अरुण साधू : आमच्या पिढीचे लेखक
संकीर्ण - पुनर्वाचन
कुमार केतकर
  • अरुण साधू (१७ जून १९४१ - २५ सप्टेंबर २०१७)
  • Mon , 25 September 2017
  • संकीर्ण पुनर्वाचन अरुण साधू Arun Sadhu महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation कुमार केतकर Kumar Ketkar माणूस साप्ताहिक Manus saptahik

‘सिंहासन’, ‘मुंबई दिनांक’ यांसारख्या समर्थ राजकीय कादंबऱ्या लिहिणाऱ्या, इंग्रजी पत्रकारितेत आपला ठसा उमटवणाऱ्या, उत्तम सदर लेखक, कथाकार, नाटककार आणि पत्रकार-संपादक अरुण साधू यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. साधू यांना गतवर्षी महाराष्ट्र फाउंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. त्यानिमित्तानं २७ डिसेंबर २०१६ रोजी ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झालेल्या लेखाचं हे पुनर्प्रकाशन... चटपटीत वाक्चातुर्य नसलेल्या, भिडस्त स्वभावाच्या आणि अनाग्रही अशा या लेखकाविषयी त्यांचे दीर्घकाळापासूनचे मित्र ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी लिहिलेल्या दीर्घ लेखाचा संपादित अंश...

.............................................................................................................................................

साधू बहुतेक वेळा ‘डीप फ्रीज’ मूडमध्येच असतात. चारचौघं आल्यानंतर जे स्वाभाविक गप्पाजनक वातावरण तयार होतं, त्याचा साधूंच्या मनावर विलक्षण ताण येत असावा. गप्पा-गॉसिप-स्कॅंडल्सच्या बैठकीत-मैफिलीत साधूंचं मन लागत नाही. आणि तसे प्रसंग त्यांच्यावर आलेच तर तिथून केव्हा एकदा सटकतो असं त्यांना झालेलं असतं. त्यांची अस्वस्थता ते चेहऱ्यावर लपवू शकत नाहीत. काही काळ ही अस्वस्थता अनुभवल्यानंतर साधू मनाने त्या बैठकीतून अंतर्धानच पावलेले असतात. लेखक-कवी-रसिकांच्या तासन तास चालणाऱ्या कलासक्त बैठकीत साधू कधीच नसतात, याचं एक कारण म्हणजे त्यांच्या सर्वांगात भरून राहिलेला बुजरेपणा.

कदाचित म्हणूनच मुंबई-पुण्याच्या प्रतिष्ठित ‘एलिट’ वर्तुळात साधू कधी दिसत नाहीत. त्यांच्या समकालीन लेखक-कवींमधले ते सर्वांत लोकप्रिय लेखक असूनही त्यांची महाराष्ट्रातल्या ‘लिटररी एलिट’मध्ये गणना केली जात नाही. याचं एक कारण त्यांचा स्वभाव. जगातल्या एकूण शहाणपणाचा मक्ता आपल्याकडे उपजतच आला आहे, अशी जी आपल्या प्रतिष्ठित एलिट मंडळींची स्वतःबद्द्लची धारणा असते, तशी अरुण साधूंची स्वतःबद्दलची समजूत नाही. जात, स्टेटस, प्रसिद्धी आदी गोष्टींमुळे साधूंच्या चेहऱ्याला तकाकी प्राप्त होत नाही.

हल्लीच्या प्रथितयश-प्रतिष्ठित लेखकांमध्ये कधी कधी दिसणारा शहरी टगेपणा साधूंमध्ये अंशतःही नाही. साधू गेली वीस वर्षं वृत्तपत्र व्यवसायात आहेत. पण अनेक पत्रकारांच्या ठायी दिसणारा अफाट उद्दामपणा आणि अकारण आणलेला नैतिकतेचा आवही साधूंमध्ये नाही. साधूंचा स्वतःचा असा कंपू नाही. त्यामुळे पत्रकारांच्या, लेखकांच्या किंवा सर्वसामान्य वाचकांच्या बैठकीत वा गर्दीत साधू ‘उपरे’च असल्याचं जाणवतं. साधूंचं हे उपरेपण आणि बुजरा स्वभाव कशातून आला असावा? कुठच्या तरी विचाराच्या तारेत, मनात आलेल्या कुठल्याशा कल्पनेच्या कोशात-एखाद्या तंद्रीत ते असल्याचं जाणवणं त्यांच्या मित्रांना नित्याचं आहे.

मी तर अनेकदा पाहिलं-अनुभवलं आहे की, साधू प्रत्यक्ष चालू असलेल्या संवादातही इतके ‘ब्लॅंक’ असतात की, त्यांच्याशी बोलणाऱ्याला वाटावं-आपण बोलतोय ते यांना ऐकू येतंय की नाही? पण असं असूनही साधूंवर कोणीही शिष्टपणाचा आरोप करत नाही. ते बरोबरच आहे. शिष्टपणा करण्यासाठी लागणारा तोरा त्यांच्या स्वभावातच नाही. त्यांच्या या स्वभावामुळे आणि चेहऱ्यावरील विरक्त अलिप्ततेमुळे साधूंच्या काही चाहत्यांनी मनात त्यांच्याबद्दलच्या काही प्रतिमाही ठसवल्या आहेत.

‘‘साधू मोठे गूढ आहेत, नाही?’’ असं म्हणणारी मंडळी मला भेटली आहेत. मात्र साधू गूढबिढ काही नाहीत. ते बुजरे आहेत, काहीसे वेंधळे आहेत, घुमे आहेत. अशी किती तरी माणसं असतात. पण हे गुणविशेष काही विशिष्ट शब्दयोजना करून लेखकाला व त्याच्या साहित्यकृतीला चिकटवले की, गूढ वलयं निर्माण करता येतात. चिं.त्रं. खानोलकरांबद्दल बोलताना साधू एकदा म्हणाले होते, ‘‘त्यांचं फार ‘पॅम्परिंग’ झालंय, त्यांच्याभोवती भ्रमवलयं निर्माण केली गेली आहेत, लेखकांनापण सर्वसामान्य यार्डस्टिक्सनीच मोजायला हवं.’’

मला ही साधूंची भूमिका मंजूर आहे. हा घुमेपणा त्यांच्या स्वभावाचं अंग आहे की, त्यात एक इतरांबद्दल सुप्त बेपर्वाईची भावना आहे? आपल्या आजूबाजूची माणसं इतक्या तन्मयतेनं वा तळमळीनं बोलत आहेत, किंवा इतक्या उत्साहात डुंबली आहेत, वा हास्यकल्लोळात दंग आहेत आणि आपण मात्र स्वतःला त्यापासून तोडून घेतलं आहे याची खंत साधूंना वाटते की नाही हे मला माहीत नाही, मात्र हल्ली साधूंचा हा घुमेपणा कमी होऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांत त्यांची जी अनेक भाषणं झाली त्यामुळे असेल कदाचित. किंवा साधूंच्या ‘ग्रंथाली’तील सहभागामुळेही हा बुजरेपणा ते जाणीवपूर्वक टाकून देत असतील. आम्ही दोघं बरोबर असलो की, मी वक्ता आनि साधू अपरिहार्यपणे (आणि काही वेळा अनिच्छेनेही) श्रोते, ही परिस्थिती आता पालटू लागली आहे. साधूंचा ‘मूड’ असला किंवा एखाद्या विषयाबद्दल त्यांना विलक्षन तळमळीनं वाटत असलं की, त्यांचा शांतपणा, बुजरेपणा कुठच्या कुठे लुप्त होतो. मग खाजगीत चालू असलेलं संभाषण असो की, व्यासपीठावरची चर्चा असो.

डोस्टोव्हस्कीच्या ‘ब्रदर्स कॉरमॉझॉव’, ‘क्राईम अँड पनिशमेंट’, जॉन फाऊल्सची ‘द फ्रेंच लेफ्टनंट्स वुमन’, डॉरिस लेसिंगची ‘गोल्डन नोट बुक’ किंवा ऑर्थर हेली, अॅलन ड्ररी, आयर्व्हिंग वॅलेस आदींचं साहित्य, ‘फीडलर ऑन द रूफ’सारखं नाटक, चार्ली चॅप्लीन, मर्ढेकर, नारायण सुर्वे – असे काही विषय निघाले की, साधूंची वाणी ओजस्वी झालेलीही मी पाहिली आहे. पण तेव्हासुद्धा तो विषय संपला की, खाडकन टेपरेकॉर्डर बंद व्हावा याप्रमाणे साधू मुग्ध होतात.

साधूंचे खरे कम्पॅनियन ते स्वतःच असावेत. त्यामुळे दुसऱ्या कोणाचंही संभाषण हे त्यांच्या स्वतःबरोबर चाललेल्या संवादात लुडबुड केल्यासारखं असतं. साधूंना शास्त्रीय संगीताची (म्हणजे ऐकण्याची) आवड आहे, पण तेसुद्धा मैफलीत नव्हे. घरी, एकट्यानं, रेकॉर्ड प्लेअरवर. साधूंच्या वाचनाचीपण हीच रीत. ते वाचत असतात (मुख्यतः इंग्रजी फिक्शन) तेव्हा आजूबाजूच्या बसमधल्या प्रवाशांना, बाहेरच्या जगाला अस्तित्वच नसतं.

साधू जसे गूढ वगैरे नाहीत तसे भाबडे-भोळसटही नाहीत. ते भिडस्त आहेत. त्यांच्याकडे चटपटीत वाक्चातुर्य नाही आणि त्याबरोबर कधीकधी येणारा खोटेपणाही नाही. आग्रहीपणा नाही तसाच अभिनिवेशही नाही. जशी साधूंची कोणावर ‘छाप’ पडत नाही, तशीच त्यांच्यावरही कोणाची छाप पडत नाही.

साधू तसे मान्यवर पत्रकार आहेत, हे मला वाटतं बहुतेकांना माहीत आहेच. ‘केसरी’, ‘माणूस’, ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि आता ‘स्टेट्समन’ असा पत्रकार म्हणून त्यांचा दीर्घ प्रवास आहे. पण कित्येक पत्रकारांमध्ये दिसणारा उचापतखोरपणा त्यांच्यात नाही. ओळखी करून घेऊन, त्या वाढवून (विशेषतः राजकारणातील व्यक्तींशी) त्यांच्याशी सलगी करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. आणि एखादी खळबळजनक बातमी हाती लागली तरी सनसनाटी शैलीत ती मांडण्याची त्यांची प्रवृत्ती नाही. अरुण शौरी स्टाईलच्या पत्रकारितेला साधूंचा सक्त आणि तीव्र विरोध आहे आणि भानगडी-कुलंगडीयुक्त पत्रकारितेविषयी त्यांना घृणा आहे. म्हणूनच त्यांच्या वृत्तपत्रीय-राजकीय लिखाणात राजकीय व्यक्तींची टिंगल-टवाळी नसते. साहजिकच पत्रकारांमध्येही साधू जरा दूरदूरच असतात.

राजकारणी व्यक्तींविषयी, त्यातून काँग्रेसच्या लोकांविषयी आपल्या समाजात बरेच गैरसमज आहेत. मात्र साधूंना राजकारणी व्यक्तींबद्दल अशी मध्यमवर्गीय घृणा नाही, ही मला हल्लीच्या दिवसात अतिशय महत्त्वाची गोष्ट वाटते. राजकारणातल्या (काँग्रेसमधल्याही) लोकांच्या कामाचा उरक, त्यांची आकलनशक्ती, त्यांचा लोकसंपर्क, त्यांच्यातली अफाट एनर्जी, त्यांचा अष्टावधानीपणा आदी गोष्टींबद्दल साधूंना नितांत आदर आहे. (कदाचित यामुळेही साधूंना एलीटमध्ये स्थान नसावं.)

राजकारण हा साधूंचा आवडता विषय आहे. पण तरीही त्या विषयाचा ऐतिहासिक वा विचारसरणीच्या आधारे, ते अभ्यास करत नसावेत असं मला वाटतं. दूरदर्शनवर झालेल्या एका मुलाखतीत, ‘‘आपल्याला मार्क्सवादी विचारसरणी जवळची वाटते,’’ असं साधू म्हणाले होते. पण मार्क्सवादाच्या मूलभूत वा सैद्धान्तिक वाचनाकडे त्यांचा ओढा असल्याचं जाणवत नाही.

अशा वाचनानं वा निश्चितपणे विचारसरणी स्वीकारल्यानं आपल्या सृजनशीलतेला, स्वातंत्र्याला बांध पडतात असाही त्यांचा समज असू शकेल. आपल्याकडे सृजनशील लेखकांच्या ‘मुक्त’पणाचं बरंच स्तोम माजवलं गेलं आहे. त्यामुळे साधूंचे मार्क्सवादाच्या बाजूनं असल्याचा अर्थ फक्त इतकाच असू शक्तो की, ते कष्टकऱ्यांच्या, शोषितांच्या, त्यांच्या संघर्षाच्या बाजूनं आहेत. अर्थात हेही कमी नव्हे, पण हे पुरंही नव्हे. मात्र साधू बरंच वाचत असतात. अभिजात वाड्मयापासून ते विज्ञान साहित्यापर्यंत. परंतु तत्त्वज्ञान-इतिहास-विचारसरणीचा पुरेसा अभ्यास नसणं (आणि त्याबद्दल विशेष पर्वा नसणे) ही साधूंमधील महत्त्वाची उणीव आहे, असं मला वाटतं.

त्यांच्या कादंबऱ्या, त्यामुळेच की काय, मला फक्त उत्कृष्ट संवेदनापट वाटतात. आजच्या जीवनाचं ‘कोलाज’धर्तीचं चित्रण त्यात मिळतं. साहित्यिकाला समाजातील सुप्त व उघड संघर्षातील शक्तींचं दर्शन आपसूकच होतं, हा साधूंच्या मनातील समज असावा असा माझा अंदाज आहे. तसा तो असेल तर ते मला जरा आगाऊपणाचं आणि चुकीचं वाटतं. पण ‘इंप्रेशनिस्टिक कोलाज’ची पायरी आता तरी साधूंनी ओलांडायला हवी असं मला नेहमी वाटत आलं आहे.

साधूंचं लिखाण विपुल आहे. (जसं वाचनही). त्यांच्या लोकप्रियतेची कारणं म्हणजे विषयविविधता आणि कादंबरी पटावरचं कोलाज पद्धतीचं चित्रण. साधू खूपच वेगानं लिहितात. रात्र-रात्र जागून लिहितात, कादंबरी डोक्यात घुमत असली की, अगदी पहाटे उठून लिहायला बसतात. आली-गेलेली माणसं त्यांच्या कथेच्या ओघात अडथळे आणू शकत नाहीत. लिहायला बसल्यावर त्यांचे कोणतेही नखरे नसतात, अमुक प्रकारचाच कागद, अमुक प्रकारची शाई वा पेन, शांत जागा अशा त्यांच्या कोणत्याही ‘मागण्या’ नसतात. त्यांच्या अनंत पात्रांचं काय करायचं अशी भीती व काळजी साधूंना नसते. साधूंच्याच भाषेत सांगायचं तर त्यांची पात्रंच त्यांचं भवितव्य ठरवतात आणि आजूबाजूची परिस्थितीही तीच निर्माण करतात. साधूंच्या डोक्यात फक्त ‘थीम’ असते. केंद्रकल्पना असते. पुढचं काम पात्रांचं.

‘बहिष्कृत’ कादंबरी त्यांनी अवघ्या तीन-चार दिवसांत सलग लिहून पूर्ण केली होती. ‘त्रिशंकू’ही तशाच झपाट्यात लिहिली होती. ‘स्फोट’सारखी लोकसंख्येच्या प्रश्नावर लिहिलेली विज्ञान कादंबरी असो वा ‘विप्लवा’सारखी परग्रहावरील ‘मानवांच्या’ पृथ्वीच्या दिशेनं आलेल्या अनोख्या प्रवाशांची गोष्ट असो; ‘शापित’सारखी दुष्काळानं देशोधडीला लागलेल्या कुटुंबाची कहाणी असो वा दिवाळी अंकातल्या विविधांगी कथा असोत, साधूंचा झपाटा विलक्षण असतो. पण साधूंचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते आमच्या पिढीचे लेखक आहेत. ‘पिढी’ हा शब्द मी इथं लौकिक अर्थानं वापरत आहे. गेल्या दोन दशकांत आपल्या समाजजीवनाचे जे विविध स्तरांवरचे पैलू प्रकट झाले आहेत, त्यांचं चित्र रेखाटणारे ते लेखक आहेत.

१९६६ ते १९७० या काळात जो जागतिक पातळीवर राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक-वैचारिक उठाव चालू होता, त्या लाटेनं अरुण साधूंना लेखक केलं असं मला वाटतं. साधू संवेदनाक्षम होते, म्हणूनच त्या लाटेमध्ये गटांगळ्या न खाता ते तरू शकले. त्या काळातलं वातावरणच कोणत्याही संवेदनाक्षम तरुण माणसाला अस्वस्थ करणारं होतं. साधूंच्या सर्व लिखाणात त्या अस्वस्थतेच्या छटा उमटल्या आहेत. त्या वातावरणाची वैशिष्ट्यं कोणती होती?

मुंबईत शिवसेनेचं वादळ घोंगावू लागलं होतं. बंगालमधले तरुण कम्युनिस्ट सशस्त्र क्रांतीचा नारा घेऊन खेडोपाडी जाऊ लागले होते. हुशार विद्यार्थीही कॉलेज सोडून कोणत्या ना कोणत्या तरी आंदोलनात पडत होते. याच काळात साधूंचा युक्रांद, दलित पॅंथर, नक्षलवादी तरुण यांच्याशी संबंध आला. पण हा आंदोलनाचा वणवा फक्त देशांतर्गत नव्हता तर जगभरच ती लाट उसळली होती. फ्रान्समधल्या तरुणांनी कॉलेजं बंद पाडून भावनिक-लैंगिक स्वातंत्र्याची मागणी केली होती. हिप्पी व अन्य तरुणांनी नवीन सामूहिक जीवनाची (कम्युनिटी लाईफ) मोहीम हाती घेतली होती. कुटुंबव्यवस्थेवर आघात होऊ लागले होते. या सर्वांतील अराजकातही काही गोष्टी स्पष्ट होत्या. जुनी मूल्यं कोसळत होती आणि नवीन मूल्यांच्या शोधात लोक लागले होते. या घटनांचे साधूंवर संस्कार झाले आहेत आणि त्याचबरोबर त्या काळातील वैज्ञानिक उलथापालथींचेही.

१९६६ ते १९७० याच काळात माणूस चंद्रावर उतरला होता, एका माणसाचं हृदय दुसऱ्याच्या शरीरात बसवण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती, टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला होता आणि मानवानंच निर्माण केलेल्या कॉम्प्युटरनं मानवी समाजासमोरच आव्हान उभं केलं होतं. कॉम्प्युटर, उपग्रह, अंतराळप्रवास, रेडिओ, अॅस्ट्रॉनॉमी या सर्वांमुळे परग्रहावरील मानवाच्या शोधाला जोमानं सुरुवात झाली होती. साधूंसारखा संवेदनाक्षम लेखक हे संस्कार घेऊनही विज्ञान साहित्याकडे वळला नसता तरच नवल.

‘माणूस’ साप्ताहिकानं या सर्वांगीण खळबळीचा धागा पकडला आणि अनेक नवीन तरुण लेखक पुढे आणले. साधूंच्या ‘माणूस’मधील ‘ड्रॅगन जागा झाला’, ‘फिडेल, चे आणि क्रांती’, ‘व्हिएतनामचा संग्राम’ या लेखमाला (आणि नंतर पुस्तके) याच काळातल्या आहेत. अभ्यासवर्गातील कितीतरी तरुण या पुस्तकांनी प्रभावित झाल्याचं मी पाहिलं आहे. त्या काळात उमटलेले स्फुल्लिंग पत्रकारितेच्या स्तरावर ‘माणूस’ने उचललं आणि साधू प्रकाशझोतात आले.

या काळात उसळून आलेल्या लाटांचा आवेग आता ओसरला आहे. पण त्या लाटेबरोबर आलेला आशय अजून ओसरलेला नाही. (परंतु दुर्दैवानं लाट ओसरल्यानंतरच्या वाळूतील शंखशिंपले वेचणारे एकही साप्ताहिक वा मासिक आज मराठीत नाही.)

लोकविज्ञान चळवळ, स्त्रीमुक्ती संघटना, थिएटर अॅकॅडमी, ग्रंथालीसारख्या चळवळी तो आशय प्रगल्भ करू पाहत आहेत. साधूंसारखा तसा लोकविन्मुख माणूस ग्रंथाली चळवळीचा एक कार्यकर्ता आहे, याची कारणंही त्या काळाच्या माहात्म्यातच दडलेली असावीत.

(‘ओसरलेले वादळ’ या कुमार केतकर यांच्या नवचैतन्य प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील दीर्घ लेखाचा संपादित अंश.)

लेखक कुमार केतकर ज्येष्ठ संपादक आहेत.

ketkarkumar@gmail.com

अरुण साधूंच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......