टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, शिवसेना, बाबा रामदेव, रविशंकर प्रसाद आणि स्वामी कौशलेंद्र प्रपन्नाचारी फलाहारी महाराज
  • Mon , 25 September 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी शिवसेना बाबा रामदेव रविशंकर प्रसाद आणि स्वामी कौशलेंद्र प्रपन्नाचारी फलाहारी महाराज

१. माणसाच्या शरीराची रचना ४०० वर्षं जगता येईल, अशा पद्धतीची आहे. मात्र चुकीच्या जीवनशैलीमुळे माणूस मृत्यूला निमंत्रण देतो, असे योगगुरू रामदेव बाबा यांनी म्हटलं. सकस आहार आणि योग्य व्यायामाच्या मदतीनं आजार आणि औषधांपासून दूर राहण्याचं आवाहनही त्यांनी लोकांना केलं. आपण चुकीच्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित विकार आणि इतर आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे जीवनमान कमी होतं. आपण डॉक्टर आणि औषधांवर अवलंबून राहू लागतो, असं रामदेव बाबा म्हणाले.

बाबांची थिअरी नेहमीप्रमाणे भारी आहे. नेहमीप्रमाणेच तिला प्रॅक्टिकलचा काही आधार नाही. बाबा जिथं योगविद्या शिकले, त्या मठात आणि हिमालयाच्या परिसरात त्यांच्या मते निर्दोष जीवनशैली जगणारे खूप साधुबाबामहाराज आहेत. त्यांच्यातले कोणी सव्वाशे वर्षाच्या वर मजल मारत नाहीत आणि आजारी पडले की, अॅलोपथीच्याच प्रगत उपचारांचा आधार घेताना दिसतात. जिथं सर्वोत्तम जीवनमान उपलब्ध आहे, त्या देशांमधलं आयुर्मानही अजून शंभरीच्या आसपासच घुटमळतंय. माणसाचं शरीर ४०० वर्षं जगू शकतं, हे संशोधन बाबांनी गंभीरपणे योग्य मंचावर सप्रमाण मांडलं असतं, तर भारत आज एका नोबेल पुरस्काराचा धनी असला असता.

.............................................................................................................................................

२. वाढती महागाई आणि पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीविरोधात शिवसेना मुंबईत रस्त्यावर उतरली. ठिकठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली असून आझाद मैदानात शिवसेना नेते अनिल देसाई आणि खासदार अरविंद सावंत निषेध मोर्चात सहभागी झाले होते. ‘नहीं चाहिये अच्छे दिन; कोई लौटा दे मेरे बीते हुएँ दिन’, ‘नको तो गॅसचा नखरा, बाई आपला चुला बरा’, ‘बहुत हुई पेट्रोल- डिजल के महंगाई की मार, अब उखाड के फेक दो भाजप सरकार’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

देशभरात वाढती महागाई आणि पेट्रोल- डिझेलचे गगनाला भिडलेले दर यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. जनतेमधील या असंतोषाला शनिवारी शिवसेनेनं वाचा फोडली. शिवसैनिकांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली. आदित्य ठाकरेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. निवडणुकीत जे आश्वासन दिलं ते पूर्ण केलंच पाहिजे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.

हे आंदोलन पाहणारे सामान्य नागरिक बिचारे फोनवरून गेल्या दोन दिवसांतच अशी काय महागाई वाढली आहे आणि असे कशाचे दर वाढले आहेत, याची चौकशी करत होते. गेले अनेक महिने जनता वेगवेगळ्या त्रासांनी हैराण झालेली असताना हे कागदी वाघ लुटुपुटूच्या, भाषणाभाषणांच्या लढाया लढून दाखवत होते. आता सत्तासमीकरणं बदलत चालली, तसे देशातल्या सरकारविरोधी हवेवरही हेच स्वार व्हायला निघाले आहेत. इतकं पटत नाही, तर आधी बाणेदारपणे सत्तेतून बाहेर पडा आणि मग आंदोलनं करा.

.............................................................................................................................................

३. भाजपसाठी व्होटबँकेचं राजकारण आणि निवडणुकीतील विजयापेक्षा देशाचा विकास महत्त्वाचा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. पशुधन आरोग्य मेळावा आयोजित केल्याबद्दल मी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन करतो. पशू आम्हाला मत देत नाही, मात्र तरीदेखील आम्ही त्यांचीही सेवा करतो, असं मोदींनी नमूद केलं. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता आवश्यक असते. बहुसंख्य आजारांचं कारण अस्वच्छता असतं. आता ग्रामीण भागात शौचालयांसाठी मोहीम सुरू झाली असून हे चित्र दिलासादायक आहे. देशात आजही अनेकांकडे हक्काचं घर नाही. अशा लोकांना २०२२ पर्यंत हक्काचं घर देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

मोदी इतकं सगळं बोलले तरी वाराणसीतले लोक म्हणे नाराजच होते... ते ज्या गतीनं हे सरकार करतंय, ते सरकार करतंय, हे सरकार देणार, ते सरकार देणार, असं सांगत होते; त्या गतीनं गाडी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये भरण्यापर्यंत जाईल, अशी त्यांची अटकळ होती. पण, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काही मोदी बोललेच नाहीत. शौचालयाचा वापर करण्यासाठी आधी पोटात काही भर असावी लागते, त्या बाबतीतही ते काही बोलल्याचं दिसत नाही. बाकी काही पशूंना आपले मतदार नसलेल्या माणसांपेक्षाही अधिक महत्त्व दिलं की, झापडबंद धार्मिकांच्या मतांचा मेवा मिळतो, हे मोदी यांच्या परिवाराला उत्तम प्रकारे माहिती आहे, हे मतदारांनाही नीटच कळून चुकलं आहे.

.............................................................................................................................................

४. स्वामी कौशलेंद्र प्रपन्नाचारी फलाहारी महाराज या अलवारमधील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरूला बलात्काराच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीसगडमधील २१ वर्षीय तरुणीनं त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. न्यायालयानं ६० वर्षीय बाबा फलाहारी यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. ऑगस्टमध्ये पीडित तरुणी बाबा फलाहारी यांची भेट घेण्यासाठी आश्रमात गेली होती. तिचा पहिला पगार बाबा फलाहारी यांना अर्पण करण्यासाठी ती आश्रमात आली होती. सात ऑगस्टला बाबांनी खोलीत बोलावून आपल्यावर बलात्कार केला आणि या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकीही दिली, असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.

बाबा-गुरू करणारे लोक एवढ्या आध्यात्मिक पॉवरबाज गुरूंकडूनही काहीही शिकत नाहीत, हे अशा घटनेमधून अधोरेखित होतं. पूर्वीच्या काळी पांढऱ्या मारुती कारमधून आलेल्या गुंडांचं पोलीस निर्जन ठिकाणी एन्काउंटर करत. त्यात सगळे गुंड वर्मी नेम लागून मरत आणि पोलिसांपैकी एखाद्याच्या बोटाला वगैरे निसटती गोळी चाटून जात असे. तेवढ्याच साचेबंदपणे बाबांच्या आश्रमात भक्तिणी आशीर्वादासाठी जातात, बाबा खासगी खोलीत बोलावतात आणि ‘कृपाप्रसाद’ देऊन पाठवतात. हे लक्षावधी वेळा होऊनही भक्तिणी बाबांच्या पायावर डोकं ठेवायला एकट्यानं जायच्या काही थांबत नाहीत.

.............................................................................................................................................

५. काही न्यायालयं सरकार चालवण्याची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. ही चिंतेची बाब आहे. न्यायालयांनी न्यायदानाचं काम करावं, आम्हाला जनतेनं निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी सरकार चालवण्याची जबाबदारी आमच्यावर सोडावी, असं प्रतिपादन केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं शुक्रवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. जे निवडून आलेत त्यांची जबाबदारी शासन चालवण्याची आहे. त्यामुळे न्यायालयानं त्यात लक्ष घालू नये, असं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या अधिकाराबाबत सरकार आणि न्यायालय एक मसुदा तयार करत आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यावर असतानाच रविशंकर प्रसाद यांनी हे वक्तव्य केल्यानं त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

आता न्या. अभय ओक यांचंच उदाहरण घ्या. लोकभावनेचा आदर करण्याची जबाबदारी असलेलं लोकनियुक्त सरकार रात्रभर धिंगाणे घालण्याची परवानगी देत असताना त्यांनी ‘बीच में’ फांदा मारला आणि सायलेंट झोन की काय त्यांचा मुद्दा पुढे आणला. हे सरकार शांततेनं जगू पाहणाऱ्या बहुसंख्याकांचं प्रतिनिधित्व करत नाही, ते धिंगाणेबाज उत्सवप्रेमींचं सरकार आहे, इतकंही न्यायाधीशांना कळू नये. थांबा आता. रिटायर झाल्यावर अशा न्यायाधीशांना राज्यपालपदावर, राजदूतपदांवर वगैरे नियुक्ती होण्याचा चान्सच देणार नाही आम्ही लोकप्रतिनिधी!

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......