‘हिंद स्वराज’ची पारायणे केल्याशिवाय गत्यंतर नाही
सदर - गांधी @ १५०
रामदास भटकळ
  • ‘हिंद स्वराज’चे मुखपृष्ठ
  • Mon , 02 October 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram

म. गांधींनी मूळ गुजरातीत ‘हिंद स्वराज्य’ या नावानं आणि इंग्रजीत ‘इंडियन होम रूल’ या नावानं लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद पॉप्युलर प्रकाशनाचे संस्थापक आणि अलीकडच्या काळात गांधींच्या अभ्यासात गढून गेलेले रामदास भटकळ यांनी केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन आज सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान (बापू कुटी, सेवाग्राम, जि. वर्धा) इथं होत आहे. या पुस्तकाला भटकळ यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश..

.............................................................................................................................................

१.

गांधीविचारांचा अभ्यास करणाऱ्याला ‘हिंद स्वराज’ या पुस्तकाची पारायणे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तो काही धर्मग्रंथ नाही, पण एखादी उत्कृष्ट साहित्यकृती जशी दर वाचनात वेगळी भासते, त्याचप्रमाणे हे लहानसे चिंतनात्मक पुस्तक दर वाचनात नवीन विचारांना चालना देते. मूळ गुजराती शीर्षकात ‘स्वराज्य’ शब्द वापरला असला, तरी गांधींनी जाणीवपूर्वक इंग्रजी आवृत्त्यांमध्ये ‘स्वराज’ शब्द वापरला आहे.

‘हिंद स्वराज’चे मूळ लेखन गांधींनी नोव्हेंबर १३ ते २२ दरम्यान इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेला येणाऱ्या ‘किल्डोनन कासल’ या आगबोटीवर गुजरातीत केले. ते डिसेंबर १९०९ मध्ये ‘इंडियन ओपिनियन’च्या दोन अंकांत – ११ तारखेच्या अंकात बारा प्रकरणे आणि १८ तारखेच्या अंकात आठ प्रकरणे – असे मिळून प्रसिद्ध झाले. लगेच १९१०च्या जानेवारीत पुस्तकाची पहिली आवृत्ती दक्षिण आफ्रिकेतून इंटरनॅशनल प्रेसतर्फे प्रसिद्ध झाली. हिंदुस्थानातील मुंबई इलाख्याच्या शासनाने १३ मार्च १९१०ला प्रती जप्त केल्याची बातमी आली. ‘हिंद स्वराज्य’ या गुजराती पुस्तकाबरोबरच गांधींनी गुजरातीत रूपांतर केलेली इतर चार पुस्तकेही जप्त झाली. रस्किन आणि प्लेटो यांची ती पुस्तके इंग्रजीत सर्वत्र उपलब्ध होती. तरीही या गुजराती रूपांतरांवर निरर्थक बंदी आली. त्यांचे फक्त गुजराती अनुवाद जप्त करून हिंदुस्थानातील परिस्थिती काही बदलणार नव्हती.

गांधींनी स्वत: केलेल्या इंग्रजी अनुवादाचे पुस्तक घाईघाईत २० मार्च १९१० रोजी प्रसिद्ध करण्यात आले ते त्यामुळेच. प्रत्यक्ष बंदी २४ मार्चला घालण्यात आली. इंग्रजी अनुवादाला इंग्लंडमध्ये आणि युरोपमध्ये स्वतंत्रपणे वाचकवर्ग मिळाला असता. इंग्रजी जाणणाऱ्या बिगर-गुजराती वाचकांनी गांधींचे हे विचार समजून घेणे आवश्यक होते. गांधींनी दक्षिण आफ्रिका सोडण्यापूर्वी गुजराती ‘हिंद स्वराज’ची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. त्यात फक्त एक छोटीशी प्रस्तावना नव्याने आली.

इंग्रजी अनुवाद अनेक ज्येष्ठांना पाठवून त्यांची मते मागवली होती. रशियात लिओ टॉलस्टॉय यांनी ते वाचून ८ मे १९१० रोजी त्यासंबंधीचे पत्र गांधींना लिहिले. त्यात म्हटले : “तुम्ही ज्या सविनय प्रतिकारासंबंधी लिहीत आहात, ते प्रश्न फक्त हिंदुस्थानाच्या दृष्टीने नव्हे, तर एकूणच सर्व मानवजातीला अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत!” या अनुवादाची टंकलिखित प्रत प्रा. गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडे हेन्री पोलाक यांच्यामार्फत पाठवण्यात आली. मात्र त्यांची तीव्र प्रतिक्रिया गांधींना १९१२मध्ये प्रत्यक्ष भेटीत समजणार होती.

मूळ गुजरातीत लेखकाने ‘हिंद स्वराज्य’ लिहिले होते; इंग्रजी आवृत्तीच्या वेळी ‘हिंद स्वराज’ असा उल्लेख करण्यात आला. १९१५ मध्ये गांधी हिंदुस्थानात परत आल्यावर हे इंग्रजी पुस्तक त्याच्या पहिल्या प्रकाशनानंतर दहा वर्षांनी, म्हणजे १९१९ मध्ये हिंदुस्थानात प्रथम प्रसिद्ध झाले. किंबहुना या बंदी घातल्या गेलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आणि विक्री हा गांधींच्या ‘सविनय प्रतिकारा’चा भाग होता. १९२१ साली गांधींनी ‘यंग इंडिया’ पत्रिकेचे संपादकीय लिहिताना या पुस्तकाला ‘हिंद स्वराज ऑर इंडियन होम रूल’ असे नाव दिले. १९२१ मध्ये त्याच्या इतर आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आणि १९२४ मध्ये ते अमेरिकेतून ‘सर्मन ऑन द सी’ या नावाने हरिदास मजुमदार यांनी प्रसिद्ध केले. या पुस्तकाची सुधारलेली आवृत्ती १९३८ साली प्रसिद्ध झाली. त्याच वर्षी बदललेल्या राजकीय परिस्थितीत या पुस्तकावरील हिंदुस्थानातील बंदी उठवण्यात आली.

२.

मी ‘हिंद स्वराज’ हे पुस्तक प्रामुख्याने इंग्रजीतून, तर अधूनमधून मूळ गुजरातीतून किंवा त्याच्या मराठी अनुवादातून वाचत आलो. हळूहळू त्या तीन भाषांतील वाचनांतून वेगवेगळा ध्वनी यायला लागला. तो का याचा शोध घ्यायला लागलो, तेव्हा सर्वप्रथम भेद जाणवला तो काही महत्त्वाच्या शब्दांच्या संदर्भात. मूळ गुजराती ‘हिंद स्वराज्य’मध्ये लेखकाने ‘सुधारो’ या शीर्षकाचे एक महत्त्वाचे प्रकरण लिहिले आहे आणि इंग्लंडमधील आणि हिंदुस्थानातील ‘सुधारो’ची चर्चा केली आहे. त्याऐवजी ‘इंडियन होम रूल’मध्ये इंग्रजीत ‘सिव्हिलायझेशन’ असा शब्द वापरला आहे. मराठी अनुवादात मुळात ‘सुधारणा’ हा शब्द होता. ‘सिव्हिलायझेशन’चा प्रतिशब्द ‘सुधारणा’ हे स्वीकारायला मी तयार नव्हतो. मग इंग्रजी-गुजराती शब्दकोशाचा आधार घेतला. एका कोशात ‘सिव्हिलायझेशन’चा अर्थ ‘सुधारो’ आणि त्याच प्रकाशकाच्या गुजराती-इंग्रजी कोशात ‘सुधारो’चा अर्थ ‘सिव्हिलायझेशन’ असा सापडला. परंतु इतर दोन शब्दकोशांत ‘सिव्हिलायझेशन’चे अर्थ ‘संस्कृती’, ‘सुधारेली स्थिति, ‘सुशिक्षितावस्था’ आणि ‘सुधारेली स्थिति के संस्कृति, सर्वे सुधारेलो देशो, संस्कारिता, राष्ट्रीय संस्कृति, ऊन्नती, ऊत्कर्ष’ असे दाखवले आहेत. इंग्रजी-मराठी कोशात ‘सिव्हिलायझेशन’चा अर्थ ‘सुधारणा’ असा कुठेच आढळेना. त्यातून गेल्या वीसेक वर्षांत भारतातील आर्थिक धोरणांच्या संदर्भात ‘सुधारणा’ या शब्दाला राजकीय कारणांसाठी विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे, त्यामुळे या गोंधळात अधिक भर पडली.

‘सिव्हिलायझेशन’ आणि ‘सुधारो’ हे प्रकरण सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्हे निर्माण करत असावे. मोहनदास गांधी आणि त्यांचे चुलतबंधू जमनादास गांधी यांच्या पत्रव्यवहारात हा प्रश्न उपस्थित झाला आहे. २८ ऑगस्ट १९११ च्या पत्रात गांधी लिहितात : ‘‘सिव्हिलायझेशन’ला जर योग्य गुजराती शब्द वापरायचा असेल, तर त्याचा अर्थ ‘सारी रहेणी’ (चांगली राहणी) हा आहे. आणि माझा भावार्थ तोच आहे. Gujarati equivalent for civilization is ‘सुधारो’, हे वाक्य बरोबर आहे, पण मला ते सांगायचे नाही. Gujarati equivalent is good conduct. या वाक्यातील बाकीचे संदर्भ बाजूला ठेवले, तरी गांधींना ‘सुधारो’च्या ऐवजी वेगळाच भाव सुचवायचा होता, असे दिसते. हा गुंता सोडवण्याची आवश्यकता ही माझ्या अनुवादामागची प्रमुख प्रेरणा आहे.

‘हिंद स्वराज’ची नवी मराठी आवृत्ती १९९७मध्ये ग्रामसेवा मंडळ, पवनार यांच्यातर्फे प्रसिद्ध झाली. हिंदीत काका कालेलकर यांनी ‘सभ्यता’ हा शब्द वापरला आहे. तो त्या मराठी भाषांतरातही वापरला, असे प्रस्तावनाकार वसंत पळशीकर यांनी मांडले आहे. परंतु जाणीवपूर्वक सांगितल्याशिवाय ‘सभ्यता’ या शब्दाचा अर्थ ‘सिव्हिलायझेशन’ असे मराठीत तरी स्पष्ट होत नाही. माझ्या किंवा माझ्यानंतरच्या पिढीतील रूढ अर्थ लक्षात घेता इंग्रजी ‘सिव्हिलायझेशन’ किंवा गुजराती ‘सुधारो’ म्हणजे मराठीत ‘सभ्यता’ असे मानायला माझे मन तयार होईना. सुरेश शर्मा आणि त्रिदिप सुहृद यांनी २०१० साली प्रसिद्ध केलेल्या हिंदी अनुवादात ‘सुधार’ शब्दच वापरला आहे. या दिशेने शोध घेण्याची सुरुवात झाली ती या एका शब्दावरून. पुढे गुजराती ‘दारूगोळो’चा इंग्रजी पर्याय ‘ब्रूट फोर्स’ (मराठी : शस्त्रबळ), ‘सत्याग्रहा’चा इंग्रजी पर्याय ‘सोल फोर्स’ (मराठी : सत्याग्रह-आत्मबळ) अशी इतर प्रश्नचिन्हे दिसू लागली. मूळ गुजरातीत लेखक ‘प्रजा’ शब्द वापरतो, तर इंग्रजीत ‘नेशन’. अशी उदाहरणे वाढू लागली आणि मग या पुस्तकाच्या बहुभाषी पारायणांत भर पडू लागली. माझ्या नेहमीच्या वाचनामागील हेतू गांधीविचारांना चालना देणे हा असल्याने या भाषिक विसंवादाचा तेव्हा त्रास झाला नाही. ज्या शब्दांमुळे माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला, त्यांचा या मूळ वाचनाशी संबंध नव्हता. प्रश्न असा होता की, इंग्रजी आवृत्तीच्या प्रस्तावनेत लेखक म्हणतात की, हे काही शब्दश: भाषांतर नव्हे, तर मूळ संहितेचे ‘फेथफुल रेंडरिंग’ किंवा विश्वसनीय यथातथ्य रूपांतर आहे, आणि पुढे असेही म्हणतात की, ‘माझ्या लेखनातील त्रुटी मुळातील नेमके अर्थ इंग्रजीतून व्यक्त करण्याच्या माझ्या असमर्थतेमुळे अतिशयोक्त रूपात जाणवतील’. तरी गांधींनी पुढे आपल्या इंग्रजी अनुवादात फारसा काही बदल केला नाही. गांधींनी पुढे आपल्या इंग्रजी अनुवादात फारसा काही बदल केला नाही. १९३८-३९ साली महादेव देसाई यांनी प्रसिद्ध केलेल्या सुधारित आवृत्तीत केलेले फरक किरकोळ आहेत. त्याचा संदर्भ गुजराती आणि इंग्रजी संहितेतील महत्त्वाच्या मूलभूत स्वरूपाच्या शाब्दिक फरकांशी नाही हे लक्षात घेता, गुजराती-इंग्रजीतील फरक हे फक्त शाब्दिक नसून जाणीवपूर्वक आहेत असे मानण्यास हरकत वाटली नाही.

३.

हे असे का झाले असावे, याचा विचार करताना काही शक्यता उघडउघड दिसल्या. मूळ गुजराती लेखन इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेला परतताना झाले. तेव्हा इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस या श्यामजी कृष्णवर्मा यांच्या वास्तूतील क्रांतिकारी, त्यांचे हिंदुस्थानातील भाईबंद आणि एकूणच तरुण पिढीला सशस्त्र लढ्याचे वाटणारे आकर्षण यांमुळे गांधी उद्विग्न मन:स्थितीत होते. त्यांनी आपल्या मनातील खळबळीला वाट करून देण्यासाठी ही पुस्तिका लिहून काढली. त्यांच्यापुढे वाचकवर्ग हा गुजराती जाणणारा होता, तोही प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेतला. ‘हिंद स्वराज’ लिहिताना गांधी जरी एकूण हिंदुस्थानातील संघर्षाचा विचार करत होते, तरी त्यांचा हिंदुस्थानातील लोकांशी प्रत्यक्ष संपर्क सुटून आठ वर्षे झाली होती.

गांधींनी मुळात हे विचार इंग्रजीत न लिहिता गुजरातीत का लिहिले असा मुद्दा मांडला गेला आहे. हे विचार त्यांना अस्वस्थ करून शांत राहू देईनात, असे गांधींनी सांगितले आहे. उबळ आल्यावर मातृभाषेतून लिहिणे हे साहजिकच होते. त्यांना जसा स्वत:च्या मातृभाषेचा अभिमान होता, तसाच प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. फिनिक्स आश्रमात प्रत्येक मुलाला आपापल्या मातृभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी आग्रहपूर्वक व्यवस्था केली होती. त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकांची गुजराती भाषांतरे त्यांनी आवर्जून केली होती. तेव्हा त्यांनी मूळ लेखन गुजराती भाषेत करणे हे स्वाभाविक होते.

‘हिंद स्वराज्य’ लिहिल्यानंतर इंग्रजी अनुवाद करण्यापूर्वी काही काळ गेला होता. मनातली खळबळ संपवून शीतमनस्क व्हायला तो वेळ पुरेसा होता. हे पुस्तक इतरांनीही वाचावे असे त्यांना वाटत होते. त्यांचे परमस्नेही हरमान कॅलनबाख यांना त्यांनी इंग्रजी रूपांतर तोंडी सांगितले; कॅलनबाख यांनी लिहून घेताना ते मूळ गुजरातीशी ताडून पाहण्याची फारशी शक्यता नव्हती. परंतु इंग्रजी शब्दयोजनेत त्यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लेखकासमोर वाचक म्हणून प्रामुख्याने इंग्लंडमधील त्यांचे स्नेही, समर्थक आणि विरोधकदेखील होते. एकूण प्रतिकूल वातावरणात त्यांना आधार मिळाला होता तो टॉलस्टॉय यांच्या एका पत्राचा. हे पत्र टॉलस्टॉय यांनी एका हिंदू क्रांतिकारकाला लिहिले होते. गांधींनी त्यांच्या हाती आलेल्या या पत्राचा अनुवाद गुजरातीत बोटीवरच केला आणि फिनिक्सहून ते पत्र इंग्रजी आणि गुजराती भाषांत प्रसिद्ध केले. त्यात टॉलस्टॉय यांना आपले विचार कळावेत हाही गांधींचा हेतू होता. आणि अर्थातच हिंदुस्थानातील अत्यल्प परंतु उच्चशिक्षित नेते यांनाही इंग्रजी आवृत्ती पाठवायची होती.

इंग्रजी आवृत्तीच्या प्रस्तावनेत लेखकाने इंग्रजी आवृत्तीचा वाचक वेगळा आहे ही जाणीव स्पष्ट केली. आपण जर मुळातच इंग्रजीतून लिहिले असते, तर संवादात्मक पद्धती कदाचित वापरली नसती असेही त्यांनी म्हटले आहे. परंतु त्यांनी गुजरातीशिवाय इतर भाषेत लिहिण्याची शक्यता नव्हतीच.

गुजराती आणि इंग्रजी संहितांचे वाचन करताना आणखी एक गोष्ट लक्षात आली. हा फरक अशा काही महत्त्वाच्या शब्दांच्या वापरात आहे, की ज्यामुळे एकूण चर्चेचा स्तर हा तत्कालीन संदर्भ पार करून वैश्विक पातळीवर जाऊ शकतो. उदाहरणार्थ, ‘दारूगोळा विरुद्ध सत्याग्रह’ या द्वंद्वापेक्षा ‘पाशवी बळ आणि आत्मबळ’ यांतील द्वंद्व हे सार्वकालिक आणि सर्वदेशीय होते. परंतु हा फरक फक्त तेवढाच नाही. एकूणच गांधींचे गुजराती लेखन हे खूपसे बोली भाषेत आहे. त्यात तत्कालीन गुजराती वाक्प्रचारांचा मुबलक उपयोग केला आहे. इंग्रजी लेखन हे खूपसे बौद्धिक पातळीवरील प्रबंधाच्या शैलीत मांडलेले आहे. त्यामुळे गांधीविचारांचा अभ्यास न झालेल्या इंग्रजी आणि गुजराती या दोन्ही भाषा जाणणाऱ्या वाचकाने या दोन भाषांतील संहिता स्वतंत्रपणे वाचल्या, तर त्याच्या प्रतिक्रिया काहीशा वेगळ्या होण्याची शक्यता आहे.

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

४.

मराठीतील पहिला अनुवाद अहमदाबादच्या नवजीवन प्रेसने बऱ्याच उशिरा प्रसिद्ध केला – अंदाजे १९४५ साली. तो पांडुरंग गणेश देशपांडे यांनी केला होता. १९९७ साली पवनारच्या ग्रामसेवा मंडळाने तो पुन:प्रकाशित करताना ‘सिव्हिलायझेशन’साठी ‘सुधारणा’ऐवजी ‘सभ्यता’ हा शब्द देण्यात आला. तो काकासाहेब कालेलकर यांच्या हिंदी भाषांतरापासून सुचलेला.

पुढे हे प्रश्न खुपायला तसेच कारण घडले. १९९७ साली ‘हिंद स्वराज्य अॅण्ड अदर रायटिंग्ज’ची नवीन आवृत्ती प्रा. अँथनी परेल यांनी संपादित केली आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसने ती प्रसिद्ध केली. प्रा. परेल यांनी १९९७ची आवृत्ती तयार करताना १९०९ची संहिता आधारभूत धरली होती. वास्तविक गांधींनी स्वतः तयार केलेल्या इंग्रजी आवृत्तीचे शीर्षक ‘इंडियन होम रूल’. परंतु या आवृत्तीत हे नामाभिधान सुरुवातीची ७६ पाने उलटल्यावरच येते. ही आवृत्ती प्रामुख्याने ‘हिंद स्वराज्य’ या नावानेच  ओळखली गेली आहे. ‘हिंद स्वराज्य’ची शतसंवत्सरी जसजशी जवळ येऊ लागली, तसतसे वेगवेगळे संकल्प पुढे येऊ लागले. एका प्रदीर्घ प्रस्तावनेत प्रा. परेल यांनी या पुस्तिकेची ऐतिहासिक आणि तात्त्विक पार्श्वभूमी मांडली होती. त्याचप्रमाणे टिपा आणि परिशिष्टे यांतून अभ्यासकाला उपयुक्त अशी बरीच माहिती पुरवली आहे. या मजकुराचे मराठीत भाषांतर करून ‘हिंद स्वराज्य’ची नवीन आवृत्ती प्रसिद्ध करावी असा मणिभवन गांधी संग्रहालयाचा विचार होता. ‘हिंद स्वराज्य’चे मूळ मराठी भाषांतर तसेच ठेवायचे अशी कल्पना होती. गांधींवरील संशोधन मी या संस्थेत करत असल्याने टिपांच्या भाषांतराची कामगिरी माझ्यावर सोपवण्यात आली. त्यातील प्रा. परेल यांच्या टिपा, प्रस्तावना इत्यादी जवळजवळ ‘हिंद स्वराज्य’च्या लांबी एवढ्याच लेखनाचे मी मराठीत भाषांतर केले. काही कारणाने याचे प्रकाशन होऊ शकले नाही, परंतु हे भाषांतर करत असताना उपलब्ध मराठी अनुवादही मी वारंवार पाहत होतो. तो वाचत असताना अनेक कारणांसाठी ‘हिंद स्वराज्य’चा नव्याने अनुवाद करावा असे वाटू लागले.

इंग्रजी आणि गुजराती या दोन संहितांचा खोलवर अभ्यास करून मग दोहोंचा एकत्र विचार करून मराठी संहिता पक्की करावी अशी मुळात माझी कल्पना होती. परंतु या दोन संहितांतील फरक हा निवळ काही शब्दांच्या बाबतींत मर्यादित नाही हे लक्षात आले. गेली शंभर वर्षे, आणि विशेषतः ‘हिंद स्वराज्य’च्या शतसंवत्सरीच्या निमित्ताने जी चर्चा होत आहे, ती ‘इंडियन होम रूल’ या इंग्रजी संहितेच्या आधारावर. तेव्हा ‘इंडियन होम रूल’ या इंग्रजी आवृत्तीचाच हा अनुवाद करायचे ठरवले. इंग्रजी शब्दाला पर्याय असेल आणि मूळ गुजराती शब्द चपखल बसतो वाटल्यास तो वापरला आहे. परंतु एकूण विचार लक्षात घेऊन इंग्रजी संहितेत ढवळाढवळ करण्याचा मोह टाळला आहे. उदाहरणार्थ, लेखक गुजरातीत ‘प्रजा’ शब्द वापरतो, तर इंग्रजीत ‘नेशन’. गांधींचा एकूण इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोणॉन हा ज्याला पुढे ‘सबऑल्टर्न स्टडीज’ म्हणू लागले तसा आहे. आणि तो ‘प्रजा’ या शब्दाने अधिक स्पष्ट होतो. तरीही ‘नेशन’साठी ‘प्रजा’ न वापरता ‘राष्ट्र’ हाच शब्द वापरला आहे. ज्या इंग्रजी शब्दांतील छटा एकाच मराठी शब्दाने स्पष्ट होत नाहीत, त्या ज्या निरनिराळ्या शब्दांनी स्पष्ट होतील त्यांचा पर्यायी उपयोग करून वेगवेगळ्या छटा सुचवायचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, संदर्भानुसार ‘सिव्हिलायझेशन’चा अनुवाद ‘संस्कृती’ आणि ‘जीवनपद्धती’ असा केला आहे. ‘संस्कृती’ शब्दातील व्यापकता आणि ‘जीवनपद्धती’ शब्दातील तात्कालिकता या दोन्ही छटा ‘सिव्हिलायझेशन’ समजून घेण्यास आवश्यक आहेत.

गुजराती ‘हिंद स्वराज्य’ आणि ‘इंडियन होम रूल’ या त्यांच्या इंग्रजी भाषांतराच्या लेखनांत फक्त दोन महिन्यांचा काळ गेला. तरीही यांतून दिसणारे गांधी वेगळे भासतात. ते का हा माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय आहे.

लेखक रामदास भटकळ पॉप्युलर प्रकाशनाचे संस्थापक आहेत.

ramdasbhatkal@gmail.com

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......