गांधी : तिरस्काराकडून आदरभावनेकडे  
सदर - गांधी @ १५०
तुषार म्हात्रे
  • म. गांधी यांच्या विविध भावमुद्रा
  • Mon , 02 October 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram

सुमारे चार वर्षांपूर्वीचा प्रसंग. डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत फरिदाबाद येथील कॉन्फरन्स आटोपून दिल्लीकडे निघालो. दिल्लीत फिरण्यासाठी पुढील योजना आखत होतो. माझ्यासोबत आणखी चार सहकारी होते. सकाळी दहाच्या सुमारास लाल किल्ल्याजवळ पोहोचलो. सोमवार असल्यानं किल्ल्याचं प्रवेशद्वार बंद. बाहेरूनच धुक्यामुळे पांढरा झालेला लाल किल्ला पाहिला आणि एक टुरिस्ट बस पकडून जिवाची दिल्ली करण्यास निघालो. एक दोन स्थळं पाहिल्यानंतर गाईडनं पुढील स्थळाचं नाव घोषित केलं- राजघाट! नाव ऐकून डोळे चमकले. उत्साहानं हिरवळीतून मार्गक्रमण करत समाधीस्थळाजवळ पोहोचलो. महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. सोबत असलेल्या राहुलला आवर्जून छायाचित्र काढायला लावलं. मनातील एक अपूर्ण इच्छा पूर्ण झाली.

‘तिरस्कार ते आदरभावना’ असा न विरुद्ध टोकाचा प्रवास सहजासहजी होत नाही. माझ्याबाबतीत तो घडलाय. याला कारणीभूत आहे महात्मा गांधींची ‘कृतियुक्त विचारशैली’.

शाळेत असल्यापासून भिंतीवर हसऱ्या छबीची गांधी प्रतिमा पाहत आलो. जोडीला रंग उडालेल्या भिंतीवरील निर्जीव चित्रंही. ‘एक रुपया चांदीचा, सारा देश गांधीचा’ या स्वरूपातल्या घोषणाही ऐकल्या. पण ‘गांधी’ नावाच्या माणसाचे विचार फारसे ऐकायला मिळाले नाहीत. नाही म्हणायला स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती-पुण्यतिथीला विद्यार्थ्यांनी रट्टा मारून केलेली रटाळ भाषणं ऐकायला मिळायची. शालेय जीवनात महान व्यक्तींवरील सर्वाधिक विनोद, कुचेष्टा ‘गांधी’ नावाभोवतीच फिरणाऱ्या होत्या. त्यांच्या शरीरप्रकृतीवरून, कपड्यांवरून विनोद केले जायचे (अजूनही केले जातात).

या  वातावरणातच ‘गांधी’ नावाची एक विशिष्ट प्रतिमा आपोआपच तयार होत गेली. पुढे थोडी समज यायच्या वयात ‘गांधींमुळे आपल्याला स्वातंत्र्य थोडं उशिरानं मिळालं’ या आशयाचं वाक्य कानावर पडायचं. सत्य, अहिंसा वगैरे शब्द त्यावेळी खूपच तकलादू वाटायचे. उपलब्ध स्रोतांतून गांधींविषयी फार चांगलं पाहायला, ऐकायला मिळत नव्हतं. वाचनाची आवड पूर्वीपासून होतीच. पण तरीही ‘गांधी विचारधारा’ किंवा तसलं इतर काही माझ्यापर्यंत पोहचत नव्हतं.

घरात गांधीजींवरील ‘प्रेषित’ नाव असलेलं, कव्हर फाटलेलं पुस्तक होतं. पण मला ते कधीही उघडून वाचावंसं वाटलं नाही. गांधीजींचा प्रत्यक्ष उल्लेख असलेलं पहिलं पुस्तक वाचलं ते म्हणजे गोपाळ गोडसेंचं ‘गांधीहत्या आणि मी’. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ‘पंचावन्न कोटींचे बळी’. या सर्व वाचनातून आणि उपलब्ध माहितीवरून ‘मोहनदास करमचंद गांधी’ नावाची एक फसव्या व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती भारतात होऊन गेली, हाच माझा समज होता.

गांधीजींविषयी टोकाचा अनादर असताना, ‘राजघाटा’पर्यंतच्या प्रवासात असं काय घडलं की, मी केवळ त्या स्थळाचं नाव ऐकल्याबरोबर उल्हासित झालो? त्या पवित्र भूमीत समाधान पावलो?

गांधी नावाचं गारूड माझ्या विचारांवर कसं झालं?

मला जरी त्यांचे विचार पटत नव्हते, तरी प्राथमिक शाळेत असताना आमच्या शिक्षकांनी शिकवलेला ‘प्रथम श्रेणीच्या डब्यातला’ प्रसंग माझ्या मनावर बिंबला होता. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा ‘गांधी’ मी त्या पाठात अनुभवला होता.

माझ्या मनातील महात्म्याच्या कलुषित प्रतिमेला सर्वप्रथम छेद दिला तो नारायणभाई देसाईंच्या अचंबित करणाऱ्या ‘बापूकथा’ या मथळ्याखालील ‘अज्ञात गांधी’ नावाच्या पुस्तकानं. समकालीन प्रकाशननं प्रकाशित केलेल्या नव्या कोऱ्या आणि सर्वार्थानं हटके अशा श्रेणीतलं हे पुस्तक. नावातील वेगळेपणामुळे मी ते वाचलं, पुन्हा पुन्हा वाचलं. काहीतरी वेगळेपणा होता या पुस्तकात, लेखन शैलीत आणि बापूंच्या विचारांत. हे वेगळेपणच मला भावलं. ग्रंथालयाचं पुस्तक परत केल्यानंतर मी दादरच्या आयडीयल मधून ‘अज्ञात गांधी’ विकत घेतलं, माझ्यासाठी.

लगेचच काही दिवसांनी बापूंची आत्मकथा म्हणजेच ‘माझे सत्याचे प्रयोग’ वाचलं. हे पुस्तकही माझ्या संग्रही आहे. यानंतर ‘महात्मा गांधी’ नावानं मिळालेलं चांगलं-वाईट सर्व प्रकारचं साहित्य वाचलं. माझ्यावरील गांधी विचारांचा प्रभाव वाढला. तिरस्काराच्या भावनेचं रूपांतर ‘कुतूहलयुक्त आदरात’ झालं.  

हे वाचन चालू असतानाच एके दिवशी हॉलिवुडचा आयर्न मॅन ‘बेन किंग्जले’नं अजरामर केलेला ‘गांधी’ नावाचा चित्रपट पाहिला. ‘शटर आयलंड’, ‘आयर्न मॅन’, ‘प्रिंस ऑफ पर्शिया’मध्ये पाहिलेला हा अॅक्शन हिरो एका योग्याची भूमिका अक्षरश: जगत होता. दोन-चार दिवसांनीच दै. ‘लोकसत्ता’मध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड अॅटनबरोंची ‘गांधी’ चित्रपटनिर्मितीमागची दोन दशकांची संघर्ष कथा वाचायला मिळाली. या चित्रपटाविषयीचा आणि महात्म्याविषयीचा आदर दुणावला. हा आदर टिकूनही राहिलाय.

भारतातील स्वातंत्र्यलढ्यापेक्षाही गांधींचं दक्षिण आफ्रिकेतील कार्य मला अधिक प्रेरित करतं. त्यांचे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे संघर्षमय प्रसंग मला प्रेरणा देतात. कोणत्याही तत्त्वज्ञानाची सूत्रबद्ध मांडणी न करता स्वत:च्या कृतीतून तत्त्वज्ञानाला आचरणात आणणारे गांधी मला आवडतात.  

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

गांधींची आत्मकथा वाचल्यानंतर मी माझा संयम तपासण्यासाठी एक वर्षाहूनही अधिक काळ शाकाहारी राहिलो होतो. (मला वैयक्तिकरीत्या ओळखणाऱ्यांना हे माझ्यासाठी किती कठीण आहे याची कल्पना असू शकेल!). अर्थात हा प्रयोग केवळ प्रतीकात्मक होता.

मी जसजसे त्यांच्याविषयी वाचत चाललोय, तसतसे समोर येणारे नवीन पैलू मला गांधीविचारांकडे झुकवत चालले आहेत. (गांधींभोवती रेंगाळणाऱ्या गैरसमजांचं धुकं दूर करण्यात ‘अक्षरनामा’ या वेब पोर्टलचासुद्धा मोठा वाटा आहे. यातील प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला येणारा गांधींविषयीचा लेख मी नियमितपणे वाचतोय.)

एक खंत वाटतेय, ती म्हणजे शांतीचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माणसाला शांततेचं नोबेल पारितोषक मिळालं नाही. गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या नेल्सन मंडेला, बराक ओबामा यांना नोबेल मिळालं, पण गांधींना नाही. असो. बहुतेक नोबेलच्या नशिबात गांधी नसावेत.

येत्या वर्षांत गांधी जयंतीचं ‘शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष’ सुरू होईल. या निमित्तानं आपल्या जाणिवा पुन्हा एकदा तपासून पाहूया. कोणताही विचार परिपूर्ण नसतो. त्याला काळाच्या कसोटीवर घासून पाहाणं गरजेचं असतं. हे पाहताना विचारातील संदिग्धता, विसंगती शोधता येते. गांधीविचाराबाबत असहमती दर्शवूनही आपण त्याचा कालसुसंगत विचार करू शकतो. एखाद्या विचारधारेबाबत असहमती दर्शवणं अथवा समज-गैरसमजाचे थर साचत जाणं म्हणजे त्या विचारधारेला विरोध करणं नसतं, तर विचार तपासण्याची ती एक संधीही असते. यासाठीच सांगोवांगीच्या कथांवर विश्वास न ठेवता चिकित्सक वृत्तीनं गांधी शोधूया. जर त्यांचे  विचार सोन्यासारखे असतील तर आगीतून तावून सुलाखून निघाल्यानंतर अधिकच चमकतील. पण त्यासाठी चिकित्सक वृत्तीची धग आणि विवेकबुद्धीची नजर गरजेची आहे. यातूनच सत्य काय ते सापडू शकेल. गांधीविचारांना अभ्यासण्याची आणखी एक संधी स्वत:ला देऊया, स्वत:साठी!

लेखक तुषार म्हात्रे रयत शिक्षण संस्थेमध्ये (मु. पिरकोन, ता.उरण, जि. रायगड) शिक्षक आहेत.

tusharmhatre1@gmail.com

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

sagar gawand

Mon , 02 October 2017

मी सुद्धा 'गांधी' कधी वाचले नाही, बघितले ते फक्त गांधीवादी म्हणून मिरवणाऱ्या लोकांमध्ये, आणि ऐकले ते फक्त लोकांच्या बोलण्यामधून ( त्यातील बहुतेक गोडसे आणि भगतसिंग समर्थक ). गांधीवादी म्हणून मिरवणाऱ्या लोकांच्या आचरणात अपेक्षित 'गांधी' कधी दिसलेच नाही ( बहुतेकांनी गांधीवाद हा फक्त गांधीटोपी प्रमाणे डोक्यावरच ठेऊन दिला असावा , त्याला डोक्यात शिरून नाही दिला) , आणि गांधींबद्दल बोलणाऱ्या लोकांमध्ये गांधींबद्दल द्वेषच दिसला. काही दिवसांपूर्वी तुझ्याशी बोलताना पहिल्यांदा मला व्यासपीठ नसतानाही गांधींजीविषयी बोलणारा समर्थक दिसला.अर्थात तुझे मत हे unbiased (मराठी शब्द आठवला नाही) आणि सर्वांकष विचार करून केलेले असतात त्यामुळे तेव्हा ( आणि आत्ताही) गांधी नीट समजून घेयाला हवे असे वाटले. वेळ मिळाल्यावर नक्कीच प्रयत्न करेन...!! बाकी तुझी लेखणी आणि विचार नेहमीप्रमाणेच सखोल आणि सुंदर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......