‘फेसबुक’ ठीक हो! ‘फेस टु फेस’ कधी भिडणार?
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 26 September 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar राज ठाकरे मनसे शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे

एखाद्या व्यक्तीला संघटन करायचं असेल आणि त्या समूहाचं पुढे नेतृत्व करायचं असेल तर त्याचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रवास हा व्यक्तीकडून समष्टीकडे जातो किंवा जावा. आजवरच्या ख्यातकीर्त अथवा अगदी एका मर्यादित स्वरूपात काम करणाऱ्या, नेतृत्व करणाऱ्यांच्या प्रवासाकडे पाहिलं की हेच दिसून येतं. मग ते राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले यशवंतराव चव्हाण असोत की, हेमलकसाच्या मर्यादित क्षेत्रफळातले प्रकाश आमटे.

मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रवास मात्र बरोबर उलटा चाललाय. विद्यार्थी सेनेच्या नेतृत्वापासून ‘प्रति बाळासाहेब’ ही प्रतिमा (सर्वार्थानं) ठसवणारे राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे वारसदार असतील असं युतीची सत्ता असतानाही सेनेतील अनेकांना वाटत होतं. कारण तोवर ते सैनिकात होते. मात्र ससा-कासवाच्या शर्यतीत उद्धव ठाकरे यांच्या दरबारी राजकारणानं राज ठाकरे यांना सेना सोडायला भाग पाडलं. सेनेसाठी हे मोठं खिंडार बाळासाहेबांच्या हयातीतच घडलं.

राज यांनी इतर (सर्वपक्षीय) बंडखोरांसारखा कुठल्याही प्रस्थापित राजकीय पक्षाचा पदर न धरता स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. फुटीर किंवा बंडखोर काँग्रेसवाल्याला वेगळी चूल मांडतानाही ‘काँग्रेस’ शब्द लागतो, त्याप्रमाणेच राज यांनी ‘सेना’ या शब्दासोबतच आपलं नातं (का हक्क?) ठेवत, पक्षाच्या नावात सेना आणली. आपला पक्ष हा शिवसेनेसारखा प्रादेशिक पक्ष असेल हे पहिल्यापासून ठरवून ‘महाराष्ट्र’ हा शब्दही अपेक्षित. मात्र महाराष्ट्रसेना, मराठीसेना, महासेना अशा शिवसेनासदृश नावांकडे पाठ फिरवत त्यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (जे पुढे ‘मनसे’ म्हणून प्रसिद्ध पावत वाक्प्रचारासारखंही वापरलं गेलं. ‘मन की बात’च्या बरंच आधी ‘मनसे’ अवतरलं!) असं नाव ठेवलं. यातला ‘नवनिर्माण’ हा शब्द त्यांच्या प्रकृती, प्रवृत्ती आणि राजकीय पूर्वेतिहासाला न शोभणारा होता. राजकीय परिभाषेत सांगायचं तर संघ किंवा समाजवादी जनसंघटनांना जवळचा असा हा शब्द. सर्वोदयी, गांधीवाद्यांशी समांतर जाणारा. त्यामुळे राज यांचा पक्ष सेनेपेक्षा वेगळं निर्माण करू पाहतोय असा मॅसेज गेला.

‘मला नवा महाराष्ट्र घडवायचाय’ या त्यांच्या आवाहनासोबतच ‘मी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट करतोय’ या त्यांच्या घोषणेतील नवलाई, ब्ल्यू प्रिंटच्या बहुप्रतीक्षेनंतर ओसरून तिची खिल्ली उडवणं सुरू झालं. आणि प्रत्यक्ष जेव्हा त्यांनी ती सादर केली तेव्हा तिचं बातमीमूल्यही गेलं होतं.

राज ठाकरे यांनी मनसे मोठ्या दणक्यात सुरू केली. स्थापनेची शिवाजी पार्कवरची सभा बघून बाळासाहेबही मनातल्या मनात म्हणाले असतील ‘हे फक्त राजाच करू शकतो!’ बाळासाहेबांच्या निवृत्तीला आणि उद्धव-मिलिंद यांच्या दरबारी राजकारणानं सेनेतही चलबिचल होती. नारायण राणेंसारखे नेते सेना सोडून सेनेवर तुटून पडले होते आणि भाजपसोबतच्या हिंदुत्वात सेनेचं ‘मराठी माणसाच्या न्याय्य हक्क्सांसाठी’ बाजूला पडलं होतं. मराठी माणसाच्या राजकारणाची पोकळी राज यांनी हेरली आणि सेनेच्या ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’प्रमाणे त्यांनी युपी, बिहारींवर निशाणा साधला. मुंबईच्या उपनगरातलं त्यांचं वाढतं प्रस्थ आणि उपद्रव मराठी माणसासोबत इतर मुंबईकरही अनुभवत होतेच. राज यांनी भैय्या, बिहारी यांना टार्गेट करताना अमिताभ बच्चन यांनाही सोडलं नाही. सेनेची ‘राडा संस्कृती’ मनसेनं ‘हुबेहूब’ उचलली आणि यशस्वीही करून दाखवली. पक्षाच्या झेंड्यातले रंग निवडताना निळा व हिरवा यांचा समावेश जाणीवपूर्वक केल्याचं राज यांनी स्वत:चं सांगितलं होतं. आणि त्यामुळे (किंवा सेना\भाजप तिथं असताना) त्यांनी हिंदू कार्ड बाजूला ठेवलं. थोडक्यात त्यांनी आपल्या राजकारणाचं राजकीय, भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रफळ आधीच निर्धारित केलं होतं.

मनसेच्या उदयाच्या वेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीही सत्तेत होती. त्यांना सेना-भाजपचा साप मारायला पाव्हण्याच्या काठीची गरज होतीच! मनसेच्या रूपानं त्यांनी ती आयतीच व दमदार सापडली.

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय यांचा पिंड भाजपसारखा मित्रपक्ष अथवा विरोधी पक्ष यांना थेट संपवण्याचा नाही. ‘ठंडा करके खाओ’ हे त्यांचं ब्रीद. उठलेल्या वादळाची दिशा पाहायची, ताकद पाहायची, ते ओसरेल कसं व कुठे याचा अंदाज घेऊन त्या वादळाची दिशा बदलायची हा काँग्रेसी खाक्या! लढाईपेक्षा तहात केसानं असा गळा कापायचा की केसालाही धक्का लागणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, युपीए आणि त्यांच्या गृहखात्यानं मनसेला योग्य ती स्पेस देत राज ठाकरे यांना राष्ट्रीय माध्यमांत नेऊन प्रस्थापित केलं.

‘प्रति बाळासाहेब’ या प्रतिमेचा योग्य तो वापर करत राज ठाकरे नावाचा झंझावात तयार झाला. पहिल्याच निवडणुकीत लोकसभेसाठी लाखाच्या वर मते, विधानसभेत तेरा आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांत लक्षणीय यश, तर नाशिक महापालिकाच ताब्यात घेतली. २०१४च्या मोदी यशाशी तुलना करता येईल. मर्यादित अवकाशात एकहाती विजय मिळवला होत राज ठाकरेंनी.

इथपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. पण नंतर मात्र पक्षाची निशाणी असलेल्या इंजिनाचं तोंड उलटसुलट फिरवूनही ते ‘पटरी’वरून उतरलं… ते थेट यार्डातच गेलं. लाखाचे बारा हजार झाले म्हणतात ती गत! सोशल मीडियावरचं प्रेरणास्थान टिंगलीचा विषय झालं. राजकारणातले पराभव हे कायमस्वरूपी कधीच नसतात. काही लाटा भल्या भल्या प्रस्थापितांना उताण्या करतात. मनसे तर दहा वर्षांची. पण तिचा पराभव लाटेपेक्षा पक्षाच्या जडणघडणीनं अधिक केला. राज ठाकरे ज्या टायमिंगसाठी ओळखले जायचे, ते तर चुकत गेलंच, पण पक्षाचं संघटन, व्यवस्थापन, धोरण याबाबतीत त्यांनी काही प्राथमिक संकेतही पाळले नाहीत. काकांच्या ‘शाखा ते मंत्रालय’ या प्रवासातून ते काहीच शिकले नाहीत. आज जे मोदींचं होतंय, ते तीन-चार वर्षांपूर्वी राज यांचं झालं!

प्रचंड मोठी प्रतिमा निर्मिती, अपेक्षांची दमदार तोरणं, ‘माझ्या हातात सत्ता द्या आणि बघा’, हा मदारी सदृश रंगतदार खेळ आणि व्यापून टाकलेला मोठा अवकाश. २०१४च्या निवडणुकीआधी भारतभर फिरणारे मोदी, सत्तेवर आल्यावर अनिवासी भारतीय झाले, जाहीर सभांची हौस लोकसभेत पूर्ण बहुमत मिळूनही संपली नाही आणि आजही संसदेपेक्षा मैदान गाजवण्यात मग्न. उदघाटन, लोकार्पण अशा सोहळ्यांची नशा, दुर्घटनांकडे दुर्लक्ष करून पुन्हा ‘मन की बात’मधून ऐकून न घेता फक्त ऐकवते.

राज यांचा प्रवासही साधारण असाच झाला. सुरुवातीच्या जाहीर सभा, त्यांची थेट प्रक्षेपणं यामुळे प्रत्यक्ष संपर्क कशाला? असं म्हणत रोड शोजची खिल्ली उडवणं, स्वत:चे रोड शो बंद गाडीतून करणं, कार्यकर्ते सोडा, नेत्यांच्याही भेटी टाळणं, वृत्तवाहिन्यांवरून पक्षाचे प्रवक्ते काढून घेणं, अगदी ठाण्यासारख्या ठिकाणीही संघटनात्मक धरसोड आणि आयत्या वेळच्या पानसेंसारख्या शरणार्थींना थेट तिकीट, अशा निर्णयांमुळे सामान्य मनसैनिक, सहानुभूतीदार दुखावला गेला. लोकसभा, विधानसभा पराभवानंतर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्ते लढवू इच्छित असताना, त्यांना पाठबळ सोडाच पण थेट ‘लढवायची नाही’चे आदेश! माध्यमांवर, त्यांच्या खांद्यावर बसून गादीवर बसलेल्या मोदी-शहांना आता माध्यमांच्या खांद्यांची टोचणी लागायला लागलीय. राज ठाकरेंचंही तेच झालं. माध्यमांसाठीची त्यांची उपयुक्तता संपल्यावर ती जी मोदींच्या भजनी लागली (सन्माननीय अपवाद वगळता), ती अजूनही टाळ कुटतातच आहेत.

नव्या पिढीच्या नेतृत्वाचा हा गोंधळ देशव्यापी आहे. राहुल गांधी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पंकजा मुंडे, राणे पुत्र, सुप्रिया सुळे या सगळ्यांना राजकीय पक्षाला आवश्यक जनसंपर्काची जवळपास ‘अॅलर्जी’ आहे.

राजकीय वारसदारीतून मिळालेलं संचित गॅझेटसच्या जमान्यात आपण टेक्नोसॅव्ही होऊन वाढवू शकतो असा त्यांचा गैरसमज आहे. तंत्रज्ञान हे पूरक आहे, प्राथमिक नाही हेच ते विसरतात. याबाबतीतला योग्य समतोल फक्त भाजपला जमलाय. केडर बेस पक्ष बहुमतानं सत्तेत असला तरी तळापासूनची कार्यशैली पूर्वीइतकीच सक्रिय ठेवायची हे फक्त भाजपमध्येच चालतं.

त्यामुळे आता राज ठाकरे यांचं फेसबुक पेजद्वारे तरुणांशी पर्यायानं जनतेशी संवाद साधणं हे स्वागतार्ह असलं तरी या व्हर्च्युअल जगापेक्षा, फेसबुकपेक्षा प्रत्यक्ष ‘फेस टु फेस’ भेटून माणसं वाचणं, ऐकणं, समजून घेणं, त्यांच्यात राहणं याला पर्याय नाही. १२५ कोटींच्या देशात आणि १२ कोटींच्या महाराष्ट्रात आपल्या आसपास स्मार्ट फोनचा गराडा असला तरी तो किती टक्क्यांचा? फेसबुकवर शब्द-चित्रांचे फटकारे मारण्यापेक्षा राज ठाकरे यांनी रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना धीर द्यावा, मराठा मोर्चा समजून घ्या. ‘आरक्षण’ म्हटल्यावर झुरळ झटकावं तसं म्हणून राजकीय अपरिपक्वता दाखवू नये. त्यानं डायनिंग टेबलवरचा नवश्रीमंत खुश होईल, पण राजकारण मार खाईल. मंडल आयोगाचा राजकीय व सांस्कृतिक वाढीसाठी उपयोग देशात फक्त भाजपनं करून घेतलाय. महागाई, नोटबंदी, पेट्रोल भाव हे राजकीय नेतृत्वासाठी फेसबुकविषय कसे काय ठरू शकतात? त्यानं तर कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरायला हवं, सरकारला जाहीर प्रश्न विचारायला हवेत, सनदशीर आंदोलनं करायला हवीत. राज ठाकरेंनी फेसबुकपेक्षा ट्विटर हँडलवरून नॅशनल स्पेसमध्ये शिरायला हवं होतं. फेसबुक पेज पक्षानं चालवावं, नेतृत्वाचं काम नाही ते.

एका दिवसात पाच लाखाच्यावर लाईक्स\फॉलोअर्स, पण एका पक्षाच्या नेत्यानं आता किती जणांच्या पोस्ट वाचायच्या? कविता झेलायच्या? प्रतिपादनं मांडायची, खोडायची? आपल्या कोशात जाऊन बसलेले राज ठाकरे फेसबुक वरून पुन्हा कोशातच जाणार. मध्ये एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, मी वाट बघतोय खरं बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या पत्रकारांची!

राज ठाकरे पत्रकारांची का वाट पाहताहेत? ते स्वत:चं का उभं राहत नाहीत? का ते मोदी, भाजप, संघ परिवाराच्या ‘अरे’ला ‘कारे’ म्हणत नाहीत? का नाही ते सेनेला जाब विचारत? केवळ निवडणुका आल्यावरच मैदानं शोधायची?

राज ठाकरे ज्या बाळासाहेबांच्या मांडीवर मोठे झाले, त्यांनी ४०-४५ वर्षं विरोधी पक्षात काढली. पण सेनाभवन आणि मातोश्री इथला सैनिकांचा राबता कमी झाला नव्हता. त्यांना नेत्यांपेक्षा शाखाप्रमुख महत्त्वाचे वाटत. त्यांच्या काळात संपर्क प्रमुख, विभागप्रमुख नव्हते. ते नंतर झाले. सेना उभी केली ती शाखाप्रमुखांनी. आणि तो पाया व्हर्च्युअल नव्हता.

‘फेसबुक’पेक्षा ‘फेट टु फेस’ हा व्यक्तीकडून समष्टीकडे जाणारा राजकारणाचा खरा पाया आहे. आज लोकांच्या असंतोषाला वाचा फोडणारा आवाज हवाय, व्हर्च्युअल नाही तर खऱ्या भूमीवर!

लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Yogesh Melag

Thu , 28 September 2017

sir jordar


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......