अजूनकाही
शकिला गेली, पण कुणी तिची फारशी दखलही घेतली नाही. नविन पिढीला तर शकिला म्हणजे कोण हेच कळणार नाही. पण जर ‘बाबूजी धीरे चलना’चा उल्लेख केला तर सर्वांनाच हे गाणं आठवेल. इथून पुढे बहरलेली गुरुदत्तची कारकीर्द आणि पुढची शोकांतिका लक्षात येते. पुढची दहा वर्षं हिंदी गाण्यांच्या क्षेत्रात ‘टांगा ठेक्या’नं अधिराज्य गाजवणारा ओ.पी.नय्यर लक्षात राहतो. एक-दोन नव्हे तर ५० वर्षांची सर्वांत मोठी कारकीर्द लाभलेले गीतकार मजरूह सुलतानपुरी लक्षात राहतात. गाणं गाणारी गीता दत्त तर काळजात घुसूनच बसते. पण उपेक्षा होते ती केवळ हे गाणं जिच्यावर आहे त्या नायिकेची. तिचं नाव- शकिला.
१९४९ ते १९६३ इतकी छोटी १४ वर्षांची तिची कारकीर्द. जेमतेम ४८ हिंदी चित्रपट. पहिली पाच वर्षं तिचे चित्रपट दुर्लक्षित राहिले. ती प्रकाशात आली पहिल्यांदा गुरुदत्तच्या ‘आरपार’ (१९५४) मध्ये. या चित्रपटातील तिची दोन्ही गाणी अतिशय गाजली. छायाप्रकाशाचा खेळ करणारा गुरुदत्तचा कॅमेरा शकिलाच्या भावपूर्ण मोठ्या डोळ्यांमधील भाव नेमके पकडण्यात यशस्वी झाला. गाण्याचा मादक भाव जसा गीताच्या स्वरांनी नेमका पकडला होता, तसाच तो शकिलाच्या डोळ्यांनीही पकडला होता. हे गाणं होतं सदाबहार ‘बाबूजी धीरे चलना’.
याच चित्रपटात अजून एक सुंदर गाणं आहे. ‘हू अभी मैं जवां ए दिल’. मजरूह यांची शब्दांवर नेहमीच पकड राहिली आहे. ओ.पी. नय्यर यांच्या संगीताला जेव्हा जेव्हा मजरूह, साहिरसारखे प्रतिभावंत गीताकार लाभले तेव्हा तेव्हा त्या गाण्यांना अभिजातता लाभली आहे. या गाण्यात शकिलाच्या डोळ्यात एक उदासीनता नशेच्या आणि मादकतेच्या खाली दडलेली समोर येते. ती कुठेतरी स्त्रीच्या सनातन दु:खाशी जाऊन भिडते.
‘अलिबाबा चालीस चोर’ (१९५४) या चित्रपटात राजा मेहंदी अलीच्या सुंदर शब्दांतलं गाणं आहे, ‘ए सबा उनसे कह जरा, क्यू हमे बेकरार कर दिया’. रफी आणि आशाचे रेशमी स्वरधागे चित्रगुप्त/एस.एन.त्रिपाठी यांनी अतिशय नाजूकपणे गुंफले आहेत. पण हा चित्रपट बी.ग्रेडच्या यादीत गेल्यानं गोड गाणंही बाजूला पडलं. या शकिलासोबत चित्रपटाचा नायक म्हणून महिपाल आहे.
गुरुदत्तचाच पुढचा चित्रपट ‘सीआयडी’ (१९५६) शकिलासाठी अप्रतिम अविस्मरणीय गाणी घेऊन आला. परत मजरूह-ओ.पी.नय्यर-रफी-गीता ही भट्टी जमून गेली. ‘आंखो ही आखों में इशारा हो गया, बैठ बैठ जिने का सहारा हो गया’ हे तसंही ओ.पी.च्या गाण्यातील सर्वोत्तम गाण्यांपैकी एक. शकिलाचे भावपूर्ण डोळे पाहूनच मजरूह यांनी हे लिहिलं असावं. देव आनंदची जोडी नूतनसोबत विशेष गाजली. मधुबाला-वहिदासोबतची गाणीही गोड आहेत. साधना सोबतचे ‘अभि ना जाओ छेाड कर’ विसरताच येत नाही. पण याच यादीत शकिलासोबतच्या या गाण्याचाही क्रमांक लावावा लागेल. त्याशिवाय अशा गाण्यांची यादी पूर्णच होऊ शकत नाही.
याच चित्रपटात ‘लेके पहला पहला प्यार’ हे शमशाद-रफीच्या आवाजातील गाणं अतिशय लोकप्रिय झालं. ते शकिलावरच आहे. याच गाण्याचा दुसरा दु:खी भाग जो की, आशाच्या आवाजात आहे तो फार कमी वेळा ऐकायला अथवा पाहायला मिळतो. त्या गाण्यात विरहाचं दु:ख जसं आशाच्या स्वरात आहे, तसं ते शकिलाच्या अभिनयात पण उमटलं आहे. धृवपदासारख्या रफी-शमशादच्या ओळी त्यात येत राहतात, तेव्हा शकिला कानांवर हात ठेवते. हा अभिनयही गाण्याच्या आशय पुढे नेतो.
पुढे ‘हतिमताई’ (१९५६), ‘रूपकुमारी’ (१९५६), ‘आगरा रोड’ (१९५७), ‘चोबिस घंटे’ (१९५८) मध्ये तिच्यासाठी गाणी होती. पण त्यांची फारशी दखल घ्यावी इतकी ती चांगली नव्हती.
शकिला परत एकदा चर्चेत आली ती १९५८ च्या ‘पोस्ट बॉक्स नं. ९९९’मध्ये. कल्याणजी आनंदजी तेव्हा कल्याणजी वीरजी शहा नावानं संगीत देत होते. लताचा आवाज मन्ना डे सोबत जुळून येतो हे ‘चोरी चोरी’मधून ठळकपणे लक्षात आलं होतं. तेव्हा याचा फायदा घेत कल्याणजींनी या चित्रपटात एक गोड गाणं दिलं आहे- ‘मेरे दिल में है इक बात, कह दो तो बता दू मैं’. तरुण सुनील दत्त आणि शकिला बागेत एकमेकांमागे बागडत गात आहेत. शंकर जयकिशनचा प्रभाव गाण्यावर जाणवतो. पण या चित्रपटातील खरं गाजलं ते हेमंतकुमार सोबतचं लताचं गाणं- ‘ओ निंद न मुझको आये.’ यात हेमंतकुमारच्या खर्जातील आवाज विरहाला अतिशय पोषक वाटतो, तर लताचा गोडवा त्यातील कातरता अजूनच गडद करतो.
काही गाण्यांइतकेच त्यांच्या आधी वाजणारे संगीताचे तुकडे (प्रील्युड) लोकप्रिय होतात. असं एक गाणं ‘काली टोपी लाल रूमाल’ (१९५९) मध्ये आहे. इतकी वर्षं झाली, पण या गाण्याच्या आधीचा माऊथऑर्गनचा तुकडा आजही तितकाच ऐकावासा वाटतो. हे गाणं होतं- ‘लागी छुटे ना अब तो सनम, चाहे जाये जिया तेरी कसम’. संगीताच्या माधुर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चित्रगुप्तचं संगीत या चित्रपटाला होतं. लता-रफीच्या उत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक. शकिलाच्या चित्रपटांचं हेही एक वैशिष्ट्य आहे की, एक तर नायक नवखे होते किंवा बी.ग्रेड चित्रपटातील होते. परिणामी हे चित्रपट दुर्लक्षित राहिले. पण काही गाणी मात्र गाजली. या गाण्यात शकिलासोबत चंद्रशेखर आहे. या चित्रपटातील इतरही गाणी लोकप्रिय ठरली.
१९६० मध्ये आलेला शकिलाचा चित्रपट ‘श्रीमान सत्यवादी’ बऱ्यापैकी चर्चेत राहिला, कारण त्याचा नायक राज कपूर होता. दत्तराम वाडकरनी शकिलासाठी दोन गोड गाणी यात दिली होती. एक होतं सुमन कल्याणपूरच्या आवाजातील ‘क्युं उडा जाता है आंचल’ आणि दुसरं होतं सुमन कल्याणपूर-मन्ना डे आवाजातील ‘भिगी हवाओं में, तेरी अदाओं में, कैसी बहार हैं, कैसा खुमार हैं, झुम झुम झुम ले ले मजा’. शकिलाच्या अभिनयात एक स्वाभविकता राहिलेली आहे. गाण्यांतही तिचे डोळे, चेहऱ्यावरचे हावभाव सहज विभ्रम दाखवतात.
सुनील दत्तप्रमाणेच नवख्या असलेल्या मनोज कुमार सोबत १९६१मध्ये शकिलाचा चित्रपट ‘रेश्मी रूमाल’ आला. त्यातील गाणी गोड असूनही दुर्लक्षित राहिली. एक तर नायक नवखा आणि दुसरं बाबुलसारखा अपरिचित संगीतकार. राजा मेहंदी अली खां यांनी ‘जुल्फों की घटा ले कर, सावन की परी आयी, बरसेगी तेरी दिल पर हस हसके जो लहरायी’ असे सुंदर शब्द लिहीले आहेत. या गाण्यांत डोळ्यांबाबत जे राजा मेहंदी अली यांनी लिहिलं आहे, ते शकिलाच्याच डोळ्यांना लागू पडतं.
‘मचले हुये इस दिल मे आरमांन हजारो है
इन प्यासी निगाहों मे तुफान हजारो है’
लगेच दुसऱ्या कडव्यात अशीच सुंदर ओळ आहे-
‘आती तो आंखो मे बिजली सी चमकती है
शायद ये मोहब्बत है आंखो से छलकती है’
शकिलाचे नशिबच खराब. जर हा चित्रपट मोठ्या बॅनरखाली निघाला असता, दुसरा कुणी लोकप्रिय नायक असला असता तर गाणं गाजलं असतं.
१९५४ च्या ‘बाबूजी धीरे चलना’ची लोकप्रियता लाभलेलं अजून एक गाणं शकिलाला १९६२मध्ये भेटलं. चित्रपट होता शम्मी कपूरचा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेला ‘चायना टाऊन’. आणि गाणं होतं ‘बार बार देखो, हजार बार देखो, देखने की चीज है हमारा दिलरूबा, डाली हो’.
शम्मी कपूर म्हणजे शंकर जयकिशनचं संगीत हे समीकरण अजून पक्कं झालं नव्हतं. शम्मी कपूरची जी गाणी शंकर जयकिशन शिवाय गाजली, त्यात या गाण्याचा क्रमांक लागतो. या गाण्याला मोठी लोकप्रियता लाभली याचा तोटा असा झाला की यातील दुसरी गाणी काहीशी दुर्लक्षीली गेली. ‘ये रंग ना छुटेगा, उल्फत की निशानी है’ हे रफी-आशाचं अतिशय गोड गाणं. शम्मी कपूर-शकिला दोघांनीही अतिशय संयत अभिनय केला आहे. मजरूहसारखा तगडा गीतकार लाभला आहे. पण हे गाणं फारसं ऐकायला मिळतच नाही.
याच वर्षी ‘टॉवर हाऊस’ (१९६२) मध्ये संगीतकार रवीनं लताच्या आवाजात एक चिरवेदनेचं गाणं दिलं आहे, ‘ए मेरे दिल-ए-नादान, तू गम से ना घबराना.’ अवखळ, मादक आव्हान देणाऱ्या शकिलानं या गाण्यालाही योग्य तो न्याय आपल्या अभिनयानं दिला आहे. याचा विचार व्हायला हवा की वैजयंती माला (देवदास), वहिदा रेहमान (गाईड, तिसरी कसम) यांनी सोज्वळ चेहऱ्यानं वेश्येच्या, तवायफच्या भूमिका केल्या. पण ही भूमिका ‘बार डान्स’मध्ये प्रभावीपणे साकारणारी शकिला मात्र यांच्याइतकी चर्चेत राहिली नाही.
‘उस्तादों के उस्ताद’ (१९६३) हा शकिलाचा शेवटचा चित्रपट. काय येागायोग आहे, शकिलाच्या अतिशय गाजलेल्या गाण्यांपैकी एक गाणं हे तिचं शेवटचे गाणं ठरावं. त्या गाण्याचे बोल होते, ‘सौ बार जनम लेंगे, सौ बार फना होंगे, ए जाने वफा फिर भी, हम तुम ना जुदा होंगे’. रफीच्या आवाजातील हे गीत प्रदीपकुमार-शकिलावर चित्रित आहे. या गाण्याच्या आधी एक शेर असद भुपालीनं लिहिला आहे
वफा के दीप जलाये हुये निगाहों में
भटक रही हो भला क्युं उदास राहों में
तूम्हे खयाल है तुम मुझसे दूर हो लेकिन
मैं सामने हूँ चली आओ मेरी धून में
खरंच आपल्या अतिशय मोजक्या अशा काही अविट गोडीच्या गाण्यांतून शकिला आपल्या समोर येत राहिल. आपल्या कानांत तिची गाणी घुमत राहतील. तिचे भावपूर्ण डोळे पडद्यावर पाहताना एखादी कविताच आपण जिवंतपणे साकर होताना पाहत आहोत असा भास होत राहिल. ‘सौ बार जनम लेंगे, ‘शकिला’ ना तुमको भूल पायेंगे’.
(शकिला १९६३ ला चित्रपटसृष्टीला रामराम ठोकून लग्न करून लंडनला निघून गेली. तिची बहीण नुरसोबत जॉनी वॉकरने लग्न केलं. शकिलाची एकूलती एक मुलगी १९९१ मध्ये वारली. ... ही माहिती विकीपिडीयावर उपलब्ध आहे. शिवाय तिच्या ४८ चित्रपटांची यादीही आहे.)
लेखक आफताब परभनवी हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.
a.parbhanvi@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment