अजूनकाही
गेल्या दोन दशकांमध्ये चित्रपटनिर्मितीच्या सर्वच अंगांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. अनेक जुन्या गोष्टी कालबाह्य झाल्या आणि लयाला गेल्या. अनेक नवीन गोष्टी आल्या. तंत्रज्ञान बदललं, माणसं बदलली, चित्रपटांचं व्याकरण बदललं. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या पहिल्या व्यवसायिक चित्रपटासोबतच आल्या आणि अजूनही टिकून आहेत. त्या बदलायचा कोणी विचारही करत नाही. अशीच एक गोष्ट म्हणजे चित्रपटांचे पोस्टर्स. चित्रपटांचं प्रमोशन करण्याच्या पद्धतीमध्ये इंटरनेटमुळे क्रांती आली. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग यांनी फिल्म प्रमोशनमध्ये क्रांती आणली. टेलिव्हिजनचा आणि रेडिओचा प्रसार जसा जसा वाढत गेला तसा टीव्ही आणि रेडिओ स्पॉट्सच्या माध्यमातून फिल्म प्रमोशनचा कल जास्तीत जास्त दृक्श्राव्य बनण्याकडे जाऊ लागला. पण महापुरात लव्हाळी टिकून राहतात तशी चित्रपटाची पोस्टर्स अजूनही टिकून आहेत. आजही शेकडो प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाचं पहिलं इम्प्रेशन त्याच पोस्टर बघूनच तयार होतं.
चित्रपटाच्या मार्केटिंगमध्ये AIDA ही संकल्पना महत्त्वाची आहे. AIDA हा चित्रपटाच्या मार्केटिंगचा चार टप्प्यांमधला फॉर्म्युला आहे. AIDA चा लॉंगफॉर्म आहे - Attention, Interest, Desire, Action. यातल्या Attention म्हणजे पोटेन्शियल प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणं या पहिल्या टप्प्यात चित्रपटाचं पोस्टर हा महत्त्वाचा घटक असतो. चित्रपटाचं पोस्टर बघून प्रेक्षकांच्या मनात आपण हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघितला पाहिजे या भावनेचं बीज त्याच्या जाणिवांमध्ये किंवा नेणिवांमध्ये पेरलं गेलं पाहिजे असा उद्देश असतो. निर्मात्यांच्या डोळ्यांसमोर आपला पोटेन्शियल प्रेक्षक कुठल्या आर्थिक स्तरातून, सामाजिक वर्गातून, जास्त करून कुठल्या राज्यातला किंवा कुठल्या वयोगटातला आहे याचे आडाखे बांधलेले असतात. त्यांना डोळ्यासमोर ठेवून पोस्टरवर काय असावं याचा निर्णय घेतला जातो. आपल्या देशात जितकी विविधता आहे तिचं प्रतिबिंब या पोस्टरच्या निर्मितीमध्ये उमटतं. याची काही रोचक उदाहरणं आहेत.
दाक्षिणात्य चित्रपट हे एका महानायकाभोवती फिरतात. या चित्रपटांमध्ये नायिका आणि इतर व्यक्तिरेखा दुय्यम असतात. तर तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांच्या सगळ्यात पहिल्या पोस्टरवर नायकाचीच छबी जागा व्यापून असते. चित्रपटातल्या इतर व्यक्तिरेखांना एक तर तिथे जागा मिळत नाही किंवा पोस्टरच्या कुठल्यातरी कोपऱ्यात ठिपक्यांसारखे दिसत राहतात. भोजपुरी चित्रपटांचे पोस्टर बघून Claustrophobic असण्याचा अनुभव येतो. एकाच पोस्टरमध्ये नायक, नायिका, चित्रपटातल्या महत्वाच्या व्यक्तिरेखा, नायिकेच्या अंगप्रदर्शनाची छबी, माऱ्यामाऱ्यांची दृश्यं, आगीचा उसळलेला डोंब आणि इतर अनेक गोष्टी खच्चून भरलेल्या असतात. एका तिकिटाच्या दरात तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी थिएटरमध्ये बघायला मिळतील असा संदेश भोजपुरी चित्रपटांच्या निर्मात्यांना आपल्या प्रेक्षकांना या पोस्टरमधून द्यायचा असतो.
एखाद्या देशभरात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचे पोस्टर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेले असतात. सनी देओल आणि सलमान खानच्या 'जीत' चित्रपटाचं उदाहरण रोचक आहे. सनी देओल आणि एकूणच देओल परिवार पंजाबमध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे 'जीत'च्या पंजाबमधल्या पोस्टरमध्ये सनी देओलची छबी मोठी होती. याउलट निजाम टेरिटरीमध्ये (मराठवाडा, आंध्र प्रदेशचा काही भाग) इथं सलमान मोठा स्टार असल्यानं या भागातल्या पोस्टरवर सलमानची छबी मोठी होती.
आपल्या पुरुषप्रधान व्यवस्थेत चित्रपटांमधल्या भूमिकांमध्ये नायिकेवर अन्याय होतोच, तसा तो पोस्टरवरील स्पेसमध्येही होतो. त्यांना क्वचितच पोस्टरवर मोठी जागा मिळते. मात्र श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित जेव्हा एन भरात होत्या, तेव्हा अनेकदा पोस्टरवर त्या नायकांपेक्षा मोठ्या असायच्या. आता संजय लीला भन्साळी त्यांच्या 'पद्मावती' चित्रपटाचं पोस्टर वेगवेगळ्या टप्प्यांत प्रदर्शित करत आहेत. त्यात दोन स्टार असणाऱ्या नायकांच्या अगोदर त्यांनी दीपिका पदुकोणची छबी असणार पोस्टर प्रदर्शित केलं. दीपिकाची स्टार पॉवरच त्यातून अधोरेखित झाली. पण हा नियम सिद्ध करणारा अपवाद.
चित्रपटांच्या पोस्टरमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आयकॉनग्राफी म्हणजे चित्रपटाची थीम काय आहे हे एखाद्या दिलखेचक व्हिज्युअलच्या माध्यमातून दाखवणं. या प्रकारच्या पोस्टरमध्ये फारसं काही न दाखवता बरंच काही सांगितलं जातं. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’चं पोस्टर या प्रकारात येतं. हाताची मुठी वळलेली आहे आणि सगळ्यात मधल्या बोटाच्या लिपस्टिकची बाटली आहे. हे व्हिज्युअल चित्रपटाबद्दल बरंच काही सांगून जातं. काही चित्रपटांच्या पोस्टरवर चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान घेतलेल्या दृश्यातली एखादी इमेज कॅप्चर करून पोस्टरवर वापरली जाते. काही चित्रपटांच्या पोस्टरसाठी खास प्रिन्सिपल फोटोग्राफी केली जाते.
हँडमेड पोस्टर्सची आपल्याकडे मोठी परंपरा आहे. या प्रकारचे पोस्टर अगदी नव्वदच्या दशकापर्यंत मार्केटिंग मटेरिअल म्हणून वापरलं जात होतं. अमिताभ बच्चनच्या 'दिवार' यासंदर्भात अनेकांना आठवत असेल. या प्रकारच्या पोस्टरचा मोह आजही दिग्दर्शकांना होतो. प्रभू देवाला 'रावडी राठोड' आणि इम्तियाज अलीला 'रॉकस्टार'मध्ये असे हॅण्डमेड पोस्टर्स करण्याचा मोह आवरला नव्हता. पण हा प्री -डिजिटलायझेशन काळ होता. आता पोस्टरची सगळी काम डिजिटलीच होतात. पोस्टर्स डिजिटली करण्याचे अनेक फायदे आहेत. डिजिटली तयार केलेली पोस्टर्स ही अधिक 'चकचकीत' आणि नेत्रसुखद असतात. छपाई करताना ते अधिक सोयीचे पडतात.
चित्रपटांच्या पोस्टरवर अनेकदा दिग्दर्शकाचा न पुसता येणारा ठसा असतो. हॉलिवुडमध्ये टारंटिनोचं नाव लगेच डोळ्यासमोर येतं. आपल्याकडे असा दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. अनुराग अनेकदा चित्रपटनिर्मितीच्या अनेक आघाड्यांवर लढत असताना आणि वेळ ही लक्झरी असताना आपल्या फिल्मच्या पोस्टरसाठी खूप वेळ देतो. अनेक दिग्दर्शक डिझाईनरला आपल्याला पोस्टरमध्ये काय अपेक्षित आहे याची आऊटलाईन सांगून बाकी जबाबदारी त्याच्यावरच टाकतात. सहसा डिझाइनरच्या कामात ढवळाढवळ करत नाहीत. अनुराग मात्र याला लखलखीत अपवाद आहे. त्याच्या सर्वच चित्रपटांचे पोस्टर हे 'युनिक' असतात. मला स्वतःला त्याचं 'देव डी'चं पोस्टर प्रचंड आवडतं. अर्थातच मला चित्रकलेची किंवा दृश्यकलेची फारशी जाण नसल्यामुळे मी पोस्टरच्या कंटेंट (सिम्बॉलिझ्म, पात्रांची प्लेसमेंट, दिग्दर्शिय विधान) वरूनच त्याला जज करू शकतो ही माझी मर्यादा.
'देव डी'ची चार-पाच पोस्टर्स आवर्जून गुगलवर शोधून बघा. देवच्या आयुष्यात असलेलं स्त्रियांचं महत्त्व, पारोचं त्याच्यात विरघळून गेलेलं अस्तित्व, मेटल गिटारचा सिम्बॉलिक वापर ही या पोस्टरची खासियत. 'रामन राघवन २.०'चं पोस्टरही रामन आणि राघव या एकाच व्यक्तिमत्त्वाच्या दोन बाजू कशा आहेत हे फार उत्तमपणे दाखवतं. 'ब्लॅक फ्रायडे', 'गर्ल इन यलो बूट्स' , 'गँग्ज ऑफ वासेपूर' आणि 'अग्ली'चं पोस्टर चित्रपटाबद्दल एक विधान करून जाणारं. दिबांकर बॅनर्जी, हंसल मेहता आणि विक्रमादित्य मोटवाणेच्या चित्रपटांची पोस्टर्स पण आवर्जून बघण्यासारखी असतात.
बॉलिवुडच्या प्रत्येक क्षेत्राला उचलेगिरीची लागण झाली आहे. चित्रपटांच्या कथा, संगीताच्या चाली चोरून समाधान होत नाही म्हणून बॉलिवुड, हॉलिवुड आणि इतर देशांच्या चित्रपटांच्या पोस्टरची उचलेगिरी करतात. आपल्या बहुतांश चित्रपटांची पोस्टर्स ही सरळसरळ उचललेली असतात हे कटू सत्य आहे. आजकाल इंटरनेटमुळे जग जवळ आलं असताना या पोस्टरचोरीचा लगेच पत्ता लागतो. 'जिंदगी मिलेगी ना दोबारा', 'रा -वन', महेश आणि मुकेश भट्ट यांच्या बहुतेक सिनेमांची पोस्टर्स, 'अतिथी तुम कब आओगे' अशी ही हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढत जाणारी यादी आहे. ज्यांच्याकडे भरपूर पैसा, रिसोर्सेस, मनुष्यबळ अशा आवश्यक गोष्टी आहेत, त्यांनीही उचलेगिरीच्या या ट्रॅपमध्ये अडकावं, हे आपल्या वैचारिक दिवाळखोरीच लक्षण आहे असं खेदानं नमूद करावं लागतं.
चित्रपटांच्या पोस्टर्सचं प्लेसमेंट हा एक घटक आहे. नव्वदच्या दशकात वाढलेल्या पिढीला कुठल्याही भिंतीवर लावलेलं राजकीय नेत्यांच्या प्रचाराची आणि सिनेमाची पोस्टर्स लक्षात असतील. पण तुरळक अपवाद वगळता भिंतीवर पोस्टर लावण्याची कला विरळ होत चालली आहे. आता पोस्टर्स तुम्हाला बिलबोर्ड, फ्लेक्स अशा स्वरूपात बघायला मिळतात. पोस्टरच्या प्रिंट आउट काढत बसण्यापेक्षा निर्माते फेसबुक आणि व्हाट्स अपवर चित्रपटाचं पोस्टर वायरल करण्याला अधिक प्राधान्य देताना दिसतात.
'First impression, is last impression' अशी एक म्हण प्रचलित आहे. चित्रपटाबद्दलच पहिलं इम्प्रेशन निर्माण करण्याचं शिवधनुष्य पोस्टरच उचलतात. त्यामध्ये पुढे बदल होईल असं वाटत नाही. पोस्टर्स बनवणाऱ्यानी या कलेत स्वतःमध्ये कालानुरूप बदल करून स्वतःला कालबाह्य न होऊ देण्याची खबरदारी घेतल्यामुळे ते अजूनही रेलेव्हंट आहेत. पण भारतीय निर्माता दिग्दर्शकांनी उचलेगिरीचा शॉर्टकट घेण्यापेक्षा स्वतःच्या ओरिजिनिलिटीला जास्त वाव द्यायला हवा हे नक्की.
लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment