मी आणि गांधीजी
सदर - गांधी @ १५०
उत्पल व. बा.
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 02 October 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram

गेले काही दिवस तरुण लेखक-पत्रकार उत्पल व.बा. ‘मी आणि गांधीजी’ ही संवादमालिका फेसबुकवर लिहीत आहे. आज गांधी असते तर आजच्या काळाच्या एखाद्या प्रतिनिधीशी समकालीन विषयांवर त्यांचा संवाद कसा झाला असता, त्यांनी काय भूमिका घेतली असती, हे थोडं हलक्याफुलक्या शैलीत उत्पलला शोधावंसं वाटलं आणि त्यातून या संवादमालिकेचा जन्म झाला. ही संपूर्ण संवादमालिका...

.............................................................................................................................................

 १.

मी : फार बोअर होतंय 
गांधीजी : फेसबुक आहे की. पुस्तकं आहेत. मोदी आहेत. राम रहीम आहे. डावी-उजवी वादावादी आहे. केवढं तरी आहे. काँग्रेससुद्धा आहे अजून.
मी : तरी आतून बोअर होतंय ना. 
गांधीजी : बरं, मग चरखा चालवून बघ. निर्मितीचं समाधान मिळेल. किंवा त्या मोबाइलशी खेळत असतोस तो मोबाइल चालतो कसा याचा अभ्यास कर. 
मी : समाधानाचं काय करायचं?
गांधीजी : म्हणजे रे?
मी : समाधानसुद्धा बोअर झालं तर?
गांधीजी : तुम्हाला समाधानसुद्धा बोअर होतं?
मी : होऊ शकतं. कालांतराने. 
गांधीजी : ओके. म्हणजे खरं तर तुला बोअर होत नाहीये. 
मी : म्हणजे?
गांधीजी : अरे, बोअर माणसाला बोअर कसं होईल? हे म्हणजे माशाने पोहावंसं वाटतंय म्हणण्यासारखं आहे.

२.

मी : काय हो? २०१९ सालची लोकसभा निवडणूक कोण जिंकेल असं वाटतं?
गांधीजी : माहीत नाही. 
मी : असं कसं? अंदाजसुद्धा नाही?
गांधीजी : मी विश्लेषक नाही, त्यामुळे... 
मी : कायतरीच. अहो प्रत्येक माणूस हा क्षणांचा लूझर आणि अनंतकाळचा अ‍ॅनॅलायझर असतो 
गांधीजी : असेल असेल. 
मी : तुम्हाला त्रास होत नाही आपण विश्लेषक नसल्याचा? आपल्याला मत नसल्याचा?
गांधीजी : नाही बुवा. 
मी : कसं काय? 
गांधीजी : कारण मी तुझ्यासारखा विश्लेषक नाही. बरं, दुधी भोपळ्याचा रस काढायचा आहे. इंटरेस्टिंग काम असतं. येतोस का?
मी : नको, तुम्हीच जा. 
गांधीजी : ठीक आहे.

३.

मी : बेस्ट पाऊस पडतोय. रोमँटिकली कांदा-भजी खावीशी वाटतायत. 
गांधीजी : खा की मग. 
मी : करायचा कंटाळा आलाय. 
गांधीजी : बरं, मग खाऊ नको. 
मी : असं कसं लगेच टोकाला जाता हो तुम्ही?
गांधीजी : का? काय झालं?
मी : लगेच 'खाऊ नको' काय? 'बाहेरून घेऊन ये' म्हणायचं. 
गांधीजी : ओके ओके. बरं बाहेरून घेऊन ये. 
मी : पुन्हा टोकाला. 
गांधीजी : अरे, तूच म्हणालास ना, म्हणून म्हटलं. बरं चल, मी करून देतो. 
मी : नको. तुम्ही मिळमिळीत कराल. 
गांधीजी : बरं. अरे, पण अशा प्रवृत्तीने तुला भजी कशी मिळणार?
मी : हं...भज्यांचं काय हो एवढं....तळणारं कुणी असेल तर भज्यांना अर्थ आहे...कुणी तळणारच नसेल तर कांदासुद्धा व्यर्थ आहे. 
गांधीजी : काय होतंय?
मी : तुम्हाला नाही कळणार. हा माणूस आणि भज्यांमधला जुना संघर्ष आहे. 
गांधीजी : असू दे, असू दे. मला वाटायचं की, संघर्ष सत्य आणि असत्यामध्ये असतो. बरं, प्रार्थनेची वेळ होईलच आता. येणार का?
मी : नको. प्रार्थना मला सूट होत नाही. 
गांधीजी : बरं.

४.

मी : भक्त पेटलेत. 
गांधीजी : कोण? काय झालेत?
मी : अहो भक्त... 
गांधीजी : कुणाचे?
मी : अहो, असं काय करता...मोदींचे... 
गांधीजी : अच्छा...नरेंद्र मोदींच्या समर्थकांना भक्त म्हणतात का?
मी : हो. 
गांधीजी : अरे, पण कुणालाही असं हिणवायचं कशासाठी?
मी : कमाल करता...अहो हा सर्वमान्य शब्द आहे आज. आणि भक्त आहेतच ते. त्यांना तर्कबिर्क काही कळत नाही. 
गांधीजी : अच्छा. आणि तुला तर्क कळतो. किंवा तू करतोस तो तर्क आहे असं तुझं म्हणणं आहे. 
मी : अहो तसं नाही. पण काही गोष्टी सरळ सिम्पल असतात. त्या तरी कळायला हव्यात की नकोत?
गांधीजी : बरं. पण समजा त्यांना नाही कळत तर हिणवल्याने त्या कळतील का?
मी : नाही... 
गांधीजी : मग?
मी : अहो, पण माझा वैताग बाहेर येतो ना... 
गांधीजी : पण तू तर तार्किक आहेस ना? मग? 
मी : अहो, पण मी माणूसही आहे. आणि माणूस वैतागतो. 
गांधीजी : म्हणजे 'माणूस' जास्त आहे. 'तार्किक माणूस' त्यामानाने कमी आहे. 
मी : असं म्हणता येऊ शकेल. 
गांधीजी : मग नरेंद्र मोदींचे समर्थक कोण आहेत? 
मी : तुमच्याशी बोलण्यात अर्थ नाही. 
गांधीजी : बरं.

५.

गांधीजी : केवढा रे हा आवाज? काय चालू आहे?
मी : अहो, गणपती... 
गांधीजी : गणेशोत्सवात हे असलं सगळं चालतं? 
मी : हो. विसर्जन मिरवणूक बघा एकदा. म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळेल. 
गांधीजी : अरे, पण मग तुम्ही काही प्रबोधन करता की नाही?
मी : आम्ही निषेध वगैरे करतो. प्रबोधन करायला रस्त्यावर उतरावं लागतं आणि फेसबुकवर अजून ती सोय नाही. 
गांधीजी : सगळ्याच सार्वजनिक उत्सवात हे चालतं?
मी : बहुतांश सर्वच. 
गांधीजी : पण मग धार्मिक संघटना काय करतात?
मी : म्हणजे?
गांधीजी : अरे, हे धार्मिक उत्सव आहेत, मग धार्मिक संघटनांनी उत्सवांच्या बिघडत्या स्वरूपाबद्दल काही करायला नकॊ? त्यांच्या डोळ्यासमोर देवा-धर्माची विटंबना होतेय ते त्यांना कसं बघवतं? 
मी : तुम्ही फारच ओल्ड फॅशन्ड आहात हो. 
गांधीजी : का? काय झालं? 
मी : धार्मिक संघटना अशा गोष्टीत फार लक्ष घालत नाहीत. कारण विटंबना कोण करतं हा कळीचा मुद्दा असतो. शिवाय त्यांना धर्मसुधारणेपेक्षा इतर महत्त्वाची कामं असतात. 
गांधीजी : म्हणजे?
मी : निवडणूक वगैरे. 
गांधीजी : मग कसं रे होणार?
मी : तुम्ही फार विचार करता हो. एवढा विचार करू नये. शिवाय अतिविचार तुम्हाला देशद्रोहाकडे नेऊ शकतो.
गांधीजी : हे काय आता?
मी : तुम्हाला नाही कळणार. सोडून द्या. 
गांधीजी : बरं.

.

मी : गेम ऑफ थ्रोन्स बघणार का?
गांधीजी : काय?
मी : गेम ऑफ थ्रोन्स... 
गांधीजी : काय आहे ते?
मी : मालिका आहे एक. अमेरिकन टेलिव्हिजनवरची. 
गांधीजी : काय संदेश दिलाय त्यात?
मी : संदेश? संदेशबिंदेश काही नाही हो. एक कल्पित आणि रंजक कथा आहे. सॉलिड थ्रिलिंग आहे... अगदी एंडलेस थ्रिल! 
गांधीजी : मग नको. 
मी : का?
गांधीजी : एंडलेस थ्रिलचं बिल फार जास्त असतं. 
मी : म्हणजे?
गांधीजी : एकदा सायंप्रार्थनेला ये. मग सांगतो. 
मी : नको बाबा. मी आपला गेम ऑफ थ्रोन्स बघतो. 
गांधीजी : बरं.

७.

गांधीजी : हे शरद पोंक्षे कोण आहेत रे?
मी (भेदरून) : का? काय झालं?
गांधीजी : त्यांना मला भेटायचंय. त्यांचा निरोप आला होता.
मी : ते अभिनेते आहेत.
गांधीजी : अरे वा! कलाकार मनुष्याला भेटायला आवडेल मला. चार्ली चॅप्लिनना भेटलो होतो एकदा. फार मस्त माणूस रे...
मी : चार्ली चॅप्लिन? आणि शरद पोंक्षे? अहो, ही काय तुलना आहे का?
गांधीजी : तुलना वगैरे नाही रे. कलाकारवरून आठवलं.
मी : तुम्ही त्यांना भेटू नका.
गांधीजी : का?
मी : त्यांना तुमचे विचार मान्य नाहीत. कडवे विरोधक आहेत ते तुमचे.
गांधीजी : विरोधक असले म्हणून काय झालं? ते काय मला गोळी घालणारेत?
मी : अहो, तुम्हाला काय सांगायचं....आपल्याला ज्यांचे विचार पटत नाहीत त्यांना गोळी घालणे हाच सध्या चर्चेचा मार्ग आहे. 
गांधीजी : हं... पण आपण शरद पोंक्षेंबद्दल बोलतोय... 
मी : हो. ते गोळी नाही घालणार बहुधा, पण बोलूनच मरणाचं टॉर्चर करतील.
गांधीजी : अच्छा. पण विरोधक असून ते मला भेटायचं म्हणतात. मग मी का नको भेटू?
मी : तुमचं अवघड आहे. 
गांधीजी : 'पोंक्षेंचं अवघड आहे' असं म्हणाला असतास तर माझा हुरूप वाढला असता.

८.

मी : हां, झालं लिहून? आता 'पोस्ट'वर क्लिक करा.
गांधीजी : अच्छा...अरे वा! म्हणजे आता लोक हे वाचणार का?
मी : हो. बघा, जमलं की नाही?
गांधीजी : जमलं बुवा. चांगलंय रे हे. अभिव्यक्ती आणि माहितीची देवाणघेवाण. तीही वेगाने.
मी : हो. 
गांधीजी : अरे कुणीतरी कमेंट केली वाटतं.
मी : काय म्हणतोय?
गांधीजी : चिडलाय बहुतेक.
मी : बघू. अरे हा होय? वाटलंच मला. असाच आहे तो. ठोका त्याला.
गांधीजी : काय??
मी : आय मीन चांगलं खरमरीत उत्तर द्या.
गांधीजी : अरे कशाला?
मी : मग काय शांत बसणार?
गांधीजी : हो.
मी : का?
गांधीजी : कारण चर्चेचा नियम. 
मी : कुठला नियम?
गांधीजी : एका वेळी एकानेच चिडायचं.

९.

मी : रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नावर तुमचं काय मत आहे? 
गांधीजी : मला तो विषय नीट माहीत नाही. मुळातून बघावं लागेल. 
मी : काय???
गांधीजी : एवढं दचकायला काय झालं?
मी : अहो, काहीतरीच काय बोलता?
गांधीजी : कुठे काय बोललो?
मी : विषय माहीत नाही??
गांधीजी : हो. 
मी : असं कसं होऊ शकतं?
गांधीजी : का नाही होऊ शकत?
मी : अहो, विषय माहीत नसणं आणि त्यावर प्रतिक्रिया न देता येणं हा गुन्हा आहे. एकवेळ विषय माहीत नसू दे, पण प्रतिक्रिया देता यायला हवी. 
गांधीजी : म्हणजे? सगळ्या गोष्टींवर प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे का?
मी : नाहीतर आयुष्यात करण्यासारखं आहेच काय? प्रतिक्रिया देणं हा आजचा युगधर्म आहे. अहो, बोलायचं बेफाम. पोस्ट्स लिहायच्या. फेसबुक लाइव्ह करायचं. फक्त सेकंडरी रीसर्चच्या बळावर लोकांना मंत्रमुग्ध करायचं. अहो, काश्मीर प्रश्नावर आज चौथीतली मुलंसुद्धा बोलतात. आहात कुठे?
गांधीजी : मी? मी अजून ज्युनिअर केजीत आहे.

१०.

मी : काय हो...
गांधीजी : बोला!
मी : ही आरएसएसची भानगड काय आहे नक्की?
गांधीजी : का? काय झालं?
मी : संघातले लोक संघाचं कौतुक करताना थकत नाहीत. संघ समजून घ्यायचा असेल तर शाखेवर या म्हणतात. आता संघ समजून घ्यायचा असेल तर शाखेवर जाण्यापेक्षा मोहन भागवतांच्या अंतर्गत बैठकांना गेलं पाहिजे हे इतरांना कळत नाही असं त्यांना वाटतं. पण ते एक सोडा. दुसरीकडे संघात नसलेले किंवा संघात लहानपणी असलेले आणि नंतर विचार करू लागल्यावर बाहेर पडलेले लोक संघावर टीका करताना थकत नाहीत. म्हटलं तर संघ स्वयंसेवी संस्था, म्हटलं तर सांस्कृतिक संघटना, म्हटलं तर राजकीय संघटना, पण एकूणात संघटना म्हणून आवाका मोठा...
गांधीजी : यात दोन गोष्टी आहेत.
मी : कोणत्या?
गांधीजी : शिस्तपालन आणि मूल्यमापन. 
मी : म्हणजे?
गांधीजी : सांगतो. तू शिस्तपालन कधी करणार नाहीस.
मी : का? करू की.
गांधीजी : मग संघासारखी देशव्यापी संघटना का नाही उभी राहिली तुझी?
मी : तुम्हीच बोलायचं बाकी होतं.... यावर बरंच बोलू शकेन. पण जाऊ दे. तुम्ही बोला... 
गांधीजी : तर तू शिस्तपालन करणार नाहीस आणि संघातला मनुष्य स्वतःचं किंवा संघाचं मूल्यमापन करणार नाही. थोडक्यात तू सारखे प्रश्न विचारणार आणि ते सारखे शिस्त पाळणार. तुला बुद्धीविकास हवा, त्यांना कार्यविकास हवा. 
मी : हं..
गांधीजी : म्हणून खरं तर दोघांनी एकत्र काम करायला पाहिजे.
मी : काय??
गांधीजी : झटका बसला ना?
मी : हो.
गांधीजी : बसणारच. कारण तू मूल्यमापनवाला आहेस.

११.

मी : जरा बाजूला व्हाल का?
गांधीजी : का? अच्छा, टीव्ही अडतोय होय... 
मी : हो 
गांधीजी : जवळजवळ भांडतायत रे हे लोक 
मी : त्याला चर्चा असं म्हणतात 
गांधीजी : आणि यातून काय निष्पन्न होतं?
मी : जनमत तयार होतं अहो. 
गांधीजी : म्हणजे टीव्हीजन इतर जनांचं मत तयार करतात 
मी : हो 
गांधीजी : आणि मग इतर जन काय करतात?
मी : जनमताचं रूपांतर निवडणुकीच्या मतात करतात. 
गांधीजी : हं...आणि मग जे सरकार येईल त्याची प्रशंसा किंवा त्याच्यावर टीका करतात
मी : बरोबर. 
गांधीजी : पण जनांनी स्वतः काहीतरी करायला हवं ना?
मी : मत देतातच की!
गांधीजी : पण ते पुरेसं होत नाहीये ना? 
मी : पुरेसं कधीच काही होणार नाही. 
गांधीजी : असं कसं? सत्तेचं विकेंद्रीकरण, स्वशासन, जमिनीची सामायिक मालकी अशा गोष्टींवर काम केलं पाहिजे. माणसाच्या वृत्तीवर काम केलं पाहिजे. 
मी : ते बोअरिंग आहे हो. 
गांधीजी : मग एक्सायटिंग काय आहे? 
मी : तुम्ही पुन्हा ज्याच्या मधे येताय ते.

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

१२.

मी : वाढदिवस आला तुमचा. उद्या पार्टी करू. काय?
गांधीजी : पार्टी कधी केली नाही रे मी.
मी : अहो मग यावर्षी करा.
गांधीजी : बरं. काय करायचं?
मी : तुम्हाला खायला काय आवडतं?
गांधीजी : खाण्यात आवड-निवड असते?
मी : असते, असते!
गांधीजी : अरे, पण आपण खातो ते शरीराला इंधन म्हणून. आणि म्हणून ते सकस असलं पाहिजे. इतकं पुरेसं आहे.
मी : चवीकरतासुद्धा खातोच की.
गांधीजी : हं. पण मी इंधनवाला आहे. तुझ्या भाषेत बोअरिंग आहे मी. 
मी : अहो, चवीने खावं. त्यात काही वाईट नाही. रसिक असावं माणसाने. एकदा जरा पावभाजी वगैरे खाऊन बघाच तुम्ही. वाटल्यास इंधन म्हणून खा.
गांधीजी : चालेल. पण नंतर माझ्याबरोबर बकरीचं दूध घेणार का थोडं?
मी : मी?
गांधीजी : हो. का?
मी : बरं.
गांधीजी : निरुत्साहीच झालास की एकदम. अरे, तुला कुणी काळ्या पाण्यावर नाही पाठवत. बकरीचं दूध प्यावं. त्यात काही वाईट नाही. रसिक असावं माणसाने. एकदा जरा पिऊन बघच. वाटल्यास चव म्हणून पी.
मी : कळलं. पितो.

लेखक उत्पल व. बा. मुक्त लेखक-पत्रकार आहेत.

utpalvb@gmail.com 

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 05 October 2017

उत्पल व. बा., 'आपल्याला ज्यांचे विचार पटत नाहीत त्यांना गोळी घालणे हाच सध्या चर्चेचा मार्ग आहे', हे वाक्यं तुम्हाला कुठनं सुचलं? मला माहितीये. स्वामी श्रद्धानंदांच्या खुन्यास भाई म्हणून संबोधणारे मो.क.गांधीच होते. विचार पटत नसले की गोळी घालण्याची परंपरा कुठून सुरू झाली ते कळलं का तुम्हाला? आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......