‘मला जीवे मारण्याची योजना आहे का?’ - रवीश कुमार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
पडघम - माध्यमनामा
रवीश कुमार
  • रवीश कुमार आणि त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेलं मूळ हिंदी पत्र
  • Thu , 28 September 2017
  • पडघम माध्यमनामा रविशकुमार Ravish Kumar नरेंद्र मोदी Narendra Modi

मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, 

आपण स्वस्थ असाल अशी आशा करतो, किंबहुना तसा पूर्ण विश्वास आहे की, तुम्ही सकुशल आहात. मी आपणास उत्तम आरोग्य लाभो अशी इच्छा व्यक्त करतो. आपणास असिमित ऊर्जा सदैव लाभत राहो यासाठी मी प्रार्थना करत असतो. पत्र लिहिण्याचं कारण अगदी सहज आहे. आपणास माहीत असेलच सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममधून भाषेची नैतिकता तुडवली जात आहे. या प्रकियेत आपल्या नेतृत्वात चालणाऱ्या संघटनेचे सदस्य, समर्थक, यांशिवाय विरोधी गटांतील संघटना आणि सदस्यांचा समावेश आहे. या टोळीत सहभागी होणाऱ्यांची संख्या लक्षनीयरीत्या वाढत आहे.

दुख:द बाब ही आहे की, अभद्र भाषा वापरून धमकी देणाऱ्या या टोळीतील काही लोकांना तुम्ही ट्विटरवरून फॉलो करत आहात. अशा लोकांचे अभद्र व्यवहार सार्वजनिक होऊन त्यावर वाद झाल्यानंतरही आपण त्यांना फॉलो करत आहात. भारताच्या पंतप्रधानांच्या सहवासात असे वादग्रस्त लोक असावेत हे आपणास, तसंच आपल्या पदाला शोभणारं नाहीय. काही विशिष्ट योग्यता असल्यामुळे त्यांना आपण फॉलो करत असाल. मला पूर्ण खात्री आहे की, आपण अशा धमकी व शिव्या देणाऱ्यांच्या मतांशी सहमत नसाल. तसंच हिंसक आणि सांप्रदायिक विचार मांडणाऱ्यांची ‘विशिष्ट योग्यता’ आपण मानत नसणार.

एक वेळ हे मान्य करूया की, पंतप्रधानांच्या अगणित विश्वासाचा लाभ घेऊन हे लोक अशा वादग्रस्त भाषेचा वापर करत असतील. पण आपण देशाचे पंतप्रधान आहात. त्यामुळे यावर निरीक्षण करणं आपली जबाबदारी आहे. आपला व्यस्त दिनक्रम मी समजू शकतो, पण आपण कुणाला फॉलो करावं आणि कुणाला करू नये, हे आपली टीम नक्कीच निश्चित करू शकते. हे लोक आपल्या प्रतिष्ठेला अडचणीचे ठरू शकतात. भारताच्या जनतेनं आपल्याला खूप प्रेम दिलंय. यात काही कमतरता राहिली असेल तर तशी आपण पंतप्रधान म्हणून मागणी करू शकता, अगदी आनंदानं आपली मागणी मान्य केली जाईल. पण भारताच्या पंतप्रधानांनी अशा लोकांना फॉलो करावं हे शोभत नाही. माननीय पंतप्रधान आपण अशा लोकांना फॉलो करत आहात, जे सामान्य नागरिकांना शिव्या देतात, अल्पसंख्याक समुदायाविरोधात सांप्रदायिक विचार मांडत असतात. हेच लोक असं म्हणतात की, सरकारवर टीका करणारे अजूनही जिवंत कसे आहेत, याबद्दल ते दु:ख व्यक्त करत असतात.    

altnews.in या वेबसाईटवर वाचलं आहे की, ‘ऊं धर्म रक्षति रक्षित:’ नावाच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मला अश्लील शिव्या दिल्या जात होत्या. मला जीवे मारण्याची भाषा केली जात होती. सांप्रदायिक व हिंसक विचार या ग्रुपवरून मांडले जात होते. या ग्रुपवर माझ्यासारख्या सर्वोच्च देशभक्त आणि इतर पत्रकारांना दहशतवादी घोषित करत होते. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील काही लोकांना आपण ट्विटरवर फॉलो करत आहात, हे ऐकून व वाचून मी स्तब्ध झालो आहे. पंतप्रधान महोदय मी आपणास सांगू इच्छितो की, या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माझ्यासहित इतर काही पत्रकारांबद्दल अश्लाघ्य व स्फोटक भाषा वापरली जाते. ही भाषा मी वाचून दाखवली तर बरेच जण आपले कान बंद करतील. महिला पत्रकारांच्या अनादरार्थ वापरली जाणारी अभद्र भाषा लाजीरवाणी आहे.

सोशल मीडियावर आपल्याविरोधातही अश्लाघ्य भाषेचा वापर होतो. याबद्दल खरंच मला फार दु:ख होतं. पण मी इथं मला आलेल्या व्यक्तिगत धमक्यांवर बोलत आहे. हे लोक गेल्या काही दिवसांपासून मला एकट्याला धमकावत आहेत. ज्या वेळी मी या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून बाहेर पडतो, त्यावेळी ‘पकडा याला, मारा याला’ अशी भाषा वापरत मला पुन्हा-पुन्हा बळजबरीनं अ‍ॅड करण्यात येतं. मी त्यांच्या भाषेची उदाहरणं इथं देऊ शकत नाही, कारण मला माहीत आहे की, मी भारताच्या पंतप्रधानांना पत्र लिहतोय. माझी जबाबदारी आहे की, माझ्या आपल्याविरोधात टीकेच्या भाषेतही मी सौम्य शब्दांचा वापर करून आपल्या पदाचा मान ठेवेन.

राजकारणानं सोशल मीडिया आणि रस्त्यावर जी झुंड तयार केली आहे, एक दिवस ही झुंड समाज आणि विशेष म्हणजे महिलांसाठी मोठं आव्हान ठरेल. यांच्या शिव्या महिलाविरोधी असतात. यांची भाषा इतकी सांप्रदायिक असते की, आपण सहन करू शकणार नाही. आपण २०२२ पर्यंत भारतातून सांप्रदायिकता नष्ट करणार आहात. १५ ऑगस्टच्या आपल्या भाषणाचा प्रभाव या ट्रोलर्सवर पडलेला दिसत नाही, त्यामुळेच ते मला वारंवार धमकावत आहेत.  

आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की, आपण खरंच नीरज दवे आणि निखिल दधिचला फॉलो करता? का करता? काही दिवसांपूर्वी मी यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा स्क्रीन शॉट माझ्या फेसबुक पेज @RavishKaPage वर टाकला होता. altnews.in चे प्रतीक सिन्हा आणि नीलेश पुरोहित यांचा तपास हे स्पष्ट करतो की, या ग्रुपचा एक सदस्य नीरज दवे राजकोटचा रहिवासी असून तो एका एक्सपोर्ट कंपनीचा डिरेक्टर आहे. नीरज दवेला आपण फॉलो करत आहात. जेव्हा मी त्याला ‘अशा अभद्र भाषेचा वापर करू नको’ म्हणालो तर त्यानं लिहिलं की, ‘मला दु:ख वाटतं की तू अजून कसा जिवंत आहेस?’

याच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अजून एक सदस्य निखिल दधिचबद्दल बरंच काही लिहून आलं आहे. दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर या निखिलनामक व्यक्तीनं जी भाषा वापरली, कदाचित अशी भाषा आपणास रुचणार नाही. परंतु अजूनही या व्यक्तीला आपण फॉलो करत आहात. माझी माहिती खरी असेल तर नुकताच भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी चुकीच्या पद्धतीनं एडिट केलेला माझ्या भाषणाचा व्हिडियो शेअर केला होता. यात जी अफवा पसरवली होती ती altnews.in नं निदर्शनास आणून दिली होती. परंतु यावर अमित मालवीय यांनी साधा खेदसुद्धा व्यक्त केला नाही.

मला याची सुतराम कल्पना नव्हती की, हा निखिल दधिच माझ्या मोबाईलमध्ये घुसून आहे. हा एका विषारी सांप्रदायिक असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा तो सदस्य आहे. ज्यात मला बळजबरीनं जोडलं जातं. जिथं माझ्या विरोधात अनेकदा हिंसक शब्द वापरले जातात. खरंच मी कल्पनाही केली नव्हती की, ज्या ग्रुपबद्दल मी गेल्या कित्येक महिन्यांपासून चिंतित होतो, माझ्याविरोधातल्या विखारी मॅसेजचे स्क्रीन शॉट जमा करत होतो, त्या ग्रुप मेंबरचं कनेक्शन आपल्यापर्यंत आहे. कदाचित, हे सर्व खोटं असावं. कदाचित altnews.in नं केलेला तपास चुकीचा ठरावा. पण निखिल दधिच याची आपल्या अनेक मंत्र्यांबरोबरची छायाचित्रं पाहून मला धक्का बसतो.  

एवढंच नाही तर ‘ऊं धर्म रक्षति रक्षित:’ ग्रुपचे बरेच अ‍ॅडमिन आहेत. या अ‍ॅडमिननी आपली नावं RSS, RSS-2 अशी ठेवली आहेत. यातल्या एका अ‍ॅडमिनचं नाव आकाश सोनी आहे. भारताच्या महिला संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासोबत आकाश सोनीची छायाचित्रं आहेत. छायाचित्रं कोणासोबतही असू शकतात, पण हा माणूस कुणाला तरी धमकावणारा व हिंसक विचार मांडणारा ग्रुप चालवतो. आपल्या विरोधात जो कुणी लिहील त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला अटक केली जाते. मी अशा अनेक बातम्या वाचल्या आहेत. खरंच आकाश सोनी RSSचा प्रमुख पदाधिकारी आहे? आकाश सोनी यानं माझ्यासहित अभिसार शर्मा, राजदीप सरदेसाई आणि बरखा दत्त यांचे फोन नंबर आपल्या पेजवरून सार्वजनिक केले आहेत. ही बाब altnews.in च्या रिपोर्टमधून निदर्शनास आली आहे.

माननीय पंतप्रधान महोदय यापूर्वीदेखील आपल्या नेतृत्वात चालणाऱ्या संघटना आणि त्यांच्या नेत्यांनी माझा नंबर सार्वजनिक केला आहे, यांच्याकडून मला वेळोवेळी धमक्या देण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे मी खूप व्यथित झालो होतो, परंतु आपल्याला पत्र लिहिण्यास बसलो नाही. यावेळी मात्र पत्र लिहितोय, कारण मला हे जाणून घ्यायचं आहे की, खरंच माझा जीव घेण्यापर्यंत या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर असणाऱ्यांची मजल जाऊ शकते का? खरंच माझ्या जिवाला धोका आहे का? किंबहुना आपणालाही याबद्दल माहिती असावी यासाठी हा पत्रप्रपंच आहे.

मी एक सामान्य नागरिक असून एक किरकोळ परंतु सजग पत्रकार आहे. माझ्याबद्दल प्रत्येक दुसरा व्यक्ती हे सांगून निघून जातो की, लवकरच आपल्या कृपेनं मी रस्त्यावर येणार आहे. माझी नोकरी जाणार आहे, याचा उत्सव काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर साजरा करण्यात आला होता. बऱ्याच जणांनी सांगितलं आहे व सांगत असतात की सरकार माझ्या मागावर आहे. काही दिवसांपूर्वी ‘हिन्दुस्तान टाइम्स’चे संपादक बॉबी घोष यांना केवळ आपली नापसंती असल्यानं नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. ही बातमी मी thewire.in या वेबसाईटवर वाचली होती. असं सांगितलं जातं आहे की, आता माझी पाळी आहे. हे सर्व ऐकून हसू येतं पण चिंतादेखील होत असते. यावर मला विश्वास करावासा वाटत नाही की, भारताचा एक सशक्त पंतप्रधान एका पत्रकाराची नोकरी काढून घेऊ शकतो. त्यावर काही जण म्हणतात, ‘फक्त काही दिवस वाट पाहा, बघा तुमची नोकरी लवकरच जाईल, तुमची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.’ असं झालं तर ती माझ्यासाठी सौभाग्याची बाब असेन. परंतु असं होऊ देऊ नका. माझ्यासाठी नव्हे तर भारताच्या महान लोकशाहीच्या सन्मानार्थ हे होऊ देऊ नका. लोक सांगतात की माझा आवाज वेगळा आहे, तीक्ष्ण आहे. खरंच माझ्यासाठी या लोकशाही देशात कुठलं स्थान उरलं नाहीय? एका पत्रकाराची नोकरी बळकावण्याची व्यवस्था पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांच्या पातळीवरून होईल? अशा अफवांना मी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून दिल्या जाणाऱ्या धमक्यांना जोडून बघतो. जर आपण अशा लोकांना फॉलो केलं नसतं तर मी हे पत्रदेखील लिहिलं नसतं.

माझ्याकडे अ‍ॅल्युमिनियमची एक पेटी आहे, ही पेटी घेऊन मी दिल्लीत आलो होतो. या २७ वर्षानं मला खूप काही दिलं आहे. तरी ही पेटी मी आजही जवळ बाळगतो. या पेटीसोबत मी पुन्हा माझ्या मोतिहारी गावी परत जाऊ शकतो, पण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. रोजगाराची चिंता कुणाला नसते? मोठ-मोठे बॉलिवुड कलाकार सत्तरीतही जाहिराती करत असतात, यातून फक्त पैसा मिळवणं असा हेतू असतो. या मोठ्या लोकांना घर चालवण्याची चिंता असेल, तर त्या चिंतेतून मी वेगळा कसा असू शकतो. मलाही माझ्या कुटुंबाची जबाबदारी व त्यांची चिंता आहे. आपण माझ्या मुलांना रस्त्यावर पाहू शकाल... इतका राग का आहे माझ्यावर? तरीही माझी मुलं आपणासाठी प्रार्थना करतील. मला रस्त्याविषयी प्रेम आहे. मी रस्त्यावरही प्रश्न विचारत राहील. चंपारणमध्ये जाऊन महात्मा गांधींनी हेच उदाहरण दिलं होते की, सत्ता कितीही मोठी असो, जागा ओळखीची नसली तरी नैतिकतेच्या शक्तीसमोर ती उभी राहू शकत नाही. मी त्याच चंपारणच्या मातीचा एक लहानसा भाग आहे.

मी कुणालाही भीती दाखवण्यासाठी खरं बोलत नाही. महात्मा गांधी नेहमी सांगत असत की, खरं बोलण्यात अहंकार आला तर खरं राहत नाही. मी स्वत:ला अधिक विनम्र बनवण्यासाठी खरं बोलत असतो. माझ्या आत सुरू असलेल्या अंतर्विरोधांवर प्रायश्चित करण्यासाठी मी खरं बोलत असतो. ज्या वेळी मी खरं बोलू शकत नाही त्यावेळी मी लिहू शकत नाही. त्या वेळी मी खऱ्या गोष्टींना घेऊन आत्मकलह करत असतो. मी माझ्या सर्व कमतरतेपासून मुक्त होण्याच्या संघर्षात त्या गोष्टी बोलत असतो. माझ्या बोलण्याच्या पद्धतीवर काहीजण म्हणतात की, तुम्हाला सरकारची भीती वाटत नाही का? मला माझ्यातील कमकुवत बाजूंची जास्त भीती वाटते. त्यांच्याशी लढण्यासाठी मी बोलत असतो. यातून अनेकदा मी हरलोदेखील आहे. त्यावेळी स्वत:ला दिलासा देत राहतो की, या वेळी मी अयशस्वी झालो, मात्र पुढच्या वेळी जिंकण्यासाठी प्रयत्न करेन. सत्तेसमोर बोलणे साहसाचं आहे, ज्याचा अधिकार मला माझी राज्यघटना देते, माननीय पंतप्रधान महोदय आपणच या राज्यघटनेचे संरक्षक आहात.

मी हे पत्र सार्वजनिक स्वरूपात प्रकाशित करत आहे. याची एक प्रत पोस्टानं आपणास पाठवत आहे. जर आपण निखिल दधिच, नीरज दवे आणि आकाश सोनी यांना ओळखत असाल तर त्यांना फक्त इतकं विचारा की, यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मला जीवे मारण्याची योजना तर करत नाही ना! altnews.in ची लिंक पत्रासोबत जोडत आहे. (https://www.altnews.in/alt-news-investigation-people-behind-targeted-harassment-ravish-kumar-via-whatsapp/) पत्र लिहिण्याच्या ओघात अनावधानानं आपला अनादर झाला असेल तर त्याबद्दल क्षमा असावी.

आपला शुभचिंतक
रवीश कुमार
पत्रकार, एनडीटीव्ही इंडिया

मराठी अनुवाद : कलीम अजीम

.............................................................................................................................................

मूळ हिंदी लेखाची लिंक -

http://naisadak.org/i-write-a-letter-to-the-prime-minister-of-india/

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......