असा ‘साधू’ आता होणे नाही!
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • अरुण साधू (१७ जून १९४१ - २५ सप्टेंबर २०१७)
  • Sat , 30 September 2017
  • संकीर्ण श्रद्धांजली अरुण साधू Arun Sadhu कुमार केतकर Kumar Ketkar दिनकर गांगल सिंहासन मुंबई दिनांक

‘अरुण साधू आता आपल्यात नाहीत’ या सुदेश हिंगलासपूरकरनं पाठवलेल्या एसएमएसनं २५ सप्टेंबरची सकाळ उगवली. दिवसभरावर त्याच बातमीचं गडद मळभ दाटून राहिलं. नांदेडमधील कार्यक्रम त्याच मळभात कसेबसे आटोपून औरंगाबादच्या दिशेनं प्रवास करताना अरुण साधू आठवू लागले. मी काही अरुण साधू यांच्या हाताखाली किंवा त्यांच्या सोबतही काम केलेलं नाही. त्यांच्या आणि माझ्या वयात एका पिढीचं अंतर आणि महत्त्वाचं म्हणजे, कर्तृत्वाच्या बाबतीत ते हिमालय तर मी त्या हिमालयाच्या पायथ्याचा एक खडाही असेन की नाही अशी स्थिती. खूप वेळानं जाणवलं ‘अरे, त्यांची जागा ​​मेंटॉरची आहे... एक अदृश्य ​​मेंटॉर’.

अरुण साधू यांची पहिली भेट बार्शीच्या साहित्य संमेलनात झाली. ते आणि कुमार केतकर ग्रंथालीच्या स्टॉलसमोर उभे होते. अरुण साधू हे नाव तेव्हा खूप मोठं होतं. आणीबाणीचं समर्थन करतात म्हणून कुमार केतकरांबद्दल एक सूक्ष्मशी अढी माझ्या मनामध्ये होती. मात्र अरुण साधूंच्या लेखनाची भुरळ होती. तेव्हा मी ‘सागर’ या दैनिकासाठी काम करत असे. दोघांचीही ओळख करून घेतली. दोघांनीही आवर्जून चौकशी केली. त्या दोघांचे नंबर आणि पत्ते घेतले (तेव्हा ही पद्धत होती!) पण, गप्पा मात्र जास्त केतकरांशी झाल्या. केतकर आणि साधूंची पुस्तकं विकत घेऊन त्यावर त्या दोघांकडूनही सह्या घेतल्या.

पुढे मुंबईला गेल्यावर ग्रंथालीच्या नायगावच्या कार्यालयात अरुण साधू यांना आवर्जून दोन-तीन वेळा भेटायला गेलो. अरुण साधू काहीतरी लिहीत आणि कुमार केतकर पुस्तकांची आवरासावर करत असायचे; असं त्या दोघांचं ग्रंथालीसाठी असणारं समर्पण थक्क करणारं होतं. (आता सांगायला हरकत नाही; आम्ही तरुण पत्रकार  ग्रंथालीचा उल्लेख तेव्हा ‘मठ’, दिनकर गांगल यांचा ‘मठाधिपती’, त्या मठाचे अरुण हे ‘साधू’ आणि केतकर म्हणजे ‘महाराज’ असा करायचो!) साधूंकडून मग आधी कोकण आणि मी नागपूरला नागपूर पत्रिका या दैनिकात रुजू झाल्यावर विदर्भाबाबत चौकशा व्हायच्या.

‘काय वाचता?’ असं एकदा अरुण साधूंनी विचारल्यावर मी पटपट मराठीतली काही नावं सांगितली तर त्यांनी विचारलं, ‘इंग्रजीतलं काय?’

त्यांना इंग्रजीतली काही नावं सांगितली. त्यात जॉर्ज ऑर्वेल हेही नाव होतं. मी म्हणालो ‘माझं सगळं शिक्षण जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये झालंय आणि तेही मराठवाड्याच्या अत्यंत ग्रामीण भागात. त्यामुळे इंग्रजी वाचायचा खूप कंटाळा येतो. अवघडही जातं.’

‘तरीही तुम्ही ऑर्वेल वाचला?’ त्यांनी विचारलं.

‘हो’. Animal Farm, 1984 ही नावं ही सांगितली. ‘पण त्यासाठी डिक्शनरी खूपच फॉलो करावी लागली’, असं मी तक्रारवजा स्वरात सांगितलं.

साधू, हलकसं हसले आणि म्हणाले ‘एरिक सेगल, जेफ्री आर्चर वाचत चला. तुलनेनं इंग्रजी सोपं आणि समजायलाही सुबोध आहे. दररोज एक तरी इंग्रजी वृत्तपत्र वाचा आणि आवडीच्या बातम्यांपासून सुरुवात करत मग अग्रलेखाकडे वळा. हळूहळू सवय होईल इंग्रजीची’. जेफ्री आर्चरची ‘फर्स्ट अमंग इक्वल्स’ आणि एरिक सेगलची ‘​​मॅन, वुमन अँड चाईल्ड’ ही त्यांनी सांगितलेली नावं अजूनही आठवतात. त्यांच्याकडून बाहेर पडल्यावर फोर्टात जाऊन ती दोन्ही पुस्तक लगेच विकत घेतली. नागपूरच्या परतीच्या रेल्वे प्रवासात त्यातल्या ‘​​मॅन, वुमन अँड चाईल्ड’चा फडशाही पाडला.

साधूंशी माझं आणखीन एक नातं जुळलं. १९८०-८१ च्या सुमारास राज्य विधिमंडळाचं वृत्तसंकलन करणारी जी पिढी बाजूला झाली किंवा बाजूला व्हायला सुरुवात झाली, त्यात मुंबईतून अरुण साधू, विद्याधर दाते, दिनकर रायकर, मधु शेटे; तर नागपुरातून दत्ता कवीश्वर, लक्ष्मण त्र्यंबक जोशी, युधिष्ठिर जोशी ही मंडळी होती. त्यांच्या जागी येणाऱ्यांत मुंबईतून प्रकाश जोशी, प्रकाश अकोलकर, भारतकुमार राऊत, धनंजय कर्णिक, दिलीप चावरे; तर नागपुरातून मी, सुधीर पाठक, मोरेश्वर बडगे असे काही पत्रकार होतो. बहुसंख्य नागपूरकर पत्रकारांचं विधिमंडळ वृत्तसंकलन नागपूरपुरतंच मर्यादित राहिलं. मी मात्र नागपूर आणि मुंबई असं शटल करत राहिलो. याच काळात अरुण साधूंशी ओळख वाढत गेली. विधिमंडळाच रिपोर्टिंग कसं करायचं हे अनेकदा अरुण साधू आणि मधुकर भावे आम्हाला सांगत असत. पण, का कोण जाणे मी साधूंना जरा जास्तच प्रश्न विचारत असे, अनेकदा माझी कॉपीही दाखवत असे. माझी लिहिलेली बातमी बघून ते काही सूचना करत. याच काळात मुंबईतून ‘मुंबई सकाळ’साठी राधाकृष्ण नार्वेकरांचे फोन येत असत. विधिमंडळातलं कामकाज फोनवरून सांगत असताना नार्वेकरही काही सूचना-सुधारणा करत असत. अरुण साधूंमुळे तारांकित आणि अतारांकित प्रश्न यातील भेद, लक्षवेधी सूचना, विधेयक, अध्यादेश, आदेश, निर्देश यांचे नेमके अर्थ आणि त्याचा वापर, ते केव्हा आणि कोण जारी करतं इत्यादी तपशील समजत गेले. विधेयक, कपात सूचनांवरील चर्चा ऐकण्याचं महत्त्व त्यांनीच समजावून सांगितलं.

तेव्हा नागपूरला वसंतराव लुले नावाचे एक कामगार नेते होते. बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी १९५६ साली नागपूरला आल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सीताबर्डीवरील ज्या हॉटेलात राहिले; त्या श्याम हॉटेलच्या मागच्या गल्लीत एका दुमजली वाड्यात पहिल्या मजल्यावरच्या दीड खोलीत वसंत लुले यांचा संसार आणि उरलेल्या अर्ध्या खोलीत त्यांचं कार्यालय होतं. ते ‘चर्चा’ नावाचं एक साप्ताहिक प्रकाशित करत. ‘चर्चा’चा दिवाळी अंकही निघे. हा दिवाळी अंक म्हणजे चर्चा साप्ताहिकाचे वर्षभरातले काही अंक प्रकाशित करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचा प्रयत्न असे. लुले यांचा माझ्यावर काय लोभ होता माहिती नाही, पण या दिवाळी अंकाचं म्हणजे, संपादकीय संस्कार, मुद्रित शोधन, पाने लावणे ही कामं ते माझ्यावर सोपवत आणि त्यापोटी ५०० रुपये मानधन देत. तेव्हा ५०० रुपये ही फार मोठी रक्कम होती. हे काम सुरू केल्यावर मी पहिल्याच वर्षी अरुण साधू यांना कथा मागितली आणि त्यांनी ती दिलीही; एवढंच नाही तर मानधनही घेणार नाही असं सांगितलं आणि पुढे चार-पाच वर्ष कथा देताना मानधन न घेण्याचा शब्द पाळलाही! मदत करण्याचा साधूंचा हा नि:शब्द गुण मला खूपच भावला. पुढे कळलं की, लुले त्यांचे जुने स्नेही होते; म्हणजे एकाच दगडात दोन पक्षांना समाधान देण्याचा चाणाक्षपणा साधूंनी दाखवलेला होता!

अरुण साधूंचं मूळ विदर्भातलं; यवतमाळ जिल्ह्यातलं. दरम्यान आप्तजन चरितार्थासाठी नागपूरला स्थायिक झालेले होते. त्यामुळे वर्षातून साधूंच्या एक-दोन तरी चकरा नागपूरला होतं. त्यामुळे पुढे भेटी थोड्याशा नियमित होत गेल्या; घसट थोडी वाढतच गेली; मात्र आमच्यात कौटुंबिक स्नेह निर्माण झालाच नाही. त्यांचा फोन येत असे आणि ते प्रताप नगरच्या चौकात येऊन उभे राहत. मग माझ्या कारमधून आम्ही कुठेतरी फिरत असू. ते फिरणं निरर्थक असे परंतु गप्पा होत. साधू शंभर टक्के अबोल होते असा काही माझा अनुभव नाही. ते बऱ्यापैकी मोकळे होते; छान गप्पा मारत. मात्र निर्विवाद मोठा कादंबरीकार, इंग्रजी-मराठीत समर्थपणे लिहिणारा पत्रकार असा काही तोरा त्यांच्या बोलण्या-वागण्यात किंचितही नसे. विशेषत: राजधानीच्या ठिकाणी काम करणाऱ्या पत्रकारांत जगातली सर्व माहिती आणि शहाणपणाचं कंत्राट घेतल्याच्या भाव असतो; तसं काही अरुण साधू यांच्यात नव्हतं. टोकाचा संयम बाळगत समोरच्याचं म्हणणं ऐकून घेण्याची सहिष्णुता त्यांच्यात होती. मीही अल्पशी अक्कल त्यांच्यासमोर मोठ्या धाडसानं पाजळत असे. काही वेळा ते म्हणत, ‘तुमची निरीक्षणं छान आहेत. कारण तुम्ही ग्राउंड लेव्हलला काम करता’. मला बरं वाटत असे. कदाचित असं म्हणून ते माझ्या बडबडीला आळा तर घालत नव्हते ना, असं अशात वाटू लागलंय. दरम्यान साधूंचं लेखनही वाचनात येत गेलं. कादंबरी, कथा, वैचारिक लेखन, अनुवाद... असा त्यांचा आवाका थक्क करणारा होता. त्यानिमित्तानंही बोलणं व्हायला लागलं. ते फारच मोठ्या उंची आणि ताकदीचे कादंबरीकार होते; पात्र ​एस्टॅब्लिश करण्याची त्यांची हातोटी अचंबित करणारी होती. आठवा ‘मुंबई दिनांक’, ‘सिहांसन’मधली पात्रांची गर्दी तरी त्या पात्रांनी घातलेली मोहिनी! साधूंच्या कमी बोलण्याचं कारण सूक्ष्म निरीक्षण शक्तीवर भर हे असावं. त्यातून ही पात्रं शब्दात उतरली आणि वाचकांना त्या पात्रांची भुरळ पडली असावीत. ‘तुमची पात्र द्विधा मन:स्थितीत असतात’ असं मी एकदा त्यांना म्हणालो तेव्हा त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. फक्त ते चष्म्याआडच्या डोळ्यातून हलकेच हसल्याचा भास झाला.

संपादक म्हणून अरुण टिकेकरांचं पर्व सुरू झाल्यापासून अरुण साधू ‘लोकसत्ता’मध्ये अतिशय नियमित लिहू लागले. अनेकदा ते नागपूरला येत, तेव्हा त्यांचं लेखन अपूर्ण असे किंवा त्यांना पूर्णच मजकूर लिहायचा असे. त्यांचा सकाळी फोन येत असे आणि त्यांनी केलेलं लेखन मी कार्यालयात जाऊन ते ऑपरेट करून घेत असे. नंतर साधू ते लेखन घेऊन किंवा पूर्ण लेखन करण्यासाठी माझ्यासोबत कार्यालयात येऊ लागले. हस्ताक्षर हळूहळू बिघडत चाललंय, असं त्यांचं मत होतं; ते संगणकावर टंकलेखन करणाऱ्याला समजेल का नाही याविषयी शंका असल्यानं मजकूर ऑपरेट होईपर्यत साधू थांबत, मग मुद्रितशोधन करून देत. या काळात अनेकदा साधू कार्यालयातील माझ्या टीममधल्या मुलांशी गप्पा मारत; ती मुलं इतकी लहान, पण साधू त्यांचं म्हणणं लक्ष देऊन ऐकत. एवढा मोठा माणूस आपल्या कार्यालयात येतो, रिपोर्टिंगच्या वर्क स्टेशनवर बसतो आणि काम करतो याचं मोठं अप्रूप वाटत असे.

‘लोकसत्ता’च्या निवासी संपादकपदाची सूत्रं मी हाती घेतल्यावर अरुण साधू नागपूरला आले. नेहमीप्रमाणे त्यांचा सकाळी फोन आला आणि ते आवर्जून कार्यालयात आले. त्यांना मला संपादकाच्या खुर्चीत बघायचं होतं. मला ते फारच भारी वाटलं. एवढा मोठा माणूस त्यांच्या आणि माझ्या वयातलं तेरा-चौदा वर्षाचं अंतर लक्षात घेता आपल्याविषयी इतकी सदभावना बाळगतो ते खूपच भरून येण्यासारखं का नसावं? अरुण साधूंना घेऊन कार्यालयात आलो. त्यांना संपादकाच्या खुर्चीत बसण्याची विनंती केली, पण त्यांनी नकार दिला. मी मुख्य वार्ताहर असताना ते कार्यालयात येत, तेव्हाही बाजूच्या खूर्चीत बसत. हा असा दुसऱ्याचं स्थान मान्य करण्याचा त्यांच्यातला उमदेपणा दाद देण्यासारखा होता. अरुण साधूंमध्ये लपलेलं साधेपण आणि त्याआडचा मोठेपणा हळूहळू पण तुटक-तुटक मनावर उमटत गेला.

मुंबईतून नागपूरला वृत्तसंकलनासाठी येणाऱ्या अनेक इंग्रजी पत्रकारांकडे अरुण साधू माझ्या नावाची शिफारस करत. नागपूरला आले की हे पत्रकार आवर्जून भेटत. मग मी त्यांच्यासोबत फिरत असे. त्यांच्यासोबत फिरताना राज्याचा दृष्टिकोन, त्यांची काम करण्याची शैली, त्यांची भाषा याचं ते एक प्रकारचं शिक्षण होतं. हे तेव्हा नाही पण, सिनियर पोझिशनला गेल्यावर लक्षात आलं. पत्रकारितेचा हा संस्कार अशा अदृश्यपणे वेगवेगळ्या माध्यमातून अरुण साधूंच्यामुळे माझ्यावर होत गेला.

समोरच्याला जमिनीवर आणण्यासाठी ‘पंच’ मारण्याची अरुण साधूंची शैली हटके होती. माझा ‘डायरी’ हा स्तंभ लोकप्रिय होत गेला. त्यावर, ‘चांगलं लिहिताय. आता मोठ्या लेखनाचा विचार करा’, असं ते म्हणाल्यावर मी म्हणालो, ‘मी स्वत:ला लेखकबिखक समजत नाहीये. हे लेखन काही तुमच्यासारखं सर्जन नाहीये. पत्रकारितेतले अनुभव ललित शैलीत आजवर कोणी लिहिले नाहीत; मी लिहितोय म्हणून त्याचं कौतुक आहे, बस्स इतकंच’.

तेव्हा साधू त्यांच्या परिचित शैलीत मंदसे हसले आणि त्यांनी शालजोडीतून हाणताना म्हटलं, ‘तुमचं म्हणणं बरोबर आहे. महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला समजलंय हे जास्त महत्त्वाचं आहे. पण हे लेखन सुरू ठेवा. हेही लेखन आवश्यक आहे. ते साहित्य आहे का नाही, हे नंतर ठरेल.’ ग्रंथालीनं प्रकाशित केलेल्या माझ्या ‘नोंदी डायरीनंतरच्या’ पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेतही त्यांनी अनेक ‘पंच’ मारले आहेत.

माझ्या मनात एका स्त्रीप्रधान राजकीय कादंबरीचा विषय अनेक वर्षांपासून घोळतो आहे. ते तीन-चार वेळा लिहिण्याचा प्रयत्नही केला पण अरुण साधूंचा प्रभाव जाईचना. हे प्रभावप्रकरण एकदा मी ​साधूंना सांगितलं, ‘अजून मराठी राजकीय कादंबरी तुमच्यापुढे सरकलेलीच नाहीये’. तर ते म्हणाले, ‘जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था, निवडणुकांची इव्हेंट झालीये. तेव्हा आणि आताच्या राजकारणाचे सगळेच संदर्भ बदलले आहेत, निवडणुकीचा बाज पूर्ण बदलला आहे’. मग खास साधू शैलीतला पंच आला, ‘प्रयत्न करा पुन्हा, पुन्हा’. मग हसत पुढे म्हणाले, ‘माझ्या कादंबरी लेखनाबद्दल तुम्हाला वाटतं तसं मराठी साहित्य जगताला मात्र वाटत नाही’. त्या हसण्यात सल जाणवली. जनस्थान सन्मान प्राप्त झाल्यावर त्यांच्या मनातली ही सल दूर झाली असावी.

अरुण साधू ठाम असत. एक प्रसंग आठवतो - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वारे नागपुरात वाहू लागले होते. एक दिवस भास्कर लक्ष्मण भोळे आणि मी बोलत असताना अरुण साधूंना अध्यक्ष करू या, असं आमच्या बोलण्यात आलं. मग तिथूनच मी अरुण साधूंना फोन केला. भोळेही बोलले. अरुण साधूंनी थेट नकार दिला नाही, पण ‘थोडंसं थांबा’ असं ते म्हणाले. मग आम्ही विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकरांना हे सांगितलं. म्हैसाळकर नेहेमीप्रमाणे गूढ हसले आणि म्हणाले, ‘साधूंच्या नावाला विदर्भातून एकमुखी पाठिंबा मिळणार नाही’. ते स्वाभाविक होतं. साधूंचा स्वतंत्र विदर्भाला असलेला विरोध जगजाहीर असल्यानं विदर्भवादी मंडळी त्यांना मतदान करतील याची खात्री नव्हती. पण मनोहर म्हैसाळकरांनी पाठिंबा देण्याचं कबूल केलं. काही दिवसांनी पुन्हा साधूंना फोन केला. या काळात ते बहुदा महाराष्ट्रातल्या त्यांच्या काही मित्रांशी बोलले असावेत. अरुण साधू जरा दरडावणीच्या अपरिचित स्वरात म्हणाले, ‘हे बघा बर्दापूरकर, माझी पहिली अट अशी की, निवडणुकीसाठी मी प्रचार करणार नाही. प्रचाराचं पत्रकसुद्धा काढणार नाही. महत्त्वाचं म्हणजे माझी संयुक्त महाराष्ट्राची भूमिका मुळीच सोडणार नाही’. त्यांच्या म्हणण्याचा संदर्भ माझ्या लगेच लक्षात आला. मी त्यांना म्हणालो की, पत्रकारांना यासंदर्भात कायमचं गप्प करता येणार नाही, पण शक्यतो तुम्ही स्वत:हून बोलू नका. हा विषय ताणला जाऊ नये असं मला वाटतं. ते अखेर साधूंनी मान्य केलं. मग भास्कर भोळेही त्यांच्याशी सविस्तर बोलले. यथावकाश अरुण साधूंचं संमतीपत्र आलं.

भास्कर लक्ष्मण भोळे सूचक आणि मी अनुमोदक असा अरुण साधूंचा उमेदवारी अर्ज रीतसर दाखल झाल्यावर दोन-तीन दिवसांनी मुंबई आणि औरंगाबादहूनही अरुण साधू यांच्या उमेदवारीचे अर्ज दाखल झाले. मराठवाडा साहित्य परिषदेत दाखल झालेल्या अर्जावर दिग्गज समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांची सही होती. साधूंच्या उमेदवारीला यामुळे बळच मिळालं. साधू प्रचारासाठी फिरले, पण त्यांनी प्रचार केलाच नाही. त्यांच्यासोबत असलेलं कुणीतरी अरुण साधू निवडणुकीला उभे आहेत तुम्ही मतदान करा असं सांगत असे. अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मतदारांच्या गाठीभेटीसाठी अरुण साधू नागपूरला आल्यावर प्रथेप्रमाणे पत्रकार परिषद झाली. पत्रकारांना आधीच मिन्नतवाऱ्या करून कृपा करून स्वतंत्र विदर्भाच्या संदर्भातील प्रश्न विचारू नका असं तयार केलेलं होतं. बऱ्याच वर्षांनंतर पत्रकार परिषद मी मागच्या बाकावर बसून अनुभवली. पत्रकार परिषद संपली आणि मी आणि भोळेंनी सुस्कारा सोडला.

पण, हे इथं संपायचं नव्हतं अरुण साधू प्रचारासाठी येऊन गेले आणि विदर्भांचा मुद्दा निघाला नाही हे काही विदर्भवाद्यांना रुचलं नाही. मग त्यासंदर्भात नेहमीप्रमाणे बरीच वृत्तपत्रीय वादावादी सुरू झाली. त्या काळात बहुतेक दररोज सकाळी मी प्रकाशित बातम्यांची माहिती साधूंना देत असे. त्यावर फारशी काही प्रतिक्रिया ते व्यक्त करत नसतं. हळूहळू स्वतंत्र विदर्भ आणि अरुण साधू विरोध वृत्तपत्रांतून बराच वाढतोय असं लक्षात आलं. तेव्हा एकदा भास्कर लक्ष्मण भोळे, मनोहर म्हैसाळकर आणि मी भेटलो. पण मनोहर म्हैसाळकरांनी आश्वस्त केलं की, विदर्भाची कमीत कमी पासष्ठ ते सत्तर टक्के मतं अरुण साधूंनाच मिळतील. मराठवाडा अरुण साधूंच्या बाजूनं होता. मुंबई आणि पुण्यातूनही अरुण साधूंना भरघोस पाठिंबा होता. त्यामुळे अरुण साधू यांच्या विजयाबद्दल दुमत होण्यात काहीच कारण नव्हतं. सांगितल्याप्रमाणे खरंच अरुण साधूंनी पत्रक काही काढलं नाही. मीच एक मसुदा तयार करून दिनकर गांगल यांच्याकडे पाठवला. बहुदा गांगलांनीच प्रचाराचा अंतिम मसुदा तयार केला.

अपेक्षेप्रमाणे अरुण साधू यांचा दणदणीत विजय झाला. संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून साधू नागपूरला नागपूरला आले. साधूंचा साधेपणा असा की, ते ना हॉटेलमध्ये उतरले ना त्यांनी महामंडळाचं वाहन घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी संमेलनस्थळाला नियोजित अध्यक्षांनी भेट दिली. तिथे अर्थातच पत्रकार जमलेले होते. व्यासपीठाचं अवलोकन करून अरुण साधू खाली आले. पत्रकार परिषदेची तयारी होती. विदर्भाचा मुद्दा न निघता पत्रकार परिषदही जवळजवळ पार पडली. सगळेजण खुर्चीतून उठण्याच्या तयारीत होते आणि तेवढ्यात तो स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आलाच! उठण्याच्या तयारीत असलेले अरुण साधू पट्कन खाली बसले. मृदू आवाजात पण अत्यंत ठाम स्वरात त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची भूमिका मांडली. स्वतंत्र विदर्भाला असलेला विरोध स्पष्ट केला आणि ‘संमेलन नागपूरला होत असलं तरी माझ्या या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही’ हेही जाहीर करून टाकलं! मग पत्रकार परिषदेमध्ये बरीच खडाजंगी झाली. मी मागे बसून गपगार होऊन हे पाहत होतो. कुणालाही न बधता सस्मित अरुण साधू त्यांच्या भूमिकेवर ठाम होते.

संमेलन सुरू झालं. स्वतंत्र विदर्भांचा पुरस्कार करणारी मंडळी काही शांत बसली नव्हती. खुल्या संमेलनात एक स्वतंत्र विदर्भांच्या मागणीचा ठराव असावा अशा हालचाली सुरू झाल्या. पत्रकारांनी पुन्हा अरुण साधूंना गाठलं. अरुण साधूंनी अतिशय परखडपणानं सांगितलं की, स्वतंत्र विदर्भाचा ठराव खुल्या संमेलनात संमत होणार असेल तर मी खुलं संमेलन सोडून निघून जाईल आणि एकदम शांतता परसली. पुढे काही लोकांच्या मध्यस्थीनं (त्यात मनोहर म्हैसाळकरांचा विशेष पुढाकार होता) स्वतंत्र विदर्भाचा ठराव काही खुल्या संमेलनात चर्चेला आला नाही आणि संभाव्य रणकंदन टाळलं.

नंतरचं हे साहित्य संमेलन सांगलीला झालं. तिथं उद्घाटनासाठी तेव्हा राष्ट्रपती असलेल्या प्रतिभा पाटील येणार होत्या. प्रतिभा पाटील राष्ट्रपतीपदी होत्या त्यामुळे त्यांच्याबद्दल नकारात्मक काही बोलणं अशिष्ट ठरेल. पण त्यांच्या शिष्टाचाराचा जो अतिरेक आला तो काही कुणाही सुसंस्कृत माणसाला रुचणारा नव्हता. खरं तरं, प्रतिभाताईंनी स्वतःच पुढाकार घेऊन प्रशासनाला सांगायला हवं होतं, पोलिसांना सूचना द्यायला हव्या होत्या की, साहित्य संमेलनाचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष तसंच ज्येष्ठ सारस्वतांना सुरक्षेच्या कडेकोट अटींचा त्रास होऊ देऊ नका, परंतु प्रतिभाताईंनी काही असं सौजन्य दाखवलं नाही. पोलिसांनी नियमानुसार कठोर भूमिका घेऊन राष्ट्रपती ज्या व्यासपीठावर येणार आहेत आहे, तेथपासून ३०० का ४०० मीटर्स मीटर्स पलीकडे सर्वांची वाहनं उभी करावीत आणि तेथून पायी चालत यावं आणि राष्ट्रपती येण्याच्या पंधरा मिनिटं आधी सर्वजण व्यासपीठावर हजर असलेच पाहिजेत अशा अटी टाकल्या. राष्ट्रपतींच्या शिष्टचारानुसार ते योग्य असलं तरी त्यामुळे सारस्वतांचा मान राखला जात नव्हता. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सारस्वत स्वभाविकपणानं कुठल्याही सरकारी पदापेक्षा मोठे होते. मराठी सारस्वतांना प्रशासनाकडून घातलेल्या अटी अत्यंत जाचक आणि अपमानास्पद वाटल्या. त्या विरुद्ध एकटे उभे राहिले ते अरुण साधू. त्यांनी त्या अटी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रं देण्यासाठी ते संमेलनस्थळी आलेच नाहीत. मावळत्या अध्यक्षांकडून सूत्रे स्वीकारं स्वीकारली न जाण्याशी अभूतपूर्व घटना सांगलीत घडली. संमेलन स्थळी तर सोडाचं, सांगलीकडे त्यांनी वळूनही बघितलं नाही. साधू अनाग्रही होते असं नेहमीच म्हटलं गेलं, पण त्याच वेळी ते भूमिकांबाबत कसे ठाम होते याचंही हे उदाहरण आहे. तरी ‘सिंहासन’ या कादंबरीला पुरस्कार देण्याची शिफारस सरकारनं नाकारली, तेव्हा साधू गप्प का राहिले, हे कधी कळलं नाही.

पुणे विद्यापीठात शिकवत असताना जातीच्या नावाखाली जे काही घडलं, तेव्हा पुण्यातील तथाकथित पुरोगामी आणि सर्व सहकारी एकदिलानं आणि ठामपणे पाठिशी उभे राहिले नाहीत, हीदेखील खंत ती सर्व हकीकत सांगताना अरुण साधू यांनी व्यक्त केली होती.

अशात, म्हणजे २०१४ नंतर आमची भेट झाली नाही, केवळ फोनवर बोलणं व्हायचं. बब्रुवान रुद्र्कंठावारच्या पुस्तकाला अरुण साधू यांनी लिहिलेली प्रस्तावना अप्रतिम आहे, त्यावरून पाच-सहा महिन्यांपूर्वी फोनवर आमचं सविस्तर बोलणं झालं होतं. नयन बाराहाते आणि संदीप काळे संपादित करत असलेल्या ‘संपादकांची आई’ या प्रकल्पासाठी लिहावं ही विनंती करण्यासाठी अशात आमचं बोलणं झालं, ते शेवटचं. लिहिण्याचं साधूंनी मान्य केलं होतं. ते लिहिलं का नाही, हे कळलं नाहीये.

किती लिहावं? अरुण साधू यांची अशी अनेक स्मरणं मनात वसलेली आहेत.

असा ‘साधू’ आता होणे नाही!

.............................................................................................................................................

लेखक दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

अरुण साधूंच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......