अजूनकाही
‘मुंबईसारख्या महानगरांमध्ये आधीच प्रचंड गर्दी आहे. त्यात ती वाढत आहे. एका मर्यादेनंतर जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त गर्दी वाढते, तेव्हा ते शहर असहिष्णु होत जातं...’ प्रसिद्ध साहित्यिक अरुण साधू यांनी हे विधान काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांच्या ‘मुंबई ऑन सेल’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात केलं होतं. या आठवड्याच्या सुरुवातीला साधू सर गेले. आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी, २९ सप्टेंबर २०१७ रोजी मुंबईतील एल्फिन्स्टन रोड उपनगरी रेल्वे स्थानकावरील पुलावर प्रमाणाबाहेर गर्दी झाली आणि त्यातून चेंगराचेंगरी होऊन २२ जणांचा बळी गेला, तर ३४ जण जखमी झाले... ही चेंगराचेंगरी रेल्वे प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा परिपाक होती, त्याचबरोबर अफवा पसरवून, ढकलाढकली करणाऱ्या गर्दीची असहिष्णुताही या चेंगराचेंगरीला तितकीच कारणीभूत होती. साधू सरांमधील भविष्यवेधी भाष्यकाराची आठवण या शोकात्म घटनेनं करून दिली!
साधू सरांमधील या भाष्यकाराचा अनुभव त्यांचा विद्यार्थी म्हणून (२०००-२००१, रानडे इन्स्टिट्यूटमधील त्यांची शेवटची बॅच.) अनेकदा घेतला होता. त्यांची पहिली भेट झाली जून २००० मध्ये. पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूट या वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रवेशासाठी लेखी परीक्षा दिली. त्यानंतर मुलाखत झाली. त्यात साधू सरांबरोबर विनय हर्डीकर व बहुधा केवलकुमार सर होते. ‘लेखक दिसतो कसा आननि...’ या प्रश्नाचं उत्तर शोधताना बऱ्याचदा आपल्या मनात त्याचं एक कल्पनाचित्र तयार होतं. माझ्या मनातील त्या कल्पनाचित्रात साधू सर दाढीवाले होते... प्रत्यक्षात ते एकदम क्लीन शेव... मनात स्वत:चं हसू येत होतं! (रानडे इन्स्टिट्यूटमध्ये सुहास पळशीकर आम्हाला एक विषय शिकवायला आले. ते मात्र माझ्या मनातील साधू सरांसारखे दिसत होते.) मुलाखत पार पाडली. प्रवेश मिळाला. तेव्हापासून साधू सरांबद्दल एक कुतूहल मनात असायचं.
ते आम्हाला ‘एथिक्स’ हा विषय शिकवायला होते. शिवाय विभागप्रमुख. त्यांच्या पहिल्या लेक्चरची सुरुवातच त्यांनी अमेरिकेतील एका सर्वेक्षणाच्या निष्कर्षानं केली. अमेरिकत एक सर्वेक्षण झालं. त्यात तुमचा विश्वास असलेले व्यवसाय-व्यावसायिक यांची क्रमवारी लावायला लावली. माध्यमांचा-पत्रकारांचा त्यात शेवटचा म्हणजे १० वा क्रमांक होता... याचा अर्थ पत्रकारांवर, छापून येणाऱ्या बातम्यांवर, त्यांच्या लेखांवर विश्वास उरलेला नाही... साधू सर बोलत होते... आमच्यातील अनेकांच्या पत्रकारितेविषयीच्या, त्यावरील लोकांच्या विश्वासाबद्दलच्या समजांना त्यांनी सुरूंग लावला होता. गेल्या काही काळात आपल्याकडे एकीकडे सरकारविरोधात बातम्या देणाऱ्यांवर प्रकट होणारा अविश्वास... तर दुसरीकडे काहींवर सरकारला अनुकूल असलेली पत्रकारिता सुरू आहे असा खुद्द माध्यमांमधील काहींचा सूर... माध्यमांवरील लोकांच्या विश्वासाच्या चिंध्या उडवणारी परिस्थिती आहे... ती पाहताना सतत साधू सरांचा तो पहिला तास आठवत राहतो. लोक दूर राहिले... माध्यमांमधीलच विविध लोकांचा एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही...
असेच एकदा ते म्हणाले होते, ‘ज्यांच्या भाषणातील शब्दाच्या उच्चारावरून शब्द ऱ्हस्व आहे की दीर्घ हे समजेल, असा शेवटचा वक्ता म्हणजे पु. ल. देशपांडे.’ पुलंचं त्यावेळी नुकतंच निधन झालं होतं. (‘पुन्ना, पुन्ना...’ करणारे स्टार अँकर त्यावेळी टीव्हीवर अवतरायचे होते!)
साधू सर बाय चॉइस जर्नालिस्ट होते. त्यामुळे त्यांना स्वत:च्या व्यवसायाचा अभिमान होता. वृत्तपत्र स्वातंत्र्य हे सर्वोच्च आहे... पत्रकारांनी आणि देशाच्या नागरिकांनी त्यासाठी आग्रही राहिलं पाहिजे. वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच म्हणजे माहितीचा संकोच... हुकूमशाहीची सुरुवात... लोकशाहीचा अंत... हे ते अनेकदा सांगायचे. पत्रकारिता हा देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवला जातो ते उगाच नव्हे, यावर त्यांची श्रद्धा होती. जगातील विविध देशांतील घडामोडी, तेथील राजवटी, हुकूमशाही राजवटीतील लोकांची हलाखी (केवळ आर्थिक नव्हे, मानसिक-अभिव्यक्तीच्या पातळीवरील) यांच्या अभ्यासामुळे ती श्रद्धा अधिक बळकट झाली होती. ‘एथिक्स’ हा विषय शिकवताना सरांच्या बोलण्यातून ते अनेकदा येत असे. त्यातूनच ‘मेन आर क्रिएटेड इक्वेल’ हे थॉमस जेफरसनचे अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यातील वाक्य असो की ‘आय डिसअप्रूव्ह ऑफ व्हॉट यू से बट आय व्हिल डिफेंड टू द डेथ युअर राइट टू से इट’ हे फ्रेंच क्रांतिकारक व्हॉल्टेअरचे विधान... लोकशाहीचा पुरस्कार करणारी व तिच्या रक्षणाची मूल्यं रुजवणाऱ्या विविध विचारांचा ते सहज परिचय करून देत.
.............................................................................................................................................
अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’ कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/2553
.............................................................................................................................................
पुण्यात त्यांची पत्रकारिता सुरू झाली १९६० च्या दशकात. त्यांची कारकीर्द संपली (नोकरी म्हणून) २००१ मध्ये, तीही पुण्यातच वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख म्हणून. या काळातील बदलतं पुणं त्यांचं लक्ष वेधून घेत होतं. त्यांना अस्वस्थ करत होतं. त्यातील एक बदल होता, पुण्यातील बदलत्या पानाच्या गाद्या. ते सिगारेट प्यायचे. त्यामुळे साहजिकच त्यांचा जवळून संबंध यायचा. हा बदल होता तो पानाच्या गाद्या बहुतांशपणे उत्तर भारतीय लोकांच्या होत आहेत, तेही पुण्यासारख्या शहरात, हे त्यांचं निरीक्षण होतं. साधू सर ते बोलून दाखवत होते २००० मध्ये. राज ठाकरे यांनी मराठी-अमराठीचं राजकारण २००८ च्या आसपास सुरू केलं. पण त्यासाठीची सुपीक जमीन समाजपातळीवर आधीच तयार होण्यास सुरुवात झाली होती. साधू सरांमधील पत्रकार-सामाजिक भाष्यकारानं ते कधीच टिपलं होतं. उत्तर भारतीय मंडळींची पानाची गादी आकर्षक असते. त्यात स्वच्छ, चकचकीत पितळी भांडी असतात. ही मंडळी जरा सवड मिळाली की, ती भांडी चमकवत असतात. रात्री उशिरापर्यंत काम करतात. या उलट मराठी लोकांना पानाच्या गाद्या चालवण्यात कमीपणा वाटत आहे. ज्या गाद्या आहेत त्या टापटीप ठेवत नाहीत. साहजिकच लोक उत्तर भारतीयांच्या पानाच्या गाद्यांकडे आकर्षित होत आहेत, हे त्यांनी एक-दोनदा वर्गात बोलून दाखवलं. समाजातील बदल दाखवून देताना पत्रकार म्हणून आपली निरीक्षणं कशी ठेवली पाहिजेत याचा तो अप्रत्यक्ष धडा होता.
साधू सरांचं लेखक म्हणून नाव निघालं की, बहुतांश वेळा ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या कादंबऱ्यांचीच चर्चा केंद्रस्थानी राहते. राजकारण-राजकारणी यांच्याबद्दलचं आपलं आकर्षण व त्याबाबत सर्वसामान्यांना असणारी जुजबी माहिती या पार्श्वभूमीवर या कादंबऱ्या आपल्यासाठी अलीबाबाची गुहा उघडणाऱ्या वाटतात. त्यातून त्यांची जास्त प्रसिद्धी होते. पण ‘मुखवटा’ ही कादंबरी भाषा (कादंबरीच्या निवेदनाचीच नव्हे तर पात्रांची, भूतकाळातील), पट (कॅनव्हॉस), समकालीन राजकीय-सामाजिक-आर्थिक संदर्भ आणि त्यांचे समाजजीवनावर पर्यायानं कुटुंबावर होणारे परिणाम (यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांचे संदर्भ) आणि साहजिकच कथा (उच्च-नीचतेच्या कल्पनांच्या ठिकऱ्या उडवणारा शेवट) अशा विविध दृष्टिकोनातून एक मोठं योगदान आहे. त्यासाठी लेखकाच्या छातीचा भाता मोठा असावा लागतो. येऱ्या गबाळ्याचं काम नोहे ते. पण ‘मुखवटा’च्या वाट्याला तशी चर्चा आली नाही... अजूनही फारशी येत नाही. कादंबरी म्हणजे केवळ ‘कोसला’ हेच आपल्या अभिजात रसिकतेचं उदाहरण म्हणून सांगणाऱ्या साहित्यक्षेत्रातील नवब्राह्मण्यवादाचा हा परिणाम असेल कदाचित. अपवाद म्हणायचा तर कुमार केतकरांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये त्यावर लिहिलेलं परीक्षण. ‘मुखवटा’च्याच आसपास प्रसिद्ध झालेली त्र्यं.वि. सरदेशमुखांची ‘डांगोरा एका नगरीचा’ ही कादंबरीही अशीच आहे.
.............................................................................................................................................
अरुण साधू यांच्या ‘मुखवटा’ कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3095
.............................................................................................................................................
ढासळती मूल्यव्यवस्था ही नेहमीच लेखकांच्या लिखाणाचा विषय असते. तशी ती साधू सरांच्या लिखाणाचाही होती. पत्रकारितेनं त्याला एक व्यापक अनुभवाचं परिणाम दिलं होतं. दिल्लीतील गृहमंत्रालयातील मुजोर अधिकाऱ्याची ती कथा... सामान्य माणसाचा छळ करणारी... ‘ग्लानिर्भवति भारत’ ही दै. लोकसत्ताच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली कथाही त्यातूनच आली. समकालीन वास्तवाचं धारदार चित्रण त्यात होतं.
मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रूजू झाल्यावर एक-दोनदा त्यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यावेळी ते खूप आस्थेनं बोलत. पण एक-दोन विषय बोलण्याचे राहूनच गेले. त्यापैकी एक होता आणीबाणीबाबतची त्यांची भूमिका. आम्ही ज्या वेळी शिकत होतो, त्या वेळी ते आणीबाणीचे समर्थक म्हणूनच ओळखले जात. पण मी त्यांचं ‘सत्तांध’ वाचलेलं होतं. अशोक जैन व त्यांनी मिळून ते लिहिलं होतं. त्यासाठी दिल्लीतील अनेक नेत्यांच्या भेटी, मुलाखती घेतल्या होत्या. त्यात आणीबाणीच्या वेळी केंद्रातील सत्तेत असणारे नेतेही होते. त्यातून इंदिरा गांधी यांनी आपली सत्ता वाचवण्यासाठीच व पुत्र संजय गांधीच्या आहारी जाऊनच आणीबाणी लादली हा निष्कर्ष आलेला होता. मग असं काय घडलं की साधू सरांचं मतपरिवर्तन झालं? विचारायचं होतं, राहून गेलं.
दुसरी गोष्ट ही त्यांच्याबद्दलची एक खंत आहे. ती म्हणजे २००२ मध्ये ‘लोकसत्ता’मधील त्यांच्या सदरात त्यांनी शहाबानो प्रकरणावर लिहिताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला तिलांजली देणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या घटनादुरुस्तीच्या निर्णयाची भलामण केली होती. तसं करणं म्हणजे एक प्रकारे लोकशाहीचं रक्षण होतं, असं त्यांच्या त्या लेखाचं सार होतं. लोकशाहीत अल्पसंख्याकांनाही तितकेच अधिकार असतात आणि या निर्णयातून काँग्रेसनं अल्पसंख्याकांना मंजूर नसलेल्या निर्णयाला फिरवत लोकशाहीचं रक्षण केल्याचा युक्तीवाद साधू सरांनी केला होता. तो लेख वाचल्यावर खूप वाईट वाटलं. कारण साधू सर पुरोगामी होते, महिलांना दुय्यम लेखण्याच्या विरोधात होते. मग ते अशी भूमिका कशी घेऊ शकतात? अल्पसंख्याकांमधील ५० टक्के असलेल्या महिलांना नैसर्गिक न्यायापासून वंचित ठेवणारा, त्यांचं जीवन पुरुषाच्या मनमानीवर सोडू्न देणारा निर्णय साधू सरांना कसा काय पटतो, असे अनेक प्रश्न पडले. कधीतरी विचारायचं होतं, आमच्या मनातील त्यांच्या प्रतिमेवर छोटा का होईना हा ओरखडा का पडू दिला, हे विचारायचं होतं, पण राहून गेलं...
.............................................................................................................................................
लेखक स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ दै. लोकमत (मुंबई)मध्ये पत्रकार आहेत.
ksaurabha@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment