोधक फारच कमी होते. गांधीजींचे देशातच नव्हे तर जगभर असलेले अनुयायी, समर्थक आणि चाहते यांची संख्या कोट्यवधी होती. प्रत्यक्ष गांधीजींच्या विचारानुसार जीवनशैली असलेले, त्यांच्या सत्याग्रही भूमिकेनुसार व्यवहार करणारे आणि सूतकताई करून खादी वापरणारे अगदीच कमी होते. शाकाहार, दारूबंदी, साधी राहणी असलेले काँग्रेसवाले तर त्याहूनही कमी. म्हणजेच गांधीजींचा प्रभाव असलेले असंख्य; परंतु त्यांच्या विचारांचे अनुकरण करणारे मात्र नगण्य. हा अंतर्विरोध कायम आहे! आता तर देशातील वातावरण ‘मुंह में राम, बगल में नथुराम’ असे आहे. गांधीजींचे मारेकरी आपल्यातच आहेत-आजही! त्यांच्यात अलौकिक असे काय होते, की मृत्यूनंतर ६६ वर्षे झाली तरी त्यांच्या नावातील महिमा टिकून आहे? अनेक पुढारी आले आणि गेले; परंतु कोणीही गांधीजींसारखा ठसा आधुनिक इतिहासाच्या मानसिकतेवर इतक्या ठळकपणे उमटवू शकलेले नाही.
आज वयाच्या विशीत वा तिशीत असलेल्यांच्या दृष्टिकोनातून तर गांधीजी कितीतरी दूर... अगदी प्राचीन वाटावे इतके. कारण गेल्या पन्नास वर्षांत जग किती वेगाने बदलले आहे! जीवनशैली, राजकारणाचा एकूण माहोल, दैनंदिन व्यवहारातील मूल्यव्यवस्था, इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि अर्थातच माध्यमसृष्टी. गांधीजींच्या नावाची अपूर्व जादू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पोहोचलीच कशी? ‘वैष्णव जन तो तेणे कहिये जो पीड परायी जाने रे’ या गांधीजींनी लोकप्रिय केलेल्या ओळी नरसी मेहतांच्या. गांधीजींनी ओजस्वी क्रांतिकाव्य लिहिले नाही की, भावना भडकवणारी भाषणे केली नाहीत. खरे म्हणजे, गांधीजी ‘वक्ते’ नव्हतेच! अतिशय संथ, आवाज न चढू देता, कोणताही कठोर शब्द न उच्चारता, विनोद वा उपहास यांचा आधार न घेता, कोणावरही घणाघाती टीका न करता मायक्रोफोनसमोर बसून ते भाषण देत.
गांधीजी प्रचलित अर्थाने ‘इंटलेक्चुअल’ नव्हते. ते उठसूट वेद किंवा प्लेटो-अॅरिस्टॉटल, मार्क्स किंवा फ्रॉइड उदधृत करीत नसत. ते तडाखेबंद वाद घालत नसत. आपलेच म्हणणे खरे करण्यासाठी पुराव्यांच्या चवडीच्या चवडी सादर करीत नसत. दुसऱ्याचा मुद्दा वा धोरण खोडून काढण्यासाठी इरेस पडत नसत. काँग्रेस कार्यकारिणीत अनेक वेळा तीव्र मतभेद होत. गांधीजी त्यांना काय वाटते ते सांगत. बराच वेळ खल करूनही काहीही ठरले नाही की ते ‘आता बकरीचे दूध काढायची वेळ झाली’ असे म्हणून उठत. श्रीमंत होऊन ऐषारामी जीवन जगणे त्यांना सहज शक्य होते. त्यांनी ते सर्व सोडून दिले. १९१५ नंतर काँग्रेसमध्ये आलेल्या अनेक मध्यमवर्गीय-सवर्ण-सुशिक्षितांचे प्रेरणास्थान गांधीजीच होते. परंतु मुख्य म्हणजे, पुढारी मंडळींपैकी कोणालाच ग्रामीण-गरीब भारत माहीत नव्हता. गोपाळ कृष्ण गोखले यांनी गांधीजींना प्रथम सबंध भारताची ओळख करून घ्यायला सांगितली होती. गांधीजींनी रेल्वेने, तिसऱ्या वर्गाने प्रवास करून, आपल्या विशाल देशाची तोंडओळख करून घेतली. परंतु ग्रामीण भारताचा रोजचा परिचय असलेले कितीतरी जण होते. त्यांच्यातून कोणी गांधी कसे झाले नाही? त्यामुळे भारतदौरा करून देशातील लोकांचे मानस कळेल वा महात्मा होता येईल, असे अजिबात नव्हे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वार्ताहराने गांधीजींना विचारले की, ‘तुम्हाला महात्मा का म्हणतात? तुम्हाला त्यामुळे संकोचल्यासारखे होत नाही का?’ गांधीजी म्हणाले, ‘मी तुम्हालाही महात्मा म्हणायला तयार आहे... आपण सर्वच महात्मे आहोत... पण मी तुम्हाला महात्मा म्हटले तर तुम्ही संकोचून जाल... मला संकोच वाटत नाही, कारण मला ते माझे विशेषण वाटतच नाही.’ गांधीजींच्या अगोदर ‘महात्मा’ ही उपाधी जोतिबा फुले यांना लोकांनी दिली होती. त्या दृष्टिकोनातून गांधीजी हे दुसरे महात्मा! परंतु गांधीजींच्या माहात्म्यात असे काय होते वा आहे, की ज्याची संमोहिनी आइन्स्टाइनपासून रिचर्ड अॅटेनबरापर्यंत, रवींद्रनाथ टागोरांपासून विनोबा भाव्यांपर्यंत, मार्टिन ल्यूथर किंगपासून नेल्सन मंडेलांपर्यंत सर्वांवर पडावी. सर्वांचा आदर्श महात्मा गांधी का? जगप्रसिद्ध तंत्रज्ञ सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या ‘एकविसाव्या शतकात भारत नेण्याच्या’ ‘अॅक्शन इंडिया’ चळवळीचा शुभारंभ गांधीजींच्या साबरमती आश्रमातून केला. पित्रोदांनाही गांधीजींचे आकर्षण का? ते अस्सल अनिवासी भारतीय आहेत.
क्लिक करा - http://www.booksnama.com
.............................................................................................................................................
गेली ३५ वर्षे ते शिकागोत आहेत. त्यांना अमेरिकेतील सर्व सुखसोयी सहज उपलब्ध आहेत. मग त्यांना भारतात येऊन मलेरिया उच्चाटन करण्यासाठी, साक्षरता व शिक्षण प्रसार करण्यासाठी, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि माहिती-क्रांतीच्या सर्जनशीलतेचा प्रसार करण्यासाठी गांधीजींचे बोट धरून का जावेसे वाटते? जगप्रसिद्ध नृत्यकलाकार चंद्रलेखा असो वा गडचिरोलीचे अभय बंग असोत, सर्वांनाच गांधीजी हे आजही- शतक संपत असताना- प्रेरणास्थान का वाटते? पोरबंदरसारख्या त्या वेळच्या एका सामान्य गावात, मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात १८६९मध्ये जन्माला आलेल्या, वैष्णव पंथाचा आणि जैन धर्माचा प्रभाव असलेल्या वातावरणात वाढलेल्या, फाटक्या अंगाच्या एका मुलाने अवघ्या विसाव्या शतकावर इतका प्रभाव टाकावा, हे गूढ नाहीतर काय? गांधीजी जेव्हा अहिंसा, सत्याग्रह, उपोषण, चरखा, सूतकताई, पंचा, आश्रम, रुग्णसेवा, साफसफाई करण्याचा झाडू, दारूबंदी, रुग्णसेवा, मौनव्रत, शाकाहार, पदयात्रा, ब्रह्मचर्य आणि नरसी मेहतांचे अभंग या संकल्पना व प्रतीकांची आयुधे घेऊन स्वातंत्र्यलढ्याच्या रणांगणावर येऊन उभे राहिले, तेव्हा जगात वाढता प्रभाव होता मार्क्स-लेनिन आणि स्टॅलिनवादाचा; त्याचप्रमाणे नाझीवादाचा आणि हिटलरचा; सशस्त्र लढ्याचा आणि दहशतवादाचा. भारतात सावरकर, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांच्या सशस्त्र बाण्याचाही दबदबा होता. बॉम्ब बनवणारे, रेल्वेगाड्या उडवून देणारे, बँकांवर दरोडे घालणारे, इंग्रज अधिकाऱ्यांना गोळ्या घालणारे लहान-मोठे गटही तरुण मनांना आकर्षित करत असत. या क्रुद्ध आणि विद्ध वातावरणात गांधीजींमधले महात्मापण उजळून निघाले होते. म्हणूनच गांधीजींच्या हत्येनंतर आपली प्रतिक्रिया देताना आइन्स्टाइन म्हणाले होते की, या भूतलावर असा एक माणूस होऊन गेला, असे पुढील पिढ्यांना कुणी सांगितले; तर त्यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही!
(हा लेख ३० जानेवारी २०१४ रोजी दै. दिव्य मराठीचे संपादकीय म्हणून प्रकाशित झाला होता.)
लेखक कुमार केतकर ज्येष्ठ पत्रकार-संपादक आहेत.
tusharmhatre1@gmail.com
.............................................................................................................................................
गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_list
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Shashank
Sun , 25 February 2018
Waah Kay lekh ahe... mhanun Mahatma Gandhi he Mahatma ahet