अजूनकाही
“एकदा एक बिनशिडाचं तारु भक्कम जहाजाचा आधार सोडून समुद्रात भरकटलं. मग तगण्याचा एकाकी प्रयत्न करू लागलं. त्यावर फक्त तिघे प्रवासी होते. प्रत्येक जण प्रचंड आशावादी, स्वाभिमानी! होडीचं वल्हं आपल्याच हाती आहे अशा समजुतीत वावरणारा! होडी भरकटत चालली तरी, हाच आपला मार्ग आहे आणि याच मार्गानं आपण कि'नारा' गाठणार यावर मात्र तिघांचही एकमत होतं. अशातच समुद्र खवळला. वादळ उठलं. होडी हेलकावे खाऊ लागली. आता आपण काही तरत नाही, या भयानं तिघंही हादरले. लांबवर एक भव्य जहाज खवळलेल्या समुद्रातही संथपणे पुढे सरकत होतं. तिघांनी त्याकडे पाहून हातवारे सुरू केले. शिट्ट्या वाजवल्या. 'आम्हाला वाचवा' असा आक्रोशही सुरू केला. पण वादळ आणि लाटांच्या तांडवात तो केविलवाणा आवाज तिकडे पोचलाच नाही. मग आसपास आणखी कुणी आपल्यास वाचविण्यासाठी भेटतं का याचाही शोध सुरू झाला.
कुणीच दिसत नव्हतं.
अखेर नाईलाज झाला. होडीचं काय होईल ते आता नशीबावर सोपवावं असा स्वाभिमानी विचार करून तिघेही खवळलेल्या समुद्राकडे हतबलपणे पाहात राहिले.
होडी भरकटतच होती.
लांबवर एक कि'नारा' दिसत होता. होडी हळूहळू तिकडेच जात होती.
सुदैवाने सारे कि'नाऱ्या'वर उतरले.
जीव वाचल्याचा आनंद तिघांनाही लपवता येत नव्हता.
काही वेळ विश्रांती घेऊन ते आत शिरले आणि त्यांना धक्का बसला!
त्या बेटावर एकही प्राणी दिसत नव्हता. माणसाचा तर मागमूसही नव्हता...
तिघेही काही क्षण घाबरले. मधल्याने दाढीवरून उगीचच हात फिरवला.
'आता दाढी वाढवावीच लागणार!' तो पुटपुटला आणि मोठ्याने त्याच्या खांद्यावर थोपटून त्याला धीर दिला.
आता आपणच काहीतरी केलं पाहिजे हे ओळखून आवाजात उसना उत्साह आणून तो म्हणाला,
'चला... आजपासून आपणच या बेटावर राज्य करू! आपण इथले राजे!'
उरलेल्या दोघांचे डोळे चमकले!
आणि तिघंही हातात हात घेऊन उंच आवाजात नारा दिला, 'हा कि'नारा' आमचा आहे!'....
बेटावर चहुबाजूंनी त्या नाऱ्याचा एकमुखी आवाज घुमला!!”
नारायण राणे यांनी काँग्रेस सोडण्यापूर्वी पत्रकारितेतील माझा जुना प्रिय सहकारी दिनेश गुणे यानं 'किनारा'यण!’ ही नारायण राणे किंवा त्यांच्या पुत्रांचा नामोल्लेखही नसलेली, पण त्या तिघांनाच उद्देशून असलेली संकेतकथा फेसबुकवर पोस्ट केली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना राणे यांनी पत्रकार परिषदेत केलेली वक्तव्यं ऐकली आणि दिनेश गुणेची कथा वास्तव व बोचरेपणा यांचं अफलातून उदाहरण आहे याची खात्री पटली.
राणे यांना भाजपमध्ये नेण्याची घाई मीडियाला कितीही झालेली असली तरी काही महिन्यांपूर्वी मी लिहिलं होतं की, त्यांना पक्षात घेण्याची भाजपला मात्र मुळीच घाई नाही; कारण ज्या वस्तूची उपयोगिता संपलेली असते तिचं मूल्य शून्य असतं. टीआरपीच्या नादात किंवा राणे यांच्याच ‘टीप’वरून बातम्या देताना बाजारपेठेचा हा नियम ठाऊक नसावा. अन्यथा राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या इतक्या वावड्या उठवण्याचा उठवळ छचोरपणा मीडियानं केला नसता. सुमारे बारा वर्षांपूर्वी शिवसेना सोडताना राणे यांची जी वट राजकारणात होती, ती आता पार उतरलेली आहे आणि ती मिळवल्याशिवाय त्यांना पुन्हा उठाव मिळणार नाही याचं भान या वावड्या उठवताना राहिलेलं नाही.
एक लोकसभा आणि सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव चाखावा लागल्यानं आणि राहुल गांधी यांनी फेकलेला विधान परिषद सदस्यत्वाचा ‘तुकडा’ लाचारागत स्वीकारल्यावर, राणे यांचे हे असे हाल होणं अटळच होतं. ते फक्त राणे यांना कळत नव्हतं ही गोम होती. त्यामुळेच काँग्रेस सोडण्याची घोषणा करताना राणे जे काही बोलले आहेत, त्याचं वर्णन ‘रुदन’ अशाच शब्दात करावं लागेल.
एकिकडे ‘वैयक्तिक आकांक्षा काहीच नव्हती’ आणि दुसरीकडे ‘मुख्यमंत्रीपद दिलं नाही’, असा गळा काढायचा, अशोक चव्हाण यांच्यामुळे पक्ष वाढत नाही असं म्हणताना जहाज सोडण्याचा निर्णय जाहीर करायचा, ‘काँग्रेस पक्षानं दिलेला शब्द पाळला नाही’ असं म्हणताना नऊ वर्षं मंत्रीपद , एकाच घरात दोन आमदार आणि एक खासदार, सलग दोन निवडणुका हरल्यावरही मिळालेलं विधान परिषद सदस्यत्व, याचा विसर पडणं हे राणे यांचं राजकीय भान सुटल्याचं लक्षण आहे. राणे यांना राजकारणाचं आकलन पक्कं आहे किंवा नाही असाही प्रश्न त्यातून निर्माण झालेला आहे. अहमद (अमद नव्हे!) यांच्या सांगण्यावरून आपण विलासराव देशमुख यांच्या विरोधात बोललो हे जाहीरपणे सांगून आपल्याला स्वत:च्या मतानं नव्हे तर कुणाच्या न कुणाच्या इशाऱ्यावर वागायची सवय आहे, अशी दिवाळखोरी राणे यांनी जाहीर केली. म्हणजे शिवसेनेसारखं भक्कम कवच आणि कायम बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपाछत्राखाली वावरल्यानं त्यांचं तोकडेपण उघडकीला आलेलं नव्हतं, असाच याचा अर्थ आहे. आणि हे दस्तुरखुद्द राणे यांनीच चव्हाट्यावर आणलेलं आहे. काँग्रेसमध्ये ‘जय महाराष्ट्र’ घालण्याची पद्धत नसून ‘मुजरा’ करावा लागतो. काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठींचा कल ओळखून सूर्योदयाचीही दिशा ठरवण्याची प्रथा आणि परंपरा आहे. कोणत्याही मोठ्या पदाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्याला काँग्रेस पक्षात कायम दुर्लक्ष, उपेक्षा आणि अवहेलनाच सहन करावी लागण्याची परंपरा आहे. शिवसेना सोडून राणे यांच्यासोबत जे आले त्यांची काँग्रेसी शैलीत कधीच वाताहत करून टाकण्यात आलेली आहे, हे त्यांना कळू नये आणि त्यांच्या सल्लागारांनीही हे सांगू नये, ही तर भीषण शोकांतिकाच म्हणायला हवी.
राणे यांचं उघडकीला आलेलं तोकडेपण कसं आहे तर - काँग्रेसच्या सलग पराभवासाठी राज्यातील नेत्यांना राणे जबाबदार धरतात, पण देश पातळीवर झालेल्या काँग्रेसच्या सुपडा-साफसाठी ते राहुल गांधी किंवा सोनिया यांना दोषी ठरवत नाहीत. (‘आम्ही सोनिया गांधी यांनी सांगितलं तरच ऐकू. अशोक चव्हाण यांचं ऐकणार नाही,’ असं तद्दन भोंगळ राजकीय विधान निलेश राणे यांनी केलंय!) काँग्रेसच्या विस्तारासाठी जीव तोडून प्रयत्न होत नाहीत असं म्हणत असतानाच, आपण त्यासाठी काय केलं हे न सांगता काँग्रेसनं मुख्यमंत्री करण्याचा शब्द पाळला नाही, हेच केविलवाणं रुदन राणे करत राहतात.
खूप बोल लावूनही अखेर अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्रीपद स्वीकारून राणे यांनी ते पदासाठी आसुसलेले असल्याचं सिद्ध केलं आणि तेव्हापासून त्यांची काँग्रेसमधली वट आणि प्रभाव ओसरण्यास सुरुवात झाली. राणे यांना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याला कोणी रोखलं नव्हतं, पण जो कोकण हा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो, त्याच किल्ल्यात स्वत:चा आणि पुत्राचा पराभव राणे रोखू शकले नाहीत. लगेच झालेल्या पोटनिवडणुकीत मुंबईतही बांद्रा मतदार संघातून राणे दुसऱ्यांदा मानहानीकारक पराभवाला आणि तेही शिवसेनेकडूच सामोरे गेले. याचा अर्थ असा की, कोणत्याही सभागृहात स्वबळावर निवडून येण्याइतपतही राणे यांचा प्रभाव उरलेला नाही, दोन पुत्र आणि एक आमदार वगळता त्यांचा कोणी समर्थक आता उरलेला नाही अशी आजची स्थिती आहे. त्यात या सुपुत्रांनी जे काही ‘कर्तृत्व’ कोकणात दाखवलं (त्याला जनसामान्यांच्या भाषेत मग्रुरी आणि माजोरीपणा म्हणतात!) तेही राणे यांचा कोकणातील प्रभाव ओसरण्याचं एक मुख्य कारण आहे. हे राणे यांनी नाही तरी भाजपनंही चांगलं ओळखलेलं आहे. भाजपमधील एका बड्या नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार राणे यांना भाजपमध्ये प्रवेश मिळणार आहे, पण बहुदा ग्राम पंचायत निवडणुकांत प्रभाव सिद्ध केल्यावरच असं जे बोललं जातं त्यात तथ्य वाटतंय. हे म्हणजे पद्मविभूषण सन्मान मिळाल्यावर मानद वॉर्ड कार्यकारी अधिकारी पदासाठी अर्ज करण्यासारखं झालंय!
युतीत असताना राणे यांना ज्युनिअर असणारे भाजपमधील राज्यातले बहुसंख्य नेते आता निर्णयाधिकारी झालेले आहेत. एके काळी ‘ज्युनिअर’ असणारे देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचा महाराष्ट्राचा चेहरा आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राणे (आज्ञाधारकपणे) काम करतील का, भाजपची वेगळ्या विदर्भाची भूमिका राणे यांना (निमूटपणे) मान्य असेल का, मुख्यमंत्री नसलेल्या पण त्या पदाचे दावेदार असणाऱ्या राणे यांचं नेतृत्व फडणवीस यांना मान्य असेल का, दरवषी एकदा रेशीमबागेत हजेरी लावण्याचा संयम राणे यांच्यात आहे का, राणे यांना तातडीनं एखाद्या सभागृहात निवडून आणायचं कसं... असे अनेक जर-तर, पण-परंतु राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या मार्गात आहेत.
कमी बोलावं आणि संयमानं वागावं ही समजही अजून राणे यांना आलेली नाही, असाही त्यांनी काँग्रेसचा त्याग करताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि सेनेवर, तसेच सर्वच नेत्यांवर जी काही सरबत्ती केली त्यातून समोर आलेलं आहे. या स्वभावामुळे एकतरी मित्र राजकारणात उरेल का असा प्रश्न राणे यांना का पडत नाही, हे काही समजत नाही. शिवसेना सोडताना राणे यांनी शिवसेना संपवण्याचीच भाषा केली होती, प्रत्यक्षात शिवसेना वाढली. सुमारे १३० वर्षांचा काँग्रेस नावाचा विचार, या देशाला राजकारण आणि विकासाचं मॉडेल देणारा काँग्रेस पक्ष आपल्या शापामुळे संपेल, हा राणे यांचा आशावाद भाबडाच म्हणावा लागेल. असे तळतळाट देऊन काहीच साध्य होत नाही, हे तिसऱ्या पक्षांतराच्या तयारीत असलेल्या राणे यांना उमजलेलं नाही, हाही या तोकडेपणाचा आणखी एक अर्थ आहे.
म्हणूनच काँग्रेस पक्ष सोडताना राणे यांनी एखादं शौर्यगीत गायलेलं नाहीये, तर रुदन केल्याचं महाराष्ट्रासमोर आलंय. या रुदनातून अमृत निघालं नाही तर दिनेश गुणे म्हणतो त्याप्रमाणे आणखी एखादा नवा ‘किनारा’ शोधण्याची वेळ भविष्यात येईल. ती वेळ राणे यांच्यावर येऊ नये यासाठी शुभेच्छा!
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment