टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • एम. जे. अकबर, रामनाथ कोविंद, यशवंत सिन्हा, राम रहिम
  • Sat , 30 September 2017
  • विनोदनामा टपल्या एम. जे. अकबर M. J. Akbar रामनाथ कोविंद Ramnath Kovind यशवंत सिन्हा Yashwant Sinha राम रहिम Ram Rahim

१. अर्थव्यवस्थेतील घसरणीवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका करणारे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी तोच सूर कायम ठेवला आहे. देशाची अशी अवस्था होत असताना कोणतीही व्यक्ती मौन बाळगू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशाचा जीडीपी सातत्यानं घसरत आहे, सरकारही हे नाकारू शकत नाही, असं अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात अर्थ खात्याचा कारभार पाहणाऱ्यांना सिन्हांनी म्हटलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतरही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपनं बहुमत मिळवलं. यावर ते म्हणाले, जर कोणी निवडणूक जिंकतो तेव्हा त्याच्या साऱ्या चुका विसरता येणार नाहीत. निवडणुका जिंकणं एक गोष्ट आणि देश चालवणं वेगळी बाब आहे.

‘यशवंत हो, जयवंत हो’ या गाण्यावर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आणि काँग्रेसकडून ‘यशवंत हो, जसवंत हो’ अशा नव्या शब्दरचनेचं गाणं प्रसृत, या दोन बातम्यांची वाट पाहायला हवी आता. यशवंत सिन्हा यांनी एकेकाळी देशाचं अर्थमंत्रीपद भूषवलेलं असल्यामुळे त्यांना काय कळतं अर्थशास्त्रातलं, असं स्वत: बँकेत कॅल्क्युलेटरवर आकडेमोडीची नोकरी करणाऱ्या कोणाही भक्ताला छद्मीपणे म्हणता येणं कठीण. आता सगळी मदार खऱ्याचं खोटं करून दाखवणाऱ्या आयटी सेलवरच आहे म्हणायची... पण, हल्ली लोक त्यावरही फारसा विश्वास ठेवेनासे झाले आहेत.

.............................................................................................................................................

२. संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानला ‘टेररिस्तान’ म्हटल्यानंतर आता किर्गिझस्तानमधील बिश्केक येथील परिषदेत भारतानं पाकिस्तानवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. दहशतवादाला आसरा देणारी सरकारं आत्महत्येला निमंत्रण देत आहेत, अशा शब्दांमध्ये भारतानं नाव न घेता पाकिस्तानवर टीका केली. ‘इस्लाम इन मॉर्डन सेक्युलर स्टेट’ या विषयावर आयोजित परिषदेत भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर म्हणाले, धर्मावर आधारित दहशतवाद आधुनिकतेच्या विरोधात आहे. अशा प्रकारचा दहशतवाद कोणत्याही देशासाठी मोठं आव्हान आहे. ते धर्मावर आधारित असलेल्या एका भूमीला मानतात. ते देशाला मानत नाहीत. त्यांचा देशावर विश्वास नाही. दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांमुळे किर्गिझस्तान, इराक, सोमालिया आणि भारतासारख्या देशांना मोठा धोका आहे,’ असंही अकबर म्हणाले.

नशीब अकबर हे बाहेरच्या देशात, आंतरराष्ट्रीय मंचावर बोलले. इथं बोलले असते तर? आधीच नाव अकबर, त्यात धार्मिक दहशतवादाबद्दल बोलतायत म्हटल्यावर नेमकं कुणाबद्दल बोलतायत, हे कळायची पंचाईत होती. सगळी ट्रोल आर्मी कामाला लागली असती आणि आतापर्यंत अकबर यांची ट्विटरमार्गे मायदेशी, म्हणजे पाकिस्तानात रवानगी झाली असती. मंच बदलला की शब्दांचा अर्थही किती बदलतो, नाही?

.............................................................................................................................................

३. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ८८ व्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. मात्र लतादीदींचा, बहुधा गानकोकिळा या अर्थानं, भारताची नाइटिंगेल असा उल्लेख करणारं राष्ट्रपतींचं हे ट्विट अनेक नेटिझन्सना अजिबात आवडलं नाही आणि त्यामुळे साक्षात राष्ट्रपती काही काळ ट्रोलिंगच्या तडाख्यात सापडले. प्रेसिडंट ऑफ इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी ‘नाईटेंगल ऑफ इंडिया’ वाढदिवसाच्या शुभेच्छा असं ट्विट केलं होतं. स्वातंत्र्यलढ्यातील नेत्या सरोजिनी नायडू यांची ही ओळख त्यांनी लतादीदींना कशी चिकटवली, यावरून त्यांचं ट्रोलिंग करण्यात आलं.

कोण या सरोजिनी नायडू? कवयित्री होत्या का? त्यांची गाणी पद्मजा फेणाणी जोगळेकरांनी गायली आहेत का? स्वातंत्र्यलढ्यात लढल्या म्हणता? पण, जंतरमंतरवर तर दिसल्याच नाहीत. अच्छा, दीनदयाळजी, अटलजी, गोळवलकरजी, श्यामाप्रसादजी ज्या लढ्यात लढले आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या लढ्यात होय. पण, त्या मो. क. गांधी आणि ज. मो. नेहरू यांच्या त्या किरकोळ चळवळीत होत्या काय? तरीच कुणाला माहिती नाहीत. मग त्यांच्याऐवजी लतादीदींना नाइटिंगेल म्हटलं तर एवढं काय झालं? हल्दीघाटीची लढाई बदलून टाकली आपण, एका किताबाची काय कथा!

.............................................................................................................................................

४. जगभरातील शिक्षण क्षेत्रातील स्थितीबद्दल जागतिक बँकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतीय शिक्षणक्षेत्रातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भारतासारख्या देशांमधील लाखो मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळत नाही. त्यामुळे त्यांना भविष्यात चांगल्या संधी मिळत नाहीत. त्यामुळे या मुलांना त्यांच्या आयुष्यात तुटपुंज्या पगारावर काम करावं लागतं, अशी विदारक स्थिती जागतिक बँकेनं अहवालात नमूद केली आहे. भारतातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विद्यार्थ्यांना आयुष्याचे धडे देण्यात अपयशी ठरतं, अशा शब्दांमध्ये जागतिक बँकेनं भारतातील शिक्षण क्षेत्रातील परिस्थितीवर भाष्य केलं. इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या देशातील अनेक विद्यार्थ्यांना एक शब्दही वाचता येत नाही, असं हा अहवाल सांगतो. या यादीत पूर्व आफ्रिकेतील मलावी देशानंतर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

ही जागतिक बँक एखादी एनजीओ आहे का? हिचं फॉरेन फंडिंग बंद करायला हवं. कोणत्या शिक्षणाबद्दल बोलतायत हे लोक? त्या पोटभरू शिक्षणाला आमच्याकडे विचारतो कोण? आम्ही राष्ट्रप्रेमाचे आणि उच्च मूल्यपरंपरेचे धडे देतो, मुलांना भारतीयत्वाचा घनघोर अभिमान शिकवतो. ‘वंदे मातरम’ जर योग्य सुरात म्हणतील, तर सगळं आवश्यक ज्ञान त्यांच्या डोक्यात आपोआप शिरेल, असं स्वदेशी विद्यापीठाचं संशोधन आहे. शिवाय आम्ही गोमूत्र आणि पंचगव्याच्या योग्य मात्रेतून त्यांच्या डोक्यात पुरेसं गोबर म्हणजे पवित्र ज्ञान भरलं जाईल, याचीही काळजी आम्ही घेऊ. त्यांना बाकी काही येवो ना येवो, ‘भारत माता की जय’ म्हणून किंवा कोणतीही अस्मिता चेतवून आम्ही ज्या कोणाकडे बोट दाखवू त्याचे लचके तोडायला धावण्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात करावं, बस्स.

.............................................................................................................................................

५. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला बलात्काराच्या गुन्ह्याखाली २० वर्षांची शिक्षा झाली आहे. मात्र त्याच्या तथाकथित अनुयायांची मग्रुरी कायम आहे. डेरा सच्चा सौदाच्या ‘कुर्बानी आघाडी’नं पत्रकार, हरयाणातील पोलीस अधिकारी आणि डेरा सच्चा सौदाच्या माजी अनुयायांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ‘राम रहिम यांच्याविरोधात बोलणाऱ्या सर्वांना आम्ही संपवू,’ अशी धमकी ‘कुर्बानी आघाडी’कडून पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे. केंद्रातील आणि हरयाणातील भाजप सरकारनं राम रहिम यांची फसवणूक केल्याचा आरोपही या पत्रातून करण्यात आला आहे. ‘डेरातील किमान २०० मुलं राम रहिम यांच्यासाठी प्राणांची बाजी लावायला तयार आहेत,’ असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

घ्या, याला म्हणतात सच्चा सौदा. डेराप्रमुख जे काही सांगेल तीच सच्चाई मानायला कोवळी मुलं तयार होतात आणि त्याच्या पापांवर पांघरूण घालण्यासाठी जीवही द्यायला-घ्यायला तयार होतात. पण, या डेऱ्याबद्दल बोलण्याची देशातल्या इतर कोणत्याही बुवाबाबाच्या किंवा पक्षाच्या किंवा नेत्याच्या किंवा संघटनेच्या अनुयायांची पात्रता आहे का? ते कमीअधिक प्रमाणात वेगळं काय करत असतात?

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......